अध्याय ८७ वा - श्लोक ३१ ते ३३

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


न घटत उद्भवः प्रकृतिपुरुषयोगजयोरुभययुजा भवन्त्यसुभृतो जलबुद्बुदवत् ।
त्वयि त इमे ततो विविधनामगुणैः परमे सरित इवार्णवे मधुनि लिल्युरशेषरसाः ॥३१॥

पूर्वपक्ष इये ठायीं । विधिनंदनीं केला पाहीं । स्वतः जीवांसी जन्म नाहीं । तरी घदे दोन्ही पासाव ॥८३॥
तेथ प्रकृति जीवरूपें होय । अथवा पुरुष होतसे काय । किंवा प्रकृतिपुरुष हें उभय । जीवरूपें होतसे ॥८४॥
प्रकृतिच होते ऐसें म्हणतां । तैं जीवांस येतसे जडता । पुरुष ऐसें म्हणों जातां । सविकारता पुरुष ये ॥६८५॥
दोहीं मिळोनिं जीव होय । तैं लागती दोष द्वय । वास्तव न घडे हा निश्चय । वक्ता श्रुत्यर्थ प्रतिपादी ॥८६॥
तरी जीवांचा संभव कैसा । वास्तव कथितों सावध परिसा । प्रकृतिपुरुषांचिया अध्यासा । माजी जीवदशा उभारे ॥८७॥
वास्तव जन्मातीत ईश । अज अनंत जो अविनाश । जन्म मिथ्यात्वें प्रकृतीस । न घडे म्हणोनि अजा म्हणिजे ॥८८॥
उभयतांच्या अजत्वा स्तव ही । जीवांसि उद्भव घडत नाहीं । श्रुतीनें हाचि अर्थ पाहीं । निर्धारिला म्हणे वक्ता ॥८९॥
जे मिथ्यात्वें नामें अजा । श्वेत रक्त कृष्णा सहजा । त्रिगुणात्मका बह ते प्रजा । प्रसवे आपणा सारखिया ॥६९०॥
अजा म्हणिजे शेळिये प्रति । दोघे अज तयेचे पति । एक जीव तो तत्संगती । भोगी आसक्तिसुखदुःखें ॥९१॥
दुजा तो ईश भोगूनि भोगा । असंग करी इचिया त्यागा । तस्मात् प्रकृतिपुरुषयोगा । पासूनि होती जीव कोटी ॥९२॥
न घडत दोहींचा संयोग । परस्परें अध्यासयोग । तेणें होती जीव अनेग । असुभृत म्हणिजे सप्रमाण ॥९३॥
प्राणादि सोपाधिक जीव । जलबुद्बुदवत् होती सर्व । तो उभययोगाभिप्राव । दृष्टान्तद्वारा अवगमिजे ॥९४॥
बुद्बुद न होती केवळ जळें । अथवा न होती केवळ अनिळें । जळा अनिळांच्या संयोगमेळें । बुद्बुद मोकळे उद्भवती ॥६९५॥
जेथ जेंवि निनित्त पवन । जल बुद्बुदां उपादान । तैसेंचि दार्ष्टान्तीं ही जाण । पुरुष उपादान येर प्रकृति ॥९६॥
तया अथवा ययास्तव । होय गगनाचा संभव । एवं भूतें भौतिकें सर्व । पुरुषा पासाव श्रुति वदती ॥९७॥
बहुत व्हावें ऐसा काम । कामिता झाला पूर्णकाम । अग्नीपासोनि स्फुलिंगोद्गम । स्थिरजंगम तेंवि स्वयें ॥९८॥
तस्मात् परमात्मयापासून । सर्वलोक सर्वप्राण । भूतां देवतादिकांचेगण । होती तुपन्न स्फुलिंगवत् ॥९९॥
ब्रह्मा पासूनि चराचर । तें ब्रह्मत्वाहूनि नोहे अपर । सुवर्णाचे अलंकार । ते कार्तस्वर कीं भिन्न ॥७००॥
तेंवि परमात्मा उपादान । स्थिरचरप्रपंचा लागून । ऐसिया श्रुतिवाक्या वरून । विकारस्पर्शन नव्हे ईशा ॥१॥
परिणामाच्या अनंगीकारें । उपादानत्व ईशा खरें । विवर्तवादें श्रुतिनिर्धारें । प्रतिपाद्य ऐसें म्हणे वक्ता ॥२॥
अद्वैतवादी कोणी एक । परिणाम अंगीकारूनि सम्यक । आत्मयास विकारता कलंक । झणें स्पर्शेल म्हणोनियां ॥३॥
निमित्तोपादाच्या ठायीं । विपरीतभावबोधें पाहें । प्रकृतिपुरुषैक्यें सर्व ही । जीव उद्भवती हें सिध ॥४॥
निमित्तकारण पुरुष म्हणतां । सहसा न शिवे विकारता । प्रकृत्युपादानें जडता । आरोप मिथ्या जीवांसी ॥७०५॥
येचि अर्थीं वदती श्रुति । एकचि अद्वय ब्रह्म म्हणती । अजा एका माये प्रति । प्रतिपादिती गुणमयी ॥६॥
अरे आत्मा हा अविनाशी । बहुधा श्रुति इये विषीं । उपपादिती आणि जीवांसी । उत्पत्ति कैसी ते ऐका ॥७॥
उपाधिमात्र जन्म पावे । चैतन्य व्यापक तेथें स्वभावें । जन्म तिये उपाधी सवें । स्वतः न पवे जन्म कहीं ॥८॥
पुढतीं उपाधिविलयें करून । परमात्मस्वरूपीं जीव लीन । इत्यादि श्रुतिवाक्यांचें श्रवण । वास्त्व जनन निरसीं पैं ॥९॥
त्वयि म्हणिजे तुझ्या ठायीं । कारणात्मकें स्वरूपीं पाहीं । ते हे चराचर जीव सर्व ही । उपाधिउदयीं उद्भवती ॥७१०॥
तस्मात् वास्तव जन्म नसे । उपाधीस्तव मात्र दिसे । अनेक नामगुणभेदा सरिसे । लीन होती तुज माजी ॥११॥
अनेक कार्योपाधीं सहित । विविधनानागुणां समवेत । तुजमाजी पुढती लीन होत । हा सिद्धान्त श्रुतींचा ॥१२॥
तया लीन होतियां परी । द्विविध वदली श्रुतिवैखरी । दृष्टान्तद्वारा तें अवधारीं । म्हणे उत्तरीं शुक राया ॥१३॥
सुषुप्ति आणि प्रळयसमयीं । प्रपंचा विलय होतसे पाहीं । कैसें कोण कोणाच्या ठायीं । लीन होती नामरूपें ॥१४॥
मधू माजी अशेष रस । लय पावोनि करिती वास । सुषुप्ति सरिसे न निःशेष । कारणनाश न होता ॥७१५॥
कारण विद्यामान असे । म्हणोनि जीव श्वासोच्छ्वासें । जाणों येती रसही तैसे । अनोळखपणें रुचि देती ॥१६॥
कोण मी ऐसा न स्फुरे जेंवि । श्वासोच्छ्वास स्वभाव दावी । दुमकुसुमादि मधु न सुचवी । परी भेषजीं चवी प्रकटितसे ॥१७॥
एवं सुषुप्ति मधुदृष्टान्तीं । उपपादिली ऐसिये रीती । आतां ऐका कैवल्यमुक्ति । सिन्धू मिळती जेंवि सरिता ॥१८॥
वर्षाक्शोभें जेंवि सिन्धुजळा । प्राशूनि नेती मेघमाला । ते उतरतां भूमंडळा । प्रवाहशीळा नद्या होती ॥१९॥
त्या समस्ता सिन्धुमिळणीं । यथापूर्व होती पाणी । स्वादें बोधें अथवा गुणीं । पुन्हा निवडणी न घडे त्यां ॥७२०॥
परमे म्हणिजे परात्परपुरुषीं । जीवां अमृतत्व समरसीं । पुढती निवडणीयाची पुसी । न उरे ऐसी श्रुतिवाणी ॥२१॥
एवं परमेश्वरा पासून । जीव होताती उत्पन्न । तद्वश करिती कर्माचरण । पुढती लेन तेथ होती ॥२२॥
संसारचक्रीं भ्रमण ऐसें । जीवांलागूनि बोलिलें असे । तेथूनि मुक्त होती कैसे । तेंही ईशें दर्शविलें ॥२३॥
तें ईशाचें अभिप्रेत । श्रुति बोलिली विधिसंमत । तदनुसार जे वर्तत । ते निर्मुक्त भवचक्रीं ॥२४॥
पूर्वीं समष्टिजीव झाला । व्यष्टिजीवसृष्टि तो व्याला । भवचक्राचे भंवडी भ्याला । निज सुटिकेला अवलोकी ॥७२५॥
भूतें भौतिकें अवलोकिलीं । लोकलोकान्तरें पाहिलीं । दिशाप्रदिशांची घेतली । शुद्धि साकल्यें सर्व ही ॥२६॥
तेथ सुटिकेचा न दिसे वाट । मग होवोनि अंतरनिष्ठ । उपास्थान केलें स्पष्ट । नित्य निघोंट वस्तूचें ॥२७॥
ऋतसत्य जें नामें ब्रह्म । तेथ चित्कळा झाली प्रथम । तयेच्या स्तवनें वास्तव धाम । होऊनि निर्भ्रम स्वयें झाला ॥२८॥
श्रुतीनें तो मार्ग पुढें अबळां । प्रकट दाखविला प्राञ्जळा । आर्पश्रुति ते कौरवपाळा । वदता झाला योगीन्द्र ॥२९॥

नृषु तव मायया भ्रमममीष्ववगत्य भृशं त्वयि सुधियोऽभवे दधति भावमनुप्रभवम् ।
कथमनुवर्ततां भवभयं तव तद्भृकुटिः सॄजति मुहुस्त्रिणेमिरभवच्छरणेषु भयम् ॥३२॥

यया सम़स्त जीवांच्या ठायीं । तुझिये माये स्तव हें पाहीं । भ्रमचक्र भ्रमतें सर्वदा ही । जाणोनि हृदयीं धीमंतीं ॥७३०॥
भवनिवर्तक जो तूं अभव । त्या तुझ्या ठायीं दृढसद्भाव । धरिती आणि मायाप्रभव । मिथ्या माव निस्तरती ॥३१॥
नित्य नूतन जन्ममरण । भ्रमचक्राच्या ठायीं जाण । तयापासून तव पदशरण । निर्भय पूर्ण निर्मुक्त ॥३२॥
तुझ्या ठायीं ज्या अनुवृत्ति । भवभय कैंचें तयां प्रति । तरी तें कोणासि म्हणतां श्रुति । प्रतिपादिती तें ऐक ॥३३॥
ज्यास्तव तुझें भ्रूभंगरूप । त्रिधारचक्रमय काळसर्प । शीतोष्णवर्षादिप्रभैदकल्प । गनना अनल्प शब्दांची ॥३४॥
तव पदशरणा न वांछिती । हें काळचक्र तया प्रति । जन्ममरणाच्या दुःखावर्तीं । भवभयप्राप्ति करीतसे ॥७३५॥
अतएव ऐसें काळचक्र । संसाररूपी महाक्रूर । त्याचे निवृत्तीस्तव सुधीर । होती दृढतर तव भजनीं ॥३६॥
सुधी म्हणिजे बुद्धिमंत । तुझ्या ठायीं सद्भावयुक्त । होवोनि दुस्तर भवावर्त । निस्तरती हें श्रुति बोधी ॥३७॥
तो चि भगवच्चरणीं भावो । मनोनियमावाचूनी वावो । मानसनियमें दृढसद्भावो । करी रोहो हरिभजनीं ॥३८॥
सद्गुरूसी न वचतां शरण । सहसा नोहे मनोनिग्रहण । या लागीं कीजे गुरूपदसदन । लाहिजे विज्ञान तत्कृपया ॥३९॥
जो तापला तापत्रयें । शत्रुषट्काच्या कुठारघायें । त्रासला तेणें हृदयीं भय । घरूनि अभय वांछितसे ॥७४०॥
भवदुःखाच्या आहळणीं । आहळला म्हणे त्राता कोणी । भेटोनि पुढती जन्ममरणीं । पडों नेदी सर्वथा ॥४१॥
ऐसा सचिंत सर्वकाळीं । संसारभयाची काजळी । नित्य जागवी हृदयकमळीं । विषयमेळीं सुख न मनी ॥४२॥
एवं तापत्रयसंतप्त । इहामुत्रीं पूर्ण विरक्त । सद्गुरू प्रति शरणागत । रिघे त्वरित तो पुरुष ॥४३॥
समित्प्रसूनोपचारपाणी । करुणास्वरें आर्तवाणी । दृष्टि ठेवूनि सद्गुरुचरणीं । नम्रमूर्ध्नी होत्साता ॥४४॥
सद्गुरु श्रोत्रिय श्रुत्रिसंपन्न । तदुदित यथोक्त कर्माचरण । ब्रह्मनिष्ठ प्रबोधप्रवीण । नित्य निमग्न स्वानंदीं ॥७४५॥
ऐसिया सद्गुरू प्रति तो शिष्य । शरण रिघोनि करी दास्य । अवंचकभावें निमिषोन्मेष । कृपाकटाक्ष लक्षूनी ॥४६॥
येचि अर्थीं अनेक श्रुति । गुरूपसदन प्रतिपादिती । आचार्यवंतां पुरुषांप्रती । ब्रह्मप्रतीति सुलभत्वें ॥४७॥
इत्यादि श्रुतिवाक्यांच्या ठायीं । दृढ विश्वास धरूनि पाहीं । गुरुभक्तीची बुद्धि कांहें । कुतर्कें चंचल न करावी ॥४८॥
सुष्ठुज्ञान्संपन्न पुरुष । आचार्यमुखेंचि ब्रह्मोपदेश । प्रियतम मानूनि स्वानुभवास । लाहे निःशेष भेदलयें ॥४९॥
ऐशा अनेक बळिष्ठ श्रुति । गुरुभजनातें प्रबोधिती । शुक नृपातें ये चि अर्थीं । बोले सुमति तें ऐका ॥७५०॥

विजितहृषीकवायुभिरदान्तमनस्तुरगं य इह यतन्ति यन्तुमतिलोलमुपायखिदः ।
व्यसनशतान्विताः समवहाय गुरोश्चरणं वणिज इवाज सन्त्यकृतकर्णधरा जलधौ ॥३३॥

इत्यादिश्रुतिवचनीं विश्वास । न धरूनि करिती ब्रह्माभ्यास । तैं मनोनिग्रह न घडे त्यांस । साधनसोस बहु करितां ॥५१॥
हृषीकें म्हणिजे इन्द्रियगण । वायुशब्दें बोलिजे प्राण । यमदमें करितां उभयां दमन । अजिंकमन त्यांतें ही ॥५२॥
दमें इन्द्रियां लागीं दमिती । प्राणायामें प्राणां यमिती । मन अनावर त्यां ही प्रति । श्रमतां स्वमती वश नोहे ॥५३॥
अनावर मानसतुरंगम । अदान्त दमितां अतिदुर्गम । त्यातें स्वमती करूनि क्षम । साधक अधम दमूं पाहती ॥५४॥
वायु अनावर गगनोदरीं । मनस्तुरंगम तयाचिये परी । चंचलत्वें नियमा न धरी । साधनकुसरी श्रम करितां ॥७५५॥
अनाश्रयून सद्गुरुचरण । क्लेशें करिती मनोनिग्रहण । ते नर होती खेदभाजन । व्यसनीं निमग्न होत्सातें ॥५६॥
बहुधा होती व्यसनाकुळ । साधनखेदें अतिव्याकुळ । न निस्तरतां भवाब्धिजळ । दुःख बहळ अनुभविती ॥५७॥
नावाडिया वांचूनि वाणी । पदार्थ घालूनियां जलयानीं । प्रवेशती जे सिन्धुजीवनीं । त्यां लागूनी गति जैसी ॥५८॥
तैसे स्वमतिसाधक दुष्ट । अनेक साधनीं पावती कष्ट । आत्महत्यारे ते स्पष्ट । विवेकभ्रष्ट म्हणोनियां ॥५९॥
येचि अर्थीं संमत श्लोक । स्वमुखें बोलिला जो श्रीशुक । सज्जन परिसोत तो सम्यक । तारक देशिक आश्रयिजे ॥७६०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP