अर्जुन म्हणाला, ब्रह्म सर्वत्र आहे. परमेश्वर सर्वज्ञ आहे आणि मी ब्रह्मस्वरुप आहे; हे जाणले. परंतु तसा निर्देश करावयाला प्रमाण काय आहे.? ॥१॥
श्रीभगवान म्हणाले, जसे पाण्यात पाणी, दुधात दुध, तुपात तूप टाकले असता मिसळून जाते, तसे जीवात्मा आणि परमात्मा एक होऊन जातात. ॥२॥
जीवाचे परमेश्वराशी तादात्म्य होते. ज्योतीला ज्योत मिळून त्यांचे ऐक्य होते. तसाच हा ऐक्य प्रकार आहे. तो प्रमाण लक्षणांनी एकाग्रवादी योग्याने स्वत:च जाणून घ्यावा लागतो. ॥३॥
ज्ञानानेच ते जाणणे शक्य आहे. ज्ञेय समजल्यावर तत्क्षणीच मुक्ती मिळते. या मुक्तीला ते ज्ञानच कारण आहे. त्यामुळे ज्ञानोत्तर पुन्हा योगसाधनेची आवश्यकता ती काय? ॥४॥
ज्ञानाने झळाळलेल्या देहात बुध्दी ब्रह्माशी अनुसंधान साधून असते. ब्रह्मज्ञानरुपी अग्नीचे पापपुण्यांचे नित्य जळून भस्म होत असते. ॥५॥
पाण्याला पाणी मिळाले असता ती दोन्ही उदके एक होऊन जातात. ब्रह्मज्ञानाग्रीने पापपुण्यांचे दहन झाल्यानंतर आत्मा परमेश्वराशी मिळून तेथे अव्दैतभावाने निरुपाधिकपणे राहतो. हे अव्दैत निरभ्र आकाशाप्रमाणे शुध्द पवित्र असते. ॥६॥
कोणी म्हणतात आकाशाप्रमाणे आत्मस्वरुप सूक्ष्म आणि परिपूर्ण आहे. तर कोणी म्हणतात आत्मा वायूसारखा अदृश्य आहे. खरे तर सबाह्याअभ्यन्तर निश्चलरुपी अन्तरात्म्यालाअ ज्ञानाच्या व्दारेच पाहता येत. ॥७॥
(समजा घट फुटला तर त्यातील) आकाश तेथेच मूळ आकाशाला मिळते त्याप्रमाणे ज्ञानी भक्ताला कोठेही आणि कोणत्याही कारणाने मृत्यू आला तरी मरणोत्तर तो तेथेच ब्रह्मतत्त्वात विलीन होतो. ॥८॥
चौदाही भुवनात तसेच संपूर्ण शरीरात आत्मा निरंतर व्यापकपणाने भरला आहे. हा आत्मा निश्चल,  निर्मल आणि निरंजन आहे. ॥९॥
एक मूहूर्तपर्यंत जरी मनोभावे अंतर्दृष्टी नाकाचे शेंडायावर स्थिर केली तर तो साधक शतजन्मातील पापापासून मुक्त होतो. ॥१०॥
उजव्याबाजूची नाडी पिंगला, ती पुण्यकर्माला प्रेरणा देणारी आहे.पिंगला नाडीतून श्वास चालू असता भृकुटीमध्यात दृष्टी स्थिर केली तर सूर्यमंडलाचे दर्शन होते. हा देवयान मार्ग होय. ॥११॥
डाव्याबाजूची इडा नाडी. ती वामकर्माला प्रेरणा देणारी आहे. इडानाडीतून श्वास चालू असता भृकुटीमध्यात दृष्टि स्थिर केली तर चंद्रमंडलाचे दर्शन होते. हा पितृयान मार्ग होय. ॥१२॥
गुदेन्द्रियाच्या पृष्ठभागापासून डोक्यापर्यंत दीर्घास्थींचा कणा आहे. वीणेच्या दांडयाप्रमाणे दिसणार्‍या या कण्याला ब्रह्मदण्ड असे म्हणतात. ॥१३॥
त्याच्या शेवटी स्थिर आणि अत्यंत सूक्ष्म ब्रह्मनाडी आहे असे सांगतात. इडा आणि पिंगला यांच्यामध्ये सुषुम्ना नावाची नाडी आहे. ॥१४॥
त्यात सर्वकाही सर्व बाजूंनी भरलेले आहे. तिच्या मध्यभागात सूर्य, चंद्र, अग्नी आणि परमेश्वर आहेत. ॥१५॥
पंचमहाभूते, दिशा, त्रैलोक्य , समुद्र, पर्वत, शिला, बेटे, नद्या, वेद , शास्त्रे, विद्या, कला हे क्षरविश्व आहे. ॥१६॥
स्वर, मंत्र, पुराणे, गुण हेही सर्व विश्वातील घटक असून त्यांना प्राणवायुरुप आत्मा अधिष्ठान आहे. या शरीरस्थ आत्म्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. ॥१७॥
सुषुम्नानाडीपाशी हा देहकंद प्रतिष्ठित आहे. प्राण्याच्या शरीरात असणार्‍या नानाप्रकारच्या नाडयांचे ते मूलस्थान आहे. ॥१८॥
मूळ वर आणि खाली शाखा याप्रमाणे विस्तारलेला हा वायुमार्गाने सर्वत्र संचार करणारा आहे. शरीरात ७२००० नाडया आहेत. त्यात हा वायू खेळतो. ॥१९॥
खाली आणि वर पसरलेल्या नाडयांची सर्व तोंडे स्वच्छ ठेवावीत. कर्ममार्गाने म्हणजे प्रयत्नाने वायू वर वर न्यावा. ही क्रिया सफल झाल्यावर प्राण ब्रह्मरंध्रात शिरुन तेथे स्थिर होईल. ॥२०॥
वायूसमवेत हा जीव ज्ञान आणि मोक्ष मिळवितो. पूर्वदिशेकडील इंद्रा़ची अमरावती मुखाचे ठिकाणी आहे असे जाणावे. ॥२१॥
अग्निलोक हृदयामध्ये आहे असे जाणावे तर तेजोवती नगरी चक्षूमध्ये आणि नियमन करणारा यमलोक कानाचे ठिकाणी असल्याचे जाणावे. ॥२२॥
नैऋत्येकडील ? कुबेरलोक तो पार्श्वबाजूस जाणावा. पश्चिमेकडील वरुणनगरी पृष्ठभागात जाणावी ॥२३॥
डावीकडे पृथ्वी, तर पार्श्वभागात वायुलोक (प्रतिष्ठित) आहे. उत्तरेकडे चंद्रलोक प्रतिष्ठित आहे. ॥२४॥
डाव्या कानाचे ठिकाणी आहे असे जाणावे. डाव्या डोळ्याचे ठिकाणी ईशानी तर शिवलोक मनोमनी प्रतिष्ठित जाणावा. ॥२५॥
देहाचे संदर्भात ब्रह्मपुरी मस्तकांत असल्याचे जाणावे. पायाचे खाली शीव, अनंत, काळ आणि प्रलयाग्नी आहेत असे जाणावे. ॥२६॥
खाली , वर,  मध्ये, सर्वत्र कल्याण आहे. बाहेर शिवमंगल आहे. (सप्त पाताळाची शरीरातील स्थाने पुढीलप्रमाणे ) पायाखाली ‘अतल’ आहे तर चवडयापाशी ‘वितल’ आहे. ॥२७॥
घोटयापाशी ‘नितल’ पोटरीमध्ये ‘सुतल’ गुडघ्यात ‘रसातल’ आहे. मांडयात ‘महातल’ आहे. ॥२८॥
अशा प्रकारे कमरेचे ठिकाणी ‘तलातल’ सात पाताले सांगितलेली आहेत. पाताळांची स्थाने खालची आहेत. कुंडलिनीचे मुखही अधोमूलच आहे. ॥२९॥
हृदयनिवासी अनंत सर्वत्र संचार करतो. (सात ऊर्ध्वलोकांची शरीरस्थिती पुढीलप्रमाणे ) बेंबीपाशी ‘भू’लोक आहे. कुशीस्थानी ‘भुवर्लोक’ आहे. ॥३०॥
हृदयात ‘स्वर्लोक’ असून तेथेच नक्षत्रासह चंद्र, बुध, गुरु, मंगळ, शुक्र, सूर्य इत्यादी ग्रहमाला आहेत. ॥३१॥
शनी, सप्तर्षी, ध्रुव हेही हृदयस्थ स्वर्लोकात आहेत. अशी कल्पना करावी त्यामुळे आत्म्याला तेथे सर्वमुख मिळेल. ॥३२॥
छातीपाशी ‘महर्लोक’ आणि कंठाचे ठिकाणी ‘ जनलोक’ असल्याचे सांगतात. भुवयामध्ये ‘तपोलोक’ आणि मस्तकात ‘ सत्यलोक’ आहे. ॥३३॥
याप्रमाणे देहातच सर्व ब्रह्माण्ड भुवने आहेत. ब्रह्माण्डाने व्यापिलेले सर्व लोक पिंडामध्येही आहेत. ॥३४॥
लय क्रम असा सांगतात - ब्रह्मांडाला व्यापून दिसणारी ही पृथ्वी जलतत्त्वात लय पावते. अग्रीत पाणी, वायूत अग्नी लय पावतो. ॥।३५॥
वायूचा आकाशांत आणि आकाशाचा मनांत लय होतो. बुध्दी, अहंकार, चित्त आणि क्षेत्रज्ञ आत्मा यांचा परमेश्वरात लय होतो. ॥३६॥
आत्मज्ञानमय तुर्यावस्था, त्यापलीकडे अनामय असे शिवस्थान आहे. त्यांचा समस्थितीतील आत्म्यात आणि आत्म्याचा परमात्म्यात लय होतो. ॥३७॥
मन एकाग्र करुन ‘मी ब्रह्मरुप आहे’ असे घ्याने करावे. त्यायोगे शतकोटी कल्पांतून केलेल्या सर्व पापासून तो मुक्त होतो. ॥३८॥
नेल्याजाणार्‍या घटांत, आकाश कोंडल्यासारखे असते. परंतु घट फुटला तरी घटांतील आकाशाचा नाश होत नाही. ( ते महाकाशात विलीन होते.) तीच स्थिती जीव आणि शुध्दात्मा यांचे संदर्भात आहे. ॥३९॥
घटाकाशाचा महाकाशात जसा विलय होतो. त्याप्रमाणे जीवाचा आत्मतत्त्वात विलय होत असतो, हे जो तत्त्वत: जाणतो तो ज्ञानाने निरालंबस्वरुपाशी एकरुप होतो यात संशय नाही. ॥४०॥
एका अंगठयावर उभे राहून पुरुषाने हजारो वर्षे तप करावे. तथापि ते तप ध्यानयोगाच्या सोळाव्या भागाशीही तुलनापात्र ठरत नाही. ॥४१॥
अग्नी लाकडे जाळून टाकतो त्याप्रमाणे हजारो ब्रह्महत्या आणि शेकडो वीरहत्या अर्थात्‍ त्यांची पातके एकटा ध्यानयोग जाळून नाहिशी करतो. ॥४२॥
हजारो अश्वमेधयज्ञ आणि शेकडो वाजपेययज्ञ यापासूनची पुण्याई ध्यानयोगापासून होणार्‍या पुण्याईच्या एकसोळांशपटही असत नाही. ॥४३॥
अनंत प्रकारची पवित्र कर्मे, विविध जपयज्ञ तीर्थयात्राही तोपर्यंतचीच साधने ,क जोपर्यंत अनुभवजन्य आत्मतत्त्व जाणलेले नसते. ॥४४॥
आत्मज्ञान जोपर्यंत झाले नाही, वेदाध्ययन, तीर्थे ही साधने तोपर्यंतचीच. ते परमात्मतत्त्व एकदा जाणले की सर्वत्र एकानुभवच घेतो. ॥४५॥
मी ब्रह्मस्वरुप आहे अशी आत्मसंबंधी दोन अक्षरे (ब्रह्म) म्हणावीत. ज्याने ती उच्चारली तो स्वत: ब्रह्मरुप होतो यांत संशय नाही. ॥४६॥
चाराही वेदांचा अभ्यास केलेला ब्राह्मण सूक्ष्म ब्रह्मतत्व जाणत नसेल तर वेदभार वाहणारा तो ब्राह्मणस्वरुपातील गाढवच म्हणायचा. ॥४७॥
चार वेद, धर्मशास्त्रे यांचा अनेकप्रकारांनी अभ्यास केला. परंतु मी ब्रह्मरुप आहे हे जाणले नाही तर त्याची स्थिती गोड पाकातील (रसास्वाद न जाणणार्‍या) पळीप्रमाणे होय. ॥४८॥
चंदनी लाकडे वाहणारा गाढव वस्तुत: भारवाहक असतो. चंदनवाहक नसतो. (त्याला चंदनाचा गंध नसतो) त्याप्रमाणे वेदशास्त्राचा अभ्यास केलेले ब्राह्मण ब्रह्मतत्व जाणत नसतील तर ते गाढवाप्रमाणे वेदभार वाहतात. ॥४९॥
मनुष्य आणि पशु यांत आहार, निद्रा, भय आणि विषयभोग (मैथुन)ही समान आहेत. मनुष्याचे ठिकाणी ज्ञान हे अधिक विशेष आहे. ज्ञान नसलेले मानव पशुसमान आहेत. ॥५०॥
जीव प्रात:काळी मलमूत्राने त्रस्त होतो तर दुपारी तहानभुकेने ग्रासला जातो. कामतृप्त झालेला जीव रात्री निद्रेने बाधित होतो. ॥५१॥
योगाने हजारो नादबिंदु शेकडो कोटिबिंदु ? या सर्वांचे ब्रह्माग्नीत हवन केल्यानंतर तो निरामयपदाला पोहोचतो. ॥५२॥
गाई नाना रंगाच्य़ा असल्या तरी त्या सर्व गायींचे दूध एकाच पांढर्‍या रंगाचे असते. ज्ञानी भक्त गाईप्रमाणे प्राण्यांची शरीरे लिंग-वर्ण याही भिन्न असली तरी दुधाप्रमाणे सर्वाभूती एकच आत्मा असल्याचे ज्ञानाने जाणतो. ॥५३॥
‘मम’ (माझे) ‘निर्मम’ (माझे नाही) या दोन शब्दांनी बंध आणि मोक्ष ठरतात. ‘मम’ शब्दाने प्राण्याला बंधन होते तर ‘निर्मम’ शब्दाने बंधातून मुक्तता होते. ॥५४॥
मनाच्या उन्मनी अवस्थेत व्दैत सापडत नाही. जेथे जेथे मनाचा अभाव तेथे तेथे परब्रह्माची प्रतीती येते. ॥५५॥
कोणी आकाशाला मुठीनी ठोसे लगावावेत किंवा एखाद्या भुकेजल्याने कोंडा (भूस) कांडावा. हे दोन्ही व्यर्थ त्याचप्रमाणे जो ब्रह्मतत्व जाणीत नाही त्याला मुक्ती मिळत नसते. ॥५६॥
॥उत्तरगीतेचा व्दितीयाध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP