गदायां सन्निवृत्तायां शाल्वस्त्वंतरधीयत । ततो मुहूर्त्त आगत्य पुरुषः शिरसाऽच्युतम् ॥२१॥

गदाघाताची मूर्च्छना गेली । शरीरीं स्मृति प्रकटती जाली । मयकृतमाया अवलंबिली । अगोचर केली सौभप्रभा ॥६॥
गगनीं हरपे गंधर्वनगर । तेंवि लोपलें सौभपुर । ऐसा लोटतां मुहूर्त मात्र । कपट विचित्र प्रकटिलें ॥७॥
मुहूर्तमात्र क्रमल्या वरी । पुरुष एक पातला समरीं । जेणें नमस्कारूनि हरी । बोले उत्तरीं तें ऐका ॥८॥

देवक्या प्रहितोऽस्मीति नत्वा प्राह वचो रुदन् । कृष्ण कृष्ण महाबाहो पिता ते पितृवत्सल ॥२२॥

दूत म्हणे भो भगवंतो । देवकीनें मी धाडिलों आतां । तिणें कथिलें त्या वृत्तान्ता । ऐका तत्वता निवेदितों ॥९॥
ग्लानिवदनें दूत रडत । रडूनि कथी वर्तली मात । टपटपा अश्रु भूतळीं पडत । स्फुंदे वृत्तान्त निवेदितां ॥११०॥
कृष्ण कृष्ण या वीप्सावचनीं । संबोधिलें तुज पावूनि ग्लानी । महाबाहो चक्रपाणी । नेला दुर्ज्जनीं तव जनक ॥११॥
पितृवत्सल तूं पितृभक्त । असतां वर्तला हा आकान्त । परिवार आक्रंदे समस्त । जालों अनाथ म्हणोनियां ॥१२॥
कैसा नेला कोणें पिता । ऐसें पुससीं जरी तत्त्वता । त्याही कथितों तुज वृत्तान्ता । श्रीभगवंता अवधारीं ॥१३॥

बद्ध्वाऽपनीतः शाल्वेन सैनिकेन यथा पशुः । निशम्य विप्रियं कृष्णो मानुषीं प्रकृतिं गतः ॥२३॥
विमनस्को घृणीस्नेहाब्दाभाषे प्राकृतो यथा ॥२४॥

बळेंचि शाल्वें येऊनि सदनीं । दृढतर तव पिता बांधोनी । पशुहिंसक पशू लागूनि । उदित हननीं ने जैसा ॥१४॥
अंगदभूषास्थानीं दृढ । बांधिले पृष्ठभागीं दौर्दंड । पुधें वोढूनि मागें दंड । ताडी उदंड निष्ठुरता ॥११५॥
ऐसा नेला तुझा पिता । जेंवि पशूतें पशुहंता । इतकिया देवकीच्या वृत्तान्ता । तुज भगवंता म्यां कथिलें ॥१६॥
दूतमुखींची अशुभ वार्ता । ऐकूनि सदया श्रीकृष्णनाथा । मोहें जाकळिलें तत्त्वता । सर्वज्ञता विसरविली ॥१७॥
घेतली मनुष्याची अवगणी । तदनुसार अंतःकरणीं । जाली मोहाची झळंबणी । पडिला करणी चाकाट ॥१८॥
प्राकृत जैसा पितृग्लानी । देखोनि दुःख पावे मनीं । तैसा स्नेहाळ चक्रपाणी । विमनस्क होऊनी काय वदे ॥१९॥

कथं राममसंभांत जित्वाऽजेयं सुरासुरैः । शाल्वेनाल्पीयसा नीतः पिता मे बलवान्विधिः ॥२४॥

राम सावध प्रतापतेजें । सुरासुरां जिंकिला न वजे । शाल्वें त्यासि जिंकूनि पैजे । क्लीबत्वलाजे भेटविलें ॥१२०॥
त्रिजगज्जेता प्रतापशाली । तो बळराम असतां जवळी । शाल्वें अल्पकें केंवि धुमाळी । केली ये काळीं मज न कळे ॥२१॥
कैसी बळिष्ठ अदृष्टरेखा । शाल्वें काळिमा लाविली मुखा । जनका बांधूनि दिधलें दुःखा । अश्लाघ्य लोकांमाजि केलें ॥२२॥
दूता मुखींच्या ऐकूनि गोठी । पितृमोहें सदय पोटीं । अंतरीं द्रवूनियां कटकटीं । तंव शाल्व कपटी पुढें प्रकटे ॥२३॥

इति ब्रुवाणे गोविंदे सौभराट् प्रत्युपस्थितः । वसुदेवमिवानीय कृष्णं चेदमुवाच सः ॥२५॥

आपण आपणया माझारी । रसरसूनि अभ्यंतरीं । ऐसें बोलत असतां हरी । तंव ससौभ वैरी पुढें आला ॥२४॥
सन्मुख येऊनि कृष्णाप्रति । आणूनि वसुदेवाकृति । दूत वदला ज्या ज्या उक्ति । त्या त्या प्रतीती आणावया ॥१२५॥
पाठिमोरे बांधूनि बाहु । सन्मुख मायामय वसुदेव । आणूनि कृष्णाप्रति तो शाल्व । बोले लाघव दावूनि ॥२६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP