मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|
विठ्ठल भगवंत लेंभे

विठ्ठल भगवंत लेंभे

मराठी शब्दसंपत्ति


गुलाब फ़ुलले पहा वनलता लवूं लागल्या,
सुगंध सुखदायिनी कुमदिनी वनीं शोभल्या;
सुधांशु कुसुमावरी अमृतबिंदु सोडी करें.
वनस्थल करी जणो धवल दुग्धधाराभरें !

असा धवल चंद्रमा सुखद जाहला चक्षुला,
तुझ्या सुविमला यशा परम मित्र हा शोभला;
गभीर गुरुघोष ये दुरुनि नर्मदेचा तया,
मृदंगरव हा मिळेम श्रवणयुग्म तर्पावया !

उडे गगनमंडळीं मदनसारिका स्वैरिणी
सुमंजुरव दे जिचा सुखचि कर्णरन्ध्रां झणीं
प्रसन्न मन हें सखे ! क्षणभरी अहा ! जाहलें
कळे न मज  दु:ख कीं अहह ! यापुढें वाढिलें !

अनर्थ बहु जाहले वरिवरी धनाच्या भ्रमें
जनां गुणगणांहुनी तरिहि थोर लक्ष्मी गमे
उदारहृदये ! तुवां पडुनि निर्धनाच्या करीं
सुखें सदनिं सेविल्या निवल कोरड्या भाकरी

असेही दिन ते बरे म्हणविती अहा ! या क्षणीं,
गमे सुखचि तैं तिच्या प्रणयभारलोलेक्षणीं !
श्रमाउपरि भाकरी अमृततुल्य त्या लागल्या,
सुहास्यवदनें तिनें निजकरेंचि ज्या वाढिल्या.

सदैव हुरडा मिळे मधुर कोंवळा भाजला,
तसा हरभरा हुळा मधुर फ़ार हो ! लागला;
तशीं मधुरशीं नवीं विपुल हो ! मिळालीं फ़लें,
अहो ! सुख मना दिलें विमल ओढियाच्या जलें.

सुखास अमुच्या तदा अहह ! अल्प सीम असे
कदान्न धड वस्त्र यावरि न लेह्स आशा वसे
गुरुत्व, धन, ही नसे म्हणुनि गर्वतृष्णा नसे
परार्ह्तहरणीं न धी मग कशास चिंता डसे ?

अहो ! गहिंवरोनि ये हृदय, अश्रु हे लोटती
अहो ! दशदिशा कशा मजसि शून्यशा वाटाती ?
अहो ! त्रिजग ढांसळे कडकडोनि माझ्यावरी
अहो ! परि कठोर हें हृदय राहिलें भूवरी.

जणों दुरुनि ये शिरे प्रखर बाण हो अंतरीं,
जणों हृदय हें जपें चरचरा चिरी हो सुरी;
न शोकभर आंवरे कळवले अहा ! जीव हा,
बलाढ्य भवितव्यता छळितसे अझोनी पहा.

नको भुवन हें जिथें अदय काय ये पाहुणा,
नको भुवन हें मला तिळ न सौख्य जेथें मना.
नको मन विटे, नको मजसि दु:खदा संसृति,
न दे मजसि जया स्थळीं गुनवतीसतीसंगति.

दया करि वसुंधरे ! सकल तीर्थ हो ! हे रवे !
विशाल विभुचक्षु तूं बघसि विश्व हें गौरवें;
दयार्द्र पवना सख्या ? गहनशा नभोमंडला !
पहा निवविली प्रिया - अहह ! कंठ हा दाटला !

दिसे सदन शून्य हो ! सुमनवाटिका शून्य हो !
लतासदन शून्य हो ! रसयुता कथा शून्य हो !
वनस्थलहि शून्य हो ! सकल विश्व हें शून्य हो !
मदीय तनु शून्य हो ! हृदय शून्य हो ! शून्य हो !

N/A

References : N/A
Last Updated : January 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP