अध्याय ८८ वा - श्लोक ११ ते १५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


ततस्त आशुतोषेभ्यो लब्धराज्यश्रियोद्धताः । मत्ताः प्रमत्ता वरदान्विस्मरन्त्यवजानते ॥११॥

त्या नंतरें ते अतिसत्वर । जे प्रसन्न होती सुरवर । त्यां आशुतोषां पासूनि नर । पावती स्वेच्छा राजश्री ॥३६५॥
आधींच सकाम अंतःकरण । स्वेच्छा ऐश्वर्य उपलभ्यमान । झालिया होती उद्धत पूर्ण । विषयाचरण बहु करिती ॥६६॥
राजश्रीमदें मातती । प्रकर्षें ते उन्मत्त होती । शेखीं वरदातें ही नाठविती । फिरूनि करिती अवज्ञा ॥६७॥
जिंहीं प्रसन्न होवोनि वर । कृपेनें दिधले ऊर्जितकर । तयांचा विसरूनि कृपोपकार । करिती प्रतिकार कृतघ्नवत् ॥६८॥
ईश्वरोऽहमहं भोगी । सिद्ध मी बळिष्ठ सर्वांगीं । सुखी आध्य पवित्र सुभगीं । मज सम त्रिजगीं कोण असे ॥६९॥
ऐसा देहाभिमान वाढे । ऐश्वर्यभोगाच्या सुरवाडें । स्वेच्छा विषयसेवनें मोडे । विहित निवाडें आचरण ॥३७०॥
मज दुराराध्या जाणोनि त्यजिती । अन्यां आशुतोषांतें भजती । तयांची ऐसी विपरीत स्थिती । मद्भक्त निश्चिती न तैसे ॥७१॥
शुक म्हणे राया उमजें खूण । युधिष्ठिराचा ऐकूनि प्रश्न । श्रीकृष्णें विशद निरूपण । कथिलें व्याख्यान तें केलें ॥७२॥
हा अच्युतवाक्यफळाचा रस । जिज्ञासाक्षुधार्त्त कौरवेश । युधिष्ठिर सेवितां तृप्ति तोष । पावूनि निःशेष सुखावला ॥७३॥
इतुक्या कथनाचें तात्पर्य । ऐक आतां निःसंशय । थोडेंन कथितों सूत्रप्राय । कोमळहृदय भो नृपति ॥७४॥

श्रीशुकउवाच - शापप्रसादयोरीशा ब्रह्मविष्णुशिवादयः । सद्यःशापप्रसादोऽङ्ग शिवो ब्रह्मा न चाच्युतः ॥१२॥

शापप्रसादांचें ईश । विधिहरिहरादि प्रत्यक्ष । त्यां माजी सद्यचि कोप तोष । करिती विशेष विधिहर ॥३७५॥
अल्पापराध अथवा भजन । देखूनि शापप्रसाददान । कारक होती विधिईशान । अच्युत जाण न तैसा ॥७६॥
कीं भूतभविष्यद्वर्तमान । विचारज्ञ कमलारमण । सहसा उतावळी न करून । भजककल्याण पूर्ण चिन्ती ॥७७॥
शंभु दीर्घ विवेकेंविना । न जाणोनि तदंतःकरणा । सत्वर प्रसन स्वभक्तगणा । होऊनि व्यसना मग पावे ॥७८॥
येचि विषयीं उदाहरण । देत असती विबुध जन । या पुरातनेतिहासातें जाण । तें तूं संपूर्ण अवधारीं ॥७९॥

अत्रैवोदाहरन्तीममितिहासं पुरातनम् । वृकासुराय गिरिशो वरं दत्वाऽऽप सङ्कटम् ॥१३॥

वृकासुरा कारणें वर । देवोनियां पार्वतीवर । संकट पावता झाला घोर । जें अनावर निवारणा ॥३८०॥
जरी तूं म्हणसी परीक्षिति । वृकासुर कोणाची संतति । कैसें संकट उमापति । पावला त्याप्रति वरदानें ॥८१॥
तरी तो सविस्तर इतिहास । तुज निवेदितों सावकाश । परिसिलिया अशेष । संशयपुरास निस्तरसी ॥८२॥

वृको नामासुरः पुत्रः शकुनेः पथि नारदम् । दृष्ट्वाशुतोषं पप्रच्छ त्रिषु देवेषु दुर्मतिः ॥१४॥

वृक हा नामें जाण असुर । पुत्र शकुनीचा साचार । दुर्मेतिविषाचें आगर । दुर्गुणाकार मूर्तिमंत ॥८३॥
तो देवताप्रसादें अभिनव । स्वेच्छा ऐश्वर्यप्राप्तास्तव । तपा कारणें स्वयमेव । जातां अपूर्व घडलें पैं ॥८४॥
अकस्मात् मुनि नारद । मार्गीं चालतां स्वच्छंद । तयातें देखोनियां विशद । पुसे सर्वज्ञ जाणोनी ॥३८५॥
म्हणे अटवीं अटका । पथदर्शक कीं रुग्णा सद्वैद्य चिकित्सक । ना तरी नदीनिस्तरका तारक । दैवें सम्यक जेंवि भेटे ॥८६॥
तेंवि मी अत्यंत चिन्तातुर । तोषवावया वरिष्ठ सुर । ऐसिये समयीं दैवतंत्र । मिनलासी पवित्र दयाळुवा ॥८७॥
मम दैवाब्जमुकुला प्रबाकर । मनोरथवना जीवनाकार । साधनग्रावा वैरागर । गमसी मुनिवरवरिष्ठा ॥८८॥
तूं सर्वज्ञ सर्वग कृपामूर्ति । त्रिजगीं प्रसिद्ध तुझी कीर्ति । तरी जेणें निरसे मम चित्तार्त्ति । ते यथार्थ उक्ति मज सांगें ॥८९॥
कीं ब्रह्मा विष्णु महेश्वर । त्रिदेवां माजी करुणाकर । भजतां संतुष्ट अपार । होय सत्वर कोण तो ॥३९०॥
ऐसें वृकासुराचें वचन । ऐकोनि देवर्षि सर्वज्ञ । जाणोनि सकाम अंतःकरण । करी भाषण तदुचित ॥९१॥

स आह देवं गिरिशमुपाधावाशु सिध्यसि । योऽल्पाभ्यां गुणदोषभ्यामाशु तुष्यति कुप्यति ॥१५॥

म्हणे अगा ये वरदेप्सका । भजें तूं कैलासनायका । तुझा मनोरथतरु आसिका । फळेल नेटका सत्वर ॥९२॥
अल्पगुणदोषें लौकरी । सकोप संतुष्ट त्रिपुरारी । होय यास्तव तद्भक्ति करीं । लाहसी झडकरी तपःसिद्धि ॥९३॥
म्हणसी यदर्थीं प्रमाण काय । तरी पूर्वीं जयासि गौरीप्रिय । देता जाला विपुलैश्वर्य । तें कथितों प्रत्यय बाभावया ॥९४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP