मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
रसवत्

अर्थालंकार - रसवत्

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


या अलंकाराचें लक्षण देण्यापूर्वी रस ह्मणजे काय हें सांगितले पाहिजे:- विभाव, अनुभाव, व व्यभिचारीभाव यांहीं व्यक्त जो स्थायी
भाव त्यास रस असें म्हणतात.
रस एकंदर नऊ आहेत ते येणेंप्रमाणें.

आर्या-
ऋंगार हास्य करुणा रौद्र भयानकाचे साहवा वीर ॥
बीभत्साद्भुत शांतचि नवरस हे वदति जे कविप्रवर ॥१॥

गद्य-
यांचे स्थायीभाव.

आर्या-
रति हास शोक तिसरा क्रोध तसें भय तसाचि उत्साह ॥
निंदा विस्मय शम हे स्थायीभावचि वदे कविसमुह ॥२॥
गद्य-विभावाचें लक्षण व त्याचे भेद.

आर्या-
रस उत्पन्न करी जो विभाव त्या नांव विबुध देताती ॥
आलंबन उद्दीपन यापरि तद्भेद दोन ते गणिती ॥३॥

गद्य-
आतां अनुभावाचें व सात्वकि भावाचें लक्षण सांगतों.

आर्या-
जें कार्य शरीरावर होय कटाक्षादि त्यास अनुभाव ॥
परगतसुखादिभावितहृदयोद्गत त्यास सात्विकचि नांव ॥४॥

गद्य-
सात्विकभाव आठ प्रकारचे.

आर्या-
स्तंभ प्रलय तसेची रोमांच स्वेद अश्रु वैस्वर्य ॥
वैवर्ण्य कंपहि तसा सात्विक हे भाव वदति कविवर्य ॥५॥
गद्य-
व्यभिचारीभाव ३३ प्रकारचे: -

आर्या-
निर्वेद मद ग्लानी शंका श्रम तेवि ती असूया हो ॥
आलस्य दैन्य चिंता मोह स्मृति धृति तशीच द्वादश हो ॥६॥
लज्जा चापल्य तसें जाड्या वेगहि तसाच सोळावा ॥
गर्व विषादौत्सुक्यचि निद्रापस्मार एकवीसावा ॥७॥
सुप्ति विबोधचि मर्षचि अवहित्थचि उग्रताच सव्वीस ॥
उन्माद मति व्याधिच हर्ष मरण तो वितर्क बत्तीस ॥८॥
त्रासचि तेहतिसावा ऐसे व्यभिचारिभाव जाणावे ॥
तेतिस प्रकारचे ते रस सहकारी असेंच मानावें ॥९॥

गद्य-
याप्रमाणें रसलक्षण झाल्यावर आतां रसवदलंकाराचें लक्षण सांगतों.

आर्या-
रस जेव्हां दुसर्‍याला पोसाया अंगभूत होत असे ॥
तेव्हां अलंकृतीतें रसवद्‍ हें नाम सत्य साजतसे ॥१०॥
तो योगिराड्‍ महात्मा अगस्तिमुनि धन्य धन्य धन्यचि हो ॥
एका चुळींत ज्यानें देखियले दिव्य मत्स्य कूर्म अहो ॥११॥

गद्य-
येथें मुनिविषयक जो रतिरुपभाव त्यास पोषक अद्भुत   रस हा अंगभूत आहे.

आर्या-
कांचीस ओढणारा पुष्ट स्तन मर्दणार हाच कर ॥
नाभी मांडी जघन स्पर्शी नीरीस मुक्त करणार ॥१२॥

गद्य-
येथें ऋंगारवस्थेनें करुणरसाचें पुष्टीकरण केलें आहे.

आर्या-
केश धरुन जयानें कृष्णेला ओढिलें मज समोर ॥
तो पापी दु:शासन राहिल जीवंत कां निमेषभर ॥१३॥
येथें दु:शासन हा आलंबनविभाव. त्याची कृष्णाकर्षणचेष्टा ही उद्दीपनविभाव. "पापी" हे जें धि:कारयुक्त वचन तो अनुभाव. यांत दृष्टीस पडणारें जे गर्वादि ते व्यभिचारीभाव. यांनी वाढविलेलास्थायीभाव जो क्रोध तो रौद्ररसाप्रत पावला आहे.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP