ज्येष्ठ वद्य ११

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


फिरंग्यासी बिघाड केला.

शके १६०५ च्या ज्येष्ठ व. ११ रोजीं छत्रपति संभाजी राजे हे ‘स्वार होऊन राजापुरास गेले. फिरंग्यासी बिघाड केला. रेवदंडियासी ( चौलास ) वेढा घातला’
शिवाजीच्या वेळेपासूनच पश्चिम किनार्‍यावर पोर्तुगीझ, सिद्दी व इंग्रज या सत्तांचा धुमाकूळ चालू होता. शिवाजीनें पुष्कळच बंदोबस्त केला तरी सवड सांपडतांच हे लोक मराठयांना त्रास देत असत. “रायगडावरील मराठयांची राजधानी म्हणजे जंजिर्‍याच्या सिद्दीवर मोठेच दडपण उत्पन्न झालें. हा सिद्दी पुढें मोंगल बादशहाचा दर्यावर्दी हस्तक बनला. धर्माच्या व व्यापाराच्या बाबतींत मराठयाचा उच्छेद करणें हें सिद्दी व पोर्तुगीझ या दोघांचेंहि नेहमींचेंच उद्दिष्ट होतें आणि या बाबतींत ते सदैव एकमेकाना साह्य करीत” संभाजीचें लक्ष प्रथमपासूनच पश्चिम किनार्‍याकडे होतें. दरम्यानच्या काळांत शहाजादा अकबर बापावर उठून संभाजीच्या आश्रयास आला. त्याच्या वतीनें संभाजीनें सिद्दी, पोर्तुगीझ, इंग्रज यांना तंबी दिली कीं, खबरदार मोंगलास मदत कराल तर ! परंतु सिद्दी आणि पोर्तुगीझ यांनीं निरनिराळया कारवाया करण्यास सुरुवात केली. अर्थातच त्यांचा पराभव करणें संभाजीला भाग पडलें. तसेंच सिंधुदुर्गाप्रमाणेंच कारवार बंदराच्या तोंडाशीं अंजदीव नांवाच्या बेटावर एक दुर्ग बांधावा अशी शिवाजीची इच्छा होती. त्याप्रमाणें संभाजीनें काम सुरु करतांच पोर्तुगीझ गव्हर्नरानें तें ठाणेंच हस्तगत केलें. अर्थातच संभाजीस त्याचा संताप आला. तो वाढण्याची आणखी एक गोष्ट घडली. मोंगल सेनापति रणमस्तखान यानें मराठयांचा मुलूख जिंकून कल्याण येथें आपलें ठाणें दिलें. मोंगलाचा पराभव संभाजीस करणें शक्य होतें. पण पोर्तुगीझांनीं आपल्या जहाजांतून धान्यसामग्री मोंगलांना पुरवली, त्यामुळें संभाजीचा डाव फसला. शेवटीं संभाजीनें पोर्तुगीझांच्या विरुध्द युध्दच पुकारलें. या युध्दांत प्रथम चौलाचा व नंतर फोंडयाचा वेढा हे दोन निकराचे संग्राम झाले. चौलच्या तटावर मराठयांनीं निकराचा हल्ला केला. पोर्तुगीझांनीं पुष्कळ मराठे कापून काढले. जवळच्या कोरलाईलच्या किल्यावरहि मराठयांनीं छापा घातला. पण स्थळ हातीं आलें नाहीं. पुढें फोंडयाच्या वेढयांत मात्र मराठे विजयी झाले.
- १० जून १६८३
----------------

ज्येष्ठ व. ११
चित्तरंजन दास यांचें निधन !

शके १८४७ च्या ज्येष्ठ व. ११ रोजीं बंगालमधील सुप्रसिध्द वकील, कवि, वृत्तपत्रकार व राजकारणी पुढारी चित्तरंजन दास यांचें निधन झालें.
दासांचें कुटुंब सुसंस्कृत असून ब्राह्मसमाजी होतें. चित्तरंजन दास बी.ए. झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठीं इंग्लंडला गेले. तेथें त्यांनीं बँरिस्टरीच्या अभ्यासाबरोबरच अनेक राजकीय व्याख्यानें देण्याचा उपक्रम केला. भारतांत परत आल्यावर यानीं हायकोर्टात बँरिस्टरी करण्याला प्रारंभ केला. बंगाली भाषेतील ते एक मोठे कवि होते. ‘सागर - संगीत’, ‘किशोर - किशोरी’, ‘अंतर्यामी’, इत्यादि त्यांचे कविता - संग्रह प्रसिध्द आहेत. याशिवाय साहित्य व वैष्णववाड्गमय याच्या चर्चेसाठीं ‘नारायण’ नावांचें मासिक कित्येक दिवस ते चालवीत होते. सन १९१५ मध्यें त्यांना बंगाली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला होता. ‘वन्दे मातरम्‍’ व ‘फाँर्वर्ड’ याहि पत्रांशीं यांचा संबंध होता. ‘वन्दे मातरम्‍’ वरील राज्यद्रोहाचा खटला व माणिकतोळा बागेंतील प्रसिध्द खटला यांमधून त्यांच्या वकिलीकौशल्याची ख्याति होऊन धडाडीचे राष्ट्रीय पुढारी म्हणून चित्तरंजनदास यांची कीर्ति झाली.
सन १९१७ पासून मोठया जोमानें त्यांनीं राजकारणांत भाग घेण्यास सुरुवात केली. “राजकीय पुढार्‍यांत आवश्यक असणारी लढाऊ वृत्ति त्यांच्यांत भरपूर होती. त्याच्याइतका परमावधीचा त्याग आणि असाधारण लोकप्रियता इतरत्र कचितच आढळते. कवीचें हॄदय आणि सत्पुरुषांची उदारता यांच्यांत एकवटली होती. ते एखाद्या राजासारखा दानधर्म करीत ... त्यांनीं आपली सर्व संपत्ति मेडिकल काँलेज व स्त्रियांचा दवाखाना याकरिता देऊन टाकिली. आणि यानंतर लोक यांना ‘देशबंधु’ या नांवानें संबोधूं लागले. त्यांच्या मृत्यूनेम शत्रुपक्षसुध्दां हळहळला. महात्मा गांधींनीं यांच्या स्मारकासाठीं दहा लक्ष रुपये जमविले आणि बेळगांव राष्ट्रसभेच्या वेळीं त्यांच्या इच्छेप्रमाणें त्यांच्या कलकत्ता येथील वाडयाचें हाँस्पिटलमध्यें रुपांतर केलें”
- १६ जून १९२५

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP