स्वामी समर्थ सप्तशती - अध्याय चौथा

श्री दत्तावधूत विरचित ' श्री स्वामी समर्थ सप्तशती ' ही उपासना करण्यासाठी खूप दिव्य पोथी आहे.


श्री गणेशाय नम: । ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा ॥
राहोनी अक्कलकोटात । असंख्य सिध्द निर्मित । ऐसा महिमा अद्‍भुत । श्री स्वामी समर्थांचा ॥१॥
असता स्वामी मोगलाईत । एका मुलासी  योग देत । आणि शिर्डीसी पाठवीत । योगसाधना करावया ॥२॥
तेची श्री साई समर्थ । म्हणूनी पाहा होती प्रसिध्द । श्री गुरु स्वामी समर्थ । ऐसा महिमा तयांचा ॥३॥
श्री स्वामी समर्थ । प्रज्ञापुरी राहो लागत । शिष्य आनंदनाथ । म्हणोनी होते तेथवरी ॥४॥
तयांसी म्हणती समर्थ । शिर्डीसी जावोनी पाहा म्हणत । गुप्त खुणा सांगत । योगमार्गींच्या तयालागी ॥५॥
शिर्डीसी जाती आनंदनाथ । प्रेमे साई त्यांसी भेटत । आपुल्या आसनी बैसवीत । करिती गोष्टी त्यांसवे ॥६॥
समर्थांचे सारे निरोप । साईंसी आनंदनाथ देत । आणि ग्रामस्थांसी सांगत । श्रोते तुम्ही अवधारा ॥७॥
श्री साईबाबा योगीपुरुष । देवाचे लेकरु असत । वसती तुमच्या गावात । भाग्य उदेले तुमचे हो ॥८॥
हा आहे हिरा प्रखर । तेजे दिपेल जगदांतर । तुम्ही सेवा सत्वर । ऐसे सांगती लोकांना ॥९॥
ऐसे ग्रामस्था सांगोन । आनंदनाथ करिती प्रयाण । ते साईबाबा भगवान । आज जाहले जगताचे ॥१०॥
ऐसे महासमर्थ । असती पहा स्वामी समर्थ । त्यांच्या लीला अद्‍भुत । कोणी कैशा वर्णाव्या ॥११॥
जगदोध्दारा कारण । केले सिध्द निर्माण । ऐसे अगाध महिमान । असे स्वामी समर्थांचे ॥१२॥
शेगावीचे गजानन । येती समर्थांसी शरण । योग शिकवा म्हणून । प्रार्थना करिती समर्थांची ॥१३॥
समर्थ म्हणती गणूप्रत । येथे गर्दी खूप असत । तू जाई देव मामलेदारांप्रत । शिकवील सारे तुजला तो ॥१४॥
ऐसे तया सांगती । काही योगक्रिया दाविती । आणि पाठवून देती । सटाण्यासी तेधवा ॥१५॥
देव मालेदार महासिध्द । गजानन आले तेथ । राहोनी त्यांच्य़ा सहवासात । शिकले योगसाधना ते ॥१६॥
तीन मास राहोनी तेथ । मग आले अक्कलकोटात । वंदूनी श्री स्वामी समर्थ । सेवा करीत राहिले ते ॥१७॥
स्वामी गजाननासी म्हणत । जावोनी राही शेगावात । नाव नाही गाव नसत । अवधूत होऊनी राही तू ॥१८॥
ते गजानन महाराज शेगावात । आज जाहले प्रसिध्द । स्वामी समर्थ लोकोध्दारार्थ । ऐसे निर्मिती सिध्द ते ॥१९॥
ऐसे स्वामी समर्थ । प्रज्ञापुरी होते राहत । अनेक सिध्द निर्मित । जगदोध्दारा कारणे ॥२०॥
श्रीकृष्ण सरस्वती सिध्द । कोल्हापुरी असती प्रसिध्द । गुरु त्यांचे स्वामी समर्थ । ऐका नवल ती कथा ॥२१॥
ते राहती कोल्हापुरात । परी अंतरी तळमळत । कैसा होईल मोक्ष प्राप्त । साफल्य होईल जन्माचे ॥२२॥
मंगळसुळीचा खंडोबा दैवत । ते त्यांचे कुलदैवत । त्याचे यात्रेसी जात । उपाशी राहती तेथे ते ॥२३॥
खंडोबा होऊनी प्रसन्न । त्यार्ते देई वरदान । म्हणे दत्तात्रेय भगवान । प्रज्ञापुरी पाहे तू ॥२४॥
त्यासी जाई शरण । ते करतील दया पूर्ण । श्री अवधूत निरंजन । होवोनिया राहसी तू ॥२५॥
असो श्रीकृष्ण सरस्वती । अक्कलकोटी येवोनी राहती । स्वामीकृपा करिती । सिध्दावस्था पावले ते ॥२६॥
ऐसे स्वामी समर्थ । राहती लीला करीत । जगदोध्दारार्थ श्री दत्त । प्रज्ञापुरी राहिला ॥२७॥
सय्यद नामे भक्त । येई स्वामी दर्शनार्थ । अक्कलकोटी येवोनी पुसत । ‘ अक्कलकोट स्वामी कहाँ है ’ ॥२८॥
क्रोधे स्वामी म्हणत । अक्कलकोटमे स्वामी असत । यहाँ क्या देखत । ऐसे म्हणती तयाला ॥२९॥
ऐसे म्हणता अकस्मात । समाधी त्यासी लागत । आठ तास समाधित । बुडोनिया राहे तो ॥३०॥
मैंदर्गीचा जमादार । अलिखान भक्त थोर । भेटविला त्यासी ईश्वर । सिध्द केले तयांना ॥३१॥
अनेक हिंदूंना सिध्द केले । पारशी ख्रिश्चनही आले । शरण स्वामी समर्थांना ॥३२॥
सिध्द निर्मिले अनेक । असंख्य निर्मिले साधक । अनेक  केले मुक्त । कृपाप्रसादे करोनिया ॥३३॥
वेंगुर्ल्याचे आनंदनाथ । मुंबईचे स्वामीसुत । पुण्याचे जंगलीनाथ । ऐसे शिष्य समर्थांचे ॥३४॥
काळ्बुवा नामे पुण्यात ।होते एक सिध्द राहत ।  वेडयासारखे वागत । मारिती दगड लोकांना ॥३५॥
काही समर्थ भक्त । जाती त्यांचे दर्शनार्थ । त्यांसी बैसवोनी समीपत । सांगती गोष्टी समर्थांच्या ॥३६॥
म्हणती श्री स्वामी समर्थ । ते दत्तप्रभू साक्षात । मी त्यांचा सेवक असत । ऐसे म्हणती भक्तांना ॥३७॥
त्यांनी मला केले सिध्द । आणि पाठविले पुण्यात । लोक उपद्रव टाळण्याप्रत । वेडा होऊनी राहिलो ॥३८॥
शंकर महाराज प्रसिध्द । समाधी असे पुण्यात । तेही समर्थांचे शिष्य । कथा त्यांची अवधारा ॥३९॥
शिकारीस जाती अरण्यात । एका पाडसा पाहत । गोळ्या त्यावरी झाडत । परी ते पळोनी जात असे ॥४०॥
त्यासी शोधीत । थोडे आणखी पुढे जात । एका शिळेवरी दिसत । स्वामी समर्थ बसलेले ॥४१॥
मांडीवरी पाडस असत । पाहूनी शंकर क्रोध येत । म्हणे शिकार मजप्रत । द्यावी म्हणूनी सांगतसे ॥४२॥
त्यासी म्हणती समर्थ । ‘ का मारिसी जीवांप्रत ’ । ‘ जरी तू नाही निर्मित ’ । ‘का मारिसी तयांना ’ ॥४३॥
शंकरासी क्रोध येत । झाडी गोळ्या बहुत । परी त्या आरपार जात । काही न होई समर्थांना ॥४४॥
पाहोनी हा चमत्कार । मनात भ्याला शंकर । हा नर नव्हे ईश्वर ।ऐसे म्हणे मनामाजी ॥४५॥
करी साष्टांग नमस्कार । म्हणे मी आपुला चाकर । आपण साक्षात ईश्वर । क्षमा करावी मजलागी ॥४६॥
हेची शंकर महाराज । म्हणूनी होती पुढे प्रसिध्द । एकशे चाळीस वय असत । समाधी घॆती तेव्हा ते ॥४७॥
ऐसा दत्त दिगंबर । लीलाविग्राही अवतार । त्यांच्या लीला समग्र । कोणी कैशा वर्णाव्या ॥४८॥
वामनबुवा दत्तभक्त । होते पुण्यामाजी राहत । अंतरी सदा तळमळत । सद्‍गुरु भेटी कारणे ॥४९॥
ऐसे असता तळमळत । एक तेजस्वी व्दिज येत । म्हणे ‘जा ’ अक्कलकोटात । दत्त तेथे राहिला ॥५०॥
ऐसे ब्राह्मण म्हणत । आणि तेथेची होई गुप्त । वामनबुवा चकित । होऊनी पाहा जातसे ॥५१॥
परी विश्वास न होत । कारण असे पंडित । बुध्दिवादी बहुत । विश्वास मनाचा होईना ॥५२॥
शेवटी करोनी मनोबळ । म्हणे पाहू एक वेळ । ब्राह्मणाच्या गुरुचे खेळ । जावोनी एकदा पाहावे ॥५३॥
ऐसा अविश्वास करोन । अक्कलकोटी येवोन । घेई समर्थ दर्शन । वामन पंडित तेधवा ॥५४॥
का रे चेष्टा केलीस । आमच्या ब्राह्मणावरी अविश्वास । ऐसे म्हणोनी वामनास । खूण दाविली स्वामींनी ॥५५॥
वामनबुवा नमस्कार करीत । म्हणे मी अज्ञानी असत । आज काल  समाजात । दत्त कोठे दिसेना ॥५६॥
कोण सत्या काय असत्य । हे न काही कळोन येत । गावोगावी अनेक सिध्द । दीक्षा देण्या बैसले ॥५७॥
म्हणौनी थोडी थट्टा केली । परी ती अंगासी आली । आपण दत्तात्रेय माऊली । क्षमा करावी म्हणत असे ॥५८॥
मज दीक्षा द्या म्हणत । स्वामी म्हणती तयाप्रत । राही सेवा करीत । ब्रह्मनिष्ठा होशील तू ॥५९॥
समर्थांची सेवा करीत । वामन काही दिवस राहत । तेथून मग गाणगापुरात । जाई सेवा करावया ॥६०॥
गाणगापुरी जावोन । केले गुरुचरित्र पारायण । सप्ताह होता पूर्ण । दृष्टांत होई तयालागी ॥६१॥
दत्तात्रेय भगवान । रात्री स्वप्नी येवोन । सांगती वामना लागोन । श्रोते तुम्ही अवधारा ॥६२॥
स्वप्नी सांगती श्री दत्त । मीच आहे अक्कलकोटात । स्वामी समर्थ रुपात । भक्तोध्दारा आलो मी ॥६३॥
ऐसा दृष्टांत होत । वामन अक्कलकोटासी येत । म्हणे श्री स्वामी समर्थ । साक्षात दत्त असती हो ॥६४॥
ऐसे लोकां सांगत । राहती सेवा करीत । ब्रह्मनिष्ठा वामनबुवा होत । समर्थकृपे करोनिया ॥६५॥
ऐसा महिमा अपार । तो लीलेचा सागर । त्यातील काही लहर। येथे आपण पाहतसो ॥६६॥
सरस्वती सोनार । समर्थांचा कृपाकर । लाभता जाहली सत्वर । परहंस योगिनी ती ॥६७॥
स्वामी होता क्रोधित । सरस्वतीसी आणिती भक्त । स्वामी शांत त्वरित । तीसी पाहता होती ते ॥६८॥
नाना रेखी पंडित । त्रिकालज्ञानी असत । ते म्हणती स्वामी समर्थ । सहस्र वर्षांचे असती हो ॥६९॥
शके दहाशे एकाहत्तर । स्वामींचे जन्म संवत्सर । ऐसा अगाध अपार । महिमा स्वामी समर्थांचा ॥७०॥
॥ अध्याय चौथा ॥  ॥ ओवी संख्या ७०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 14, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP