चैत्र व. ४

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.

‘यदुवंशविलासु’ रामदेवराव दिल्लीस !

शके १२२९ च्या चैत्र व. ४ रोजीं महाराष्ट्रांतील देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यांस मलिक कफूरनें कैद करुन दिल्लीला नेलें.
तेराव्या शतकांत महाराष्ट्रांत रामदेवराव यादव नांवाचा राजा देवगिरी येथें राज्य करीत होता. शके १२१६ मध्यें मोठया फौजेनिशीं दिल्लीपतीचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी यानें देवगिरीवर हल्ला करुन रामदेवरावाचा पराभव करुन अगणित द्रव्य नेलें होतेंच. यानंतर बारातेरा वर्षानीं अल्लाउद्दीनानें तीस हजार घोडेस्वार बरोबर देऊन मलिक काफूरास देवगडावर खाना केलें. हा काफूर खंबायतच्या एका सावकाराजवळ गुलाम होता. बादशहाची मर्जी त्याच्यावर असल्यानें ही कामगिरी त्याकडे आली होती. माळव्यांतून खानदेशच्या वाटेनें सुलतान पुरावरुन तो देवगिरीस आला. या सरदाराशीं लढा देण्यास आपण समर्थ नाहीं असें पाहून रामदेवराव हतबल झाला असतां मलिक काफूरनें त्यास कैद केलें. दिल्लीस गेल्यानंतर तेथे बादशहानें त्याचें स्वागत करुन त्यास एक छत्र, राजाधिराज हा किताब, व एक लाख रुपये बक्षीस दिले; तीन महिन्यांनीं तो परत आल्यावर शके १२३१ मध्यें रामदेवाचा अंत झाला.
रामदेवराव यादव हा कृष्णदेवाचा मुलगा. याच्या राज्यांतच या वेळीं ज्ञानेश्वर - नामदेवांच्या प्रयत्नानें भागवतधर्माचा डंका महाराष्ट्रांत झडूं लागला होता. श्रीज्ञानेश्वरांनीं या राजाचा उल्लेख आपल्या ज्ञानेश्वरींत असा केला आहे:-
“तेथ यदुवंशविलासु । जो सकळकळानिवासु ।
न्यायातें पोषी क्षितीशु । श्रीरामचंद्र ।”
महानुभाव पंथाचा चक्रधर - कृष्ण व हेमाद्रिसारखे जाडे विव्दान्‍ याच्याच काळांत होऊन गेले. कृष्णभक्त बोपदेव याच काळांत चमकला. रामदेवराव वारल्यानंतर आठनऊ वर्षातच देवगिरीचें राज्य नष्ट होऊन महाराष्ट्राचें स्वातंत्र्य हरपलें. आणि नंतर इस्लामी संस्कृतीच्या लाटेखालीं महाराष्ट्रांत भयंकर काहूर माजून राहिलें.
- २४ मार्च १३०७

N/A

References : N/A
Last Updated : September 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP