ज्येष्ठ शु. १२

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


कालिकत बंदरीं वास्को - ड - गामा !

शके १४२१ च्या ज्येष्ठ शु. १२ रोजीं प्रसिध्द पोर्तुगीझ खलशी वास्को - ड - गामा हा ‘केप - आँफ - गुड - होप’ ला वळसा घालून कालिकत या बंदरांत येऊन दाखल झाला.
हिंदुस्थानाच्या सुवर्णभूमीकडे पश्चिमेकडील व्यापार्‍यांचें लक्ष चौदाव्या - पंधराव्या शतकापासूनच लागलेलें होतें. शके १४१९ मध्यें वास्को - ड- गामा युरोपचा किनारा सोडून निघाला. प्रवासांत सर्व मिळून दोनशें लोक होते. नोव्हेंबरच्या सुमारास त्यांनीं आफिकेचें दक्षिण टोक ओलांडिलें. त्या ठिकाणीं तुफानांचा फारच त्रास झाल्यामुळें लोक कंटाळून गेले. पण पुढें लौकरच ख्रिस्तजयंतीच्या दिवशीं त्यांना जमीन लागली. तिचें त्यांनीं - नाताळ - म्हणजे जन्म -असें अन्वर्थक नांव ठेविलें. त्यानंतर मोंझाबिक, मोंबासावरुन वास्को - ड - गामा मलिंद येथें आला. तेथील राजानें त्याचा सत्कार करुन सांगितलें, “खंबायत येथें न जातां कालिकोट येथें जा.” त्यानंतर प्रवास करीत करीत गामा यानें कालिकत बंदरांत ज्येष्ठ शु. १२ या दिवशीं आपलीं जहाजें नांगरलीं. पोर्तुगीझ लोकांना हा मार्ग सांपडला तेव्हां ‘भुकेलेल्या लांडग्यांचे कळप उत्कृष्ट मेंढरांच्या कळपांवर जसे जाऊन पडतात” तशी त्यांची स्थिति झाली. त्या वेळीं कालिकत हें व्यापाराचें फार मोठें केंद्र होतें. तेथील राजास झामोरिन म्हणजे सामुद्री असें नांव होतें. त्याच्या राज्यांतील व्यापार मक्का व कायरो येथील श्रीमान अरबांच्या ताब्यांत होता. अर्थात्‍ त्यांना पोर्तुगीझांबद्दल वैमनस्य वाटलें. गामा मोठा वस्ताद होता. ‘हरवलेल्या गलबतांचा शोध करण्यास आलों आहों; आतां मसाले वगैरे विकत घेऊन परत जाऊं’ असें राजास गामानें कळविलें.आणि झामोरिननेंहि त्याला वाटेल तो व्यापार करण्यास परवानगी दिली. अनेक प्रकारच्या चिजा गामानें राजास नजर केल्या. राजा खुष झाला. त्यानें कळविलें, “आपल्या घराण्यांतील सरदार वास्को - ड - गामा हे आमच्या राज्यांत आल्यामुळें आम्हांस फार संतोष होत आहे.” त्यानंतर गामानें झामोरिनलाच पराजित करुन पाश्चात्य संस्कृतीचा पाया भारतांत रोविला.
- २२ मे १४९९
==
संभाजी राजे यांचा जन्म !

शके १५७९ च्या ज्येष्ठ शु. १२ रोजीं धर्मवीर छत्रपति संभाजीमहाराज यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म झाला.
दोन वर्षांत़च आई सईबाई वारल्यामुळें त्याचें संगोपन आजी जिजाबाई हिनें केलें. संभाजीचें बालपण साहसांत व धामधुमींतच गेलें. वयाच्या नवव्या वर्षी बापाबरोबर तो आग्र्‍यास गेला होता. तेथें शिवाजीच्या साहसाचा विलक्षण परिणाम त्याच्या मनावर झाला. तो शूर,उदार,आणि दिलदार होता. पुढें तो उतावळा व तामसी बनला. विवेक व शांत विचार त्याला कधीं सुचला नाहीं. समर्थ रामदास व अमात्य रघुनाथ पंडित हणमंते यांच्या संगतीचा व शिकवणीचा उपयोग झाला नाहीं. राज्यावर आल्यावर अनेक प्रकारचीं क्रूर कृत्यें त्याच्या हातून घडलीं. सचिव अण्णाजी दत्तो, त्याचा भाऊ सोमाजी, हिरोजी फर्जद, बाळाजी आवजी, सावत्र मातोश्री सोयराबाई, इत्यादि अनुभवी व थोर माणसे संभाजीच्या क्रोधास बळी पडलीं ! एकटया कलुषाशिवाय त्याचा कोणावरहि विश्वास नव्हता. अशा या संभाजीला शेवटीं अत्यंत कठोर प्रायश्चित पश्चात्तापदग्ध अवस्थेंत मिळाल्यामुळें त्याचे सर्व दुर्गुण लुप्त झाले.
“आज राजापुरास तर उद्यां मडोचेस, आज हबसाणांत तर उद्यां फोंडयावर असा जो एकसारखा विजेप्रमाणें चमकव्त होता, ज्यानें अनेक मुलूख मारुन मोंगल बादशहास जर्जर केलें, गंगेच्या तीरीं सहा हजार विश्वासघातकी लोकांचा मोठया शिताफीनें समाचार घेतला, ज्यानें वाघाप्रमाणे शत्रूवर उडी घालण्यास कधींहि जिवाची पर्वा केली नाहीं त्यास औरंगजेबासारख्या बलिष्ठ बादशहानें व्यसनाधीनतेच्या वन्य अवस्थेंत विश्वासघातानें पकडलें, आणि नीचतेनें त्याचा शिरच्छेद केला. म्हणून आम्ही तज्जातीयांनीं संभाजीचा तिरस्कारच केला पाहिजे असें नाहीं” स्वत:केलेल्या अपराधांचें त्यास मिळालेल्या कठोर प्रायश्चित्तानें महाराष्ट्राच्या अंत:करणांत नवीन चैतन्य निर्माण झालें आणि त्यायोगें पुढें मराठयांनीं सर्व मोगल बादशाही उलथून पाडली. आपल्या राजाच्या अमानुष वधाबद्दल महाराष्ट्रांत सूडाची भावना व्यक्त होत होती.
- १४ मे १६५७


N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP