अध्याय ८२ वा - श्लोक १६ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


ततोऽभिवाद्य ते वृद्धान्यविष्ठैरभिवादिताः । स्वागतं कुशलं पृष्ट्वा चक्रुः कृष्णकथा मिथः ॥१६॥

सुहृत्संबंधी नृपवर । करुसृञ्जयादि उशीनर । काम्बोज कैकय मत्स्य भद्र । नंदादि अपर व्रजौकस ॥१८॥
मग ते भूपति परस्परें । सुहृद इष्ट मित्र सोयरे । नमिते जाले वृद्धाचारें । कोण्या प्रकारें तें ऐका ॥१९॥
वयें धाकुटे जे जे होती । तोहीं नमिलें वृद्धां प्रति । समानवयस्यां अळंगिती । ज्येष्ठ गौरविती आशीर्वादें ॥१२०॥
असो नमनाचा प्रकार । स्वागत पुसती त्या नंतर । क्षेमकुशल सह परिवार । पुसोनि अंतर तोषविती ॥२१॥
त्या नंतर ठायीं ठायीं । बैसोनि द्रुमाचे शीतळ सायीं । कृष्णकथा वदती पाहीं । सप्रेम हृदयीं परस्परें ॥२२॥
पुढें त्या कथांचा उल्लेख । महिमा उपसंहारात्मक । नृपातें वदला श्रीशुक । तो नावेक असो आतां ॥२३॥
प्रस्तु कुन्ती स्व माहेरा । वृष्णिभोजादि सात्वत गोत्रा । देखती जाली त्या प्रकारा । सांगे नृपवरा योगीन्द्र ॥२४॥

पृथा भ्रातृन्स्वसृर्वींक्ष्य तत्पुत्रान्पितरावपि । भ्रातृपत्नीर्मुकुन्दं च जहौ संकथया शुचः ॥१७॥

पृथानामक जे कां कुन्ती । जाली स्वजनांतें देखती । बंधु बहिणी तत्संतती । पितरांप्रति आपुलिया ॥१२५॥
चुलते चुलत्या भाऊजया । त्यांच्या प्रजाही अवघिया । रामकृष्णां स्वभाचयां । देखोनि हृदयामाजि द्रवे ॥२६॥
अभिवादनें आलिङ्गनें । यथोचित आशीर्वचनें । स्वागतप्रश्नें श्रमापहरणें । परस्परें स्वजनासी ॥२७॥
सप्रेमभावें सुस्निग्ध गोष्टी । कारुण्यभावें कळवळा पोटीं । तेणें अश्रु नेत्रवाटीं । पडती भूअटं परस्परें ॥२८॥
भेटी जालिया बहुतां दिवसां । यास्तव स्मरोनि अनुभूत क्लेशां । पुसतां सांगतां तिया अशेषा । शोक अपैसा विसर्जिती ॥२९॥
असो परस्परें संवाद । वसुदेवासी कुन्ती विशद । बोलती जाली तो अनुवाद । ऐका सावध क्षणैक ॥१३०॥

कुन्त्युवाच - आर्य भ्रातरहं मन्ये आत्मनमकृताशिषम् । यद्वा आपत्सु मद्वार्त्तां नानुस्मरथ सत्तमाः ॥१८॥

मुन्ती म्हणे भो श्रेष्ठा बंधु । तुम्ही स्नेहाळ कृपासिन्धु । माझेंचि विपरित प्रारब्धु । कायसा शब्द तुम्हांवरी ॥३१॥
माझेचि अपूर्ण मनोरथ । तुम्ही असतां मी अनाथ । महा आपदा मजला प्राप्त । होतां किंचित न स्मरलां ॥३२॥
तुम्ही सर्वदा सत्तम बले । परंतु माझिये संकटवेळे । तुम्हांसि स्मरण नाहीं जालें । अंतर पडलें दुर्दैवें ॥३३॥
पाण्डुरायें परम अगाध । प्रतापें केले अश्वमेध । तैं भूतळींचें विबुध बुध । नमिती मत्पद् श्लाघ्यत्वें ॥३४॥
पुढें आमुचे अदृष्टपाप । तेणें रायासि जाला शाप । मग वनवासीं कष्ट बहुत । भोगिले तप आचरतां ॥१३५॥
पाण्डुराजा स्वर्गा गेला । आम्हां वनवासीं वियोग केला । धर्मभीमार्जुनयमलां । सहित अबळा आक्रंदे ॥३६॥
शोकदावानळीं पडिलें । दुःखउन्हाळां वरपडलें । उभय गोत्रां विघडलें । वोघीं बुडालें कर्माच्या ॥३७॥
तये संकटीं तुमचें स्मरण । करूनि विशेष केलें रुदन । तेणें कळवळोनि मुनिजन । हस्तिनापुरा पावविलें ॥३८॥
तये संकटीं मजलागूनी । स्मरलां नाहीं तुम्ही कोण्ही । ऐसी केवळ दुर्दैवखाणी । तुम्ही असोनी मी जाल्यें ॥३९॥
भीष्मबाह्लिकादिहीं सकळीं । पांचही बाळें आपंगिलीं । पुढें दुर्योधनादिकुटिळीं । विघ्नें रचिलीं पापिष्ठीं ॥१४०॥
भीमा विषप्रळय केला । रात्रीं त्याचा प्राण गेला । पोटीं बांधोनि वज्रशिळा । मग बुडविला गंगाजळीं ॥४१॥
ऐसिया दुःखाचे संकटीं । कीं तुम्हीं ही ऐकिली असेल गोष्ठी । तथापि दैवहीन मी करंटी । म्हणोनि पोटीं न द्रवला ॥४२॥
पांचां पुत्रां सहित मातें । कौरवीं जोहरीं जाळिलें दुश्चितें । तेथ रक्षिलें श्रीभगवंतें । विवरपथें काढूनियां ॥४३॥
विवरपथें पडिलों वनीं । घडल्या अनेक संकटश्रेणी । परि न स्मरतां तुम्ही कोण्ही । अनाथ बहिणी म्हणोनियां ॥४४॥
पुढें द्रौपदीस्वयंवरीं । कौरवांतें कळल्यावरी । कैसे वांचले म्हणती वैरी । म्हणोनि विचारीं प्रवर्तले ॥१४५॥
कपटद्यूतें जिङ्कूनि सकळां । सभे गांजिली द्रुपदबाळा । मायलेंकुरां विघड केला । तैं न स्मरलां तुम्ही आम्हां ॥४६॥
असो ऐसीं कोठवरी । दुःखें स्मरोनि करूं अवसरी । तस्मात पापें होतीं पदरीं । ते सामग्री मज फळली ॥४७॥
उभें ठाकल्या दुरदृष्ट । तैं न स्मरती जिवलग इष्ट । कोण्ही न परिहरिती कष्ट । तेंचि स्पष्ट वदे कुन्ती ॥४८॥

सुहृदो ज्ञातयः पुत्रा भ्रातरः पितरावपि । नानुस्मरन्ति स्वजनं यस्य दैवमदक्षिणम् ॥१९॥

दैवें जेव्हां डावलिलें । तैं कोणाचें कांहीं न चाले । सुहृद आप्त जिवलग भले । ते केतुले ते ठायीं ॥४९॥
सुहृद स्नेहाळ सोयरे ज्ञाती । पुत्र बंधु चुलते किती । मायबापही पारके होती । मा मामे माउसे कोणीकडे ॥१५०॥
स्वजन गणगोत धणीवरी । असोनि कोण्हीही स्मरण न करी । जयाची दैवरेखा पुरी । पाठिमोरी जैं ठाके ॥५१॥
तस्मात माझें विपरीत दैव । तुम्हां कोठूनि येईल कींव । खेद कुन्तीचा परिसोनि सर्व । बोले वसुदेव तें ऐका ॥५२॥

श्रीवसुदेव उवाच - अंब मास्मानसूयेथा दैवक्रीडनकान्नरान् । ईशस्य हि वशे लोकः कुरुते कार्यतेऽथवा ॥२०॥

वसुदेव म्हणे बहिणी ज्येष्ठे । केंवि न झळंबों तुझिया कष्टें । परि आम्हां वोखटिया अदृष्टें । महासंकटें दाखविलीं ॥५३॥
निन्द्य नैष्ठुर्यशब्द आतां । झणें ठेविसी आमुचे माथां । दुरदृष्टें दिधल्या व्यथा । त्या तुज कथितां न सरती ॥५४॥
आम्ही पुतळे नर अशेष । अदृष्टसूत्रें नाचवी ईश । समस्त लोक ईश्वरा वश । करिती करवी तैसें ते ॥१५५॥
तस्मात सर्व लोकां माथां । अदृष्टरूप ईश्वरसत्ता । ते तूं आमुची कर्मकथा । ऐक तत्वता कल्याणी ॥५६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP