ज्येष्ठ वद्य ८

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


“शिंदा दखखनेंत आला !”

शके १७१४ च्या ज्येष्ठ व. ८ रोजीं मराठेशाहींतील प्रसिध्द वीर व मुत्सद्दी महादजी शिंदे हे उत्तरेंतून पेशवाईची व्यवस्था लाविण्याच्या हेतूनें पुण्यास आले.
महादजींचें दक्षिणेंतील आगमन हें अनेक तर्कवितर्काचें व मतभेदांचें प्रकरण तत्कालीन महाराष्ट्रांत निर्माण झालें होतें. “हिंदुस्थान, गुजरात सोडून शिंदा दख्खनेंत आला । हुकूम केला बादशहानें त्याला” या एका पोवाडयांतील पालुपदांतहि हाच भाव व्यक्त होत आहे. पुणें सोडून महादजींना जवळजवळ एक तप झालें होतें. येवढया काळांत बालपेशवे सवाई माधवराव वयांत आले होते, त्यांना पाहण्याची इच्छा शिदे यांना होतीच. पुण्याची सर्व सत्ता आपल्याच हातीं असावी अशी जरी महादजींची इच्छा नसली तरी उत्तरेंतील कारभार अधिक व्यवस्थित राखण्यासाठीं मूळ आधार असणारी पेशवाई खंबीर करावी असा विचार महादजींनीं केला असावा. उत्तरेंतील गैरव्यवस्थेमुळें आणि दगदगीनें शिद्यांना नकोसें झालें होतें. या सर्व भानगडी तुम्हीच सांभाळा असा आग्रह त्यांनीं पेशव्यांकडे व नानांकडे सारखा चालविला होता. नाना फडणिसांनीं त्यांना लिहिलें, “तुमच्याशिवाय दुसर्‍याच्या हातून तिकडची व्यवस्था उरकणार नाहीं; इतकेंहि असून तुम्ही आग्रहानें याल, तर या. दौलतेवर ईश्वराचा क्षोभ झाला, असेंच समजावें लागेल.” तरी सुध्दां पुण्याच्या कारभाराची नीट व्यवस्था लावावी म्हणून महादजी दक्षिणेत आले. मराठयांच्या सार्वभौम सत्तेस इंग्रजांचा मोठाच शत्रु निर्माण झाला होता; तेव्हां त्यांच्याविरुध्द एकजूट करण्याचा उत्तरेंतील सत्ता स्थिर करावी असाहि हेतु शिंदे यांच्या मनांत होताच. त्या दृष्टीनें महाद्जी तरुण माधवरावांना वारंवार भेटून पूर्वपरंपरा समजावून देत होते; पेशव्यांच्यांत मर्दानी व लष्करी पेशाची आवड निर्माण करीत होते. नाना एका पत्रांत लिहितात, “पाटीलबावा जांबगांवींहून ज्येष्ठ व. ८ रोजीं पुण्यास आले. श्रीमंतांचे दर्शनाचा मुहूर्त निश्चयांत आला ... पाटीलबावा येऊन श्रीमंतांचे पायावर डोई ठेवून भेटले. श्रीमंतांनीं आपले गळयांतील मोत्यांची माळ पाटीलबावांचे गळयांत घातली. येणेप्रमाणें समारंभानें भेट बहुत चांगली झाली.”
- १२ जून १७९२

N/A

References : N/A
Last Updated : September 20, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP