कल्य़ाण खजिना पोवडा

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.


धन्य धन्य शिवाजी राजे । दिगंती गाजे । उदाहरण ताजें । स्वतंत्र्य ध्वजा महाराष्ट्रांत । लाविली अवघ्या पाव शतकात । याला नाही जोड अखिल जगतांत ॥
स्वातंत्र्य सूर्य उगवला । महाराष्ट्राला । आनंद झाला । शिवप्रभु घेउनी अवतारास । येउनी दास्यतिमीर विलया । काटशह दिला अदिलशाहास ॥
ग्रहमाला जशी सूर्यास । तशी शिवबास शोभते खास । तानासी बाजी रत्नाचीखाण । सिध्द शिवबास अर्पण्या प्राण । ज्याने यवनाची केली धुळधाण ॥
सूर्याची आकर्षण शक्ति । ग्रहा फिरविती । सूर्याभोवती । तशी शिवबाच्या भोवती खास । लोकसंग्रह शक्ति वीरास । स्फूर्ति देत असें देशकार्यांस ॥
(चाल १ ) स्वातंत्र्य प्रेम तरुणांत । शिवबानें केले जागृत॥ स्वातंत्र्य ज्योत तरुणात । फुलविली महाराष्ट्रात ॥ तरुणास वेड स्वातंत्र्य । तरुणांस स्वप्नस्वातंत्र्य ॥ स्वातंत्र्य समर करण्यांत । लागली होड वीरांत ॥ स्वातंत्र्य देवी पदी हात । ठेवुनी करिती शपथ ॥
धरणीस पडेपर्यंत । करणार युध्द सतत ॥ स्वातंत्र्य मिळेपर्यंत देह झिजवूं राष्ट्रकार्यास ॥
रक्ताचे सडे समरांत । वाहवू रक्ताचे पाट ॥ एक दिल असे समस्त । मिळुनिया ठरविला बेत ॥
छातीचा करुनिया कोट । फोडिला तोरणा तट । तोरणा घॆउनी हातांत स्वातंत्र्य तोरण त्यात । तात्काळ भवानी माता शिवबाचे आली स्वप्नांत ॥ किल्याचे तटबंदीत । धन विपुल आहे निश्चत ॥
शिवबाचे आलें हातात । धन अमित तटबंदीत तात्काळ तरुण आगणीत । स्वखुषीने आले सैन्यांत । सक्तीनें । नव्हते करीत । इंग्रजासम रिक्रुट ॥
कल्याण शत्रूचा प्रांत घेण्याचा ठरविला बेत । घेणार शत्रुचा प्रांत । दरोडेखोर म्हणतात । होताच यशस्वी मात । त्यासच राजा म्हणतात । होताच यशस्वी मात । त्यासच राजा म्हणतात ॥
(चाल २) देशार्थ शत्रुमुलखात उकळणे कर । राज्यांत स्वत:च्या उकळूं नयें कधि कर । देशात सर्व खाणारे कांदा भाकर । तनमन देशा अर्पूनी झाले चाकार । यासाठी स्वदेशा लादू नये कधी कर । असे होत लुटारु शिवबा मनाचे थोर । वरी उग्र परी अंतरीं दयासागर । वात्सल्य स्वपुत्रासम केलें प्रजेवर । ऐका ऐका दयाळु नोकरशाहीचा कर । झाडुनी सार्‍या हिंदूना केंले नोकर । इंग्रजी कायदा सुधारणेंचा कहर । शिरकवुनी कर देशांत उकळणें कर । किती मऊ भूमि लागते खूपसा कोपर कागदी करुनी रिपोर्ट वाढला कर । युध्दाची वेळ येतांच पालटे नूर । स्वातंत्र्य द्तो तुम्हांस चला सत्वर । सक्तीनें व्यक्तीपासून घ्यावे वारलान । सक्तीनें नेले ओढीत तरुण घरोघर शिवबाचे तुम्ही मावळे लढवय्ये वीर । चणे खाउन तुम्ही राहतां मराठे सर्व तोफे पुढार । राहतो तुमच्या रक्षणा मागे आम्ही शूर । संपले युध्द या सुधारणेचा वर । नीतींत इंग्रजी नीती आहे खरोखर । वरी वरी दिसते निर्मळ अंतर काळ । हृदीं हलाहल जिव्हाग्री मधाचे पोळे । यास्तव झाला लुटारु शिवबा वीर । राज्येंच्या राज्यें चावूनी होतीना चोर । होतील चोर येतांच चोरावर मोर । शिवबाचे नाहीं येणार केंसाची सर ।
चाल..........  कोंदणी हिर्‍याचा  थाट । तसा तरुणांत । शिवाजि सम्राट । समर गर्जना ज्याची युध्दांत । घुमे कर्णात सतत मराठयांत । निपुण जे सर्व गनिमी काव्यांत ॥
विजापूरशहा अस्वस्थ । ऐकुनी वृत्त । जाहला त्रस्त । मुल्लाना अहमद सरदार । कल्याणप्रांताचा होता सुभेदार । आला सत्वर घेण्या समाचार ॥
कल्याण खजिना नेण्यास । विजापुरास । सोडला त्यास । हुकूम हें वृत्त गुप्त सकळास । भिंतीचे कान ऐकती खास । तत्व हें ठावे नाही कवणांस । कल्याण खजिना लुटण्याचा केला निर्धार । धाडिला आबाजी हा सरदार ॥
चाल १ :- सुभेदार वसुल घॆऊन । चालला उंट भरुन ॥वरि वित्त विपुल लादुन । चालले उन्ट वाकून । ह्त्यारबंद शिपाइ भोवतून । चालले चांदण्यातून ॥ आबाजी खजिना पाहून । तात्काळ गेला हरकून ॥
चाल २:- मावळे मार्ग आबाजी पुढें पुढीयार । रोखिला मार्ग यवनांचा त्यानें सत्वर । बैसला आबाजी दबा धरुन चौफेर । साधून किरण बैसतो व्याघ्र दरिवर । येताच भक्ष पकडीत सुटावा तीर । फोडतो नरडे प्राशून टाकितो रुधिर । धावला तसा आबाजी मुल्लानावर । दोघांची झाली चकमक समोरासमोर । मावळे सर्व धावले फोडला घेर ॥
(चाल कटाव) चकमकती विजा गगनांत । तशा सेन्यांत । कटयार हातांत । मराठे लोकांत तृषा सर्वात । शत्रु सधिरांत । आणि मांसात । कराव्या पूत । नग्न तरवारी , अर्पण्या सिध्द शिरकमल भवानी पायी ॥
जाहले युध्द घनघोर । यवन बेजार । जाहले फार कैक सरदार । आणि लढणार । करुनिया ठार केला सभोवार । रक्ताचा पूर । त्यांत चौफर । यवन शिरकमल । जणू रुधिर तटाकीं कमळें  आली लाल ॥
मावळे घुसले सैन्यांत । यवनावर मात । केली लुटालूट । पाहून फूट । पळविले उंट । गोण्यासकट । बीनबोभाट । पळविले थेट । शिवाजीपाशी । देशार्थ म्हणती आणिल्या राशी ॥
अबाजीने यवन चौफेर । पळविले दूर । त्यांत सुभेदार । केला गिरफदार । आणि सुंदर । पकडिली नार । जिचा भ्रतार पुत्र सुभेदार । रुपमनोहर । यौवन भर । जणू सुरनार । अशा रमणीला पाहुनी नाही जो भुलत तोची जगी विरळा ॥
(चाल मो.) आबाजीने खजिना लुटला । यवन कापला । उध्वस्त केला । प्रांत कल्याण आला हातांत । वाढली युध्दतृष्ण सर्व मराठयात । मोद मावेना त्याचा गगनांत ॥
पकडूनी सुभेदाराला । आणि यबनीला । घॆउनी गेला । ऐकुनी सर्व समरवृत्तास । शिवाजी म्हणे भले शाबास ॥
सुभेदार जसा कांही चोर । शिवाजी समोर नंदीसम स्थिर । नंदिला वाचा नाहि परी यास । वाचा आहे ह्मणुनि विनवि शिवबास । सांब शिवबांनें मुक्त केले त्यांस ॥
कल्याणसुभेदार केला । आबाजीपंताला । बाकी फौजला । पाहुनी ज्याचे त्याचे शौर्यांस ॥ ढालतलवार धनामानास । देऊनी खूष केलें सकळांस ॥
(चाल १ ) आबाजीनें रुपवती बाला । अर्पण केली शिव बाला ॥ संतुष्ट करुनि शिवबाला । मिळविण्या धनमानाला ॥ अन्तरी धरुनी हेतुला । स्वार्थाचे पडॆ मोहाला ॥
:(कटाव १ ) पाहुनी बिजली सम रमणि । जाहले मनी मोहवश झणी । सर्व ते स्थानि । तरी ती रमणी । गेली घाबरुनि । पाहूनी धरणि । आणिते नयनि । टपटपा पाणी । न्हाणि धरणीस । प्रार्थिते रक्षि हे धरणि करी करणीस ॥
(कटाव २) निस्वार्थ नीतीमानाला अर्पूनि परस्त्री त्याला । समजून आत्मसम त्याला । कलंकित त्याला करण्याला । स्वार्थान्ध सिध्द जो झाला । बघुनियावरती सूर्याला । थुंकण्या तयार झाला । त्याचा थुंका त्याच्यावर आला । कधी सूर्य कलंकित झाला असे घडेल काही बोला बोला निस्वार्थी मानव । विरळा । असमान्य नीतीमत्तेला । जागृत ठेवी सदरेला । बाळगी अतुल ध्रैर्याला । जगी वंद्य तोच जाहला । आशा शिवाजि नितिमानला । जै सिध्द झाला करण्याला । मंबाजी तुकारामाला । मोहीत अर्पुनी त्याला । लावण्यवती नारिला । तुकाराम नीतीचा पुतळा हरिभक्त डंका गाजला । देवाचा लाडका त्याला । पाडतो कोण मोहाला । थेट तस्सा प्रसंग झाला । अर्पण्या आबाजी गेला । सौदर्यवती रमणिला लज्जयुक्त यवनीला । पाहुनीया त्या नारीला । नत शिवाजी राजा झाला ॥
(चाल २ ) शिवराज म्हणें आबाजि सोनदेवाला । लाभते असे सुस्वरुप माझे मातेला । सुस्वरुप मीही जन्मलो । असतो मातेला जागृत ठेवि किर्ति थोर नीतिमत्तेला । यास्तव नीतिचा ध्वज वैकुन्ठि गेला । पोचती केली तात्काळ यावनी स्त्रीला । देऊनी उंची भूषण आणि वस्त्राला । बैसुनी पालखीमाजि गेलि सासरला । माहेरि आल्यासारखे झाले त्या स्त्रीला  । असा नीतिमान शिवराज जगी गाजला । धन्य तो भुलत जो नाहि कनक कांतेला मोठें उतरले नाही या कसोटीला । साठ हजार वर्षे संपुर्ण केले तपाला । परि विश्वामित्र मेनकेला भुलुनिया गेला । पडतात असे परनारीच्या मोहाला । रावणासारखी घाला येतो वाटयाला । जाणती सूज्ञ परनार विषाचा पेला जाहला पूर्ण उतीर्ण कसोटीला । नीतीमान शिवबा म्हणुनी डंका गाजला ॥
(चाल मोड ) सूर्याची प्रभा फाकते । दिगंती जाते । जगात चालते । तशी शिवबाचि किर्ति जगतात । भरुनि राहिलि  महाराष्ट्रांत म्हणुनि स्वातंत्र्य सूर्यशिव ख्यात ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 15, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP