आषाढ शुद्ध १५

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


लो. टिळकाचें निधन !

शके १८४२ च्या आषाढ शु. १५ रोजीं भारतातील राजकीय असंतोषाचे जनक, थोर राजकारणी मुत्सद्दी, वृत्तपत्रकार, वेदादि प्राचीन वाड्गमयाचे अभ्यासक, लोकमान्य टिळक यांचा मुंबईला अंत झाला.
टिळकांचें अंत्यदर्शन घेण्यासाठीं मुंबईकडे सारा महाराष्ट्र धांवला, पुण्याहून स्पेशल आगगाडी सुटली. स्मशानयात्रा मुंबईसच निघण्याचें ठरलें. चौपाटीवर दहनविधि करण्यास सरकारनें परवानगी दिली. दिवस रविवारचा होता. दुपारीं दोन वाजतां स्मशान - यात्रा निघाली. अनेक प्रमुख लोकांनीं प्रेतास खांदा दिला त्यांत म. गांधीहि होते. अफाट जनसमुदाय लोटला होता. पाऊस जोराचा पडत होता, तरी त्याची पर्वा कोणाला होती ? दिंडयांचें भजन सुरु असून जागजागीं पुष्पवृष्टि होत होती. चौपाटीवर पोहोंचल्यावर थोर लोकांचीं समयोचित भाषणें झाल्यावर टिळकांचा पार्थिव देह चंदनकाष्ठांच्या सरणावर ठेवून त्यास अग्रिसंस्कार करण्यांत आला.
त्या दिवशींच्या ‘संदेश’ मध्यें अच्युतराव कोल्हटकर लिहितात -
“गेल्या चाळीस वर्षात सूर्यानें इतक्या येरझार्‍या केल्या, वायु इतके वेळ वाहला, समुद्राला इतके वेळ भरती आली, तारे इतक्या वेळां चमकले, पण त्या प्रत्येक चमकण्यानें, भ्रमणानें, लाटेनें, पवनानें हेंच तत्त्व पुन:पुन: प्रस्थापित केलें आहे कीं, टिळक म्हणजेच महाराष्ट्र म्हणजेच टिळक ! ह्या चाळीस वर्षातील एक कृति काढा, एक गोष्ट घ्या, एक वर्तमानपत्र वाचा, एक राजकारण उलगडा, त्या शोधकांना काय आढळेल ? १८८० मध्यें टिळक महाराष्ट्राच्या राजकीय पटांगणांत उतरले आणि १९२० मध्यें ते महाराष्ट्र सोडून गेले. इतक्या अवधींत एकच नांव भरलेलें आहे आणि तें कोणतें ? तर ‘बाळ गंगाधर टिळक !’ टिळकांच्या निधनानंतर सर्व भरतखंडांत त्यांचीं स्मारकें झालीं. मुंबईला ज्या ठिकाणीं त्यांच्या शवाला अग्रि देण्यांत आला त्या ठिकाणीं सन १९३३ मध्यें टिळकांचा भव्य पुतळा लोकनायक बापूजी अणे यांच्या हस्तें उभारण्यांत आला.
- १ आँगस्ट १९२०

N/A

References : N/A
Last Updated : September 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP