उध्दवगीता - अध्याय बारावा

उध्दवगीता

भगवान्‍ श्रीकृष्ण म्हणतात, वानप्रस्थाश्रम घेऊ इच्छिणार्‍या पुरुषाने आपल्य पत्नीसह वनात जावे अथवा तिच्या संरक्षणाची जबाबदारी पुत्राकडे देऊन नंतर वानप्रस्थाश्रम घ्यावा; आणि तेथे शांत वृत्तीने आपल्या आयुष्याचा तिसरा भाग म्हणजे ५० ते ७५ वर्षे वनातच घालवावी. ॥१॥
तेथे वनात मिळणारी फळे किंवा मुळे आणि कंद यांवरच आपला उदनिर्वाह करावा. आच्छादनासाठी झाडाच्या साली म्हणजे वल्कले, तृण म्हणजे गवताची तागाची वस्त्रे, अगर झाडाची पाने अथवा मृगांची कातडी, यांचा वस्त्राप्रमाणे उपयोग करावा. ॥२॥
अंगावरील मळ, अंगावरील लव, तोंडावरील केस मिशा अगर दाढी, इ. केस व नखेही काढू नयेत; दात घासू नयेत. तिन्ही काळी पाण्यात डुंबावे, पण अंग घासू नये ! त्याने भूमीचेच अंधरुण करावे. ॥३॥
उन्हाळ्यात पंचाग्रिसाधन करावे, पावसाळी धो धो पाऊस पडत असता पाण्यात बिनतक्रार उभे राहावे आणि थंडीच्या दिवसात गळ्याइतक्या पाण्यात असावे. याचेच नांव शारीरिक तप होय. ॥४॥
अग्रीने भाजलेले अथवा झाडांवर पिकलेले (उन्हात वाळलेले ) अन्न (कंद, मुळे इत्यादी) खावेत. कंद वगैरे कठीण असतील तर उखळांत कांडावे, दगडांनी ठेचावे, अथवा दातांचेच उखळ करुन बारीक करुन खावे. ॥५॥
आपल्या शरीरधारणेसाठी जी काय कंदमुळे वगैरे लागतील, अथवा आच्छादनाला काही हवे असेल ते सर्व आपण स्वत: श्रम करुन जमा करावे. आपण राहतो तो भूप्रदेश , ऋतू व आपले सामर्थ्य जाणून योग्य पदार्थ स्वत: मिळवावेत, दुसर्‍याने दिलेले काही घेऊ नये. ॥६॥
यज्ञकर्मांत वन्य पदार्थांचेच पुरोडाश करुन अग्रिसमर्पण (ईशसमर्पण) करावे. श्रौतामध्ये सांगितलेली पशुहिंसा करुन वानप्रस्थी माणसाने माझे यजन करु नये. ॥७॥
पूर्वीप्रमाणेच (पण पशुहिंसा न करीता) अग्रिहोत्र, दर्श, पूर्णमास, चातुर्मास्ये, ही श्रुतिविहित कर्मे वानप्रस्थ मुनीने करावीत. ॥८॥
अशा रीतीने आचरलेल्या दीर्घ तपश्चरणाने शरीरावर सर्वत्र शिरांचे जाळे असलेला मुनि, जर तपव्दारा माझे ( तपोमय असणार्‍या माझे) आराधन करील,  तर तो ऋषिलोकास जाऊन तेथून माझ्या म्हणजे ब्रह्मलोकास येऊन पोहोचेल. ॥९॥
याप्रकारे अत्यंत कष्ट सोसून आचरलेले, मोठया योग्यतेचे मोक्षदायक जे खडतर तप, त्याचा विनियोग, तुच्छ अशा विषयप्राप्तीसाठी करणार्‍या पुरुषांपेक्षा मूर्ख दुसरा कोण असणार ? ॥१०॥
म्हातारपणामुळे हात, पान मान, इत्यादी कापू लागल्यामुळे वानप्रस्थाची कर्तव्ये मुनीला उरकता येईनाशी झाली तर त्याने जिवंत ठेवलेल्या अग्रीचा समारोप आपल्या प्राणात करावा, आणि माझे म्हणजे परमेश्वराचे ठिकाणी चित्त ठेऊन अग्रीत प्रवेश करावा. ॥११॥
परंतु कर्माचे फल भोगण्यासाठी जे बरे वाईट लोक (भुवने) मिळतात, ते सर्व अत्यंत दु:खरुप प्रत्यक्ष नरकवासच आहेत, असे ज्ञान झाल्यामुळे वानप्रस्थाला वैराग्य प्राप्त झाले असेल, तर शास्त्रोक्त पध्दतीने अग्रीचा त्याग करुन नंतर त्या विरक्त वानप्रस्थाने चतुर्थाश्रमात शिरावे- संन्यास घ्यावा. ॥१२॥
या विरक्ताने कर्मे मला अर्पण करावी, आपल्याजवळ जे काया असेल ते आचार्याला देऊन टाकावे, अग्नीस प्राणरुपी आत्म्यात ठेवावे आणि मन सर्वथा निरिच्छ होऊन संन्यासी व्हावे. ॥१३॥
संन्यास घेण्याच्य प्रसंगी भार्यादिरुपाने देवच आडवे येतात व विघ्ने उत्पन्न करतात. कारण त्यास भीती वाटते की हा विरक्त आम्हास ओलांडून परब्रह्मच गाठील व आम्हास हव्य मिळणार नाही. ॥१४॥
संन्याशास दुसरे वस्त्र हवेसे वाटले तर लंगोटीशिवाय तितक्याच लांबीरुंदीचे वस्त्र घ्यावे. कारण आश्रम घेताना सर्वस्वाचा त्याग केला असतो म्हणून त्याने शरीरस्वाथ्य असताना दंडकमंडलूशिवाय दुसरे काही जवळ ठेवू नये. ॥१५॥
पुढे अपवित्र काही नाही, असे पाहून नेहमी पाऊल टाकावे, वस्त्राने गाळून पाणी प्यावे, शुध्द- सत्य तेच बोलावे आणि विवेकाने शुध्द आचारावे. ॥१६॥
वाणीचा निग्रह करणारा मौनरुपी दंड, शरीराला नियमित रीतीने वागण्यास लावणारा वासनांचा अभावरुपी दंड व चित्ताला दाबांत ठेवणारा प्राणायामरुपी दंड, हे तीन दंड, जो बाळगीत नाही, त्याने कितीही वेळूचे दंड बाळगिले, तरी त्याला यतित्व प्राप्त होत नाही. ॥१७॥
पतित लोक वर्जून चारी वर्णात भिक्षा मागावी. अकल्पित अशा सात घरी मात्र भिक्षा मागावी, व जे काय मिळाले असेल, त्यांत संतोष मानावा. ॥१८॥
नंतर गावाबाहेर असणार्‍या जलाशयावर जाऊन ती भिक्षा जलात बुडवून शुध्द करावी, अथवा मंत्राने प्रोक्षावी. त्या शुध्द भिक्षेचे चार भाग करावे; दोन भागांचे सेवन करावे. ॥१९॥
एकटयाने पर्यटन करावे, नि:संग असावे; इंद्रिये निग्रहावी; आत्म्यात रममाण व्हावे, आत्म्यावरच सर्वस्व प्रेम ठेवावे, आत्मचिंतनांतच निमग्र असावे; आणि सर्वत्र समदृष्टि असावे. उच्च -नीच ही भावना नसावी. ॥२०॥
नेहमी एकांत असणार्‍या निर्भय स्थानी असावे. माझ्या चिंतनाने अंत: करण शुध्द करावे. एकच आत्मा आहे व तो परमात्म्याहून भिन्न नाही, माझ्याशी एकरुप होऊन मुनीने अखंड ध्यान करावे. ॥२१॥
आत्म्याला बंध कसा प्राप्त होतो व तो मुक्त कसा होतो, याचा विचार ज्ञाननिष्ठेच्या साह्याने अखंड करावा. उध्दवा ! इंद्रिये विक्षेप उत्पन्न करतात. त्या योगे जीवात्मा बध्द होतो. परंतु त्यांचा निग्रह केला तर जीवात्मा मुक्त होतो. ॥२२॥
म्हणून त्या षड्‍वर्गांचा (कामक्रोधादी षड्‍ रिपुंचा) संयम माझे स्वरुप ध्यानात धरुन करावा, तुच्छ कामना टाकून देऊन त्याने विरक्त व्हावे. मोठा जो आत्मानंद त्यांत  निमग्र होऊन जीवयात्रा कंठावी. ॥२३॥
नगरे, खेडेगाव, गोकुळे, यात्रास्थाने, येथे इच्छेनुसार जाऊन भिक्षा मागावी. पुण्यक्षेत्रे, गंगेसारख्या नद्या, हिमाचलासारखे पर्वत, अव्दैतवनासारखी तपोवने,ऋषींचे आश्रम इत्यादि स्थानांनी पवित्र झालेली भूमि संचारार्थ उपयोजावी. ॥२४॥
भिक्षा मागणे ती विशेषत: वानप्रस्थांच्या आश्रमांत मागावी, कारण शिलोछ वृत्तीने संपादलेले वानप्रस्थांचे अन्न भिक्षूला पवित्र करते, मोह निरस्त करते आणि चित्तशुध्दिनामक जी सिध्दी ती लवकर  प्राप्त करुन करुन देते. ॥२५॥
हे विश्व  व या विश्वातील सर्व पदार्थ इंद्रियांस गोचार होणारे म्हणून ते नश्वर अर्थात्‍ = मिथ्या आहेत, असे समजून घ्यावे. आणि हे  दृश्य विश्व मिथ्या आहे, हे जाणून त्यावर केव्हांही आसक्ती ठेवू नये. इतकेच नव्हे तर ऐहिक व स्वर्गीय भोगांपासून व भोगाच्या इच्छांपासूनही निवृत्त व्हावे. ॥२६॥
मन, वाणी व प्राण, यांच्यासह असणारे हे विश्व म्हणजे आत्म्याच्या आश्रयाने विलसणारी माय आहे, असे प्रमाणशुध्द तर्काने ठरवावे; आणि आपल्या आत्मस्वरुपात स्वस्थ राहावे. फार काय? त्याचे स्मरण सुध्दा ठेऊ नये. ॥२७॥
तो यती ज्ञाननिष्ठ असून विरक्त असो, अथवा माझा अनन्य भक्त असल्यामुळे निष्काम असो, (ब्रह्म व आत्मा एकच अशी ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठा असणारा यती वैराग्यसंपन्न असतो, असाच ईश्वराचा जो अनन्य भक्त असतो तोही निष्काम म्हणजे विरक्त असतो. तात्पर्य, नैष्ठिकज्ञानी व नैष्ठिकभक्त यांनी आश्रमांचा त्याग खुशाल करावा. श्रुतीने सांगितलेल्या विधींच्या तावडीत न सापडता विहार करावा. ॥२८॥
प्रौढ असताही हे ज्ञानी भक्त अर्भकाचे (लहान मुलांचे) खेळ खेळतील, संकटे टाळता येत असताही जडाप्रमाणे (दगडधोंडयाप्रमाणे) ती ती संकटे सहन करतील. ॥२९॥
काय करावे, काय नाही, या वेदवादांच्या फंदांत ते पडत नाहीत. ते नास्तिक नसतात व तर्कादिकांचे दासही नसतात. निरर्थक वाद न करिता कोणताही पक्ष स्वीकारीत नाहीत. असे ते असतात अथवा त्यांनी असावे. ॥३०॥
हे बुध्दिमान्‍ समाजाला कंटाळत नाहीत अथवा समाज कंटाळेल असेही वागत नाहीत. कोणी वेडेवाकडे वोलते तरी ते सहन करावे, परंतु कोणाचाही अपमान करु नये. ॥३१॥
कारण सर्व भूतांच्या ठिकाणी व आपल्या जीवात्म्यांतही एकचएक अव्दितीय परमात्मा अखंड वास्तव्य करीत आहे, तसेच सर्व भूते आत्मनिर्मित आहेत, असे ज्ञान असल्यामुळे, ते व्देषापासून अलिप्त राहतात. अनेक जलपात्रात प्रतिबिंबलेला चंद्र , एकच असतो, परंतु निरनिराळ्या पात्रांतील त्याची प्रतिबिंबे एकात्मच असतात. ॥३२॥
धीरवंत ज्ञानी कधी पुष्कळ भिक्षा मिळाली म्हणून आनंदत नाहीत, किंवा मुळीच मिळाली नाही म्हणून खिन्नही होत नाहीत. हर्षविषादांच्या पलीकडे हे साधू गेलेले असतात. ॥३३॥
तथापि, शरीर जिवंत राहावे म्हणून मात्र भिक्षा मागण्याचा प्रयत्न करावा. कारण, या मनुष्यदेहामध्येच जीवाला मोक्ष मिळवून देण्याचे सामर्थ्य असते. अर्थात्‍ प्राणधारणाची युक्तता अवश्य आहे. ॥३४॥
जे काय अन्न, वस्त्र व निजण्याचे ठिकाण यदृच्छेने प्राप्त होईल, त्यावर ते संतुष्ट असतात. ॥३५॥
शौच, आचमन, स्नान, जप, ध्यान, उपासना वगैरे ते करतात; पण श्रुती ते कर्म करावयास सांगते म्हणून मात्र नव्हे. कारण श्रुतीने सांगितलेल्या फलांची आशाच त्यांना नसते. तर परमेश्वर जसा लीलेने व स्व पणे वागतो व कर्म करतो, तसेच हे ज्ञानी स्वतंत्रत: कर्म करीत असतात. ॥३६॥
हे ज्ञानी माझेच चिंतन व ध्यान  करीत असल्यामुळे, त्यांची भेदबुध्दी नष्टच झालेले असते. विकल्प अथवा भेद त्यांच्या गावी सुध्दां नसतो. देह आहे तोवर इंद्रिये त्यास भेद दाखवतात; देह पडला की हे ज्ञानी मद्रूपच होतात. ॥३७॥
आता ज्यास ब्रह्माचे परोक्ष वा अपरोक्ष ज्ञान करुन घ्यावयाचे आहे, त्या जिज्ञासूंनी प्रथमत: येथील व स्वर्गातील सर्व भोग व भोगेच्छा दु:खपूर्ण आहेत, त्यांपासून उव्देजित होऊन नंतर ज्ञानी व साक्षात्कारी गुरुला अनन्य शरण जावे. ॥३८॥
तेथे राहून या जिज्ञासूंनी पूर्ण श्रध्देने व निर्मत्सर बुध्दीने गुरुसेवा करावी. गुरु म्हणजे परमात्मा अशी भावना आदराने ठेवावी. या सेवेने व एकनिष्ठ श्रवणाने गुरु प्रसन्न होऊन तो ब्रह्माचा साक्षात्कार करुन देईतोपर्यंत त्याच्या आश्रमात राहावे.॥३९॥
भगवान्‍ म्हणतात, उध्दवा ! परंतु ज्याचे कामक्रोधादी अनावर आहेत, इंद्रिये स्वैर असून विवेकसारथ्याच्या लगामी नाहीत, ज्याला ज्ञान ना वैराग्य, त्याचा त्रिदंडी संन्यास केवळ पोटभरण्याचा धंदा होय. ॥४०॥
असा हा धर्मघाती भोंदू, यज्ञसंबंधी देवांचा, स्वत:च्या जीवात्म्याचा व तेथेच नित्य राहणार्‍या माझा म्हणजे परमात्म्याचा तिरस्कारच करतो, आणि या सर्वांस ‘धाब्यावर’ बसवितो, असा हा रागी, व्देषी, लोभी, मत्सरी, उन्मादी व मूढ संन्यासी आपले ऐहिक व पारमार्थिक नुकसान करुन घेतो. ॥४१॥
शांती (मनाचे स्थैर्य) आणि अहिंसा हे भिक्षूचे = संन्याशाचे धर्म होत. तप आणि अग्रिहोत्रादी यज्ञ हे गृहस्थाचे, आणि गुरुची एकनिष्ठा सेवा आणि श्रवणादी हे ब्रह्मचार्‍याचे धर्म (कर्तव्ये ) होत. ॥४२॥
ब्रह्मचर्यवृत्ती, तपश्चरण, अंतर्बाह्य शुध्दी, संतोष, सर्वांशी जिव्हाळ्याची मैत्री, हे गुणधर्म गृहस्थाने संपादावे. ऋतुकाळीच भार्यासमागम करणे, हे गृहस्थाचे ब्रह्मचर्यच होय. चारी आश्रमांतील लोकांनी माझे आराधन श्रध्दापूर्ण भक्तीने करावे. ॥४३॥
याप्रमाणे स्वस्ववर्णांची व आश्रमाला विहित असणारी कर्तव्ये करीत असतानाच जो माझी अनन्यभक्तीने उपासना करतो, सर्व स्थिरजंगमामध्ये मी परमात्मा अखंड आहे असे पाहतो , त्याला लवकरच माझी ‘परमा भक्ति’ प्राप्त होते. ॥४४॥
उध्दवा ! अशी ही अखंड परमश्रेष्ठ भक्ती उत्पन्न झाली म्हणजे सर्व ब्रह्मांडाची उत्पत्ती व संहार करणारा, सर्वकारण असणारा, सर्व भुवनांचा नियामक जो मी परमात्मा तोच सर्व आहे, भक्ताचा आत्माही तोच आहे, असे ज्ञान होऊन माझा साक्षात्कार होतो व तो अनन्य भक्त ज्ञानविज्ञानी होऊन मद्रूप होतो. मुक्त होतो. ॥४५॥
तात्पर्य, याप्रमाणे स्वधर्माचरणामुळे शुध्दचित झालेला, माझी भक्ती केल्यामुळे माझे म्हणजे भगवंताचे ऐश्वर्य साक्षात्‍ जाणणारा निष्काम भक्त ज्ञानविज्ञानसंपन्न होतो आणि लवकरच माझ्या स्वरुपात मिळून मत्स्वरुप, परमात्मरुप प्राप्त करुन घेतो. ॥४६॥
हा जो वर्ण आणि आश्रम यास विहित असणारा आचारस्वरूपी धर्म तुला एवढा वेळ सांगितला, त्यालाच माझ्या भक्तीची जोड मिळाली, म्हणजे आचार उत्तमोत्तम पदप्राप्तीचा मार्गदर्शक होतो. ॥४७॥
असो; याप्रकारे उध्दवा ! तू जे जे काय प्रश्न केलेस त्यांची उत्तरे मी दिली; आणि ही उत्तरे देताना असेही स्पष्ट सांगितले की, माझी भक्ती व स्वधर्माचरण यांचे मिश्रण करणारा माझा भक्त श्रेष्ठ पदास जाऊन पोहचतो. ॥४८॥
अध्याय बारावा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : March 14, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP