इति तच्चिन्तयन्नंतः प्राप्तो निजगृहान्तिकम् । सूर्यानलेंदुसंकाशैर्विमानैः सर्वतो वृतम् ॥२१॥

निजगृहाचे समीपप्रान्तीं । ब्राह्मणें देखूनि अद्भुत दीप्ति । म्हणे कोठूनि चंडदीक्षिति । असंख्यात प्रकटले ॥३७॥
सूर्यप्रभेचीं व्योमयानें । चंद्रकान्तीचीं दिव्य विमानें । पावकप्रख्यें पुष्पकें वहनें । गृहा सभंवती विराजती ॥३८॥
निजगृहाचें ऊर्ध्वभागीं । द्विजें प्रभा हें देखोनि वेगीं । भूतळ सभोंवतें पाहे दृगीं । तंव देखे अवघी सुरलक्ष्मी ॥३९॥

विचित्रोपवनोद्यानैः कूजद्द्विजकुलाकुलैः । प्रोत्फुल्लकुमुदाम्भोकह्लारोत्पलवारिभिः ॥२२॥

विचित्र वनें स्वधामाभवंती । उपवनें उद्यानें शोभती । त्यांमाजी पक्षी अनेकजाती । विराव करिती स्वानंदें ॥१४०॥
तिहींकरूनिं व्याप्त वनें । सदना भंवती विचित्र विपिनें । सरें अमृतोपम जीवनें । भरलीं पूर्णें प्रतिविपिनीं ॥४१॥
प्रकर्षें उत्फुल्ल कुमुदें जळीं । कित्येक सरें नीलोत्पलीं । कित्येक भरलीं रातोत्पळीं । हेमकमळीं कह्लारीं ॥४२॥
त्यांवरी भ्रमरकुळांचीं गानें । उन्मत्त रुंजती मधुपानें । तिहींकरूनि व्याप्त नयनें । देख्लें ब्राह्मणें स्वधाम ॥४३॥
अधोर्ध्वभागीं पाहिलें ऐसें । मध्यभागीं माझारी कैसें । द्विज देखता जाला जैसें । परिसें तैसें परीक्षिती ॥४४॥

जुष्ठं स्वलंकृतैः पुंभिः स्त्रीभिश्च हरिणाक्षिभिः । किमिदं कस्य वा स्थानं कथं तदिदमित्यभूत् ॥२३॥

नगरनारी जैशा अमरी । नवयौवना सालंकारी । विलासरसिका अतिसुंदरी । तेहीं माझारी शोभाढ्य ॥१४५॥
मराळगमना कुरंगनयना । मृगाङ्कवदना सुकुन्दरदना । ज्यांचिया कटाक्षें क्षोभ मदना । होतां कदना वाञ्छितसे ॥४६॥
ऐसिया स्त्रियांहीं सुशोभित । सदन सर्वत्र निषेवित । तेथ पुरुषही सालंकृत । भासती सर्वत्र निर्जरसे ॥४७॥
ऐसें स्त्रीनरनिषेवित । वनीं विमानीं परिवेष्टित । तेजःपुञ्ज अत्यद्भुत । देखोनि विस्मित द्विजवर्य ॥४८॥
ब्राह्मण म्हणे प्रकाशमय । अद्भुत पुढें दिसतें काय । सादर विलोकूनि जों पाहे । तंव विमाननिचय नभीं देखे ॥४९॥
म्हणे देवेन्द्राची अमरावती । कीं अनळाची ज्योतिष्मती । कीं भास्करीची भास्करद्युती । यमसंयमनी हें न कळे ॥१५०॥
कीं निरृतीची नैरृत्यधानी । किंवा वरुणाची वारुणी । भासे परिवेष्टित विमानीं । जेंवि पावनी वचनाची ॥५१॥
कीं धनदाची अलकावती । कीं ईशानाची सद्योजाती । कीं विष्णूची ऐश्वर्यशक्ती । विमानपंक्तिमंडित हे ॥५२॥
ऐसा विस्मयें वितर्क करी । स्थान कोणाचें हें निर्धारी । विवरूनि पाहतां अभ्यंतरीं । म्हणे नसती भूवरी सुरभुवनें ॥५३॥
विचित्र उद्यानें उपवनें । सरोवरें पूर्ण जीवनें । लक्षूनि पुढती वितर्क मनें । केला ब्राह्मण हृत्कमळीं ॥५४॥
म्हणे हें अश्वावतीचें तीर । पश्चिमभागीं रत्नाकर । एवं माझेंचि हें मंदिर । परि प्रकाशप्रचुर केंवि दिसे ॥१५५॥
तेजःपुंज इये वेळे । कैसेनि जालें हें मज न कळे । ब्राह्मण पाहे उघडूनि डोळे । तें भूपाळें परीसिजे ॥५६॥

एवं मीमांसमानं तं नरा नार्योऽमरप्रभाः । प्रत्यगृह्णन्महाभागं गीतवाद्येन भूयसा ॥२४॥

ऐसा विचार करी ब्राह्मण । त्यातें नगरवासी जन । दिव्यनरनारीगण । घेऊनि उपायन पुढें आला ॥५७॥
वाणी सोवाणी सोनार । वसनक्रयी माल्यकार । धान्यक्रयी रंगकार । शिल्पिक कांसार तंतुवाय ॥५८॥
ऐशा अनेक वार्धुषपंक्ति । उपायनें घेऊनि हातीं । तौर्यत्रिकेंसीं द्विजाप्रति । येऊनि नमिती उल्लासें ॥५९॥
समस्त म्हणती भो भो द्विजा । आम्ही अवघिया तुझ्या प्रजा । आमुचें पालन बरवे वोजा । महाराजा तां कीजे ॥१६०॥
दिव्य वस्त्रें लेवविती । दिव्याभरणें अळंकारिती । उपायनें समर्पिती । एक वोळगती दासत्वें ॥६१॥
पादत्राणें करिती पुढां । म्हणती शिबिकायानीं आरूढा । एक म्हणती रथ गज घोडा । बैसोनि प्रवेशा निजनगरीं ॥६२॥
अमरासमान देदीप्यमान कान्ति । ऐसिया नरनारींच्या पंक्ति । ब्राह्मणातें सप्रेम भक्ति । पूजोनि स्तविती उच्चस्वरें ॥६३॥
तंव येरीकडे द्विजाची पत्नी । ब्राह्मणागमन ऐकूनि श्रवणीं । मंदिरापासूनि तत्क्षणीं । येती जाली तें ऐका ॥६४॥

पतिमागतमाकर्न्य पत्न्युद्धर्षातिसम्भ्रमा । निश्चक्राम गृहात्तूर्ण रूपिणी श्रीरिवालयात् ॥२५॥

साध्वी पतिव्रता ब्राह्मणी । एकीं घातलें तिच्या श्रवणीं । तुझा कान्त द्वारकेहूनी । आला भेटूनी कृष्णातें ॥१६५॥
ऐकूनि पतीचें आगमन । उत्कंठ हर्षें सतीचें मन । कोंदाटलें मग अभिगमन । करिती जाली सप्रेमें ॥६६॥
विराजमान वस्त्राभरणीं । नवयौवना सुभगा तरुणी । साध्वी पतिव्रता सद्गुणी । अपर इंद्राणीसम गमली ॥६७॥
कमलकानन कमलालय । तेथूनि सुरश्री प्रकट होय । तेंवि ब्राह्मणी आत्मनिलय । सोडूनि लवलाहे पातली ॥६८॥
पूर्वीं क्षुत्क्षुमा कुचैल कृशा । तेचि सुरश्रीसम रूपसा । होती जाहली द्वारकाधीशा । प्रसादलेशापासूनी ॥६९॥
मराळगामिनी वेगें करून । कान्तासमीप स्वयें येऊन । नमिती जाली आत्मरमण । तें व्याख्यान अवधारा ॥१७०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP