वडगावची लढाई

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.


चौक १ ला
ते धन्य धन्य नरवीर बारभाई जाणा । स्वातंत्र्य देवी पदी घेऊनी शपथा आणा । देशार्थ झाले तय्यार अर्पण्या प्राणा । धडधडाड तोफ़ा झाडून । धुव्वा उडवुन केले जमीनदोस्त त्यांनी इंग्रेजांना ॥१॥
जगीं धन्य झाले बारभाई । अजब चतुराई । राखली पेशवाई । रग इंग्रेजांची पार जिरवून । विजय वडगांवी पूर्ण मिळवून । आणिले शरण हात बांधून ॥२॥
नारायणराव पेशवा झाला । नाही बघवला । राघोबा दादाला । जाहला राज्यलोभ अनिवार । पुतण्या मारण्याचा केला निर्धार । बाईल बुध्द्याला कुठला सुविचार ॥जी॥
आंनदीबाईने गारद्याला । पुतण्या मारण्याला । तयार केला । देउनि पैसा अमित गारद्यास । शपथ घेण्यास लाविलें त्यास । कटाचा थांग नव्हाता कवणास ॥जी॥
पर्वती दर्शन घेउन । सुग्रास जेंऊन । सासुरवाडीहून । नारायणराव पेशवे आले वाड्यास । तोंच गारद्यांचा गराडा त्यांस । पळुं लागला भिवूनी गारद्यांस ॥जी॥
चाल १- तलवारी पाहुनी बुजल्या । गाई दावें तोडुनी धावल्या ॥
गारद्यांच्या अंगावर गेल्या । गारद्यांनी गाई कापल्या ॥
इतक्यांत नाराय़ण आला । शोधित राघोबा दादाला ॥
येईल आडवा त्याला । दुष्टांनी कापून काढीला ॥
राघोबांच्या धरुनि कमरेला । नारायण विनवूं लागला ॥
वाचवा काका पुतण्याला । मारितो गारदी मजला ॥
मारण्या सिध्द जो झाला । तारील दुष्ट काय त्याला ॥
चाल २- ऎकूनी शब्द पुतण्याचे काका गहिवरला । नका मारु राघोबा त्यास म्हणू लागला । गारद्यांना परी त्यावेळी खूनहो चढला । व्हा दूर नाहींतर दोघे जाल स्वर्गाला । होताच दूर राघोबा वार त्यानें केला । विश्वासु एक नोकर येऊन मध्यें पडला । गारद्यानें तत्क्षणीं ठार केलें दोघाला । गारद्याचा वार त्याचे पोटावर लागला । साखरभात पोटांतून नारायणाच्या आला ॥जी॥
चाल ४- भडकले तरुण घरोघर । ऎकूनी खुनाची खबर । मामापेठे खवळले फ़ार । घेऊन समशेस, धावले गारद्यावर ॥जी॥
गारद्यास चढला होता खून । मामास म्हणे पाहुन । ठार करीन गोळी घालून । यावे एकट्यानें यास्तव गेले मुकाक्यानें ॥जी॥
मुर्खाच्या नादीं लागून । गच्छंति होईल जाणून । राघोबाच्याकड जाऊन बोले दणक्यानें । काय केले पुतण्या मारुन ॥जी॥
बाजीराव पोटी येऊन । असा दिवटा निघाला पाहून । हिर्‍यापोटीं कोळसा म्हणून । तुम्ही जन्मून । अपकिर्ती घेतली करुन ॥जी॥
चाल मोडते- राक्षसी कृत्याला । काळिमा आणिला । पूर्वज कीर्तीला । लोक खवळले राघोबावर । सूड घेण्यास झाले तय्यार । बारभाईचा कट सत्वर ॥जी॥
चौक २
सखाराम बापू नायक । नान सहाय्यक । सेनानायक । शिंदे हरिपंत चौकडा खास । बुध्दी बहादुरी जिथे सहाय्यक । विजय मिळणार त्याच पक्षास ॥जी॥
राघोबा पेशवा झाला । आंनद झाला । आंनदी बाईला । बाईच्या हाती राज्यकारभार । देऊन म्हणे राज्य करणार । नथेतून तीर कांय मारणार ॥जी॥
सुविचारी चतुर कारभारी, शत्रूला भारी । घालविले दूरी । दुखविले त्याने चतुर लोकांस । नेमिले मूर्ख जागास । गुळाची चव काय गाढवास ॥जी॥
चाल १- बारभाईनीं केलें कारस्थान । राघोबाचें करण्याउच्चाटण ॥
मुत्सदी होते गुणवान । नानाचें अजब शहाणपण ॥जी॥
अशीं जमलीं रत्न गुणवान । राखण्या राज्य शर्तीनें ॥जी॥
राघोबा करिल धुळधाण । राज्याची बाईलबुध्दीन ॥जी॥
चाल २- पुतण्याचा खून हें शल्य राघोबा दादाला । सारखे टोचू लागलें त्याच्या ह्नदयाला । पराक्रम करूनी हा डाग पाहिजे धुतला । स्वारीचा बेत यास्तव राघोबानें केला । तो बेत बारभाईच्या पथ्यावर पडला । बापूनी योग्य संधीचा फ़ायदा घेतला । वेवस्था कटाची करून स्वारीवर गेला । संशय राज्यत्र्कांतीचा य़ेईल राघोबाला । मुद्दाम म्हणून स्वारीच्या बरोबर गेला । आजार्‍याचें सोंग घेऊन बापु परतला । पुरंदरी नेले तत्काळ गंगाबाईला । पेशवाई वस्त्रें देऊन गंगाबाईला । सर्वत्र डंका नांवानें तिच्या फ़िरविला ।
कटाव १- बारभाई कट उमगला । राघोवादादाला । घाबरुनी गेला । परत झणि फ़िरला । मोर्चा वळविला । पुणें शहराला । संतापून गेला । सखाराम बापूनें घात म्हणे ही केला ॥जी॥
इतक्यात सैन्य घेऊन । फ़डके धावून आला । पाहून । तोंड वळवून । उलट खाऊन । राघोबा पळून जातो पाहून तोच येऊन । मारा सपाटून, त्रिंबकमामान, दिले तोंड तेथें मामास त्यानें निकरान ॥जी॥
जो आला झेंडा फ़डकवुन, अटकेवरतून, भरारी म्हणून त्यापुढें येऊन, त्रिंबक मामान, दिले चिथाउन, त्यामुळें, केला राघोबान, होऊन बेभान, हल्ला सपाटून, कत्तल जोरान, केले हैराण, त्रिंबक मामाला, होऊनी जखमी मामाच धणीवर पडला, ॥जी॥
कटाव- ४ मामस आणलें पकडून, असें पाहून, आंनदीबाईनें लाथ मारून म्हणे त्याला दुष्ट बरा आला तावडीला, तूच ना सामिल नानाला, कोण तारील आता तुजला, नाही बोलत पाहून त्याला, वाचा तुझी बसलो का रे मेल्या, बोलली अपमान करुनि, त्याला ऎकुनी बाईच्या शब्दाला मामा खवळून बोलला तिजला रांडे हा एक जरी मेला, जिते तुझे नवरे आकरा पुण्याला, बारभाइतला एक मेला, आकरापरि घेतिल सूडाला ॥
रांड तुझ्या दादार जा ॥जी॥
कटाव १ नागीण जणू खवळली, आंनदीबाई चिडली, मामाशी भिडली, लाल फ़ार झाली, कापुका जिभली, म्हणाली त्याला तात्काण हुकुम देऊन ठार त्याला केला  ॥जी ॥
चाल मोडते - ऎकुनी मामा रणि पडला । फ़डक्यानें केला । जोराचा हल्ला । सहन करवेना राघोबादादास । पळू लागला उलटमार्गास । शेवटी शरण आला फ़डक्यास ॥
चौक ३ रा
पुत्ररत्न गंगाबाईला । झालें पुरंदराला । पुत्रोत्सव केला । नाना फ़डणिसानें मोठ्या थाटांत सवाईमाधराव नांव झोकांत पुकारा केला महाराष्ट्रांत ॥जी॥
सुत गंगाबाईला झाला । ऎकुनि वार्तेला निराश झाला । आला राघोबा समेट करण्यास । म्हणे मी परत येतो राज्यास । द्यावें तोडून कांहि मुलखास ॥जी॥
तुम्ही रहावें आंनदवल्लीस घेउन वर्तनास । असा दादास तहाचा मसुदा आला पाहुन । बाईनें पायाखाली तुडवून बोलली नवर्‍यास फ़ार टाकून ॥जी॥
चाल १- शत्रुला शरण जाण्याला । शरम ना वाटे तुम्हाला ॥
पुतण्याचा खून तुम्ही केला । घेईल शत्रु सूडाला ॥
मारील शत्र लाथेला । खाणार काय त्या बोला ॥
तुम्ही जावे शरण इंग्रजाला । येईल राज्य हाताला ॥
जर घ्याल त्यांचे मदतीला । लाभेल राज्य तुम्हाला ॥
चाल २- उपदेश बाईलबुध्यास त्वरित तिचा पटला । तात्काळ इंग्रजाकडे वकिल धाडिला । पेशवाई नष्ट करण्यास टपुन जो बसला । मराठ्यांच्या दुहीकडे होता गोर्‍याचा डोळा येतांच संधी फ़ायदा त्याने घेतला । पूवींचा तह इंग्रजानें पार तुडविला । घेतली साष्टी ताब्यांत त्याच वेळेला । राघोबास मदत करण्यास इंग्रज धावला । इंग्रज घेऊनी राघोबांस चालूनी आला । राहू केतु आले ग्रासण्या पेशवाईला । हरीपंत तोंड देण्यास पुढे चालला । इंग्रज पाहूनि हरिपंता चकित बहु झाला । नापार येथे दोघांचा सामना झाला  ॥जी ॥
कटाव ३ - शिस्त फ़ार इंग्रजि सेनेला, तोफ़ा बंदुका सुधारलेल्या भरपूर त्यांचा दारुगोळा, भीति नव्हती त्या गोर्‍याला, मारुनि टाकू म्हणे फ़डक्याला, राघोबाला आंनद झाला वाटले विजय मिळणार खास हो त्याला ॥
हरिपंताची मावळी सेना, शिस्त इंग्रजासम ना त्यांना काय पुसावी त्यांची दैना । एक शिस्त परिठाउक त्यांना । स्वातंत्र्यास्तव रणि लढतांना । प्राणिचीना परवा त्यांनी । गनिमी काव्यानें शत्रूना जेरिस आणु खातरी त्यांना । हरिपंतातासम नायक त्याना देऊनी धीर त्यानें केली समर गर्जना कटाव २- दोघांचा सामना झाला, वीराशि वीर हो भिडला, मराठ्यांच्या चमकल्या ढाला, तलवारी फ़िरू लागल्या, झाल्या अधिर जणू रक्ताला, गोर्‍यांचें रक्त पिण्याला, निकराचा चढविला हल्ला, देशार्थ मराठा लढला, स्वाभिमान जागृत झाला, वीरश्री चढली सर्वाला, दसपट शक्तीनें लढला, इंग्रज हटू लागला, हरिपंत बोलला सर्वाला, शाबास भला मारिला, हर महादेव बोलला, ऎकून पुन्हा सरकला, मावळा चवताळुनि गेला, चराचरा चिरु लागला, तो मार सहन नाही झाला, इंग्रजाचा लोक ठार केला, सेनापती त्यांचा घाबरला, सैरावरा शिपाई धावला, तोफ़ा कितिक टाकुनि गेला, मराठ्यांनीं तोफ़ा पळविल्या, अशी फ़जिती हरिपंतानें केली नापारला ॥
चाल मोडते- समेटाचे बोलणे करण्याला । इंग्रज आला । किल्ले पुरंदराला । चतुर नानासाहेब म्हणे वकिलास । मद्त जर केली पुन्हा राघोबास नाश होईल तुमचा मग खास । जे विजयी होते जगतात । त्यांच्यावर मात । मराठे करतात । शल्य हें इंग्रजांच्या ह्नदयांत, सूड घेण्याची पाहती वाट, तहाची त्यांनी मोडली आट । हातात धरुनि राघोबास । म्हणे तुम्हास । देतो राज्यास मारूनी गोड गोड थापास । अंतरी पेशवाई राज्यास । गट्ट करण्याचा लागला ध्यास । असा तह कैक वेळेला । इंग्रजानी केला । आणि मोडिला । त्यांच्या वचनावर जो विश्चास । ठेविल तो मुर्ख ठरेल खास । होते जाणून बारभाई त्यास ॥
चाल २ इंग्रज जसे दिसतात, अंतरी तसे नसतात ॥
गोरटीं बाळें दिसतात । परि कपटि तींच ठरतात ॥
राघोबा सारखे फ़सतात, इंग्रज म्हणुन जगतात । अशी इंग्रजांची ही जात । होते नाना पूर्ण जाणत । आला हेर तोंच सांगत । इंग्रजी स्वारीचा बेत ॥
चाल उठावाची - करुनि घाइ लवलाही, नानानीं शिद्यास । पत्र धाडियलें खास । निघा सत्वर युध्दास । स्वार घेउन पत्रास । आला शिंदे दरबारास । शिंद्यास पत्र देऊनी हो केला मुजरा खाली वाकुनी ॥
खवळुनि गेले पाहुनि शिंदे पत्राचा मजकूर । म्हणे करिन चक्काचूर । इंग्रजांचा पुरेपूर । तेव्हां डोळ्यावरचा धुर । उतरुनी महापूर । नयनाश्रुचाच वाहिल । हो पायाची धूळ चाटील ॥
कवाइति फ़ौज मोठी घेऊनी जोरांत । करुनि पोषाखाचा थाट । शिंदे म्हणे करिन मात । खोटी इंग्रजांची जात । ज्यानी समेटाची आट । मोडूनि टाकली गर्वात । ठार करुनि क्षणांत । धाडितो त्यांना स्वर्गात, हो बच्चाजी माझ्याशीं गाठ ॥
चाल २ री- घेउनी फ़ौज बरोबर शिंदे दौडला । नाना बापु फ़डके पानशे तोंड देण्याला । घेउनी सेना सामुग्री तोफ़ा सदरेला । सत्वर शिंदे येऊनी त्यांना मिळाला । एक चढिस एक रणशूर वीर पातला । स्वातंत्र्य देशाचें राखण्यास्तव जमला । मारु किंवा मरु तत्तवानें मराठा लढला । स्वातंत्र्य ज्योत जागृत होती ह्नदयाला । राजाविण म्हणुनी सर्व मराठा लढला । इतिहास हेंच बाळकडू शिकवि मराठयाला । लाभति म्हणुनि नररत्ने महाराष्ट्राला । चा.मो.- इंग्रज चढुनिया घाट । आला कार्ल्यात । मोठ्या जोरात । म्हणत आम्हास विजय मिळणार । गर्व असा त्यांना झाला अनिवार । गर्व परि हरण त्यांचा होणार ॥
चौक ५ वा
जग जिंकणारा इंग्रज । प्रचंड फ़ौज । समरिं तरबेज । सेनापति ज्यांचा होता रणशूर । इस्टुर फ़ाकडा बहाद्दर वीर । युध्द करण्यास झाला अधीर ॥
मराठ्यांचा शिंदे सेनापती । फ़ौज कवायती । गनिमी कावा वरती । दुहेरी निपुण अशा योध्यास । विजय मिळ्याचा पूर्ण विश्चास । शत्रूचे भीती नव्हती चित्तास ॥
अशीं जमलीं सर्व गुणवान । रत्न अति छान । परात्र्कमि महान । त्यांत नाना बापु शिंदे हरिपंत । चौकडा होता फ़ार गुणवंत । चतुर आणि शुर होते जातिवंत ॥जी॥
कटाव १- समबल अशा दोघांचा, इंग्रज मराठ्याचा, सामना साचा, झाला निकराचा, फ़ार बहारिचा, पाहण्या आले, अंबरी देव गंधर्वं पितर धावले ॥जी॥
तोफ़ांचा झाली सरबत्ती, वाद्यें वाजती, बंदुका झडती, गर्नाळे उडती, गर्जना होती, दोन्ही सैन्यात, वीरश्री चढूं लागली मराठे वीरांत ॥
कटाव ४- इतक्यांत इंग्रज सैन्यांत, आला दणदणत, गोळा सणसणत, ठार केलें त्यांनें फ़ाकड्याला, सेनापति त्यांचा ठार झाला, उडविला पहिल्याच झटक्याला, हर्ष मराठ्यास फ़ार झाला, दुप्पट जोरानें लढू लागला, शकुन इंग्रजांना वाइट झाला, माशी जणु पहिल्याच घांसाला लागली शूर इंग्रजाला, नाहीं इंग्रज परी डरला, सेनापती त्वरित दुसरा आला, विचारले त्यानें राघोबाला, होता तो आधिच गळलेला । राघोबाची मैना प्रसंगाला । धीर देण्यास नव्हती काला । त्यामुळें धीर त्याचा खचला । सेनापती विचारांत पडला । रातभर विचार पुरता केला त्यावेळी दादा दादा रे जी जी ॥
मराठ्यानी विचार काय केला, एका वक्तालाअ, त्याच रातीला इंग्रजाला आत हो घेण्याला, सर्व बाजूनी वेढण्या, मराठा मागे मागे हटला घाटाखाली कांही लोक गेला, मुम्मईची मार्ग बंद केला, गनिमि काव्याने लढण्याला चौफ़ेर दबा धरुनि बसला, दुसरे दिवशी इंग्रज पाहू लागला, मराठा कांही, कुठे दिसेना त्याला वाटले मराठा भिउन पळाला, म्हणुनी इंग्रज पुढे गेला, पुढे येताच घेरला त्याला, वाघाच्या जबड्यांत सापडला, चहुकडे मराठा दिसू लागला, कंसाला कृष्ण जसा दिसला, तोंड वासून चकित झाला ॥
इंग्रज हो दादा दादार जी ॥
सेनापती परी नाही डरला, घुसू लागला, धरुनी धैर्याला, वडगावांत कूच केला, गाव ओसाड त्यासं दिसला, गांव मराठ्यांनी आधींचा लुटला, दाणागोटा इंग्रजांचा सरला, गावांमध्यें दाणा नाही मिळाला, मुंबई मार्ग बंद झाला, अन्नाविण लोक मरु लागला इंग्रजांच्या दादा ॥
कटाव २ इंग्रजांची उडाली दैना, काय करावे त्याला सुचेना । मराठ्यांच्या तोफ़ा दणदणा, चहुकडूनि गोळ्या सणसणा । तलवारी वाजे खणखणा,  हरमहादेव गर्जना, अंबरी ऎकूनी देवांना आंनद जाहला त्यांना, मराठ्यांनी कैक लोकांना, ठार केले त्याची नाही गणना । जणु सुरु केला कत्तलखाना लावुनी डोळे अस्मान, आकाशांतील बापाना, इंग्रजांनी केली प्रार्थना, परि नाही आली त्या करुनी,  चत्र्कच्युह, फ़ोडय्या न्यांना एकही मार्ग सापडेना अशी इंग्रजांची- हो दैना उडताच गनिमीकावा त्यांना, आला कळून तात्काळ त्यांना आले शरण मराठेलोकांना, तह करा म्हणे जोडून दोन्ही हाताना जी ॥
चाल २- म्हणे शिंदे इंग्रज सेनापतीस रागावून । जरि आला इंग्रज शरण हात जोडून असे तुम्ही कैक वेळेस शरण येऊन, फ़सविले आहे आम्हांस तह मोडून, स्वाधीन करा दोन गोरे ओलीस म्हणुन राघोबा तसाच द्यावा आमच्या हातीं आणून तुम्ही त्वरित मुलुख आमुचा द्यावा सोडून, अपमानकारक अशा अटी ऎकून खवळला परि करणार काय खवळून, तह केला कबुल पेचांत होता म्हणून ठेविले दोन इंग्रज ओलिस म्हणून, राघोबा तसाच द्यावा आमच्या हातीं आणून तोम्ही त्वरित मुलुख आमुचा द्यावा सोडून, अपमानकारक अशा अटी ऎकून खवळला परि करणार काय खवळून, तह केला कबुल पेचांत होतो म्हणून ठेविले दोन इंग्रज ओलिस म्हणून, चाल मोडते - जगा भारि अशा इंग्रजाला । पार जिरविला । भगवा फ़डकविला । बारभाइनी अखिल जगतांत । दाउनि शौर्य बुध्दी अचाट । राखिले राज्य जाहलें ख्यात ॥जी ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 10, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP