ज्येष्ठ शु. ५

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


सालबाईचा तह !

शके १७०४ च्या ज्येष्ठ शु. ५ रोजीं इंग्रज आणि मराठे यांच्यांत प्रख्यात असा सालबाईचा तह झाला.
वडगांवच्या तहानुसार राघोबाचा पेशवाईवरील अधिकार नाहींसा झाला होता. बुंदेलखंडांतील बारा लाखांची जहागिरी घेऊन झांशी येथें त्यांनीं राहावें असें ठरलें होतें. पण वस्ताद रघुनाथरावांनीं चोळीमहेश्वरजवळ नर्मदा उतरीत असतांना शिंद्यांच्या फौजेवर हल्ला करुन तिचा नाश केला. व तो इंग्रजांच्या आश्रयास जाऊन राहिला. इंग्रज सेनापति गाँडर्ड यास वडगांवचा तह कबूल नव्हता. त्यानें पावसाळा झाल्यावर गुजराथमध्यें लढाईस सुरुवात केली. डभई व अहमदाबाद हीं शहरें आपल्या ताब्यात घेतलीं. गाँडर्डचा समाचार घेण्यास महादजी शिंदे सिध्द झाले. परंतु फारसा उपयोग झाला नाहीं. कोकणांतील लढाईस सुरुवात झाल्यावर वसई इंग्रजांच्या ताब्यांत गेली. रामचंद्र गणेश मृत्यु पावले. इंग्रजांची सरंशी होत चालल्यामुळें नानांनीं सर्वाची जूट करण्याचा निश्चय केला. शिंदे, होळकर, भोंसले, निजाम, हैदर व फ्रेंच या सर्वांनीं एकत्र व्हावें; व चोहों बाजूंनीं इंग्रजांस वठणीस आणावें अशी योजना होती; पण तीहि नीटशी सिध्दीस गेली नाहीं. हैदरानें मात्र मद्रासकर इंग्रजांस जेर केल्यामुळें इंग्रज तहास तयार झाले; पण नाना हैदराखेरीज तह करण्यास तयार नव्हते. त्यामुळें गाँडर्ड पुण्यावर चाल करुन आला. परशुरामभाऊ पटवर्धन बारा हजार फौजेनिशीं तोंड देण्यास निघाले. हरिपंत, तुकोजी होळकर व नाना यांनींहि तीस हजार फौजेसह गाँडर्डवर हल्ला केला. रसद बंद झाल्यामुळें गाँडर्डचें कांहीं चालेनासें झालें. इंग्रजसेना जर्जर झाल्यावर गाँडर्ड कसाबसा पनवेलीस जाऊन पोंचला. शिंद्यांच्या मदतीनें तहाच्या वाटाघाटी सुरु झाल्या. शेवटी ज्येष्ठ शु. ५ रोजीं सालबाई येथें तह ठरला.  मुख्य कलमें अशीं होतीं
राघोबानें इंग्रजांचा पक्ष सोडावा.
एकमेकांनीं एकमेकांचीं घेतलेलीं ठाणीं परत करावींत.
साष्टी इंग्रजांचेकडेच राहावी.
शिंदे याना मध्यस्थीबद्दल मडोच मिळावें.
- १७ मे १७८२

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP