आषाढ वद्य १

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


“आतां मी सुखानें मरतों !”

शके १५८२ च्या आषाढ व. १ या दिवशीं बाजी प्रभू देशपांडे यानें श्रीशिवाजीमहाराज यांच्या जिवासाठीं आपला प्राणत्याग केला !
सिद्दी जौहार उर्फ सलाबतखान हा शिवाजी ज्या पन्हाळगडावर होता तेथें स्वारीसाठीं चालून आला होता. पन्हाळयाच्या वेढयाचें स्वरुप बिकट झालें. वेढा ढिला पडतांच आषाढ व. १ या दिवशीं मध्यरात्रीं मावळयांची एक हजारांची टोळी घेऊन शिवाजी शत्रूच्या चौक्या - पहारे चुकवून बाहेर पडला आणि थेट विशाळगडाकडे निघून गेला. सलाबतखानाचा जांवई सिदी मसूद व फाजलखान पाठलाग करुं लागले. विशाळगडाचा घाट चढत असतां शत्रु पाठलाग करीत आहे असें पाहून शिवाजीनें बाजीप्रभूस सांगितलें, “मी किल्ल्यावर जाऊन तोफा ऐकवितों, तोपर्यंत शत्रु या खिंडींत थोपवून धर.”
शूर वीर बाजी पभु खिंडींत उभा राहिला. यवन येऊन भिडले. अनेक हल्ले मागें परतविले गेले. फाजलखान ताजा दमाची तुकडी घेऊन आला. बाजीचे बहुतेक लोक पडले होते. तरी तो निकरानें लढत तोफेच्या आवाजाकडे लक्ष देत होता. स्वामिभक्त बाजीला गोळी लागून तो खालीं पडला. प्राणोक्तमणापूर्वी तोफांचे आवाज ऐकूं आले. बाजी प्रभूच्या चेहर्‍यावर समाधान चमकलें. “मी आपली कामगिरी बजावली, आतां सुखानें मरतों” असें म्हणून त्यानें प्राण सोडला.
बाजीप्रभु हा हिरडसचा देश कुलकर्णी. यानें शिवाजीस अनेक वेळां मदत केली होती. मोगल, आदिल, सिद्दी, सावंत, आदि शत्रूंनीं शिवाजीस घेरलें असतांना याच शूर वीरानें प्राणपणानें शिवरायांना मदत केली. शेवटीं आपल्या स्वामीसाठी यानें प्राणहि दिलेला पाहून याच्या एकनिष्ठेची साक्ष पटते. याच्या मृत्यूनंतर उरलेल्या मावळयांनीं शत्रूंच्या अफाट सैन्याला तोंड देत देत याचें शव रांगण्यावर नेलें. शिवरायासाठीं प्राण देणारे असे जे सौंगडी त्या काळांत निर्माण झाले होते त्यांत बाजी प्रभु देशपांडे याचें नांव प्रामुख्यानें चमकणारें आहे.
-१३ जुलै १६६०

N/A

References : N/A
Last Updated : September 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP