अध्याय ८५ वा - श्लोक ४६ ते ५०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा



शाध्यस्मानीशितव्येश निष्पापान्कुरु नः प्रभो । पुमान्यच्छ्रद्धया तिष्ठंश्चोदनाया विमुच्यते ॥४६॥

शासनार्ह जे सकळजीव । त्यांचा शिक्षक तूं वासुदेव । मानूं शासन तव ज्यास्तव । तें तूं स्वयमेव संपादीं ॥२१॥
आवडी करूनि तव शासनीं । सदैव रंगों सप्रेम भजनीं । विधिनिषेधादि कर्म बंधनें । न पडों येथूनि तें करीं ॥२२॥
जें कां म्हणिजे कर्मप्रेरणा । केवळ विधिनिषेधलक्षणा । आम्हां दासांतें जनार्दना । तेथूनि पुन्हा मुक्त करीं ॥२३॥
निश्चयेंसिं तुझा भक्त । नोहे विधिनिषेधा अंकित । ऐसा तव भजनासक्त । करीं निवांत म्हणे बळि ॥२४॥
ऐसी ऐकूनि बळीची वाणी । सर्व तदुक्ति मान्य करूनी । निजगमनार्थ सूचवूनी । चक्रपाणी बोलतसे ॥३२५॥

श्रीभगवानुवाच - आसन्मरीचेः ष्ट्पुत्रा ऊर्णायांप्रथमेऽन्तरे । देवाः कं जहसुर्वीक्ष्य सुतां यभितुमुद्यतम् ॥४७॥

बळीनें जे जे याचिले वर । मान्य करूनि ते जगदीश्वर । निजगमनाचा विचार । कथी साचार संक्षेपें ॥२६॥
बळीतें म्हणे कमलामित्र । मरीचिनामा विरिंचिपुत्र । ऊर्णा तयाचें कलत्र । ते षट्पुत्रां प्रसवली ॥२७॥
स्वायंभुव मन्वंतरीं । पुत्रषट्क ऊर्णाजठरीं । असतें जाहलें देवतानिकरीं । मान्य महत्त्वें विराजित ॥२८॥
तंव कोण्हे एके अपूर्व समयीं । वाग्देवी जे स्वसुता पाहीं । तियेशीं रमतां देखोनि तिहीं । प्रजापतीतें हासिन्नले ॥२९॥
क म्हणिजे जो प्रजापती । तेणें वाग्देवी धरूनि हातीं । मैथुनें रमावयार्थ निगुती । मरीचि षट्सुतीं हास्य केलें ॥२३०॥

तेनासुरीमगन्योनिमधुनाऽवद्यकर्मणा । हिरण्यकशिपोर्जाता नीतास्ते योगमायया ॥४८॥

तया बापास्तव पाहीं । तत्काळ मरीचि पुत्र साही । जन्मले दैत्ययोनीच्या ठायीं । गेहीं हिरण्यकशिपूचिये ॥३१॥
झणें म्हनसी पाप तें कोण । तरी श्रेष्ठाचें उपहासन । कनिष्ठीं केलें यास्तव जाण । अधःपतन त्यां झालें ॥३२॥
प्रह्लादाचा सापत्न ज्येष्ठ । हिरण्यकशिपूचा पुत्र वरिष्ठ । कालनेमिनामा दुष्ट । त्याचे जठरीं जन्मले ते ॥३३॥
कीर्तिमंतादिनामाथिले । महाप्रतापी दैत्य भले । देवकीजठरा कैसे आले । तेंही कथिलें जातसे ॥३४॥
तारकामये समरांगणीं । कालनेमीतें चक्रपाणी । वधिता जाला तये क्षणीं । निर्जरश्रेणी आनंदल्या ॥३३५॥
महामायावी काळनेमे । द्वेष धरूनि पुरुषोत्तमीं । भोजकुळीं जन्मला भूमी । कंसनामा प्रतापी ॥३६॥
तयाच्या वधाकारणें पुढती । पृथ्वी विधि हर निर्जरपंक्ती । जाऊनि क्षीरसमुद्राप्रती । स्तवनीं श्रीपती प्रार्थियेला ॥३७॥
तयासि देऊनि वरदान । कंसा सूचिलें आसन्नमरण । देवकीअष्टमगर्भ जाण । वधील म्हणे नभो वाणी ॥३८॥
कंस वधील गर्भषट्क । भावी जाणोनि हें निष्टंक । साही कालनेमीचे तोक । देवकीगर्भीं योजविले ॥३९॥
ते पूर्वींचे मरीचिकुमर । श्रेष्ठोपहासें जाले असुर । मायेसि आज्ञापूनि श्रीधर । देवकीजठरीं त्यां घाली ॥३४०॥
नारदवचनें कंसासुरें । पूर्वजन्मींचीं निज लेंकुरें । जातमात्र वधिलीं निकरें । देवकीजठरीं जन्मलिया ॥४१॥
मग सातवा देवकीपोटीं । जन्मला संकर्षण जगजेठी । विष्णु आठवा त्याचिये पोटीं । मी कृष्ण भूतटीं अवतरलों ॥४२॥
कंस वधूनि निर्जरां तोष । दमिले दुष्ट कपटी अशेष । द्वारके माजि करूनि वास । भरिलें यश ब्रह्माण्डीं ॥४३॥
प्रस्तुत येथें इये काळीं । स्वयें पातलों मी वनमाळी । तें तूं ऐकें राया बळि । जे आज्ञा केली जननीनें ॥४४॥

देवक्या उदरे जाता राजन्कंसविहिंसिताः । सा ताञ्शोचत्यात्मजान्स्वांस्त इमेऽध्यासतेऽन्तिके ॥४९॥

देवकीउदरीं जन्मले दैत्य । कंसें केला त्यांचा घात । त्यांतें मानूनि आत्मसुत । शोकाभिभूत देवकी ॥३४५॥
देवकीनें याचिलें मज । कंसहिंसित निजात्मज । मग म्यां ज्ञानीं पाहूनि सहज । आलों वोजें तुजपासीं ॥४६॥

इत एतान्प्रणेष्यामो मातृशोकापनुत्तये । ततः शापाद्विनिर्मुक्ता लोकं यास्यन्ति विज्वराः ॥५०॥

ते हे आहेत तुजसंन्निध । आतां यांतें नेऊनि विशद । निजमातेचा निरसीन खेद । मग हे शुद्ध होतील ॥४७॥
शापविमुक्त जालिया वरी । न तपती तापत्रया माझारी । पुन्हा मिरवती मुनिनिर्जरीं । इतुकें श्रीहरी स्वयें वदला ॥४८॥
पुढती बळीतें जगन्नाथ । साही जणांचा नामसंकेत । आणि उर्ध्वगतीचा हेत । कथी निवांत तो ऐका ॥४९॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP