काँग्रेसचा पोवाडा

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.


आधीं नमूं शारदारमणा । मग ठेवूं माथा स्वातंत्र्य-देवीच्या चरणा ॥
काँग्रेसदेवी तुज नमना । स्वातंत्र्य अमृतं पाजिलें तूंच ना तरुणां ॥१॥
जिजाईनें शिवाजीराजांना । स्वराज्यपान्हा । पाजुनी त्यांना । सिध्द केलें तूंच ना आम्हां स्वातंत्र्यरणा ॥२॥
जनतेच्या ह्नदयसिंहासना । बैसुनी तेथे तूं करिशी स्वराज्यगाना ॥३॥
संघशक्ति घालि धिंगाणा । दाविलें तूंच ना असे तुझ्या ग शत्रूंना ॥४॥
काँग्रेसदेबि तुज शरणा । तुझी कृति देई मज स्फ़ूर्ति करण्या गे कवना ॥५॥
चमकले हिरे हिरकण्या । अर्धशतकें आयुमध्यें तुझ्या त्याची नाहीं गणना ॥६॥
प्रतिवर्षी तुला पाहण्या । लोटती गरिब श्रीमंत तुझ्या गे स्थाना ॥७॥
तुजपाशीं नाहीं प्रतरणा । समतेनें मातेपरी पहाशी तूंच सर्वांना ॥८॥
या सुवर्णमहोत्सव दिना । आत्मारामतनय हें अर्पी कवन तव चरणा ॥९॥
चौक १ ला
भूलोकीं स्वर्गिची गंगा यावी धांवून, चमकावी वीज वा मेघमंडळांतून, काँग्रेस तशी जन्मली दास्यामधून, काँग्रेस राष्ट्राचें मुख, दावी अचूक, मार्ग जनतेस सांगे निक्षून ॥
काँग्रेस राष्टाची शक्ति पाहुनि जिची कृति, सरकाराला भीति, वाटते नित्य त्यांचे ह्नद्यांत, म्हणून नेत्यास ठेवी तुरुंगांत, परी फ़ोफ़ावे काँग्रेस जोरांत । बिजांतुन जसा वाढावा वृक्ष, काँग्रेस पक्ष तसा प्रत्यक्ष वाढुं लागला आहे देशांत, फ़ुलांनीं आला आहे बहरांत, गोड गोड फ़ळें पुढील कालांत ॥
जशी गानदेवि श्रोत्यास, मधुरालापास, काढुनी त्यास गुंगवी तशी काँग्रेस तरुणांस, स्वराज्यगान ऎकुनी त्यांस, केलें तल्लीन आहे सकलांस  ॥चाल ॥
नि:शस्त्र अशा जनतेला, इंग्रजा तोंड देण्याला । काँग्रेस आली जन्माला, भय वाटे त्या इंग्रजाला । जसा कृष्ण येतां जन्माला, भिती पडली त्या कंसाला । वसुदेव देवकी तुरुंगांत, परि कृष्ण गेला गोकुळांत । काँग्रेस पुढारी तुरुंगांत काँग्रेस बाहेर जोरांत । पूतना आली गोकुळांत, कृष्णाचा कराया घात नोकरशाही टपली देशांत, काँग्रेस कराया नष्ट  ॥चाल ॥
भेदनीति पूर्ण इंग्रजाची ओळखी काँग्रेस । काँग्रेस एकी करण्यास झटे अहनिश । लालूच दावुनी पुन्हां बेकी करण्यास । एकींत आमुच्या मरण दिसे इंग्रेजास । सरकार म्हणुनी बैसलें बेकी करण्यास । सरकार बैसलें टपुन असे प्रंसगास । करण्यास एकी पुढार्‍यांस पडती सायास । देशार्थ तिलांजलि देती घरादारांस । देशार्थ त्याग हा धडा देती तरुणांस । काँग्रेसमध्ये असे वीर येती जन्मास । काँग्रेसचा पुढच्या चौकांत ऎका इतिहास ॥
चाल मोडते - सत्तावनच्या बंडानंतर, हिंदी प्रजेवर, खूष सरकार म्हणुनी नि:शत्र केलें लोकांस, तुमची रक्षणचिंता आम्हांस, यास्तव आलो हिंदुस्थानास ॥
चौक २ रा
आगगाडी तारायंत्राला, गौरवर्णाला, पाहुनी लोक भुलला, म्हणे देवदूत आले देशास, आमचें रक्षण जणूं करण्यास, हायसें वाटलें त्याचें जीवास ॥
मानभावी कपटी बोलास स्वार्थी गोर्‍यास भुलुनि निखालस, विसरले सर्व स्वाभिमानास, पारतंत्र्याची चीड चित्तास, वाटेना गेलें पार विलयास ॥
जसा यावा काळ्याकड्यांतुन, खडक फ़ोडून, झरा धांवून, दादाभाई आले तसे जन्मास, हिरा तळपला हिंदुस्थानास ज्यांनी काँग्रेस आणली उद्यास ॥
आठराशें पंच्यांशी सालाला, मुंबई शहराला अठ्ठाविस डिसेंबरला दादाभाईआदि पुढारि येईन, निशाण काँग्रेसचें त्यांनी रोवून, धन्य झाले दादाभाई जन्मून  ॥चाल ॥
बंधु नये ऋषीचें कूळ, काँग्रेसचें आहे तसें मूळ । भांगेंत यावि जशि तुळस, इंग्रजांत हयूम सालत । स्थापन करण्या काँग्रेस, केली मदत दादाभाईस । बहात्तर लोक मुंबईत, स्थापन करण्या काँग्रेस । अध्यक्ष पहिल्या बैठकीत, निवडले उमेशचंद्रास । जस्स शोभे चांद अस्मानास, उमेशचंद्र तसे बैठकीस  ॥चाल ॥
जशी गंगा आहे उगमास अतीशय लहान । काँग्रेस तशी आरंभीं झाली स्थापन । वाढत गेली जशी गंगा पुढें जोरानं । काँग्रेस पुढें वाढत चालली वेगानं । गंगा गेली मिळाया समुद्रासि प्रेमानं । काँग्रेस स्वातंत्र्याकडे चालली तोर्‍यानं । चळवळ नाव चालवा याच गंगेतून काँग्रेसरुपी गंगेंत करा हो स्नान, घ्या पवित्र गंगेमध्ये हात धुवून । मुक्तता तरिच होईल दास्यपंकांतून  ॥(चाल मोडते) ॥
एकोणीसशें पांचपर्यंत, होते नेमस्त, काँग्रेस भरवीत नवयुगारंभ तेथपासून, बालरवि उद्याचली येऊन, तरुण जागृत तेज पाहून ॥
चौक ३ रा
टिळकासम कार्यक्षम वीर विलोकून, कीर्तिप्रभेनें दिपून, तरुण गेले हरकून, वाटे अंतरापासून, हा एक मार्ग दावील, देशास स्वराज्य देईल  ॥(चाल) ॥
टिळकांची ऎकुनी कीर्ति, उज्ज्वल कृति तशीच देशभक्ति, तेजस्वी मूर्ति, वहावा म्हणती । जणुं पाणीदार मोती दाणा, टिळक शहाणा, चेतवी तरुणा, ऎकवुन त्यांना, स्वराज्य-कर्णी । टिळकासम पाहुनी हिरा, अष्टपैलु खरा, तेजस्वी तारा, दिपूनि गेला सारा, तरुण सभोंवरा । काँग्रेसचें रोपटें लावून, दादाभाईनं, वाढविलें छान, करिल परि कोण, तिचें रक्षण ॥
(चाल मोडते) वृध्द झाले दादाभाई जणुं पिकलें, पान, कन्या काँग्रेंस लहान, चिंता मनांत थैमान, चिंता जाळीं बलवान पालनकर्ता शीलवान, कोणी दिसेना महान्‍, उगवला तोंच तेजांळ, रवि टिळक शत्रूचा काळ ॥
खवळून जातां स्फ़ोटक, द्रव्यें पृथ्वीचे पोटांत, पोट फ़ाडुनीयां त्यांत, होई भूकंप बेफ़ाट, तशी चळवळ जोरांत, वंगभंग भर त्यांत, आली स्वदेशीची लाट, नोकरशाहिचें पोट फ़ाडून, नोकरशाहि गेली हादरुन ॥
कर्झन परी कायदा जारी करुनी तोर्‍यात, म्हणे वंगभंग लाट, दाबुन टाकिन क्षणांत करुन दडपशाही मात, मारुन जनमता लाथ, म्हणे तुम्ही काय करणार हो, नि:शस्त्र असेच मरणार ॥ (चाल दांगड)  ॥
एकोणीसशें पाच सालाला, कर्झन साहेबाला, उमाळा आला, । बंगालची फ़ाळणी करण्याला, हिंदु मुसलमान फ़ोडण्याला, । बंगभंगाचा उपाय काढला, करायला कर्झन एक गेला । झाले परि भलते प्रसंगालाम वंगभंग करण्या सिध्द झाला । तेजोभंग त्याचा परी झाला, अकरा साली स्वता बादशहाला । फ़ाळणी रद्द करणें प्रसंग आला, काँग्रेसचा पहिला विजय झाला । कसा तें सांगतों या वेळेला, रुसो-जपान लढा सुरु झाला, जपान विजयानें जागृत झाला । काळ्या-गोर्‍याचा लढा झाला, गोर्‍याला पार चित केला, स्वाभिमान हिंदुस्तानचा सगळा, फ़ुंकर घालितां अग्नि फ़ुलला । टिळकासम फ़ुंकर घालण्याला, ज्वालामुखी जणुं जागृत झाला, तसा स्वाभिमान जागृत झाला, एक संस्कॄती भाषावाला । एक रक्ताचे हो लोकाला, प्रांत बंगाल फ़ोडण्याला । कर्झन जेव्हां पूर्ण तयार झाला, लाथाडून अर्जविनंत्याला । सारा बंगाल खवळुन गेला, दर्या जणु फ़ार खवळुन गेला, समुद्र मंथनीं रत्न देवाला, जनसागरीं काय देशाला । मिळाले ऎका सांगतो तुम्हाला, देह देशार्थ अर्पण्याला, । तयार नररत्नें मिळालीं आम्हाला, स्वदेशीबहिष्कारशस्त्र हाताला, अचुक हा बाण मिळाला आम्हाला, शत्रुच्या मर्मी जाऊन बसला । कारण इंग्रज व्यापारी पडला, देशभर पुकारा याचा केला, । लाल बालपाल या वेळेला, दत्तात्रय अवतार जणु झाला । काँग्रेसचा भाग्यकाल आला, स्वदेशी पुकारा सर्वत्र केला, वंगभंगाचा वणवा पेटला, तरुण खडबडुन जागृत झाला । हिंदु मुसलमान एक झाला । तिटकारा इंग्रजाचा आला, विदेशी कपड्याच्या होळ्या केल्य, त्र्कांतिकारक जन्मा आला । हरताळ सर्वत्र दिसू लागला. वंगभंग जोंवर नाहीं गेला ॥
बहिष्कार ब्रिटिश मालाला, शपथा सर्वानीं अशा घेतल्या, त्या वेळी दादा. ॥ (चा. मो.)  ॥
जळिस्थळीं जसा कृष्ण कंसाच्या मनांत, तसा कर्झनच्या चित्तांत, दिसे टिळक कृतांत कृती टिळकांची अचाट, पाहुन चळवळीची लाट, भीती वाटे ह्नदयांत, उलथुनी राज्य टाकील, हा डोईजड खास होईल. ॥
चौक ४ था
पुष्पांनी वृक्ष बहरला, तसा काँग्रेसला, तरुण गोळा झाला, आली काँग्रेस कलकत्याला, दादाभाई अध्यक्षस्थानाला, स्वराज्य ज्यांनी मंत्र बोलला ॥
जरि होते ब्यायशी वर्षाचे, ह्नदय परी त्यांचें होते तरुणाचें, स्वराज्य घोषणा म्हणुनी कलकत्त्यास, दिसेल कां स्वराज्य माझे डोळ्यास, लागल ध्यास त्यांचे चित्तास ॥
स्वराज्य हें ध्येय आमचें, सिध्द करण्याचें, साधन साचे, स्वदेशी-बहिष्कार-राष्ट्रीय- शिक्षण, चतु:सूत्रीचें जाहीर घोषण, यानें देशांत झालें अंदोलन ॥
आजवरी मवाळ झाला, मालक काँग्रेसला, त्याना कलकत्त्याला, स्वदेशी बहिष्कार नाहीं रुतला, झीज अंगास लागेल असला, मार्ग कां रुचतो मवाळाला  ॥चाल, ॥
सुरतेस काँग्रेस आली. तेथें जहाल मवाळ बंडाळी । दादाभाईची स्वराज्य आरोळी गोखल्यांना पंसत न पडली । त्या ठरावाची खांडोळी, करण्यास मंडळी जमली । टिळकांनी मख्खी ओळखिली, सुरतेस काँग्रेस उधळली । काँग्रेसची झाली चिरफ़ळी, जहाल मवाळांची दुफ़ळी । मवाळांची फ़जीती केली टिळकांची सरशी झाली ॥
(चाल २)
प्रतिपक्षी चीत करण्याची अजब हातोटी । सरकारी धोरणावरी केसरी पत्रीं । टिळकांची टीका फ़ार कडक अशी ख्याती । त्यामुळें त्यांचेवर वळली सरकारची दुष्टी । पहिली सजा दीड वर्षाची परि न त्या खंती । येतांच सुटुन सुरुझाली यांची देशभक्ती । दिनरात देह झिजविला स्वदेशासाठीं । स्वदेशीची चळवळ केली टिळकांनी मोठी । सार्वजनिक गणेश उत्सव संघटनेसाठीं । केसरी मराठा गर्जना करी महाराष्ट्रीं । स्वराज्य हा जन्मसिध्द हक्क टिळकांची उक्ती । दारु पिकेटिंग चळवळ त्यांनीं केली मोठी । त्यांनी केले यत्न राष्ट्रीय शिक्षणासाठीं । तरुणांचे रक्त सळसळलें स्वराज्यासाठीं । स्वातंत्र्यज्योत फ़ुलविली अशी महाराष्ट्रीं ॥
(चाल मोडते) धरण्यास स्वराज्य धुरा, लाभला खरा, टिळकासम हिरा, म्हणुनी काँग्रेस पाऊल जोरांत वंगभंगाची चळवळ देशांत टिळकांची कीर्ती झाली जगतांत ॥
चौक ५ वा
रोमरोमीं तेजस्वीपणा टिळकांचा बाणा, पाहूनी तरुण, येई चैतन्य त्यांचे रक्तांत; नको हें राज्य वाटे चित्तांत परी, बोलण्या चोरी देशांत ॥
येतांच सूर्य उदयाला, तिमिर विल्याला, तसे देशाला टिळक देशाचे दास्य तिमिरास अहर्निश झटले दूर करण्यास, म्हणुनी वाट्यांला त्यांच्या कारावास ॥
फ़ितवितो टिळक तरुणाला, करी चळवळीला, त्यावरी खटला, राजद्रौहाचा सरकारनें केला, वाटावी दहशत लोकाला, सहा वर्षाच्या दिली सजेला ॥
(चाल) ऎकुनी त्यांचे शिक्षेला, सारा देश फ़ार हळहळला । चंद्राविण तारांगणाला नसे शोभा वद्या पक्षाला । जातांच टिळक तुरुंगाला, निस्तेन देश जाहला । तुरुंगात जरा हा गेला, तरी नाहीं सुटत याचा चाळा । तिथें नाहीं स्वस्थ हा बसला, गीतारहस्य ग्रंथ काढिला । टिळकांच्या किर्तीमंदिराला, ग्रंथानें कळस चढविला । अनभिषिक्त राजा झाला, टिळक हा खरा देशाला । पुन्हा सुटून येतां देशाला. महायुध्द वणवा पेटला । स्वराज्याचे हक्क मिळण्याला. हा मोका चांगला आला ॥
(चाल) काँग्रेस थंडावली होती सहा वर्षात । येतांच टिळक मंडालेहून देशांत । चैतन्य येऊं लागलें पुन्हा तरुणांत । होमरुल चळवळ केली त्यांनीं जोरांत । बेझंट बाईनीं केली मदत चळवळींत । सुरतेचा सूर अद्याप होता देशांत । गोखले- टिळक हा वाद आला रंगात । मवाळ-जहालांचा हा वाद होता निश्चित । जहालांस वाटे काँग्रेस न्यावी जोरांत । मवाळांस वाटे काँग्रेस असावी ताब्यात ॥
(चाल मो.) सरकार आहे संकटांत, महायुध्दांत, मवाळ म्हणत, मागण्या मागून सरकारला त्रास, देऊ नये वाटे त्यांचे चित्तास, धडाडी कळली पूर्ण देशास ॥
चौक ६ वा
महायुध्द संधि चांगली, म्हणे लाभली,बेझटबाई भली, केली खटपट तिनें जोरांत, कराया समेंट, जहाल मवाळांत तोंच गोखले गेले स्वर्गात, टिळकांनी रात्रंदिन फ़िरुन, मोठ्या धडाडीनं आखिल हिंदुस्थान, होमरुल चळवळ केली जोरांत अपूर्ण स्वागत त्यांचे दौर्‍यांत, स्वराज्य बीज पेरलें लोकांत ॥
हिंदु मुसलमान एक केला, टिळकांनी लखनौला, म्हणून काँग्रेसला, भारतमंत्र्याचें पाचारण खास, स्वराज्यहक्क देतों तुम्हांस, तुमचें सहकार्य हवें आम्हांस ॥
(चाल) हिंदु मुसलमान मिळून, स्वराज्याची मागणी जोरान, असें संघटन पाहून, मांटेग्यू गेला घाबरुन । संकटीं होता म्हणून, इंग्रज आला धांवून । देतों स्वराज्य असें सांगून, चळवळ टाकली दाबून । संपतां युध्द दारुण, गेलें वचन पार विसरुन । सुधारणा पोकळ देऊन, कशी केली पहा बोळवण ॥
(चाल) इंग्रजाकरितां युध्दांत वेचले प्राण । उपकार-फ़ेड पहा कशी केली सरकारनं । रौलेट जुलमी कायदा बक्षीस म्हणून । यांतच भरतिला खिलाफ़त प्रकरंण, पकडितां अल्लीबंधुना चेतले मुसलमान । गांधींनीं याच्या निषेधार्थ चळवळ जोरानं । सत्याग्रह शत्र हें काढलें अजब शोधून । काँग्रेसला सत्य अहिंसेचा मार्ग दावून । लाविले महात्माजींनी निराळें वळण । यामुळें पुढें काँग्रेसचे तेच झाले धुरिण । आसेतु हिमाचल केलें रौलेट प्रकरण । आगींत तेलासम झाले पंजाब प्रकरण । येईल पुढें सविस्तर त्याचें वर्णन । थप्पड एका हातानें अशी मारुन । सुधारणारुपी हातानें गाल चोळून । सरकारी वृत्ति अशी नेहमी येते दिसून । भेदनीति यामुळें त्याची जाते साधुन ॥
(चा. मो.) पितापुत्र नेहरु लालाजी, पंडित मालवीयजी, दास पटेलजी, शोभे गांधीस प्रभावळ खास, ग्रहमाला जशी शोभे सुर्यास गांधीयुग सुरु झालें समयास. ॥
चौक ४ वा
ठेवुनी हात स्वातंत्र्य-देविपदकमला, स्वातंत्र्य प्रतिज्ञा करुनि नित्य कार्याला, कसुनिया कास देशार्थ फ़किर जो झाला, जयाचा देव सखा बनला ॥
(चाल) ज्याचि कीर्ति गाजे जगतांत, भरतखंडांत, साधुसंतांत, गांधी जाहले पूर्ण विख्यात, वंद्या जे झाले सकळ लोकांत, महात्मा म्हणुनि त्यास म्हणतात ॥
पाहुनी हाल दोनांचें, कळवळें साचे, ह्नदय गांधिचें, हिंदीचें दु:ख दूर करण्यांत, हाल सोशिले आफ़्रिका खंडांत, महात्मा म्हणुनि त्यास म्हणतात ॥
तन मन धन अर्पूनी, लंगोटी लावोनी, फ़किर होबीनी, देशस्वातंत्र्य एक चित्तांत, ध्यास लागला ज्यास दिनरात, महात्मा म्हाणुनि त्यास म्हणतात ॥
परस्त्रीस मात समजोनी, विलास सोडोनी, इंद्रिय दमनीं, मिळवुनी विजय, जाहले ख्यात ऎन तारुण्य बहर कालांत, महात्मा म्हणुनि त्यास म्हणतात ॥
(चाल) समजोनी बहिण स्वस्त्रीला, मारिली लाथ सौख्याला । अवघड विश्वामित्राला तो विषयपाश तोडिला । दोन तपे ब्रम्हचर्याला, पाहुनी विरक्त झाला । वैराग्य असें जगताला, पाहुनी अचंबा वाटला ॥
(चाल) वैराग्य लाभलें श्रीरामासम ज्याला । रामासम वाटे गांधि शांतिचा पुतळा । एकपत्नी वचनि एक बाणी या त्रिगुणाला, पाहुनी गांधिजीपाशी त्रिगुण जगताला । श्रीराम जणु कलियुगीं वाटे अवतरला । नेसुनी वल्कलें राम निघाले वनाला । नेसुनी खादि गांधिजी गेले आफ़्रिकेला । त्यानें सीतादेवि यानें कस्तुरिबाई जोडिला । मारुनी लाथ राज्याला राम नीघाला । सोडुनी पाणी वैभवावरी हा गेला । वनवास चौदा वर्षाचा त्यानें भोगिला । आफ़्रिका त्रास यानें चौदा वर्षे सोशिला । वानरें साह्य त्या, सत्याग्रहि वश याला । त्यानें लंकापति यानें लंडनपतीं हलविला ॥
 ॥(चा. मो.) ॥ हिंदीचे हाल पाहोनी, गेले धावोनी सत्याग्रह करुनी, केलें रक्षण अफ़्रिकाखंडांत, गर्व गोर्‍यांचा जिरविला त्यांत, महात्मा म्हणुनि त्यास म्हणतात ॥
चौक ८ वा
रौलेट बिलचा वरवंटा, सत्याग्रह सोटा, दाबुनी मोठा, गांधीनीं दूर पळविले त्यास, जागृत केले हिंदुस्तानास, बनविले सहनशील लोकास ॥
शस्त्रास्त्र ज्यांचे हातांत, त्यावर मात, हिंदुस्तानांत, शस्त्राविण गांधी कसे करणार, शठ्यंप्रति सत्य विजयी होणार, इंग्रजा माघार घ्यावी लागणार ॥
हरताळ सर्वत्र देशांत, पडला कडकडित, चळवळ जोरांत, पाहुनी त्र्कुध्द झाले सरकार, दिल्ली शहरांत केला गोळीबार, तिकडे गांधीजी गेले सत्वर ॥
(चाल) गांधीजी तेथे जातात, पकडिले त्यांस इतक्यांत । खळबळ झाली जोरांत, रौलेट बिल निषेधार्थ । भीति पडली सरकारांत सोडिले गांधी मुंबईत । सरकार पडले पेचांत, पाहुनी सत्याग्रह शस्त्र । शांतताभंग सदरांत, गोळीबार पुन्हा दिल्लींत ॥
(चाल) स्वामि श्रध्दानंद दिल्लींत, चालले होते शिस्तींत । गोळीबार झाला इतक्यांत, स्वामिचा घात करण्याचा हेतु ह्नदयांत ॥
स्वामिचा सवाल शिपायांस, कारण काय गोळिबारास । ऎकुनी सवाल म्हणे त्यास, आले रागास । छेद देंगे तुमकू म्हणे त्यास । छातीचा करुनिया कोट, दावुनी धैर्य आलोट । मै खडा सामने ताठ, म्हणे मुझे काट । आला गोरा तेथ इतक्यांत । रोखिल्या हुकुमावांचून, बंदुका त्यांनीं दडपून । शिपायाच्या गळल्या हातून, गोरा पाहून । अशी फ़जीती तेथे स्वामीन ॥
(चा. मो.) गांधींनीं साह्य करुनिया महायुध्दांत, इंग्रजा दिला मिळवून विजय हो त्यांत, पाजुनी दूध पोशिला सर्प गृहांत, तो सर्प जसा घे प्राण तसे शिरकाण, करुनी देशाची केली धूळधाण ॥
(कटाव ३ दांगड) जालियनवाला बागेचें, केलें रक्ताचें, अंगण साचें, कत्तलिचा असा नाहीं दाखला, कलंक हा इंग्रजी राज्याला, सांगतो एका प्रसंगाला । जालिनवाला बाग केला, पिंजरा लोकांना, कोंडण्याला, वाघापरि ठार मारण्याला, वीस हजार लोक सभेला, विमान घारिपरि हो घिरट्याला, घालुं लागलें त्या समयाला । हत्याबंद शिपाई दाराला. पाहुन गर्भगळित लोक झाला । भीती आहे जिवाचि प्रत्येकाला, भिंतीवरुन चढुन जाऊं लागला । जाऊं नाहीं दिले परि कोणाला, वाघ जणुं पिंजर्‍यात सापडला । तसा सारा लोक कोंडला गेला, गोळिबार त्यांनी सुरु केला । मुंग्यापरि लोक ठार झाला, रक्ताचा चिखल जिमिनिला । अगणित लोक ठार केला, इतक्यामधं दारुगोळा संपला । नाहीं तर आणखि कांही स्वर्गाला, पाठविण्याची इच्छा होती डायरला । कांही लोक लोळुन जमिनीला, वांचवूं पाहति प्राणाला । असें पाहुन हुकुम झाला, गुडघे टेकून जमिनीला, ठार तुम्ही करा निजलेल्याला । प्रेतांचा ढीग तेथे झाला । काय वर्णावें प्रसंगाला सांगा तुम्ही दादा ॥
(चा. मो.) जालियनवाला बागेंत, केला गोळिबार, मुंग्यापरि करुनिया कैक लोकांना ठार, डोळ्याची धुंदी परि नाहीं उतरली पार, रावरंक सारे सरसकट, जाण्या फ़रफ़टत, पोटानें सरपटत, लावी सरकार । उपकारफ़ेड ज्यानें केली करुनी अपकार, राक्षसी अशी डायर कृत्यें करणार, सरकार त्यास पेन्शन देण्यांस तयार, पाहुनी अमानुष छळा, गांधि खवळला, पुकारा केला, दुष्ट सरकार ॥
चौक ९ वा
एकोणीसशें वीस सालाला, आँगस्ट पहिलिला, घात जवा झाला, कालानें नेले बाळ टिळकास, मायभूमीच्या भाल टिळकास, पुसुनि दुर्देव तिच्या वाटयास । मासभूमि ढाळी अश्रुला, दास्यशृंखला, तोडणारा गेला, म्हणे मम द्या माझे पुत्रास, येति का कोणा सदय ह्नदयास, तोंच तापले गांधि समयास, असहकार त्यांनी पुकारुन, देश हालवुन जागृत करुनी, दु:ख मायभूचें कमी करण्यास, पारतंत्र्याचे पाश तोडण्यास, तुरंगवासाचा सोशिला त्रास ।
(कटाव २) असहकार कर्णा फ़ुंकिला, त्याचा नाद देशभर झाला, खडबडून जार्गत केला, जणुं सिंह खायला उठला, इंग्रजा बहिष्कार घाला, नका जाऊं त्याच्या कोर्टाला, सोडा त्याच्या शाळा-काँलेजाला, करु नका त्याचे नोकरिला कौंसिला बहिष्कार घाला, नका घेऊं त्याच्या पदवीला, नका शिवूं विदेशी मालाला, सर्वांग बहिष्कार घाला ॥
(चाल २) एक कोटी एक महिन्यांत फ़ंड जमविला । खादिचा धंदा त्यातुनी त्यांनी सुरु केला । जिकडे पहावे तिकडे पाहुनी गांधिटोपिवाला । त्र्कोधाग्नी नोकरशाहीचा त्यानें भडकला । मुस्काटदाबी कैक लोकांची केलि त्या काला । गोर्‍यांच्या पोटाला चिमटा खादिनें बसला । पकडिले त्यानें त्या वेळी म्हणुनि गांधिला । कांही वेळ ढगाच्या आड सुर्य जाहला । काराग्रह एक वर्षात त्यांचा संपला । जातांच ढग  बाजुला, सुर्य तळपला । भगवान्‍ कृष्ण गोकुळीं जसा जन्मला । मोहन गांधि हो तसे हिंदुस्तानाला, कंसाच्या कैदखान्यांत कृष्ण जन्मला, इंग्रजाचा जेल पुरणार याचे जन्माला । मोहनी त्यानें गोकुळा, यानें भारताला । कृष्णानें सुदर्शनानें कंसवध केला । याचे चर्खाचत्र्क मारिते म्यांचेस्टरवाला, लक्ष्मी सदा त्याचे चरणाला । धावते लक्ष्मी याचे मागें सदा कार्याला । अर्जुना गीता सांगुनी निर्भय केला । शिकवुनी अहिंसा यानें धीट देश केला । त्यानें कौरवाशि युध्दार्थ अर्जुन सिध्द केला । यानें देश केला तयार कायदेभंगाला ॥
(चा. मो.)  असहकार काळ संपला, पुढें हो चला, कायदे भंगाला । मुंबईकर ज्यामधें ख्यात, ज्यांनी केलि इंग्रजावर मात, त्याचें वर्णन पुढिल चौकांत ॥
चौक १० वा
सायमन कमिशन नेमून केला अपमान, घेतला लाठी मारुन लालाजिंचा प्राण, पाहुनी झाला जागृत देश अभिमान, स्वातंत्र्य ध्येय जाहीर, करण्या अधीर, तरुण तयार करण्या बलिदान ॥
(चाल) कलकत्ता काँग्रेस आली, अठ्ठाविस सालीं, वैभवशाली, पाहुनी दिपली, राजे मंडळी, अध्यक्ष मोतीलाल स्वारी, शोभे रथावरीं त्यांची ललकारी, सेना सागरीं, सुभाषचंद्र करी । गर्जना ऎकुनी अंबरी, देव सत्वरी, पुष्पवृष्टी करी । अध्यक्षांवरी धन्य खरोखरी सायमनचें इकडे आगमन, परि न त्या मान, सप्तग्रह म्हणुन । काळीं निशाणें दावुन, अपमान । गांधीनीं नेहरु-योजना करुनि, भाषणा ऎकुनी, सर्वांना । मान्य योजना झाली त्य क्षणा । योजना धाडुन सरकारला, एक वर्ष दिला, काल इंग्रजाला । विचार करण्याला काल संपला । (कटाव, दांगड) जसा कृष्ण भगवान्‍ गेला, शिष्टाई करण्याला दुर्योधनाला । सामोपचारानें वळविण्याला, धर्माची बाजू मांडण्याला हिताची गोष्ट सांगण्याला, दुर्योधन ऎका काय बोलला, माती जेवढी सुईच्या अग्राला, नाही देणार पांडवाला । पांच गांवांची गोष्ट कशाला । कपटानें घेऊन राज्याला । दुर्योधन मस्त फ़ार झाला । दुरुत्तर भगवानाला बोलला, बुडत्याचा पाय खोलाला, गर्व जसा त्यचा हरण झाला । थेट तसा प्रसंग झाला, कृष्णापरि शिष्टाई करण्याला । गांधी गेले व्हाइसराच्या भेटीला । गांधी म्हणे व्हाइसरसाहेबाला । एक वर्षाचा काळ संपला । सरकार काय तयार देण्याला? । नेहरु रिपोर्ट मान्य का तुम्हांला? । सरकारचा इचार काय झाला । सायबानं दिलं उत्ताराला । तयार नाहीं वचन ली देण्याला । अजुन नाही इचार पुरता झाला । केव्हांच नाहीं होणार विचार असला । गांधी गेले लाहोर काँग्रेसला झटक्यान दादा ॥
जवाहिर अध्यक्ष लाहोरला, पुकारा केला, स्वातंत्र्यध्येयाला । एकोणीसशें तीस आरंभाला, जानेवारी सहवीस तारखेला । स्वातंत्र्याचा जाहिरनामा वाचला । जागृत सारा देश झाला । गांधी म्हणे कायदेभंगाला, सुरु करणार याच काला । कायद्याचि भीती लोकाला, कोणी म्हणे थांबां या वेळेला । गांधी म्हणे भिऊं नका कायद्याला, भिऊ नका मुळींच तुरुंगाला । वाघाचे बच्चे प्रसंगाला, भिउनी पळतात का संकटाला । वाघ असुनि का शेळी बनला, आरसा इतिहासाचा डोळ्याला । दिसत का नाहीं तुम्हांला, त्यांत पहा शूर पूर्वजाला । त्यांत पहा शिवाजी राजाला । पारतंत्र्यांत राहण्याला, लाज कशी नाहीं चित्ताला, काळिमा पूर्वज कीर्तिला । हातीं घ्या सत्याग्रहशस्त्राला सविनय कायदेभंगाला । तयार व्हा त्वरितच कार्याला आज तुम्ही दादा ॥
(चाल) सविनय कायदेभंगाचा जन्मसिध्द हक्क हा साचा । पाठिंबा ज्याला सत्याचा, विजय हो त्याचा । सिध्दांत सर्व धर्माचा । मीठ कायदाभंग करण्याल । गांधी निघाले मार्च बाराला । सत्याग्रही ऎंशी लोकाला, घेऊन मदतीला । चालत गेले दांडिला ॥
लोटले लोक बघण्याला, उधळती फ़ुले पैशाला । धन नको लोक या काला, पाहिजे मजला । असें सांगून कायदा तोडला ॥
शस्त्रासि टक्कर देण्याला, शस्त्रहीन सिध्द कसा झाला । परदेश लोक लोटला, युध्द पहाण्याला, आश्चर्य वाटे जगताला ॥
(चाल २) एकनाथ, प्रल्हाद, तुकाराम या कसोटीला । उतरुन झाले जर विजयी त्या प्रसंगाला । सामुदायिक रीतीनें तसें, सोसुं कष्टाला । सोसुनि हाल देशार्थ, मिळवुं विजयाला । उतरले सर्वं सत्याग्रहि, या कसोटीला । करणार म्हणे गांधिजी, मिठागरीं हल्ला । करुं गोळीबार जर कराल, मिठागरीं हल्ला । प्राणाचि पर्वा देशार्थ नाहीं हो ज्याला । तो भिईल काय, सरकारी गोळिबाराला! । सत्याग्रही कैक तयार हल्ला करण्याला सरकारनें असें पाहून पकडले गांधिला ॥
(चाल बदलून) सेनापति गांधि गेले तुरुंगाच्या दारांत, कायदेभंगाची सुरवात, केली चळवळ जोरांत, परि सरकार तोर्‍यांत, म्हणे गोळिबार चहुंकडे, ठार करुं जशीं माकडें । माकड-साह्यें श्रीरामाने, रावण केला ठार, मस्त झाला होता फ़ार । गेला रसातळा पार, असे मी मी म्हणणार, गेले कैक मृत्युपंथास, इंग्रज जाईल खास ॥
लावणागिरी, करुनि स्वारी, घेऊं या हातांत, झेंडा लावोनिया त्यांत, करुं इंग्रजावर मात । शंका नको अंतरांत, एकजूट करुनि सत्वरी, केला हल्ला शिरोड्यावरी ॥
(चाल) पेशावरला केला गोळिबार, राक्षसी असे सरकार, लोकांत अनत्याचार, बाणला फ़ार । घेतल्या गोळ्या छातीवर ॥
सोलापुरीं गोळी बार करुन, दिसला तो ठार मारुन, लष्करी कायदा पुकारुन, घेतले छळुन, बंद व्हावी चळवळ म्हणुन ॥
मुंबईत रोज लाठिमार, खाण्यास लोक तयार, चिळकांड्या उडति भराभर, रक्ताचा पूर, निर्दयी असे सरकार ॥
कटाव ४- शिस्त पांडवासम पाळाया, देश सर्व हा तयार झाला, झेन्डावंदन करावयाला, स्वयंसेविका जमल्या अबला । आझाद-मैदानवरतीं आल्या, राष्ट्रीय झेंडा त्यांनीं रोविला, सरकारनें लाठीवाला, पोलिस ताफ़ा आंत सोडिला । केला स्त्रियावर लाठिहल्ला, स्त्रिया गरोदर कितीक पडल्या । डोक्यावरती जखमा झाल्या, रक्ताचा तो चिखल झाला । एका सुंदरशा तरुणीला, दु:शासनानें जशी कृष्णेला । सार्जंटानें कृष्णकुमारिला, लाठी मारुनि तिजवर हल्ला । करुनी जखमी केलें तिजला । ऎका सरकारच्या लीला । कितीक वर्णू मी या काला । घ्या ध्यानिं तयांचे गर्म विनती तुम्हांला ॥
चाल मो.- मस्त हत्ती खाति जेव्हां अंकुशाचा मार, मस्ती उतरते पार । तसे इंग्रज सरकार, ज्यांचा जीवनव्यापार, मुंबईनें केला ठार । नाक दाबुन तोंड उघडिलें समेटाचें बोलणें सुरुं केलें ॥
चाल- ऎशि हजार लोक तुरुंगांत कायदेभंगांत । लाखोनी लाठिमार खाल्ला याच युध्दांत । तसा गोळिबार चहुंकडे सर्व देशांत । सरकारी लाठि गोळिबार तुरुंग हीं शस्त्रं । जाहलीं सर्व बोथट शस्त्रविहिनांत । जाहला सत्य अहिंसेचा मार्ग हो श्रेष्ठ । राष्ट्राचा दर्जा वाढला सर्व जगतांत । पांडवासारखी शिस्त दिसली देशांत । देशार्थ त्याग ही वृत्ती बाणली त्यांत । याचें श्रेय सर्वं गांधिना आहे निश्चित । गांधिजी होते बिनमुदत जरी तुरुंगांत । सोडिले त्यांना बिनशर्त करण्या वाटाघाट । अर्धनग्न फ़कीर समेटास राजवड्य़ांत । वैभवशालि व्हाइसराँय करण्यास्वागत । हें दॄष्य अपूर्व वाटे सर्व जगतांत । आदर गांधिविषयीं वाढला यानें जगतांत । होऊनी समेट जाहली काँग्रेस ख्यात । बहुतेक सर्व सत्याग्रही झाले मुक्त । आंनदी आंनद झाला सर्व देशांत ॥
चाल मो.- कराचीचीं काँग्रेस भरली समेटानंतर, गांधि आविंन पँक्टावर, करण्या काँग्रेसची मोहोर, असा उत्सवाचा भर्, तोंच दु:खाचा सागर, भगतसिंग फ़ासावर, असा वीर, खरोखर झाला नाहीं आजवर, त्याचे अभिनंदनपर, गांधिनीं ठराव मांडला, त्यांचा कंठ दाटुनीं आला ॥
चौक १२ वा
समेटाची शाई वाळली नाहीं इतक्यांत, त्याचा भंग करण्यांत, घाई झाली सरकारांत, जलम सारावसुलांत, पाहुन गांधी म्हणतात, चौकशी याची करण्यास, नेमावी पंचायत खास ॥
नोकरशाही तयार नाहीं चौकशी करण्यास, पाहुन गांधी व्हाइसरायास, म्हणे राऊंड टेबलास, घालुं बहिष्कार खास, कळलें इंग्लंड सरकारास, त्यांचा हुकुम व्हाइसरायास, करा मान्य गांधी तत्त्वास, पाठवा त्यांना इंग्लंडास ॥
मान्य होतां सरकारला चौकशीची अट, गेले मुंबई शहरांत ॥
गर्दी झाली आटोकाट, जनसमूह अफ़ाट, असा स्वागताचा थाट, जणुं देशाचा सम्राट, जसा वामन गेला बळिकडे, तसे गांधी इंग्रजाकडे ॥
चाल- वामन गेला जसा बळिकडे तसे महात्मा गांधी । इंग्रज राजाकडे चालले करण्याला संधी । दर्भ हातीं कटि लंगोटीचा वामनाचा थाट । टकळी हातीं कटी लंगोटी मोहनाचा थाट} सर्व शक्ति देवांनीं दिधल्या बटु वामनास । पसतीस कोटी जनांची शक्ति लाभली गांधीस । त्रिपाद भूमीदान मागण्या गेला वामन । स्वातंत्र्याचें हक्क मागण्या गेला मोहन । बळी लागला, उदक सोडण्या त्याच्या हातांत । उदक पडेना म्हणुना पाहतो वामन झारींत । शुत्र्काचार्य बैसले पाहूनी घेऊनि दर्भांकुर । त्याचा डोळा फ़ोडुन पाडले उदक हातीं झरझर । शुत्र्काचार्यासम येईल जो जो स्वातंत्र्याआडं । गांधी हातीं टकळी घेउनि मोडतील खोड । वामनमूर्ति थोर कीर्ती त्यांची जगतांत । उक्ती कृतीचा मेळ दाविती जे आचारणांत । चाल मो.- धैर्य सत्य अहिंसेचा तिरंगी विख्यात झेंडा घेउनि हातांत । गांधी गेले इंग्लंडांत, लंडन राउंड टेबलांत, केली खटपट जोरांत । परि भेद करण्यांत सरकार असे पटाईत,तें काय त्यांना वठणार, मुसलमान फ़ोडिले पार ॥
चौक १३ वा
गांधींनी स्वराज्य-घोषणा केली लंडना, यत्न केले नाना, कृष्ण शिष्टाई परि जशी फ़ोल, वार्‍यावर गेले गांधीचे बोल, मागुन कोण देइ राज्य बहुमोल ॥
अर्धनग्न फ़किर गांधींना, करुनी सन्मानां, बादशाही खाना, अपूर्व हा योग आहे खरोखर, परि येताच स्वदेशावर, राजद्रोही म्हणून केलें गिसफ़दार ॥
येतांच परत हिंदुस्तानां दिसले गांधींना, जवाहिरलालांना, पकडुनी केला समेट भंग, काँग्रेस दडपून टाकण्याचा चंग, म्हणुनि सुरु झाला पुन्हा कायदेभंग ॥
चाल- तात्काळ महात्मा गांधींना पकडिलें, कैक पुढार्‍यांना अबदूल गफ़ूर खाना, पकडिलें सुभाषबाबूंना । पकडिलें कस्तुरबाईंना, तसे सरोजिनीबाईंना । मागां सम हजेर्‍या कोणा, स्थान बध्द केलें कैकांना । सत्याग्रही लाख लोकांना, घातले जेलमधे त्यांना । चाल- जातीय निवाडा गांधीनाम तुरुंगांत वाचुनी त्यांना । ह्नदयास होती वेदना, त्यांनीं त्या क्षणा, केलें प्राणांतिक उपोषणा ॥
शरीराच्या जणु अवयवांना (भागांना) वेगळे करणें मूर्खपणा । परि वेगळे केले अस्पृश्यांना, भेद साधला ना, हा कावा उमजे गांधिना । आत्मीक बल गांधिना, वचकलें सरकार त्यांना । मोकळे केलें गांधिना निवाडा बदलण्या, असा विजय त्यांचा झालाना ।
चाल २- कायदेभंग पुढे तहकूब गांधिनीं केला । मुंबईस भरली काँग्रेस चौतीस सालाला । काँग्रेसनें दिली मान्यता कौन्सिल प्रवेशाला । अन्सारी झाले अध्यक्ष कोन्सिल बोर्डाला । शांतताकालीं विधायक कार्य देशाला । करण्यास लावी गांधिजी तसें या काला । ग्रामोद्योग संघ गांधिनी स्थापन केला । काँग्रेसनें मान्यत दिली याच कार्याल । खेड्याची जनता यामुळें मिळेल काँग्रेसला । भीति अशी वाटुं लागली आहे सरकारला । गमक हें खरे काँग्रेसच्या भरिव कार्याला । असेंब्लिचा विजय पाहुनी धक्का सरकारला । काँग्रेसचा जिवंतपणा भोवे सरकारला । काँग्रेसनें नविन सुधारण पार फ़ेटाळल्या । हर घडीं पराभव असेंब्लींत सरकारला ॥
चाल- काँग्रेसनिष्ठा राष्ट्रांत वृध्द तरुणांत, गरिब श्रीमंतांत । याग देशार्थ करण्या झटतात ॥
काँग्रेस भीत नाही कुणा तेजस्वी बाणा, बाळकडु तरुणा । तयार करी त्यांना स्वातंत्र्यरणा । सेनगुप्त विठ्ठलभाई, स्वाराज्यापायीं, मुत्युमुखीं जाई । कैक असे भाई गणित त्याची नाही ॥
काँग्रेस झेन्डा घेउनी, कर्णा फ़ुंकुनी, स्वातंत्र्य ध्वनी । ऎकवुनी कानीं, जागृत आणि । पाहुनी चाँद अस्मानाला, भरती समुद्राला, तसा जनतेला, प्रेमभर आला पाहुनी काँग्रेसला ॥
कृष्णाची ऎकुनी मुरली, राधा जणु भुलली, स्वातंत्र्य मुरली । काँग्रेसनें फ़ुंकिली, जनता तशी भुलली ॥
चाल- काँग्रेस केले सरकार, राष्ट्राला प्यार, गांधिनी सत्वर, हुकुम काँग्रेस जो जो करणार, तो तो पाळण्याचा करा निर्धार, तरिच स्वातंत्र्य हातीं येणार । आत्माराम तनय शाहिरास स्फ़ूर्ति पोवाड्यास । ज्युबिलीप्रसंगास, काँग्रेसचा भक्त म्हणुनी ये खास स्वातंत्र्य ध्येय तिचे देशास, जसे अमृत वाटे देवास ॥

समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : January 10, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP