इत्युक्तश्चोदयामास रथमास्थाय दारुकः । विशन्तं ददृशुः सर्वे स्वे परे चारुणानुजम् ॥११॥

ऐसा बोलिला असतां सूत । मनोजवें तो प्रेरूनि रथ । नेतां जाला रुक्मिणीकान्त । स्वपर समस्त विलोकिती ॥६२॥
फोडूनि उभय सेनेची फळी । रहंवर रिघतां शाल्वा जवळी । स्वपर सैनिक महाबळी । देखती ते काळीं खगकेतु ॥६३॥
ध्वजीं तेजस्वी अरुणानुज । उभयदळींचे वीरराज । त्यांतें देखूनि प्रतापपुज्ज । म्हणती अधोक्षज पातला ॥६४॥
आला जाणूनि यदुनायक । यदुचक्रातें जाला हरिख । शंका पावले शाल्वप्रमुख । ऐका सम्यक संगर तो ॥६५॥

शाल्वश्च कृष्णमालोक्य हतप्रायबलेश्वरः । प्राहरत्कॄष्णसूताय शक्तिं भीमरवां मृधे ॥१२॥

यादवीं मारिलें ज्याचें सैन्य । तो हतसैन्येश्वर शाल्व पूर्ण । श्रीकृष्णातें अवलोकून । मनीं क्षोभून प्रज्वळला ॥६६॥
दारुकावरी शक्तिप्रहार । समरीं केला भयंकर । जये शक्तीचा घोर गजर । गमे भीकर भूतांतें ॥६७॥

तामापतन्तीं नभसि महोल्कामिव रंहसा । भासयन्तीं दिशः शौरिः सायकैः शतधाच्छिनत् ॥१३॥

प्रचंड शाल्वप्रेरित शक्ति । वेगीं व्यापूनि गगना प्रति । उल्का पडे महोत्पातीं । तेंवि सारथी लक्षूनी ॥६८॥
गगनींहूनि अवचिती पडतां । दिशा केल्या स्वतेजोरहिता । तीतें देखूनि मन्मथजनिता । करिता झाला शत खंडें ॥६९॥
शार्ङ्गनिर्मुक्त शरें करून । शक्ति शतधा विखंडून । सिंहनादें करी गर्जन । शाल्व लक्षून समरंगीं ॥७०॥

तं च षोडशभिर्विध्द्वा बाणैः सौभं च खे भ्रमत् । अविद्ध्यच्छरसंदोहैः खं सूर्य इव रश्मिभिः ॥१४॥

षोडशशरें विन्धिला शाल्व । सुर नर मानिती हें अपूर्व । शाल्वा आंगीं सौभगर्व । झाडिला सर्व ते काळीं ॥७१॥
मयमायाकृत अभेद्य सौभ । तरळ तमोमय आक्रमी नभ । भ्रमतां देखूनि पंकजनाभ । भेदी स्वयंभ शरजाळें ॥७२॥
रत्नजडित सुवर्णपुङ्ख । कृष्णमार्गण अत्यंत तीख । सौभा भेदले ते लखलख । अर्कमयूखसम गमती ॥७३॥
सौभ तमोमय जैसें गगन । अर्का समान रथस्थ कृष्ण । दशदिग्भागीं पसरले बाण । रश्मिसमान गमती ते ॥७४॥
सौभ नभोगर्भीं दे भंवरी । लक्षूनि श्रीकृष्ण त्या शर मारी । ते भासती किरणांपरी । भासे मुरारे भास्करवत् ॥७५॥
ससौभ शाल्वा ऐसिये परी । कृष्णें केली अपांपरी । या वरी शाल्व काय करी । तें अवधारीं कुरुवर्या ॥७६॥

शाल्वः शौरेस्तु दोः सव्यं सशांर्ङ्गशार्ङ्गधन्वनः । बिभेद न्यपतद्धस्ताच्चार्ङमासीत्तदद्भुतम् ॥१५॥

शार्ङ्गधन्वा जो कां शौरी । त्याचा सव्य बाहु प्रहारीं । सौभ लोटूनि भेदितां शरीं । पडिलें भूवरी शार्ङ्गधनु ॥७७॥
शाल्वें भेदितां सव्य भुज । हस्तौनि शार्ङ गळालें सहज । तेणें थरारला अधोक्षज । मानिती चोज सुर नर पैं ॥७८॥
सव्य म्हणिजे डावा पाणी । शार्ङ्गें सहित भेदितां बाणीं । शार्ङ्ग निष्टलें मुष्टीहुनी । दृष्टी देखूनी अद्भुत तें ॥७९॥

N/A

References : N/A
Last Updated : June 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP