अध्याय ८५ वा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - अथैकदात्मजौ प्राप्तौ कृतपादाभिवन्दनौ । वसुदेवोऽभिनन्द्याह प्रीत्या सङ्कर्षणाच्युतौ ॥१॥

शुक म्हणे गा परीक्षिति । ऐकें बलकृष्णांची कीर्ति । जेणें अक्षयसुखावाप्ति । प्रेमळ लाहती तुज ऐसे ॥६॥
ऐसें सादर कुरुवर्यातें । करूनि प्रवर्तला कथनातें । तें व्याख्यान श्रोतयांतें । कथी दयार्णव हरिवरदें ॥७॥
कुरुक्षेत्रयात्रे उपरी । एकदा आत्मज पाहूनि शौरी । स्मरूनि मुनींची वैखरी । काय करी तें ऐका ॥८॥
आपुलाले भुवनींहून । प्रातःकृत्य संपादून । पितृदर्शना रामकृष्ण । आले देखोन वसुदेवें ॥९॥
चरण नमस्कारूनियां पुढें । बद्धाज्जळि किङ्करापाडें । उभे ठाकले ऐसियां कडे । तोषे निवाडें पाहूनी ॥१०॥
रामकृष्णांतें ऐशिया परी । देखूनि संतुष्ट अभ्यंतरीं । कर ठेवूनि उभयां शिरीं । आशिषोत्तरीं गौरविले ॥११॥
प्रीति करूनि पुत्रांकडे । पाहोनि आनंदें वोसंडे । किमर्थ म्हणसी तरी रोकडें । ऐक निवाडें निरूपितों ॥१२॥

मुनीनां स वचः श्रुत्वा पुत्रयोर्धामसूचकम् । तद्वीर्येर्जातविश्रम्भः परिभाष्याभ्यभाषत ॥२॥

महिमा पुत्रांचा सुचक । ऐसें स्मरोनि तें मुनिवाक्य । पुत्रवीर्यें अलौकिक । विश्वासजनकें जाणविलीं ॥१३॥
पुत्र केवळ ईश्वरेश्वर । प्रकृतिपुरुषांपासूनि पर । माझिये उदरीं मनुजावतार । परि नव्हती साचार मनुज हे ॥१४॥
जन्मापासूनि आजवरी । ज्याची स्मरतां ऐश्वर्यथोरी । मुनीश्वरांच्या वाक्यें निर्धारीं । विश्वास अंतरीं बाणला ॥१५॥
करूनि पादाभिवंदन । पाहूनि सुस्निग्ध नंदन । सप्रेमभावें संबोधून । बोले वचन तें ऐका ॥१६॥

कृष्ण कृष्ण महायोगिन्सङ्कर्षण सनातन । जाने वामस्य यत्साक्षात्प्रधानपुरुषौ परौ ॥३॥

महायोगिया भो भो कृष्णा । सनातना संकर्षणा । प्रधानपुरुषां दोघां जणां । पासूनी परतर मी जाणें ॥१७॥
या विश्वाचें कारण श्रेष्ठ । स्वरूपभूत जें कां स्पष्ट । प्रधानपुरुषांहून उत्कृष्ट । हें अव्यंग चोखट जाणें मी ॥१८॥
अनेक कारणें असती अपर । त्या सर्वांहूनि उत्कृष्टतर । साक्षात् प्रधानपुरुष पर । त्याहूनि परतर तेचि तुम्ही ॥१९॥
कारणांसही कारणभूत । साक्षात् ईश्वर तुम्ही संत । हें मी जाणें इत्थंभूत । शंकारहित होत्साता ॥२०॥
येथ शंका कराल ऐसी । या विश्वाच्या होणयासी । बहुधा कारकें श्रुति प्रशंसी । तियेंही अल्पसीं निरूपितों ॥२१॥
कथितों एका उदाहरणा । सर्व पमेय अवगमें जाणा । विशेष सांगणें सर्वज्ञां । किमर्थ करणें विस्तार ॥२२॥

यत्र येन यतो यस्य यस्मै यद्यद्यथा यदा । स्यादिदं भगवान्साक्षात्प्रधानपुरुषेश्वरः ॥४॥

यत्र म्हणिजे जिये ठायीं । ज्या कृत्यानें आपुल्या बाहीं । जिहीं आउतीं करूनि पाहीं । ज्यापासूनि जें करणें ॥२३॥
ज्याच्या निमित्तें करून । ज्या कारणें संप्रदान । जें जें जैसें प्रयोजन । बहुधा भिन्न कारक हें ॥२४॥
यत्र म्हणिजे कुलालशाळे । येन म्हणिजे ज्या कुलालें । जेणें म्हणिजे गुंडाफळें । परजूनि सकळें घट कीजे ॥२५॥
यतो म्हणिजे पचनास्तव । पाकानिमित्त घट अपूर्व । ग्राहका कारणें दानगौरव । द्रव्यग्रहणें प्रयोजिजे ॥२६॥
यदा म्हणिजे जे जे अवसरीं । यथा म्हणिजे जिया परी । होय ऐसी कारककुसरी । सर्व तुम्हांवरी आरोप हा ॥२७॥
स्वप्नामाजि देखिला घट । एवं तो सर्वकारकाचि सगट । स्वप्नमात्रा एकट । तेंवि तूं वैकुंठ भगवान् ॥२८॥
प्रधानपुरुषांचा ईश्वर । अवघा तूंचि विश्वाकार । उपादान सत्य साचार । हा निर्धार श्रुतिगम्य ॥२९॥
मूळ वास्तव न विकारतां । विपरीतबोधरूपविवर्त्ता । तेथ कारकें जडपदार्था । समान वृथा अवगमनें ॥३०॥
प्रधान म्हणिजे भोग्यप्रकृति । तद्भोक्ता पुरुष चिन्मूर्ति । उभयांची जे ऐक्यस्थिति । तो तूं साक्षात् ईश्वर पैं ॥३१॥
प्रधानपुरुष रामकृष्ण । ऐक्यबोधें एक वचन । श्रीधरस्वामींचें व्याख्यान । अवलोकून उपलविलें ॥३२॥

एतन्नानाविधं विश्वमात्मसृष्टमधोक्षज । आत्मनानुप्रविश्यात्मन्प्राणो जीवो बिभर्ष्यजः ॥५॥

अगा ये अधोक्षजा हरि । एवं ऐसिया प्रकारीं । नानाविध विश्व कुसरी । आपणा माझारी स्वयें रचिलें ॥३३॥
भो भो आत्मया तुवांचि तेथें । आपणा प्रवेशूनियां निरुतें । जन्मरहित जो तूं येथें । भरण पोषण ही करिसी ॥३४॥
जेव्हां निर्मिलें आकाश । तेथ शब्दत्वें अनुप्रवेश । वायूमाजि जैसा स्पर्श । तेजीं प्रकाशरूपत्वें ॥३५॥
जळीं अनुप्रविष्ट रस । महीमाजि गंधविशेष । एवं स्वसृष्टानुप्रवेश । करूनि अशेष चेष्टविसी ॥३६॥
पुण्योगंधः पृथिव्यां च । हा अनुप्रवेश तवोक्त साच । प्राणजीवशक्ति नडनाच । दाविसी संच होत्साता ॥३७॥
क्रियाशक्तिवान तो प्राण । जीव तो ज्ञानशक्तिवान । तैसा होत्साता आपण । धरिसी संपूर्ण तूंचि तूं पैं ॥३८॥
याचें धारण पोषणकर्ता । तूंचि अभिन्न माता पिता । कैसा म्हणसी तरी तत्वता । श्रीअनंता अवधारीं ॥३९॥
पूर्वरूप बोलिजे माता । उत्तररूप म्हणिजे पिता । प्रजासंधि तेथें तत्वता । प्रजनन संधान श्रुति म्हणती ॥४०॥
स्वात्मसृष्टीचिया आभासा । इत्यादि भेद तो कायसा । अभेदद्रष्ट्याचा संकल्प जैसा । तेंवि तूं अशेषा स्फुरणातें ॥४१॥
जरी तूं म्हणसी वासुदेवा । प्राणादिशक्तिनिकर आघवा । त्यासी कारणत्वाचा यावा । तरी कां म्हणावा ईश हेतु ॥४२॥
यदर्थीं ऐकें भो जगदीशा । परमकारण मुख्य ईशा । सर्वात्मकत्वेंचि तिया अशेषा । प्रतिपादिजेल अवधारीं ॥४३॥
प्राणजीवादि विचित्र शक्ति । ते परेशाचीच सत्ता निरुती । दृष्टान्तद्वारा व्याख्यानरीती । भो श्रीपती अवधारीं ॥४४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP