TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

आरंभ
श्रीगणेशाय नमः ।
जगदात्मया जगद्गुरो । निजजनजनका कल्पतरो । तव पद स्मरणें भव हा हरो । मानस मुरो तव वेधें ॥१॥
म्हणोनि सद्गुरो सुखनिधाना । प्रणतवरदा प्रबोधगहना । नमन साष्टांग तुझिया चर्णा । संसृतिशमना मुहुर्मुहु ॥२॥
करितां तव चरणांचें स्मरण । होय देहत्रया विस्मरण । सबाह्य दाटे सच्चिद्घन । ब्रह्म परिपूर्ण अभेदें ॥३॥
तेव्हां नम्यनमक हा भाव । नुरविसी देऊनि स्वगौरव । त्रिपुटी ग्रासूनि सुखानुभव । साक्षित्वभाव अभिविलयें ॥४॥
ऐसा नैसर्गिक अगाध महिमा । सहसा न वदवेचि निगमा । परंतु स्फुरवी अनन्य प्रेमा । गुणगणगरिमा प्रणतांसी ॥५॥
बहुधा वदती युगानुयुगीं । अजस्र चालती स्तवनमार्गीं । होवूनि तव पदीं अनुरागी । न करिती वावुगी भवचिन्ता ॥६॥
अनंतयुगीं अनंत मूर्ति । तारक जड जीवां भवावर्तीं । सच्चित्सुखमय धरूनि आर्ती । निरसूनि कीर्ति प्रकाशिती ॥७॥
एका उद्धरिलें प्रबोधामृतें । एक ते भाविक चरणतीर्थें । मौळ स्पर्शोनि पद्महस्तें । कितिएकांतें तारिलें ॥८॥
एकां सदयावलोकें पाहिलें । ते तत्काळ चि कृतार्थ झाले । एकीं हृदया माजी द्भ्याइलें । ते ही चुकले भवभया ॥९॥
एकां अनुदिनीं नामस्मरणें । एक ते चिद्रूपचिन्तनें । एक परिचर्येच्या गुणें । समानपणें उद्धरिले ॥१०॥
ऐसी अनेक शुभ पवित्रें । मोक्षप्रदें श्रवणमात्रें । साकल्यें न वदती वेदशास्त्रें । पुराणें पवित्रें यथामति ॥११॥
द्वापारान्तीं सगुण विग्रह । कृष्णनामक भवापह । घेऊनि तारिला जीवसमूह । चरित सुखावह प्रकटिलें ॥१२॥
उद्धवार्जुनादि अनन्य शरण । केले चिन्मात्रबोधें पूर्ण । उरले जे कां मादृश दीन । कळिकाळीन भवग्रस्त ॥१३॥
तयांचिये करुणे स्तव । प्रकटावया पूर्णानुभव । श्रीमत्कृष्णदयार्णव । नामें स्वयमेव प्रस्तुत ॥१४॥
पूर्ण दयेनें अवतरून । केलें अपार जगदुद्धरण । विशेष तारिले भाविकजन । गुह्यज्ञानप्रबोधनें ॥१५॥
भक्ति ज्ञान आणि विराग । कर्मधर्मादिसन्मार्गयोग । जनीं प्रकटिला अभंग । यथासाङ्ग आचरणें ॥१६॥
दिवसेंदिवस बुद्धिहीन । प्राणी होती कलिकालीन । न कळे वेद शास्त्र पुराण । कळवळून तयांस्तव ॥१७॥
दशमस्कंधाचें व्याख्यान । देशभाषाकृतटीकाग्रथन । ज्या माजी सांठविला संपूर्ण । अर्थ गहन श्रुतींचा ॥१८॥
अगाध गुरुचरित्रमहिमान । तेथ अनन्य वक्ता समर्थ कोण । म्हणोनि प्रकटिलें आपुले आपण । अबळां कारणें सुभाषितें ॥१९॥
इत्यादि अनेक सवतारकार्य । संपादूनि स्वविग्रहवर्य । उपसंहरिला देऊनि धैर्य । शेषान्वयग्रथनार्थ ॥२०॥
मी तो केवळ अकोविद । अनधीत विशेषें मतिमंद । न कळे काव्यरचनाछंद । आज्ञार्थ सिद्ध स्वयें कीजे ॥२१॥
तुमची अभिनव न कळे लीला । उदकावरी तारिल्या शिळा । समुद्रीं हुताशन ठेविला । अनळीं सलिला प्रकटिलें ॥२२॥
शून्यीं सृजिला प्रभंजन । प्रभंजनीं हुताशन । न पढवूनि चतुरानन । वेदप्रेरणा त्या केलें ॥२३॥
ऐसिया देखूनि महिमाना । न होय चित्तीं असंभावना । प्रकटूनियां सतास्फुरणा । काय एक रचना न कराल ॥२४॥
असो ये विषयीं विज्ञप्ती । करणें न लगे चरणा प्रती । लेखनी न प्रार्थीं लेखनार्थीं । लेखका निश्चिती कदापिही ॥२५॥
किंवा वाद्यें प्रार्थनापूर्वक । सहसा न विनविती वादक । ते आपुलियासाठीं बहुतेक । चातुर्य सम्यक प्रकटिती ॥२६॥
तेंवि अंतर्यामित्वें बोलवणें । हें इष्टचि समर्था कारणें । म्हणोनि ग्रंथसमाप्ती कारणें । संदेह धरणें मज नाहीं ॥२७॥
ऐसे ऐकोनि श्रोते सज्जन । म्हणती हें कैसें येथ भाषण । हा अभिप्राय विशद करून । आम्हां संपूर्ण कथावा ॥२८॥
तरी ऐकावें श्रोतीं सकळीं । जे कां अळिसम गुरुपदकमळीं । हे जगदुद्धारार्थ नव्हाळी । ग्रंथरूपें केली गुरुवरें ॥२९॥
शायशी अध्याय पर्यंत । निरूपिलें श्रीकृष्णचरित । पुढें सत्यायशीवा प्राप्त । जेथ वेदस्तुत परमात्मा ॥३०॥
तो तेवीस श्रुत्युक्त श्लोक । पर्यंत वाखाणिला सम्यक । तंव पुरला अवघ्र अंक । अवतारात्मक प्रभूचा ॥३१॥
यथोक्त केलें विधिपाळणा । यास्तव काळातिक्रमणा । न करूनि सायुज्यसदना । प्रत्युद्गमना आदरिलें ॥३२॥
तेव्हां समीप स्वभक्तमेळा । होता त्या माजी अनन्यशीळा । मज आज्ञासंकेत केला । ग्रंथ राहिला करावया ॥३३॥
सोळा शतें वासष्टी अब्दें । शालिवाहनपरिमितशब्दें । क्रमितां रौद्रवत्सरीं मोदें । मार्गशीर्षें शुभमासीं ॥३४॥
शुक्लपंचमीगुरुवासरीं । ब्राह्मीं मुहर्तीं शुभावसरीं । प्रतिष्ठानीं गोदातीरीं । स्वधाम निर्धारीं स्वीकेलें ॥३५॥
त्या वरी सगुणवियोगें खेद । करूनि जाहलों मतिमंद । द्विमासां नंतर पुन्हां विशद । स्वप्नीं अनुवाद हा केला ॥३६॥
मज संबोखूनि बहुता परी । म्हणती असो तुज अंतरीं । प्रज्ञा स्फुरेल शंका न धरीं । ग्रंथ पुढारीं चालवणें ॥३७॥
ऐसी सद्गुरूची समर्थ आज्ञा । विशेष संमत् सकळां सुज्ञा । येर्‍हवीं सामर्थ्य मज अल्पज्ञा । कैंचें प्रज्ञारहितासी ॥३८॥
आतां भरंवसा मज निश्चित । कीं दूरस्थ चंद्रमा गगनांत । स्वकान्ति प्रकटित अमृत । असे विदित सर्वांसी ॥३९॥
कीं सूर्यकान्ति दिवाकर । अंतरें प्रसवे ज्योति प्रखर । मा हृदयस्थ सद्गुरु भ्रमहर । स्व उद्गार न स्फुरवी ॥४०॥
पूर्वीं स्वमुखें ओवीप्रबंध । वदोनि सद्गुरु नित्यबोध । लेखनक्रियेसी पैं विशुद्ध । मज करूनि विशद करविलें ॥४१॥
आतां अंतर्यामित्वें वक्ता । श्रीस्वामिराजचि तत्वता । येथ मीपणाचिया अर्था । ठाव सर्वथा नसेचि कीं ॥४२॥
माझ्या मीपणाचा ग्रास । तैंचि केला जी निःशेष । जैं ठेविलें पद्महस्तास । कृपाविशेष करूनियां ॥४३॥
नामरूपेंसीं पालटिलें । आपुलें नाम मज ठेविलें । उत्तमश्लोकसंज्ञाथिलें । प्रेम दिधलें निजभजनीं ॥४४॥
म्हणोनि येथ परिहार करणें । न लगेचि विविधा बोलनें । तुम्ही संत सर्वज्ञपणें । अभेदलक्षणें जाणतसां ॥४५॥
तरी सप्ताशीति अध्याय पहिले । यथानुक्रेमें समर्थिलें । यावरी व्याख्यान उपाइलें । अष्टाशीतितमाचें ॥४६॥
ये अध्यायीं निरूपण । हरिभक्त कैवल्य पावे पूर्ण । याहूनि अर्वाद्गेवता जाण । तद्भक्त संपन्न भोगसुखें ॥४७॥
शिवादिदेवतान्तरें भजती । ते भोग्यवैभवचि पावती । तयासि दुर्लभ मोक्षावाप्ती । हे संशयनिवृत्ती मुनि करी ॥४८॥
येथ अष्टम एकादशिनी । पूर्णता पावेल निरूपणीं । श्रोतीं सावध ऐकिजे श्रवणीं । इतुकी विनवणी सेवेसी ॥४९॥
तुमचें अवधानजीवन । पावतांचि वक्तृत्ववन । लसलसीत होवोनि पूर्ण । नित्यनूतन फळेल ॥५०॥
पूर्वाध्यायीं श्रुत्यर्थभूत । शेवटील श्लोक शुक समर्थ । नृपासि कथिता झाला तेथ । अभिप्राय तथ्य हा कथिला ॥५१॥
की भयनिवर्तक श्रीधर । जो परमात्मा परात्पर । स्वभक्ता मोक्षद निरंतर । हें ऐकोनि सादर परीक्षिति ॥५२॥
आशंकोनि मुनी कारनें । प्रश्न करी अतिनम्रपणें । म्हणे स्वामी हें निरूपणें । स्फुटव्याख्यानें मज लागीं ॥५३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-06-13T21:11:39.6470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चंदन पडा चमार घर, नित उठ कूटै चाम, चंदन बिचारा क्‍या करे, परयो नीचसों काम

  • (हिं.) चंदन चांभाराच्या हाती लागले ते त्‍याने चामडे कुटावयास घेतले. त्‍याला त्‍या चंदनाचा दुसरा काय उपयोग? बिचारे चंदन तरी काय करणार, नीचाच्या हातांत पडल्‍यामुळे चामडे कुटण्याचे नीच काम नित्‍य करीत राहिले. चांगली वस्‍तु तिचा उपयोग ज्‍याला करतां येत नाही, अशाच्या हाती पडल्‍यास तो तिचा भलत्‍याच कामीं, हलक्‍या कामी उपयोग करतो. याकरितां योग्‍य मनुष्‍याच्या हातीच चांगली वस्‍तु दिली असतां तिचा उपयोग होतो. 
RANDOM WORD

Did you know?

What is Gotra?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site