युधिष्ठिर म्हणाला, हे पितामह, पुरुषाच्या बाबतीत शील श्रेष्ठ आहे असे तुम्ही सांगितले. जी आशा ती कशी उत्पन्न झाली, ते मला सांगा. ॥१॥
पितामह, मला मोठा संशय निर्माण झाला आहे. परपुरंजय (शत्रूंची नगरे जिंकणार्‍या) तुमच्याशिवाया त्याचे निराकरण करणारा दुसरा कोणी नाही. ॥२॥
पितामह, युध्दाचा प्रसंग आला तर हा योग्य तेच करील अशी सुयोधनाच्या बाबतीत मला मोठी आशा होती. ॥३॥
प्रत्येक माणसाच्या ठिकाणी मोठी आशा निर्माण होत असते. तिचा भंग झाला की नि:संशय मरणप्राय दु:ख होते. ॥४॥
हे राजेंद्रा, त्या दुष्टात्मा, धृतराष्ट्रपुत्र दुर्योधनाने माझी आशा नष्ट केली. माझा हा निर्बुध्दपणा पहा. ॥५॥
हे राजा, वृक्षांनी भरलेल्या पर्वतापेक्षाही आशा मोठी आहे असे मी मानतो. किंवा ती आकाशापेक्षाही मोठी आहे. वा अनाकलनीय आहे. ॥६॥
कुरुश्रेष्ठा, या आशेविषयी तर्कवितर्क करणे अवघड आहे. तिच्यावर मात करणे कठीण आहे. त्यामुळे हिच्यापेक्षा अधिक दुर्जय काय असू शकेल ? ।७॥
भीष्म म्हणाले, युधिष्ठिरा, इथे मी तुला सुमित्र व ऋषभ यांच्या वृत्तांताचा इतिहास सांगतो. तो तू समजावून घे. ॥८॥
हैहय वंशातील सुमित्र राजा एकदाअ मृगयेसाठी गेला होता. एका हरणाला बाणाने विध्द करुन तो निघाला. ॥९॥
(घुसलेला ) बाण घॆऊन ए हरिण अतिशय वेगाने पळून गेले तो राजाही वेगाने हरणाचा पाठलाग करु लागला. ॥१०॥
अतिशय वेगाने धावणारा तो मृग एका दरीत गेला (उतारावरुन गेली.) आणि क्षणातच सपाट जागेवरुन धावू लागला. ॥११॥
तारुण्यामुळे आणि बळाने तो राजा धनुष्यबाण व खड्‍ग घेऊन त्याच्या मागे हंसाप्रमाणे गेला. ॥१२॥
अनेक नद,  नद्या, जलाशय, वने ओलांडून, मागे टाकीत बनातून संचार करत त्याने पाठलाग केला. ॥१३॥
तो मृग काही वेळा राजाच्या अगदी जवळ येई आणि लगेच खूप वेगाने दूर निघून जाई. ॥१४॥
राजा, त्या वनात फिरणार्‍या हरणावर अनेक बाण पडले होते, तरीही गमतीने राजाला हुलकावण्या देत, ते पुन्हा जवळ जाई. ॥१५॥
हरणांच्या कळपाचा तो प्रमुख पुन्हा खूप वेगाने राजापासून दूर जाऊन पुन्हा त्याज्याजवळ येई. ॥१६॥
तेव्हा शत्रूचा नाश करणार्‍या सुमित्राने मर्मभेद करणारा उत्तम बाण धनुष्यावरुन सोडला. ॥१७॥
तेव्हा बाणाच्या मार्गातून दूर होऊन मृगांच्या कळपाचा तो प्रमुख एक कोसभर अंतरावर जाऊन जणू हसत उभा राहिला. ॥१८॥
तो तेजस्वी बाण जमिनीवर पडल्यावर तो मृग निबिड अरण्यात शिरला आणि राजाही त्याच्या मागोमाग धावला. ॥१९॥
त्या घोर अरण्यात शिरल्यावर तो राजा तापसांच्या आश्रमाजवळ आला. आणि खूप दमून गेल्यामुळे तो तिथेच बसला. ॥२०॥
तेव्हा त्या थकलेल्या, क्षुधेने व्याकुळ झालेल्या धनुर्धार्‍याला पाहून ऋषींनी त्याज्याजवळ जाऊन त्याचा यथास्थित आदरसत्कार केला. ॥२१॥
ऋषींनी त्या नृपश्रेष्ठाला स्वत:चे प्रयोजन विचारले.अरे भद्रा, कोणत्या कारणासाठी तू तपोवनात आला आहेस.? ॥२२॥
हे राजा,  पायी चालत, खड्‍ग, धनुष्य-बाण घेऊन तू कुठून आला आहेत हे जाणून घेण्याची आमची इच्छा आहे. तू कोणत्या कुळात जन्मला आहेस व तुझे नाव काय  हे तू आम्हाला सांग. ॥२३॥
हे पुरुषश्रेष्ठ , तेव्हा त्या राजाने सर्व ऋषींना घडलेला वृत्तांत जसाच्या तसा सांगितला आणि आपला परिचयही दिला. ॥२४॥
हैहयांच्या कुळात जन्मलेल्या, मित्राचा पुत्र मी सुमित्र आहे. बाणांनी हजारो मृगांचा वध करीत मी फिरत आहे. माझ्या संरक्षणासाठी मोठे सैन्य तसेच अमात्य व अंत:पुरही माझ्याबरोबर आहे. ॥२५॥
मी फेकलेल्या बाणाने विध्द झालेले हरिण जखमी अवस्थेत धावू लागले.  त्याचा पाठलाग करणारा मी योगायोगाने दरिद्री, दमलेल्या अवस्थेत आपल्यापर्यंत आलो आहे. ॥२६॥
श्रमाने थकलेल्या, निराश झालेल्या, एकही राजचिह्र अंगावर नसलेल्या मला आपल्या आश्रमात येणे भाग पडावे, यापरते दु:ख ते कोणते ? ॥२७॥
तपोधनांनो, राजचिह्रांच्या अभावामुळे मला जेवढे तीव्र दु:ख होते नाही, तेवढे दु:ख माझ्या आशेची निराशा झाल्यामुळे होत आहे. ॥२८॥
जसे महानग व हिमालय किंवा महासागर किंवा समुद्र यांचा थांग लागत नाही. त्यांच्याहीपेक्षा विशाल असल्यामुळे आकाशाचा अंत सापडत नाही, त्याप्रमाणे हे तपश्रेष्ठांनो, मला आशेचा अंत कळलेला नाही. ॥२९॥
हे सर्व आपणास माहीतच आहे. तपोधन हे सर्वज्ञ असतात. आपण श्रेष्ठ आहात म्हणून मी आपल्याला शंका विचारतो. ॥३०॥
या जगात आशेने बध्द झालेला पुरुष मोठा की अंतरीक्ष मोठे ? महत्त्वामुळे या दोनपैकी जगात आपल्याला कोण अधिक मोठे वाटते? ॥३१॥
हे मी यथातथ्य जाणू इच्छितो. आपल्याला अज्ञात असे काय आहे ? आपल्याला हे नित्य रहस्य ठेवायच नसेल तर मला सत्वर क्थन कर. ॥३२॥
व्दिजश्रेष्ठहो, आपल्या दृष्टीने हे रहस्य असेल तर ते ऐकण्याची माझी इच्छा नाही. आपल्या तपश्चर्येत विघ्न येणार असेल तर मी इथेच थांबतो. पण जर हे आपल्याला सांगण्यासारखे असेल तर मी प्रश्न विचारला आहे. ॥३३॥
याचे यथायोग्य कारण जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे. आपण  सर्व तपस्वी आहात. आपण सर्वांनी मिळून माझ्या शंकेचे निराकरण करावे. ॥३४॥
अध्याय पहिला समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : March 04, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP