अध्याय ८७ वा - श्लोक ४१ ते ४५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


द्युपतय एव ते न ययुरत्नमनन्ततया त्वमपि यदन्तराऽण्डनिचया ननु सावरणाः ।
ख इव रजांसि वान्ति वयसा सह यच्छ्रुतयस्त्वयि हि फलन्ततन्निरसनेन भवन्निधनाः ॥४१॥

श्रुति म्हणती भो भगवंता । स्वर्गादिलोकपति जे तत्त्वता । न पावतीच तुझिया अंता । ब्रह्मादिक ही अतिवेत्ते ॥१२॥
कां म्हणोनि म्हणसी जरी । तरी जे अंतवंत वस्तु पुरी । ते कांहीं ही नव्हसी निर्धारीं । नेणिजे सुरवरीं यास्तव कीं ॥१३॥
असो नेणती ब्रह्मादि द्युपति । परंतु आपुला शेवट निश्चिती । तूं ही नेणसी सर्वज्ञमूर्ति । हें आश्चर्य किती मानावें ॥१४॥
जरी म्हणसी येणें अज्ञता । मज प्राप्त झाली कीं सर्वथा । तरी सर्वज्ञता सर्वशक्तिता । कैंची तत्वता मज लागीं ॥१३१५॥
म्हणोनि अनंत या पदेंकरून । अर्थ ऐसा प्रतीयमान । अंत नाहीं तुज लागून । मां कोठून जाणावा ॥१६॥
शशविषाण कळलें नाहीं । खपुष्प पाहिलें नसे कांहीं । मृगजळस्वादुत्व न गमे हृदयीं । म्हणोनि कांही मूर्खत्व ॥१७॥
याचे न कळणें सर्वज्ञता । अथवा अप्राप्ति सर्वशक्तिता । बाधित करी हे वक्तृता । अनृत सर्वथा नास्तिक्यें ॥१८॥
नाहीं जें त्या जाणिजे काय । अथवा कधीं तें पाविजताहे । म्हणोनि अनंत तूं निश्चयें । केवळ अद्वय परमात्मा ॥१९॥
तें अनंतत्व कवणेपरी । हें ही निश्चयें अवधारीं । आश्चर्य वाटतसे निर्धारीं । केवढी थोरी तव रूपीं ॥१३२०॥
उत्तरोत्तर दशगुणाधिक । ज्यांसी आवरणें महदादिक । ते ब्रह्माण्डनिचय सम्यक । फिरती अनेक तुजमाजी ॥२१॥
काळचक्रें ब्रह्मांडगोळ । अणनारहित एकवेळ । परिभ्रमती अतिविशाळ । परि पर्यायें केवळ नाहीं कीं ॥२२॥
एक ब्रह्माण्ड काळानुसार । होऊनि गेलियानंतर । मग परिभ्रमे ब्रह्माण्ड अपर । ऐसा प्रकार नसे हा ॥२३॥
एकदाचि अवघीं फिरती । तुजमाजी भो ब्रह्माण्डपति । जेंवि आकाशीं रज जे रीती । समीरें फिरती समुच्चयें ॥२४॥
ज्यास्तव ऐसें अनंतत्व । म्हणोनि श्रुति स्वयमेव । तुझ्या ठायीं फळती सर्व । तव रूपभाव पावूनी ॥१३२५॥
फळती म्हणिजे तात्पर्यवृत्ती । करूनि अभिप्रायें सूचिती । अनुभवें समाप्त होती । परी साक्षात न वदती ऐसा हा ॥२६॥
कीं सगुणाचे गुण अनंत । निर्गुण तो अगोचर निश्चित । यस्तव न वदवे यथास्थित । वचनें विशद श्रुतीसी ॥२७॥
तरी अपदार्थीं तात्पर्य कैसें । घडे म्हणाल जरी विशेषें । कीं पदार्थत्वचि मुळीं नसे । कें तात्पर्यवशें श्रुति फळती ॥२८॥
तरी पदार्थासी न आहे विशद । वाक्यार्थत्व हें प्रसिद्ध । परि तीं वाक्येंही असती द्विविध । विधिम्खें आणि निषेधमुखें ॥२९॥
त्यां माज विधिमुखवाक्यीं केवळ । नियम हा घडेल सबळ । परि निषेधमुखीं निखळ । न घडे प्राञ्जळ एकविध ॥१३३०॥
अपदार्थी ही तात्पर्य । निषेधमुखांचें पूर्ण होय । म्हणाल हे द्विविधवाक्यसोय । कैसी काय तरी अवधारा ॥३१॥
निषेधवर्जित प्रवृत्तिकारक । जेंवि हा घट हा पट हें हाटक । हें जळ ही भू हा पावक । इत्यादि वाक्यसंकेत ॥३२॥
यांसि विधिमुख म्हणावें सहज । इहीं वाच्य तो द्रव्यपुंज । त्यासी वाक्यर्थत्व हे पैज । पडे उमज विचारें ॥३३॥
ज्या ज्या पदार्थीं जैसीं वाक्यें । असती तद्रूपा सूचकें । तीं तीं तैसीच बळिष्ठ अनेकें । विधिविवेकें अनादि ॥३४॥
हा घट ऐसें बोलतां वचन । अर्थ उमजे कंबुग्रीवमान । कीं हें जल वदतां होय ज्ञान । द्रवशीळ पूर्ण रसरूप ॥१३३५॥
एवं विधिमुखवाक्यांचें तात्पर्य । पदार्थींच घदे यथान्वय । अपदार्थीं यांची सोय । सहसा न होय प्रबोधक ॥३६॥
आणि नकारादि नीषेध । पूर्वक जीं वाक्यें विशद । तीं निशेधमुखें प्रसिद्ध । जाणिजे शुद्ध विवरणें ॥३७॥
न तद्भूमि न तत्तोय । न कृष्ण न श्वेत होय । इत्यादि वाक्यांचें तात्पर्य । घडे निःसंशय अपदार्थीं ॥३८॥
म्हणोनि निषेधमुखवाक्यीं नियम । तो सहसा नाहींच निस्सीम । उपाधि निरसूनियां अधम । राहिलें उतम तें वस्तु ॥३९॥
आतां हाचि अर्थ सुनिश्चित । अतन्निरसनेन या पदें व्यक्त । जाणती केवळ धीमंत । ऐका श्रुत्यर्थ अन्वयें ॥१३४०॥
अतन्निरसन म्हणिजे काय । तरी जें जें कांहीं दृश्य होय । तें तें निरसिजे विकारमय । मग अनुभवें अवाच्य अगवमिजे ॥४१॥
तें कळण्याहूनि अन्यंत । न कळण्याहूनि ही निश्चित । कीं कळे तें तें नाशवंत । न कळे तें बाधित शून्यत्वें ॥४२॥
आणि धर्माहूनि तें अन्यत्र । अधर्माहूनि जें स्वतंत्र । धर्माधर्म ते गुणविकार । निर्गुण चिन्मात्र अद्वैत ॥४३॥
आणि कृताकृताहूनि भिन्न । कृत तें मायिक साधारण । अकृत मोक्ष निश्चयें करून । तो बंध सापेक्ष केवळ ॥४४॥
अस्थूळ अनणु निश्चयें । म्हणिजे स्थूळ सूक्ष्म जें नोहे । सूक्ष्मत्वें अणूमाजी ही आहे । आणि गगनादि समाये ज्यामाजी ॥१३४५॥
ऐसीं निषेधमुखवाक्यें । इत्यदि प्रकारें अनेकें । तिहीं तात्पर्य वृत्तिविवेकें । खुणेनें नेटकें श्रुति कथिती ॥४६॥
तत्त्वमसि अयमात्मा ब्रह्म । इत्यादि विधिमुखवाक्यें हा नियम । याचें लक्षणावृत्तीनें परम । होय पर्यवसान परब्रह्मीं ॥४७॥
शाखे वरूनि चंद्रीं लक्ष । कीं वृथा वरूनि मार्ग प्रत्यक्ष । तेंवि तत्त्वमस्यादि श्रुति अशेष । ज्या वर्तती निःशेष तत्पर ॥४८॥
त्या लक्षणावृत्ती करून । समाप्ति पावती आपण । परि वाच्यत्वें हें ऐसें म्हणोन । तत्व निर्गुण न जाणविती ॥४९॥
अथवा इदन्त इत्यादि निषेधीं । केवळ शून्यचि न बोधिती कधीं । या स्तव भवनिधना ऐशी शाब्दी । स्वरूपावधि पावलिया ॥१३५०॥
म्हणिजे तुझ्या ठायीं समाप्ति ज्यांची । अतन्निरसनें करूनि साची । कीं निरवधिनिषेधाची । संभूति कैंची सर्वथा ॥५१॥
यास्तव अवधिभूत तूं परमात्मा । त्या तुझ्या ठायीं सर्वोत्तमा । श्रुति फळती जाणोनि सीमा । हा इत्यर्थ सुगम येथींचा ॥५२॥
येचि विषयीं निदर्शन । दाविजेल साधारण । जेणें तात्पर्यलक्षण । उमजे संपूर्ण निःशब्द ॥५३॥
जेंवि का पुरुषसुखावाप्ति । झालिया उषेसि सख्या पुसती । कवण तव भर्ता आम्हां कथीं । परि कळोनि निश्चिती न वदवे ॥५४॥
तंव ते चित्रलेखा सुजाण । चित्रूनि दाविलें त्रिभुवन । पृथकत्वें पुसे आपण । पुरुषरत्न त्या माजी ॥१३५५॥
ते जो जो दावी खुणावोनि । येरी निषेधी ना म्हणोनी । शेवटीं अनिरूद्धमूर्ति देखोनी । झाली लाजोनी अधोमुखी ॥५६॥
जेथ कुंठित झाली निजवाणी । सखींस जानवणें आपुले मनीं । हाचि इचा भर्ता म्हणोनी । कथिलें न कथूनि उषेनें ॥५७॥
निषेधासी अवधिभूत । अनिरुद्ध झाला मूर्तिमंत । निषेधवाणी सफळित । झाली जेथ प्रत्ययें ॥५८॥
तेंवि श्रुतींहें परमपद । पृथ्व्यादिमायानिषेध । करूनि दर्शविलें निःशब्द । होऊनि विशद तदवधि ॥५९॥
पावोनि निजात्मस्वरूप । श्रुति होती विगतजल्प । व्यतिरेकवाणीचा आटोप । निर्विकल्प अनुभवें ॥१३६०॥
ऐसें सनंदनोक्त श्रुतिव्याख्यान । नारदाप्रति श्रीनारायण । षड्गुणैश्वर्यसंपन्न । कथूनि आपण बोलतसे ॥६१॥

श्रीभगवानुवाच - इत्येतद्ब्रह्मणः पुत्रा आश्रुत्याऽऽत्मानुशासनम् ।
सनन्दनमथाऽनर्चुः सिद्धा ज्ञात्वाऽऽत्मनो गतिम् ॥४२॥

म्हणे इतुकें हें निरूपण । तें सिद्ध विरिंचिनंदन । ऐकून आत्मानुशासन । जें अनुग्रहंणें पार मार्थिक ॥६२॥
केवळ आपुलें प्राप्तिस्थान । जें परमगति आदिकारण । जाणोनि अनुभवसंपन्न । पूर्णज्ञान अभिवेत्ते ॥६३॥
मग जयाच्या मुखीं श्रुतिसिद्धान्त । श्रवण केला इत्थंभूत । त्या सनंदनऋषीनें समस्त । पूजिते झाले गुरुत्वें ॥६४॥
म्हणती धन्य धन्य सनंदना । आत्मावबोधपरिपूर्णा । तव प्रसादें निजगुह्यखुणा । हृद्गतनिघाना पावलों ॥१३६५॥
नारदा प्रति ऋषिसमर्थ । जो श्रीनारायण साक्षात । ऐसे कथूनियां तद्वृत्त । बोले इत्यर्थ तो ऐका ॥६६॥

इत्यशेषसमाम्नायपुराणोपनिशद्रसः । समुद्धृतः पूर्वजातैर्व्योमयानैर्महात्मभिः ॥४३॥

जे सृष्टीहूनि पूर्वी झाले । विधिमना पासूनि जन्मले । अंतरिक्षगामी भले । म्हणोनि विशेषिले व्योमयान ॥६७॥
कें व्योमचि ज्यांचे वहन । ऐसे महात्मे विधिनंदन । सनकादि ब्रह्मनिष्ठ पूर्ण । ज्यां सहज ज्ञान उपलब्ध ॥६८॥
तिहीं या प्रकारें संपूर्ण वेद । पुराणें आणि उपनिषद । यांचा सारांशरस हा शुद्द । सम्यक् प्रसिद्ध काढिला ॥६९॥

त्वं चैतद्ब्रह्मदायाद श्रद्धयाऽऽत्मानुशासनम् । धारयंश्चर गां कामं कामानां भर्जन नृणाम् ॥४४॥

तूं ही हें रहस्य देवर्षि । सारवाङ्मयीं अशेषीं । विभागा परि हृमंजुषीं । ठेवीं कीं होसी तद्बंधु ॥१३७०॥
केवळ ब्रह्मचि दाया परी । अप्रयत्नलब्ध या प्रकारीं । सेवीं अनुभवें अंतरीं । जैसे निर्धारीं सनकादिक ॥७१॥
यास्तव नारदा नारायण । ब्रह्मदायाद संबोधन । बोलिला अथवा साधारण । अर्थविवरण दूसरें ॥७२॥
कीं अगा ये ब्रह्मनंदना । श्रद्धे करूनि या अनुकरणा । ऐकिल्या आत्मानुशासना । सद्गतिकारणा निश्चयें ॥७३॥
धरित होत्साता अंतरीं । स्वेच्छा विचरें अवनी वरी । प्रबोधें जडजीवां उद्धरीं । कीं कामासि संहरी रहस्य हें ॥७४॥
जेंवि दृक्तिमिरा चंडप्रभ । एनसभारा जाह्नवीअंभ । तेंवि हृद्गत नरांचे कामकोंभ । जाळी स्वयंभ अवगमतां ॥१३७५॥
शुक म्हणे गा परीक्षिती । सार्वभौम तूं श्रवणक्षिती । ऐसा शब्दीं सुशिक्षितीं । बोलिला ज्या प्रति नारायण ॥७६॥

श्रीशुक उवाच - एवं स ऋषिणादिष्टं गॄहीत्वा श्रद्दयात्मवान् पूर्णः श्रुतधरो राजन्नाह वोरव्रतो मुनिः ॥४५॥

या वरी तो देवर्षि नारद । जें नारायणें तत्व विशद । उपदेशिलें परम शुद्द । केवळ अगाध सुखरूप ॥७७॥
तें सविश्वासें अंतःकरणीं । घेऊनियां अनुभवें मुनी । आत्मसाक्षात्कारें ज्ञानी । झाला पूर्णपणीं कृतकृत्य ॥७८॥
कीं ऐकिला अर्थ सविवेक । हृदयीं धरिला निष्टंक । म्हणोनि जो श्रुतधर नैष्ठिक । बोलता झाला सप्रेम ॥७९॥
तो नमनात्मक नारदोक्त । नारायणस्तव निश्चित । ऐकें परीक्षिति दत्तचित्त । म्हणे महंत शुकमुनि ॥१३८०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP