अध्याय ८७ वा - श्लोक ११ ते १५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तुल्यश्रुततपःशीलास्तुल्यस्वीयारिमध्यमाः । अपि चक्रुः प्रवचनमेकं शुश्रूषवोऽपरे ॥११॥

श्रुताध्ययनतपःशील । इत्यादि साधनें सर्वां तुल्य । शत्रु मित्र आप्त कौल्य । समान साफल्य आचरणीं ॥५९॥
ऐशियां माजी कोण वक्ता । म्हणसी कोण प्रश्नकर्ता । तरी त्या सर्वां सम योग्यता । जेंवि अमृता सम गोडी ॥१६०॥
समस्त ब्राह्मण वेदाध्यायी । परंतु मखक्रियेच्या ठायीं । जो जो क्षण घेतला जिहीं । ते ते समयीं मंत्र पढती ॥६१॥
तैसे मुनिवर ब्रह्मनिष्ठ । एक वक्ता करूनि स्पष्ट । अपर प्राश्निक श्रवणाविष्ट । करिती अभीष्ट ब्रह्ममख ॥६२॥
तेथ सनंदननामा मुनि । वक्तृत्वाचा क्षण देऊनी । बैसविला तो तत्कृतप्रश्नीं । श्रुतिव्याख्यानीं प्रवर्तला ॥६३॥
सनंदनाप्रति प्रथम प्रश्न । म्हणसी मुनींहीं केला कोण । तरी जो राया मजलागून । विस्मयापन त्वां केला ॥६४॥
निर्गुणीं सगुणा श्रुतींची गति । केवळ ब्रह्मीं केंवि चरति । हेचि नारायणाप्रति । नारदें प्रश्नोक्ति पूसिली ॥१६५॥
नारायणें ब्रह्मसुता । ब्रह्मसत्रींची कथिली गाथा । तेथें स्वायंभुवीं सनंदन वक्ता । करूनि वार्ता हेचि पुशिली ॥६६॥
जे निर्गुणब्रह्मीं सगुणा श्रुति । कैशा कोण्या प्रकारें चरति । यदर्थी सनंदनमुनिभारती । प्राश्निकांप्रति बोलतसे ॥६७॥

सनंदन उवाच - स्वसृष्टमिदमापीय शयानं सहशक्तिभिः । तदंते बोधयांचक्रुस्तल्लिंगैः श्रुतयः परम् ॥१२॥

स्वमायेचा अंगीकार । करूनि सृजिलें चराचर । तें स्वसृष्ट विश्व ईश्वर । प्राशूनि सादर शयन करी ॥६८॥
सृजनावनात्मक ज्या शक्ति । तिहीं सहित करी सुषुप्ति । तया प्रळयाचियेही अंतीं । पुन्हा जागृति जैं लाहे ॥६९॥
प्रथम जागृति विश्वास तेथ । श्रुतिकदंबातें प्रसवत । मग त्या श्रुति प्रबोधित । बंदिजनवत प्रभुवर्या ॥१७०॥
जें कां वास्तव परब्रह्म । तेथ पूर्णचैतन्यावगम । करूनि तल्लिंगीं शंसिसी परम । गुणगण निस्सीम ते ऐका ॥७१॥

यथा शयानं सम्राजं बन्दिनस्तत्पराक्रमैः । प्रत्यूषेऽभ्येत्य सुश्लोकैर्बोधयन्त्यनुजीविनः ॥१३॥

जैसा सुप्त सम्राट् चक्रवर्ती । तदनुक्रमें ज्यां जीविकावृत्ति । ते बंदिजन तयाप्रति । उपौढ करिती प्रत्यूषीं ॥७२॥
सुश्लोक म्हणिजे उत्तम कीर्ति । तत्कृत गाऊनि करिती स्तुति । लाहूनि तत्पूर्वीं जागृति । जेंवि वोधिती अनुजीवी ॥७३॥
प्रभूच्या जागृतिसमया पूर्वीं । येऊनि प्रत्यूषीं अनुजीवी । प्रबोधिती श्रुतिही तेंवी । निजगोसावी जागविती ॥७४॥
अनंतगुणीं जो परिपूर्ण । अमलयशोमय तद्गुणगण । तन्निःश्वासीं लाहोनि जनन । स्तविती श्रुतिगण तें ऐका ॥१७५॥

श्रुतय ऊचुः - जय जय जह्मजामजित दोषगृभीतगुणां त्वमसि यदात्मना समवरुद्धसमस्तभगः ।
अगजगदोकसामखिलशक्त्यवबोधक ते क्वचिदजयाऽऽत्मना च चरतोऽनुचरेन्निगमः ॥१४॥

अजितशब्दें परमेश्वर । सगुणनिर्गुण अगोचर । त्यास संबोधी श्रुतींचा निकर । जयजयकार करूनियां ॥७६॥
तूं अद्वितीय पूर्ण अनंत । मायाद्यावरणीं अनावृत । स्वबोधशाळी सदोदित । या लागीं अजित संबोधन ॥७७॥
जयजयकारें आम्रेडितीं । भो भो अजिता श्रुति म्हणती । विजयोत्स्कर्षें तव प्रकृत्ति । वर्तो निश्चिती सर्वत्र ॥७८॥
कोणत्या व्यापारें करून । जयोत्कर्षाचें आविष्करण । म्हणसी तरी तें करितों कथन । ऐकें सद्गुणसुखसिन्धु ॥७९॥
अग म्हणिजे स्थावरनिकर । जंगमात्मकांचा समुदाय चर । एवं द्विविध शरीरधर । जीव अपार तव सृष्ट ॥१८०॥
तयां जीवांची अविद्या । अजानामका जे प्रसिद्धा । जहि म्हणिजे तिचिया वधा । स्वसंवेद्या करीं प्रभो ॥८१॥
जीव केवळ चिदाभास । वरपडविले जन्ममरणास । जिणें तयेचा करीं नाश । भो भो परेश प्रभुवर्या ॥८२॥
कैसी वधावी गुणवती । ऐसा संशय न धरीं चित्तीं । तरी ते दोषांचे कारण होती । गुणसंतती जियेची ॥८३॥
दोषांकारणें जयेचे गुण । जरी तूं म्हणसी कैसे कोण । तरी तयांचें करितों कथन । ऐकें सर्वज्ञशिखामणे ॥८४॥
हे स्वैरिणी तुझेनि आंगें । थोराहूनी गुणप्रसंगें । निजानंदावरणयोगें । परमपुरुषातें प्रतारी ॥१८५॥
तमोगुणें निजज्ञानलोपा । करूनि सुषुप्ति आणी रूपा । तीमाजी सत्वगुणाच्या दीपा । विपरीतपडपा प्रकाशी ॥८६॥
चित्तचतुष्टय सत्वदीपें । उजळे विपरीतबोधकल्पें । तैं रजही मनःसंकल्पें । प्राणेन्द्रियगण उभारी ॥८७॥
जीवांसी तें तें करणावरण । करूनि आनंदादि सहजगुण । आवरूनि मिथ्या विषयभान । प्रकट दावून भांबावी ॥८८॥
मग त्या विषयप्रलोभा साठीं । जीव लागती दृश्या पाठीं । जागृत्यवस्थे स्थूलात्मयष्टी । लाहूनि कष्टी बहु होती ॥८९॥
एवं त्रिगुणात्मकभवजाळीं । गोवूनि जीवांची मंडळी । निजानंदा विमुख केली । यास्तव वधिली पाहिजे हे ॥१९०॥
परप्रतारणाकारणें । स्वैरिणी भरली ही दुर्गुणें । यास्तव जीवांचिये करुणे । संहरणें इयेतें ॥९१॥
झणें तूं म्हणसी भो भो अजिता । ऐसी स्वैरिणी दोषाक्ता । इणें मजही सदोष करितां । कोण रक्षिता पैं तेथ ॥९२॥
ऐसें सहसा स्वामी न म्हणें । तूं आत्मत्वें पूर्णपणें । सर्वैश्वर्यें वाहसी पूर्णें । वश करूनि मायेतें ॥९३॥
पुढती शंका करितां श्रुति । म्हणसी जीव कां ईतें न मरिती । विवेकवैराग्यज्ञानसंपत्ति । संपादूनियां स्वयमेव ॥९४॥
भो भो अजिता यदर्थीं अक । अखिल शक्ति तूं अवबोधक । जीवान्तरगत उद्बोधक । शक्त्युत्कर्ष हाचि तुझा ॥१९५॥
अंतःकरणा जीवांप्रति । विवेकवैराग्यज्ञानसंपत्ति । तव प्रेरनेवीण निश्चिती । नोहे श्रीपति स्वातंत्र्यें ॥९६॥
येथ तूं जरी म्हणसी ऐसें । ज्ञानैश्वर्यादिगुणविशेषें । अकुण्ठबोधें मी आथिला असें । जीवां हें नसे काय म्हणोनी ॥९७॥
आनि जीवांकारणें अविद्या बाधे । मज पूर्णातें ते न बाधे । कर्मज्ञानादिशक्त्यवबोधें । म्यां तद्वधें सोडविजे ॥९८॥
म्हणसी यदर्थीं प्रमाण काय । तरी हा आमुचा श्रुतिसमुदाय । अन्यप्रमाणाचें कार्य । रूढ नोहे यदर्थीं ॥९९॥
जरी तूं म्हणसी गुणातीतीं । कैसी श्रुतींची प्रवृत्ति । तरी श्रुतिमयात्मक वेदा वसति । असे संतत सन्मात्रीं ॥२००॥
तो तूं सन्मात्र कोणे समयीं । मायावलंबें सृष्ट्यादिकार्यीं । माये करूनि क्रीडसी पाहीं । अचिन्त्यानंतगुणपूर्ण ॥१॥
सत्यज्ञानानंतानंद । चिन्मात्रैकरसें विशद । प्रकटैश्वर्यें क्रीडतां वेद । तवानुलक्षें विचरतसे ॥२॥
तिये काळीं वदल्या श्रुति । जेथून इयें भूतें होती । विरंचीपूर्वीं जगदुत्पत्ति । ब्रह्मयाप्रति जो सृजित ॥३॥
तया ब्रह्मयाचिये धिषणे । माजी करी जो वेदप्रेरणे । तया देवातें मुमुक्षुगणें । शरण होणें श्रुति म्हणती ॥४॥
तो तूं म्हणसी देव कैसा । जो आत्मत्वें स्वप्रकाशा । न संडूनि माये सरिसा । नित्य मुक्तत्वें क्रीडावान् ॥२०५॥
माये माजी असोनि आपण । मायैश्वर्यगुण प्रकटून । करी मायेचें नियमन । सत्यज्ञानब्रह्ममय ॥६॥
जो सर्वज्ञ सर्ववेत्ता । इत्यादि अनेक श्रुतिगण वक्ता । तो निगमकदंब तूतें तत्वता । प्रतिपादितसे भो अजिता ॥७॥
पुन्हा शंका घेऊनि श्रुति । झणें तूं म्हणसी भो श्रीपति । जें चराचरांचा राजा दिवस्पति । कीं अग्नि म्हणती स्वर्गमूर्धा ॥८॥
ऐसे लोकपाळ पृथक्पृथक । निगमप्रतिपाद्य असतां मुख्य । तेथ प्रतिपाद्य मी हा विवेक । केंवि सम्यक विवरणें ॥९॥
ऐसें न म्हणें भो परेशा । ऐक यदर्थीं परिभाषा । बृहद्ब्रह्मचि विश्वाभासा । भासक वांचून आन नसे ॥२१०॥

बृहदुपलब्धमेतदवयन्त्यवशेषतया यत उदयास्तमयौ विकृतेर्मृदि वाऽविकृतात् ।
अत ऋषयो दधुस्त्वयि मनोवचनाचरितं कथमयथा भवन्ति भुवि दत्तपदानि नृणाम् ॥१५॥

व्यतिरेकक्रमें कृतनिरास । विवर्त निरसल्या निःशेष । वास्तव उरे जें अवशेष । म्हणिजे त्यास ब्रह्मद्ब्रह्म ॥११॥
तेणें अवशिष्यमाणपणें । द्रुहिणाग्निरवीन्द्रादिकां कारणें । निमेषोन्मेषीं होणें जाणें । तें तव बृहत्त्व कोणें अवगमिजे ॥१२॥
म्हणसी बृहतापासून । या सर्वांचे उदयास्तमान । तस्मात् ब्रह्म उपादान । सर्वां लागून झालें कीं ॥१३॥
मठघटशरावकुड्यादिकां । मृद्विकारां हेतु मृत्तिका । कीं हेमविकरां कुंडलां कटकां । जेंवि कनका उपादानता ॥१४॥
तैसेंचि ब्रह्म विकारवंत । ऐसी शंका न कीजे येथ । अविकृत ब्रह्म सदोदित । विवर्तवत विकारता ॥२१५॥
सूर्य अविकार जैसा तैसा । कारण विवर्ता विश्वाभासा । तेंवि अविकृता तुज परेशा । विवर्तरूपें विकारता ॥१६॥
अधिष्ठानत्वें तूं अविकारी । विकार प्रकटिशी विवर्तापरी । इवशब्दार्थें श्रुति निर्धारीं । उपमे धरित्री उपमिली ॥१७॥
घटमठादिविकारां कृत्स्नां । अधिष्ठानत्वें अविकृत मृत्स्ना । मटमठांच्या उदयास्तमानां । न हौनि प्रकटी विवर्तवत् ॥१८॥
वाचारंभणमात्रविकार । मृत्तिका सत्यत्वें अविकार । तेंवि बृहत्त्वें निर्विकार । विश्वाकार विवर्तवत् ॥१९॥
अखिल ब्रह्मचि ऐशा श्रुति । तुज एकातें प्रतिपादिती । यास्तव तुझ्या ठायीं धरिती । वाड्मनसप्रवृत्ति मुनिवर्य ॥२२०॥
मज अद्वतामानी मुनी । देखिलें कैं कोणी कोठोनी । तरी ते मंत्रच ऋषिवरगणीं । द्रष्टे म्हणोनि जाणावे ॥२१॥
तिहीं वाड्मनसाचरित । ठेविलें तव धामीं निश्चित । तेंही ऐकें इत्थंभूत । वदती स्पष्टाथ उभयांचा ॥२२॥
मनें करूनी आचरित । तें तव धामचि निश्चित । वचनाचरितें प्रबोधामृत । वदती संतत तव महिमा ॥२३॥
जैसें आत्यंतिक कृपण । जीवें प्राणेंसीं धरी द्रविण । तैसें तव धाम आणि तव गुण । निर्धारून दृढ धरिती ॥२४॥
किंबहुना नामरूपात्मक विश्व । त्यामाजी पृथग्नामाकृति सर्व । तेथ धरिती तुझाचि भाव । निरसोनि माव निजबोधें ॥२२५॥
परि विश्वाभास पृथग्विकार । सहसा न मनिती साचार । बृहद्ब्रह्म तूं विश्वाकार । कृतनिर्धार मोडतां ॥२६॥
येचि अर्थीं उदाहरण । हेंचि श्रुति वदली जाण । जे मनुष्यां भूचरां लागून । भूमि सांडोन न वसवे ॥२७॥
मनुज बैसलाही वृक्षाग्रीं । तरी तो निश्चयें भूमीच वरी । स्थळजळयानीं पुर गोपुरीं । भूम्याधारी तथापि तो ॥२८॥
बहुतीं प्रयत्नीं अंतराळीं । त्रिमाळिकीं चतुरीं कुशळीं । पदें ठेवितांही चिरकाळींण । अचुक भूतळीं असेचि कीं ॥२९॥
भूम्याधारें भौतिकां असणें । तेंवि ब्रह्मचि ब्रह्मेन्द्रपणें । विश्वाकारें अविकार जाणे । ऐसें बोलणें श्रुत्यर्थीं ॥२३०॥
सर्व ब्रह्मचि ऐसें निगमीं । तूतें देखिलें मुनिसत्तमीं । तयाची प्रवृत्ति व्याख्यानधर्मीं । वदोनि श्रुत्यर्थ दृढावी ॥३१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP