अध्याय ९० वा - श्लोक ४१ ते ४५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तिस्रः कोट्यः सहस्राणामष्टाशीतिशतानि च । आसन्यदुकुलाचार्याः कुमाराणामिति श्रुतम् ॥४१॥

सहस्रें सहस्र यदुकुमार । तयांचे आचार्य पढविणार । यदुकुळीं होते विद्यापात्र । गणना विचित्र तयांची ॥९४॥
तीन कोटि अठ्यायशीं शतें । पृथक् पृथक् इतुकें होते । हें परिसिलें परि निश्चयातें । आम्हां निरुतें करवेना ॥३९५॥
एकैका गुरूजवळ । पुढें अनेक अर्भकमेळ । तयांची व्यवस्था सकळ । केंवि प्राञ्जळ घडेल ॥९६॥

सङ्ख्यानं यादवानां कः करिष्यति महात्मनाम् । यत्रायुतानामयुतलक्षेणास्ते स आहुकः ॥४२॥

पृथक बहुतांचे पढविणारे । ते आचार्यसंख्या निर्द्धारें । जेव्हां इतुकी गणनाद्वारें । ते ही परस्परें श्रुतमात्र ॥९७॥
परंतु सम्यक जाणिजेत नाहीं । तेव्हां कुमरांची संख्या पाहीं । कैसी करणें घडेल कहें । गोष्टी हेही विचारीं ॥९८॥
मां वडिल यादवांची संख्या । कवण करील तें श्रोतृमुख्या । अपरिमितचि ऐसी आख्या । पुराणलेख्या माजिवडी ॥९९॥
जेथ अयुताचे अयुत लक्ष । इतुका यदुसमुदाय दक्ष । तेणें करूनियां प्रत्यक्ष । राहिला तो ईश आहुक ॥४००॥
अयुत म्हणिजे सहस्र दश । दशसहस्रें अयुत लक्ष । गणितां गणना होय विशेष । जेथ मनाचें लक्ष पांगुळे ॥१॥
जरी म्हणसी कीं हे येतुले । एकत्र कोठोनियां जन्मले । तरी येविषयीं पुरा वर्त्तलें । तुजला वहिलें कथितों मी ॥२॥

देवासुराहवहता दैतेया ये सुदारुणाः । ते चोत्पन्ना मनुष्येषु प्रजा दृप्ता बबाधिरे ॥४३॥

पूर्वीं सुरासुरांचें युद्ध । जालें अत्यंत घोर प्रसिद्ध । तेथें मृत्यु पावले जे विरुद्ध । दैत्य विविध बहु दारुण ॥३॥
तेचि मनुष्यांच्या ठायीं । पुन्हा जन्मले दुःखदायी । पढिले निर्ज्जरांचिये ठायीं । निर्मूळ सर्वही करावया ॥४॥
मूळ देवांचे साङ्ग यज्ञ । यज्ञकारक मर्त्यसुज्ञ । ते स्वधर्मीं असतां निमग्न । इहामुत्रिका सुरवाड ॥४०५॥   
यास्तव धर्माचा उच्छेद । करावया प्रवर्तले विशद । पीडूं लागले प्रजावृंद । दृप्त अबुद्ध दुरात्मे ॥६॥

तन्निग्रहाय हरिणा प्रोक्ता देवा यदोः कुले । अवतीर्णाः कुलशतं तेषामेकाधिपं नृप ॥४४॥

तयांच्या निग्रहाकारणें । देवां आज्ञापिलें हरीनें । ते अवतरले मानवपणें । यदुकुळीं जाणें सहस्रशः ॥७॥
ज्यांचे एकाधिप कुलशत । म्हणिजे अनेक कुळें जीं विस्तृत । तयांचा एकचि राजा समर्थ । कीं मिथैकचित नरेश ॥८॥

तेषां प्रमाणं भगवान्प्रभुत्वेनाभवद्धरिः । ये चानुवर्त्तिनस्तस्य ववृधुः सर्वयादवाः ॥४५॥

तयांसि प्रभुत्वें एक प्रमाण । षड्गुणैश्वर्यसंपन्न । श्रीकृष्ण देवकीनंदन । जाला परिपूर्ण सामर्थ्यें ॥९॥
तेणें त्रैलोक्यीं निर्भय । अखिलोर्जित आनंदमय । सुरवाडले यादवनिचय । पूर्णाशयें धर्मिष्ठ ॥४१०॥
आणि जे अनुवर्ती हरीचे । वर्तती सहवासें कां साचे । प्रेमानंदें चित्त नाचे । सदा जयांचें सद्भावें ॥११॥
ते सर्वही यादव सुखें । वाढले विशिष्टदैवोल्लेखें । उल्लंघिलें मर्यादारेखे । पूर्णविवेकें संपन्न ॥१२॥
यादवांच्या बहुकुळश्रेणी । त्यांमाजि वृष्णिकुळीं चक्रपाणी । स्वयें अवतरला कल्याणखाणी । म्हणोनि वृष्णि अतिनिकट ॥१३॥
काय वर्णूं तयांचा महिमा । जे स्थिति दुर्ल्लभ मुनिनिष्कामां । योगियां प्राप्तां अभ्याससीमा । ते यां उत्तमा सहजगती ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP