ज्येष्ठ वद्य ३०

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.



शेवटची वेल सुकली !
शके १८३९ च्या ज्येष्ठ व. ३० रोजीं दुसर्‍या बाजीरावाची मुलगी कुसुमावती ( बयाबाई आपटे ) वयाच्या सत्तराव्या वर्षी काशी येथें निधन पावली.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस इंग्रजांकडून बाजीराव पराभूत झाला आणि त्याची रवानगी ब्रह्मावर्ताकडे झाली. कुसुमाबाईचा जन्महि याच प्रदेशांत झाला. मराठी राज्याचा शेवट १७४० या शकात झाला. आणि बरोबर शंभर वर्षानंतर पेशव्यांच्या घराण्यांतील शेवटची व्यक्ति बयाबाई हिचाहि अंत १८३९ च्या सुमारास झाला ही योगायोगाची गोष्टच आहे. पेशवे यांनी पुणें सोडल्यानंतर त्यांच्या वंशजाचे पाय पुन्हा पुण्यास लागले नाहींत. शके १८३५ मध्यें मात्र बयाबाई पुण्यास आल्या होत्या. याच वर्षी कै. तात्यासाहेब केळकर यांचें ‘तोतयाचें बंड’ हें नाटक रंगभूमीवर आलें असल्यामुळें नाटककाराच्या आग्रहावरुन कुसुमावतीबाई आपल्या घराण्याचे ‘नाटक’ पाहण्यास आल्या होत्या. “मराठी राज्य नामशेष झाल्यानंतर नाना फडणिसाच्या वाडयाची शाळा बनावी, माणकेश्वराच्या वाडयांत थिएटर यावे, आणि पदभ्रष्ट पेशव्याची कन्या तेथें पार्वतीबाईचें नाटक पाहण्यास बसावी ही करुण प्रसंगाची जुळणीच कल्पनातीत आहे.
कुसुमावतीबाई आपटे वारल्यानंतर कै. अच्युतराव कोल्हटकर यांच्या ‘संदेशां’त पुढील मजकूर आला “कुसुमाबाई अप्रसिध्द होत्या. त्यांचा पिता हतभागी होता; हें जरी खरें असलें तरी त्या श्रीशिवरायांच्या स्वराज्यांतील शेवटचा दुवा असल्यामुळें त्यांचें महत्त्व,  त्यांची किमत, व त्यांच्याविषयींची आदरबुध्दि हीं तिळमात्र कमी होत नाहींत.  भाग्यहीनपणांत कुसुमाबाई वारली,यामुळें तर त्यांच्यासंबंधाने दु:ख करण्याचें दुप्पट कर्तव्य आपल्यावर येऊन पडलेलें आहे. ही शेवटची स्त्री मृत झालेली पाहून, पेशवे कुळांतील ही शेवटची पताका खालीं पडलेली पाहून आपण दु:खी झालें पाहिजे, शोक केला पाहिजे, अश्रूंनीं ही महाराष्ट्र भूमी नाहविली पाहिजे.”
“ती नि:स्पृह, धैर्यशाली व अभिजात असून भटांच्या घराण्यांतील ठेवण तिच्या चेहर्‍यांत दिसते” असें इतिहासकार राजवाडे यांनीं लिहून ठेवलें आहे.
- १९ जून १९१७

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP