अध्याय ८७ वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


सदिव मनस्त्रिवृत्त्वयि विभात्यसदामनुजात्सदभिमृसन्त्यशेषमिदमात्मतयाऽत्मविदः ।
न हि विकृतिं त्यजन्ति कनकस्य तदात्मतया स्वकृतमनुप्रविष्टमिदमात्मतयाऽवसितम् ॥२६॥

तरी अघटितघटनापटीयसी । तुझे मायेची ख्याति ऐसी । तिणें सृजिलें मानसासी । त्रिवृत जयासी कवि म्हणती ॥४४॥
मोह प्रकाश आणि प्रवृत्ति । या मनाच्या त्रिगुण वृत्ति । एतद्द्वारा कल्पनाभ्रान्ति । जगत्प्रवृति स्फुरवितसे ॥५४५॥
सिन्धुगर्भनिवासी यवन । विविध काचक्रिया उत्पन्न । करिती त्यांमाजि पाहतां नयन । देखति भ्रमोन अनेकता ॥४६॥
एक पदार्थ बहुधा दिसे । कीं दूरस्थ तें निकट भासे । किंवा मयूरपिच्छा ऐसे । अनेक रंग प्रकाशवी ॥४७॥
तेंवि मनाचिया कल्पना । जगजगदीशसंभावना । पाञ्चभौतिक स्फुरे नाना । विपरीतज्ञाना माजिवडें ॥४८॥
तें काय तेथें सत्य असे । नसोनि साचाचि ऐसें भासे । काय निमित्त म्हणसी ऐसें । आस्तिक्य वसे तुझेनि तें ॥४९॥
डोळ्यामाजी प्रकाश नसता । तरी काचद्वारा अनेकता । कैंची कोण प्रकाशिता । श्रीभगवंतां हें तैसें ॥५५०॥
तुझ्या वास्तव आस्तिक्यवशें । मनें कल्पितां आस्तिक्य दिसे । पृथक् सत्त्वत्व पाहतां गवसे । तरी मग कायसें मिथ्यात्व ॥५१॥
व्यष्टिप्रपंचनिष्ठां पुरुषां । मनोभ्रान्तीचा बाधी वळसा । समष्टिवंता श्रीपरेशा । पृथ्क्सत्तत्व जरी म्हणसी ॥५२॥
तरी मायामात्र जो विलास । समष्टिप्रपंच म्हणिजे त्यास । त्यामाजी अभिव्याप्त परेश । वस्तुता फोस दोन्हीही ॥५३॥
येथही शंका उपजे एक । जे भान्तासी विश्व साच देख । गमे तैसेंचि सत्य पृथक । आत्मवेत्त्यांही स्फुरतसे ॥५४॥
तरी कैसें या असत म्हणिजे । यदर्थीं उत्तर अवधारिजे । त्रिपुटीसहित यातें सहजें । सन्मात्रत्वें कवि बुझती ॥५५५॥
जेंवि कनकाचा खंडेराव । श्वान सेवक तुरंग देव । तारतम्यें हे भजकभाव । सोवनीं सर्व कनक म्हणे ॥५६॥
असन्मात्र सन्मात्र बोध । कैसा मानिती आत्मविद । भ्रान्त भाविती बहुधा भेद । तें यां अभेद केंवि गमे ॥५७॥
तरी जें उपादानकारण । तद्रूपें तेंचि प्रतीयमान । बहुधा अलंकारीं सुवर्ण । एक असोन बहु भासे ॥५८॥
मेखळेचिया पेटियांवरी । सिंह व्याघ्र मयूर कुसरी । आटूनि वेगळे निघते जरी । तरी ब्रह्मीं दुसरी सृष्टि असो ॥५९॥
घटशरावीं मृद्भाण्डपंक्ति । कार्यरूपें अनेक गमती । कारणरूपें अवघी माती । ब्रह्मप्रतीति तेंवि बुधा ॥५६०॥
कनकविकृति जेंवि नग । ब्रह्मविकृति तेंवि जग । ज्ञानी वास्तवबोधें चांग । तेथ अव्यंग अभिरमती ॥६१॥
म्हणाल ब्रह्मीं विकृति कैसी । तरी स्वकल्पितें विश्वाभासीं । अनुप्रवेश जो पुरुषासी । जेंवि गगनासी घटगर्भीं ॥६२॥
जरी सत्य ज्ञान ब्रह्म अनंत । किंचित अनेकता नाहींच येथ । अनेकता जे भ्रमनिर्मित । मानी यथार्थ जो कोणी ॥६३॥
तो मरमरूं वारंवार । पुनःपुन्हा जन्म फार । पावूनि भोगी दुःख घोर । ऐसा निर्धार श्रुतींचा ॥६४॥
ऐसिया प्रकारे भगवंताची । वास्तव प्रतिपादना जरी साची । तरी तद्विषयिक ज्ञानप्राप्तीची । सुलभ सिद्धि असतां पैं ॥५६५॥
मग भक्तीचें प्रयोजन काय । ऐसा शंकेसि होतां ठाय । तत्परिहारीं शुकाचार्य । वदता होय तें ऐका ॥६६॥

तव परि ये चरन्त्यखिलसत्वनिकेततया त उत पदाक्रमन्त्यविगणय्य शिरो निरृतेः ।
परिवयसे पधूनिव गिरा विबुधानपि तांस्त्वयि कृतसौहृदाः खलु पुनन्ति न ये विमुखाः ॥२७॥

तरी सर्वभूतनिवासी जो तूं । त्या तव परिचर्येचा तंतु । रक्षूनि उपासिती संततु । ते चि हा मृत्यु निस्सरती ॥६७॥
निरृति ऐसें मृत्यूसि नाम । त्याचा करूनि अतिक्रम । सुखें पावती कैवल्यधाम । निष्कामकाम होत्साते ॥६८॥
अतिक्रम कैसा म्हणाल जरी । तरी पाय ठेवूनि मृत्युशिरीं । सुखें तरती भवसागरीं । एवढी थोरी भक्तीची ॥६९॥
आणि जे अभक्त भजनविमुख । ते होत कां विपश्चितप्रमुख । त्यांतें बांधिसी पशुसम देख । मग भोगिती दुःख तापत्रयें ॥५७०॥
त्यांसी वाचेचिये दावणीं । नामरूपाच्या गळबंधनीं । बांधूनि घालिसी तैं त्यां स्वप्नीं । सुटिका दुर्लभ जगदीशा ॥७१॥
यास्तव तुजसीं सौहार्द केलें । तेचि सप्रेमळ दादुले । आपन पवित्र होवूनि भले । पवित्र केलें त्रिजग तिहीं ॥७२॥
परंतु ज्ञानी विपश्चित । ज्ञानसाधक परि अभक्त । ते न निस्तरती मृत्युपथ । इत्थंभूत निश्चय हा ॥७३॥
जरी वस्तु अपरोक्ष नित्य । वास्तव ज्ञान ही अपरोक्ष सत्य । तथापि असंभावनातिरस्कृत । परोक्षवत अवगमतें ॥७४॥
असंभावना विपरीत भावना । तिहीं भ्रमाक्त केलिया मना । तैं अपरोक्षचि परोक्षपणा । अनुसरोनि भव दावी ॥५७५॥
नाहीं झाली चित्तशुद्धि । तंव जे साधिली ज्ञानसिद्धि । परि ते संसारद्र्म न छेदी । भवभ्रमवृद्धिकर होय ॥७६॥
ऐसें नोहेचि उपासकां । सप्रेमपरिचर्यासाधकां । भजनें चित्तशुद्धि देखा । होतां विवेका उदय घडे ॥७७॥
भगवत्प्रसादें अपरोक्षज्ञान । प्राप्त होतां अयन्तें करून । करतळामळवत् करूनि निर्वाण । लाहती संपूर्ण भ्रमनाशें ॥७८॥
भगवद्भजनें चित्तशुद्धि । झालिया अपरोक्षज्ञानवृद्धि । पावोनि भवभ्रम समूळ छेदी । हा निरवधि सिद्धान्त ॥७९॥
सप्रेमभावें उपास्यभजन । तैसेंचि अभेद गुरुसेवन । येथ कांहीं न होतां न्यून । अपरोक्षज्ञान उदया ये ॥५८०॥
श्रुति शंका करिती येथ । सकळसत्वनिवासी नाथ । त्या भगवन्ता तुजला भक्त । सेविती संतत सप्रेमें ॥८१॥
सकळसत्वनिवासियासी । सेव्यत्व बोलिलें ऐसें म्हणसी । तैम सत्वकारणत्वें निश्चयेंसीं । कर्तृत्व भोक्तृत्व तुज ही ये ॥८२॥
म्हणसी वस्तुता अलिप्त जरी मी असें । तरी जीवासि ही लिप्तता नसे । उभयां तुल्यत्व असतां कैसें । तारतम्य भजनाचें ॥८३॥
ईश्वर सेव्य कैसेनि म्हणिजे । जीवां सेवकत्व केंवि साजे । ये शंकेच्या निरसनकाजें । श्रुत्यर्थ ओजें अवधारा ॥८४॥
अपाणि अपाद अचुक्षु ईश । अकर्ण अघ्राण अजिह्व अरस । परित्यागादानगतिप्रकाश । द्रष्टा परेश सर्वांचा ॥५८५॥
श्रवणें वीण सर्व ऐके । रसने वीण सर्व चाखे । घ्राणें xx गंध असिके । तो जाणतसे अतीन्द्रिय ॥८६॥
सर्ववेद्यांचा जो वेत्ता । तयास कैंचा आन जाणता । तया आदिपुरुषा महंता । श्रुति अनंता स्तविताती ॥८७॥
तोचि अर्थ शुकाचार्य । कुरुवर्यातें कथिता होय । सनंदनगिरा आर्षश्रुतिमय । उपनिषत्प्राय अवधारा ॥८८॥

त्वमकरणः स्वराडखिलकारकशक्तिधरस्तव बलिमुद्वहन्ति समदन्त्यजयाऽनिमिषाः ।
वर्षभूजोऽखिलक्षितिपतेरिव विश्वसृजो विदधति यत्र ये त्वधिकृता भवतश्चकिताः ॥२८॥

इन्द्रियसंबंधरहित असतां । सकळ इन्द्रियांचा शक्तिधर्ता । इन्द्रियशक्तिप्रवर्तविता । स्वयें स्वसत्ता अतीन्द्रियें ॥८९॥
य़दर्थीं दृष्टान्त वदला शुक । श्रोतीं परिसिजे तो सम्यक । जेणें संशय नुधवी मुख । उमजे विवेक साकल्यें ॥५९०॥
स्वप्रकाशें देदीप्यमान । यालागीं स्वराट् तुझें अभिधान । अतीन्द्रिय तुझें ज्ञान । नोहे कारण सापेक्ष ॥९१॥
ऐसा समर्थ जाणोनि तुज । पूजा अर्पी देवतापुज्ज । अविद्यासंवृत असतां सहज । भजती भोज नाचोनी ॥९२॥
अनिंमिष म्हणिजे इन्द्रादि देव । तुज भजती हें न अपूर्व । त्यांसी ही पूज्य जो ब्रह्मादि शर्व । ते भजती सर्व सद्भावें ॥९३॥
जैसे नृपाचे किङ्कर । स्त्रिया सहित सेवनपर । तैसे अविद्यासंवृत ही सुरवर । भजती किङ्कर होत्साते ॥९४॥
ऐसी पुराणान्तरींची बोली । येथ श्रोतयां जाणविली । यावरी सुरांची भजनचाली । ते ही कथिली जात असे ॥५९५॥
मनुष्यें अर्पिती हव्य कव्य । देव पितरें तें भक्षिते सर्व । जैसे वर्षपति पार्थिव । प्रजागौरव सीकरिती ॥९६॥
भरतवर्षादिवर्षपति । ते मग सेविती चक्रवर्ती । स्वप्रजादत्त ज्या संपत्ति । त्या त्या अर्पिती तच्चरणीं ॥९७॥
आणि जे जे कार्यीं जे नियुक्त । ते ते करिती अतंद्रित । अभंग आज्ञा पाळिती नित्य । पूजा समस्त हे त्यांची ॥९८॥
कां पां आज्ञा धरी ती शिरीं । ऐसें परिसा म्हणसी जरी । तरी चकित म्हणिजे भय अंतरीं । तुझें निर्धारीं वागविती ॥९९॥
यदर्थीं ऐका श्रुतिसंकेत । भयें परिमित वाहे वात । भयें सूर्य उदया येत । अतिनियमस्थ ऋतुमानें ॥६००॥
भयें नियमित पावक जाळी । वडवाग्नि वसे सिन्धुजळीं । भयें इन्द्र यथाकाळीं । वर्षें भूतळीं परिमित पैं ॥१॥
भयें मृत्यु भूतग्रासा । करी नियमित आज्ञे सरिसा । एवं तव आज्ञा परेशा । वाहती शिरसा अमराद्य ॥२॥
तस्मात् करणप्रवर्तक तूं ईश्वर । करनपरतंत्र प्राकृत नर । म्हणोनि तुज भजती सादर । हा निर्धार श्रुत्युक्त ॥३॥
इतुकेंचि भजनासी कारण । केवळ नव्हे श्रुतिप्रमाण । तुजचि पासूनि उत्पन्न । तव तंत्र जाण या स्तव ही ॥४॥
जैसे अग्नीचे स्फुलिंग । ऊर्ध्व उसळती लघु सवेग । त्यांसी अग्नीचा वियोग । म्हणणें चांग न भसे हें ॥६०५॥
जरी अंशत्वें वेगळे झाले । तरी अग्नित्वा न मुकले । अग्नितेजें तेजाधिले । म्हणोनि बोलिले तत्तंत्र ॥६॥
तैसे तुज आत्मया पासून । विस्तारती अनेक प्राण । ते सर्व ही तदंश जाण । भासतां भिन्न तव तंत्र ॥७॥
सर्व लोक सर्व देव । सर्व भूतें सर्व जीव । आत्मया पासूनि यां उद्भव । तस्मात् सर्व तव तंत्र ॥८॥
मज पासूनि कैं यां जन्म । कैं लाधले रूपनाम । म्हणसी तरी तो अनुक्रम । ऐकें निजात्मवत्सला ॥९॥

स्थिरचरजातयः स्युरजयोत्थनिमित्तयुजो विहर उदीक्षया यदि परस्य विमुक्त ततः ।
न हि परमस्यकश्चिदपरो न परश्च भवेद्वियत इवापदस्य तव शून्यतुलां दधतः ॥२९॥

अगा ये नित्यमुक्ता स्वामी । मायायुक्त होवूनि तुम्ही । क्रीडतां चराचरात्मक द्विनामीं । भवसंभ्रमीं उद्भवती ॥६१०॥
नित्यमुक्ताचि क्रीडा कैसी । म्हणतां ऐक ये विषीं । माये पासूनि दूर अससी । लिप्त न होसी असंगत्वें ॥११॥
कैसा असंगत्वें विहार । तरी योगसत्ताबळ ईक्षणमात्र । लाहोनि माया सर्व जगत्र । रची स्थिरचर  साकल्यें ॥१२॥
नृपाज्ञेच्या सत्ताबळें । अष्ट प्रकृति ऐश्वर्यमेळें । राज्यभार जेंवि चळे । किंवा जळें नाव जैसी ॥१३॥
तेंवि तुझिया ईक्षणसत्ता । माया प्रसवे स्थिरचरभूतां । द्विविधजातींच्या देहवंतां । जीवां समस्तां जगदीशा ॥१४॥
येथ शंका हे करिसी जरे । जे महाप्रळयाच्या अवसरीं । मज माजी लीन झालिया वरी । जीवां माघारीं केंवि परती ॥६१५॥
मेघमुखें निवडिला सिन्धु । पवनें विभागिले जळबिन्दु । पुन्हा स्वकारणीं मिनल्या भेदु । उरे हा अनुवादु केंवि घडे ॥१६॥
ऐसें म्हणसी जरी परेशा । तरी अविद्यावरणें जीवा अशेषां । ते तुजमाजी संस्कारलेशा । सहित स्वकारणीं लीन होती ॥१७॥
अविद्या माये माजी लीन । माया तुज माजी सुलीन । पुढती होतां तव ईक्षण । करी उत्थान तव सत्ता ॥१८॥
लाहोनि सत्तायोगबळ । माया प्रसवे ब्रह्माण्डगोळ । तैं अविद्यावरणाथिले सकळ । जीव केवळ जन्मती पैं ॥१९॥
तुझिया ईक्षणें उत्थितें । होती जीवांचीं निमित्तें । तीं कर्में त्या जीवांतें । देती योनींतें उच्चारचा ॥६२०॥
निमित्तें म्हणिजे कर्मसंस्कार । लाहोनि तुझें ईक्षणमात्र । उठती जीव तदनुसार । गात्रां पात्र होत्साते ॥२१॥
येथ शंका करिती श्रुति । झणें तूं म्हणसी जगत्पति । मज मीनल्या कर्में पुढती । निमित्तें होती कां म्हणिजे ॥२२॥
माझिया ईक्षणमात्रें । उत्पन्न होती सर्वत्र सर्व । तेथ निमित्ताचा भाव । कां पां वाव कल्पावा ॥२३॥
ऐसें म्हणसी जरी जगदीशा । तरी तुज पासूनि परमपुरुषा । केंवि वैषम्यें जीवां अशेषां । जन्म कैसा घडेल ॥२४॥
तूं तों परमकारुणिक । तुज पासूनि जैं समस्त लोक । समानसुखभोक्ते सम्यक । असती निष्टंक तैं देवा ॥६२५॥
आकाशा परी सदा सम । स्वपदभेद नसे विषम । श्रुति प्रतिपादी तुझें साम्य । तूं अगम्य वाड्मनसां ॥२६॥
असत् म्हणिजे अव्यक्तरूपें । हें विश्व होतें पडपें । तेथूनि पुढती सत्स्वरूपें । होती ऐसें श्रुति वदती ॥२७॥
तस्मात शून्यपूर्वक विश्व । ऐसा श्रुतींचा अभिप्राव । शून्या समान तूं वासुदेव । वसती स्वयमेव पूर्णत्वें ॥२८॥
शून्य न होनि शून्यासम । तो तूं केवळ परब्रह्म । न शकती प्रतिपादूं तव धाम । वाड्मन अनाम अगोचर तें ॥२९॥
तस्मात् सम विषम हे जीव । कर्मसंस्कारें होती सर्व । तूं परमात्मा वासुदेव । वससी स्वयमेव असंगत्वें ॥६३०॥
अविद्योपाधि जीव ऐसे । संसार पावती संस्कारवशें । तेथ ही तव भजनाच्या लेशें । निश्चयेंसे आथिजती ॥३१॥
ऐसें वदोनियां श्रुती । पुढती काय शंका करिती । ती परिसावी सावध श्रोतीं । अवतारणिके माजीवडी ॥३२॥
अविद्याकृतकार्योपाधि । तवांश जीव जरी त्रिशुद्धी । तरी हे पडिले अविद्याबंधीं । कवणे विधी सुटती हे ॥३३॥
जरी अविद्या उपाधि एक । तरी जीव कैसेनि अनेक । एकत्व म्हणतां मुक्ति देख । एका सरिसी सर्वांतें ॥३४॥
वास्तवबोधें एक जीव । अविद्याभ्रम हे जाणोनि माव । स्वयंवेद्यता अनुभव । लाहोनि स्वयमेव निर्मुक्त ॥६३५॥
तयाचि सरिसे सर्व मुक्त । म्हणणें तुम्हांसि हें संमत । कीं अनेक अविद्यांश येथ । तद्विम्बित एक जीव ॥३६॥
जरी म्हणाल जीव एक । परंतु अविद्याभेद अनेक । तरी मग मोक्ष न घडे देख । अविद्या पृथक उरलिया ॥३७॥
तस्मात् इत्यादि तर्कबळें । अनेक जीव अविद्याबळें । प्रतिपादितां अबळां कळे । निर्दोष मोकळें प्रमेय हें ॥३८॥
यावनाळाचा एक कण । कणिशदशक त्या पासून । एक्या कणाची तयांतून । कानी होऊनि परिणमतां ॥३९॥
काणिशदशक तया सरिसी । कानी सहसा नोहे जैसी । बेजभावें संसरणासी । पावणें घडे कीं ना हो ॥६४०॥
तेंवि एका अधिकारिया जीवा पाडें । सर्व जीवांसि मुक्तता न घडे । अविद्यादामनीं सुटे पेडें । मोकळा पडे तोचि पशु ॥४१॥
आणि अंशरूपें म्हणतां जीव । अवगुणत्वपरिमाणें वास्तव । कीं मध्यमपरिमाणें सावयव । देहा एवढा म्हणतसां ॥४२॥
कीं महत्परिमाणें गगना । समान जीवां बृहत्त्व माना । तैं मग अंशरूपें नाना । म्हणणें न घडे सर्वथा ॥४३॥
औट हात प्रमाण देह । त्या माजी अणुमात्र जीव राहे । तैं तो एकदेशीं वसता होय । व्यापक नोहे सर्व देहीं ॥४४॥
म्हणाल देह सावयव । तया माजी तैसाचि जीव । तैं त्या आलें अनित्यत्व । नव्हे यास्तव चिद्रूप ॥६४५॥
गृहा माजी एकदेशीं । दीप राहोनि गृहा प्रकाशी । अणुत्वें जीव तेंवि देहासी । व्यापूनि राहे म्हणाल ॥४६॥
तरी दीपासि लावितां स्निग्ध वाति । तेथ उजळे तत्काळ ज्योति । प्रकाशा माजी धरितां हातीं । नुजळे कल्पान्तीं वर्तिका ॥४७॥
जीव शरीरीं सर्वां ठायीं । व्यापक चैतन्यरूपीं पाहीं । केश ओढितां ठायींच्या ठायीं । सुखदुःखाचा आण असे ॥४८॥
तरी जितुके देह तितुकें जीव । म्हणतां भेदासि झाला ठाव । अभेद अद्वय जें वास्तव । तैं तें वाव श्रुतिवाक्य ॥४९॥
इत्यादि अनेक शंका श्रुति । करूनि पुढती उपसंहरिती । जीव नित्य सर्वग म्हणती । कोणा एका ऋषिमतें ॥६५०॥
जीव सर्वग न्त्य म्हणतां । पूर्वोक्त शंका नुधविती माथा । अविद्याभेदें अनेकता । जीवांसि वदतां दोष नसे ॥५१॥
म्हणोनि अविद्याभेदें करून । अथवा तच्छक्तिभेदें जाण । बद्धमुक्ततासंभवन । मायिक घडे भ्रमास्तव ॥५२॥
भेद असाच जेव्हां होय । तैं बद्धमुक्तताही तत्प्राय । ईश्वरपदीं याची सोय । कोण्या अंशें न स्पर्शें ॥५३॥
बद्धमुक्तेची जैं हे परी । तैं स्वतःसिद्ध ऐक्य जीवेश्वरीं । त्रिशुद्धि निःसंशय निर्धारीं । श्रुति वैखरी प्रतिपादी ॥५४॥
आणि पूर्वोक्त शंका बृहदारण्यीं । अंतर्यामी नाम ब्राह्मणीं । न साहोनि अद्वैत वाणी । वास्तव म्हणोनी प्रतिपाद्या ॥६५५॥
ते चि येथ आर्षश्रुती । सनंदनोक्त शुकभारती । श्रवणीं सादर परीक्षिती । तैशीच श्रुती परिसावी ॥५६॥

अपरिमिता घ्रुवास्तनुभृतो यदि सर्वगतास्तर्हि न शास्यतेतिनियमो ध्रुव नेतरथा ।
अजनि च यन्मयं तदविमुच्य निवन्तृ भवेत्सममनुजानतां यदमतं मतदुष्टतया ॥३०॥

श्रुति म्हणे वास्तव ध्रुव अनंत । तेणें चि रूपें सर्वग नित्य । जीव मानाल जरी तनुभृत । तैं त्या समता ईशेंसीं ॥५७॥
समता असतां न घडे शासन । याहूनि जीव जरी विलक्षण । तरी त्यांसी घडेल नियमन । ईश्वरापासून निश्चयें ॥५८॥
जीवेश्वरांचें समत्व जयीं । शासनशास्तृत्व न घडे तयीं । झणें पडाल या संशयीं । म्हणोनि निश्चयीं श्रुति बोले ॥५९॥
यन्मय म्हणिजे जया ऐसें । उपाधी स्तव विकृत दिसे । कारणत्वें त्या कार्यदशे । अदे अपैसें नियंतृत्व ॥६६०॥
कारणत्वें न टाकून । ओतप्रोत स्वबोधें पूर्ण । म्हणाल तें जरी किंल्लक्षण । तरी जें समान अनुस्यूत ॥६१॥
यन्मयशब्दें जाणिजे काये । हें अमुकें ते कथिजे सोये । तज्ज्ञानविषयीं जैसें होय तैसें नोहे अद्वैत ॥६२॥
येथ वस्तु जो ज्ञानें जाणें । तो उरे साक्षी वेगळेपनें । तैं तें जाणणेंचि नेणणें । वृथा मिरवणें ज्ञातृत्वा ॥६३॥
जो साक्षित्वें विरोनि जाये । तो जाणावया उरेल काये । न जाणोनि तो सर्वज्ञ आहे । या अभिप्रायें श्रुत वदती ॥६४॥
जेणें शर्करा भक्षिली । तेणें गोडी सांगितली । केवळ शर्करा होवोनि ठेली । तैं ते गोडी वेगळी न वदे कीं ॥६६५॥
कळलें ज्या त्या न कळे कांहीं । कळे तें तो विनाशी पाहीं । न कळे ज्यासी त्या कळलें हृदयीं । अभेदबोधें आत्मत्वें ॥६६॥
तस्मात् यत्तच्छब्दा प्रति । अतर्क्य वस्तु म्हणती श्रुति । अनुस्यूतत्वें नियंतृत्वें स्थिति । सर्वांप्रत जयाची ॥६७॥
नभ न होनि नादकुसरी । अनुस्यूयत्वें नादान्तरीं । कारणत्वें शासन करी । भेद अंबरीं न शिवोनी ॥६८॥
तस्मात परेश सर्वशास्ता । अनुस्यूयत्वें साक्षी न होतां । अभेदबोधें स्वसंवेत्ता । प्रकृती परता परमात्मा ॥६९॥
हे ऐकोनि सनंदनवाणी । प्रश्न केला ब्रह्मनंदनीं । तो परिसावया श्रोतृजनीं । सावध श्रवणीं बैसावें ॥६७०॥
विधिसुंत म्हणती भो वक्तया । जीव जरी होती परमात्मया । पासूनि तरी मग नियम्यां तयं । नियंतृत्व घडे ईशा ॥७१॥
ऐसें म्हणतां दोष विविध । तो ही ऐकावा सावध । जें प्रतिदिनीं कृतकर्माचा बाध । अकृत संबंध भोक्तृत्वा ॥७२॥
अहरहर सत्कर्म जीव करिती । तत्फळ इहामुत्रीं भोगिती । अनित्यत्व जैं जीवांप्रति । तैं फळभोगप्राप्ति कवणातें ॥७३॥
ईशापासूनि जीवकोटी । नूतन जन्मती ऐसी गोळी । तैं न करितां कर्मराहटी । घडे कीं सृष्टी भोक्तृत्व ॥७४॥
कर्म न करितां भोगणें पडे । सम विषम तैं केंवि घडे । एक नृपासनीं सुरवाडे । एक काबाडें वाहताती ॥६७५॥
एक सचिंत एक रुग्ण । एव निरामय निश्चिन्त पूर्ण । दुःखशोकार्णवीं एक मग्न । एक निमग्न अष्टभोगीं ॥७६॥
अकृताभ्यागमप्रसंगीं । ऐसी विषमता केंवि भोगीं । तैं मग मोक्ष जीवांलागीं । स्वरूपहानिमात्र ॥७७॥
भस्मीभूत होतां देह । जन्ममरणाचा अभाव । तैं चार्वाकमत स्वयमेव । सिद्ध झाले या बोधें ॥७८॥
यास्तव बोलणें हें अयुक्त । आत्मा स्वप्रकाशानंद सत्य । तेथ उपाधि अविद्याकृत । नाना अनर्थ उपवादी ॥७९॥
अविद्याकृतानर्थवृत्ति । इतुकेनि मोक्ष जीवांप्रति । देहीं सहसा न घडे युक्ति । कोणे रीती तें ऐका ॥६८०॥
जीवांसि वास्तव जन्मचि नाहीं । उपाधिजन्में जन्मती पाहीं । जेंवि कां घटमठादिकांच्या ठायीं । न जन्मोनियां नभ जन्मे ॥८१॥
ऐसा सिद्धान्तप्रतिपादनीं । जे श्रुति वदला सनंदनमुनि । ते परिसावी श्रोतृजनीं । सावध होवोनि क्षण एक ॥८२॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP