देवासुरमनुष्याणां गंधर्वोरगरक्षसाम् । अभेद्यं कामगं वव्रे स यानं वृष्णिभीषणम् ॥६॥

प्रसन्न जाणोनियां पशुपति । अभीष्ट याची तो शाल्व नृपति । वृष्णिप्रमुखयादवांप्रति । भयाची प्राप्ति ज्या यानें ॥३८॥
कामग म्हणिजे इच्छिल्या ठाया । ज्या यानावरी आरूढोनियां । सामर्थ्य सैन्येंसीं जावया । कैलासराया मज दे तें ॥३९॥
मनुष्य अथवा असुर देव । उरग राक्षसगण गंधर्व । भूत प्रेत पिशाचें सर्व । अभेद्य अपूर्व जें यांसी ॥४०॥
इन्द्रादिकांच्या वज्रप्रहारीं । भंगिलें न वचे जें कां समरीं । असुरविद्या मायिकांस्त्रीं । घायीं कठोरीं न भेदवे ॥४१॥
जें न भेदवे महाराक्षसां । न जळे महासर्पाच्या विषा । भूतप्रेतांची कोण दशा । जें अभेद्य मनुष्यगंधर्वां ॥४२॥
जयाची गति लोकत्रयीं । सवेग जाय चिन्तले ठायीं । वृष्णियादवां भयंकर पाहीं । तें यान देईं मज शंभो ॥४३॥
ऐसा शान्वें याचितां वर । तथास्तु म्हणे गिरिजावर । मय असुरांचा शिल्पकार । त्यातें शंकर आज्ञापी ॥४४॥

तथेति गिरिशादिष्टो मयः परपुरंजयः । पुरं निर्माय शलवाय प्रादात्सौभमयस्मयम् ॥७॥

परदुर्गाचा करी जय । यास्तव तो परपुरंजय । सौभनामक त्रिपुरप्राय । निर्मी लोहमय पुर अपर ॥४५॥
शिवाज्ञेनें शाल्वाप्रति । मयें अर्पिलें कथूनि युक्ति । शाल्वा होतां सौभप्राप्ति । खवळे दुर्मति तो ऐका ॥४६॥

स लब्ध्वा कामगं यानं तमोधाम दुरासदम् । ययौ द्वारवतीं शाल्वो वैरं कृष्णकृतं स्मरन् ॥८॥

जैसें याचिलें शिवाप्रति । तैसीच झाली सौभप्राप्ति । स्मरतां अप्राप्य अपरांप्रति । ते यानसंपत्ति लाहूनि ॥४७॥
गगनगामी कामगयान । चिन्तिल्या स्थळा करी प्रयाण । कामनारूप जें विस्तीर्ण । ज्याचा वर्ण शर्वरवत् ॥४८॥
नभान्तींची कुभुतमिस्रा । जैसी घनदाट शर्वरप्रचुरा । तेंवि ज्याचा सान्निध्यवारा । करी नरसुरां अंधवत् ॥४९॥
अंधकाराचें अधिष्ठान । जें झांकोळी भास्करनयन । तेथ इतरांचा पाड कोण । संक्रंदनही अदेखणा ॥५०॥
तें सौभ लाहूनि शाल्वरायें । सवेग पातला द्वारावतीये । रुक्मिणीस्वयंवरींचा डाय । कृष्ण दुर्जय जिणावया ॥५१॥
रुक्मिणीस्वयंवरीं पराभविलें । हृदयशल्य तें गुल्म झालें । म्हणोनि शंकरा आराधिलें । सौभ याचिलें ज्यासाठीं ॥५२॥
या कृष्णातें यादवांसहित । निर्दाळीन हा स्मरोनि हेत । द्वारावतीये आला त्वरित । अपरकृतान्तसम भासे ॥५३॥
द्वारकेमाजि नसतां हरी । दुष्टें येऊनि रोधिली पुरी । प्रजा घातल्या महाघोरीं । तें अवधारीं कुरुवर्या ॥५४॥

निरुध्य सेनया शलवो महत्या भरतर्षभ । पुरी बभंजोपवनान्युद्यानानि च सर्वशः ॥९॥

महती म्हणिजे प्रचंड सेना । सहित वळंघूनि कामगयाना । द्वारका रोधूनि वनोपवना । करी उद्याना विध्वंस ॥५५॥
भरतकुळामाजि गहन । यास्तव भरतर्षभ म्हणोन । नपा संबोधी व्यासनंदन । शाल्वदौर्जन्य परिसावया ॥५६॥
प्रचंड सेनेच्या संभारीं । शाल्वें रोधिली द्वारकापुरी । केली वनोपवना बोहरी । दुःखें नगरी आक्रंदें ॥५७॥
अलकावती अमरावती । आर्चिष्मती वरुणावती । पारमेष्ठ्यादि कैलासप्रान्तीं । अमोघयाति तरुवर जे ॥५८॥
विश्वकर्म्यानें ते तरुवर । द्वारके आणूनि ते सविस्तर । वनें उपवनें पृथगाकार । निर्मिलीं सुखकर सर्वांसी ॥५९॥
जया वनांमाजि वृक्षीं । अगाधसुकृतीं होऊनि पक्षी । म्हणती हें सुख नाहीं मोक्षीं । जें येथ फळ पक्षीं पाविजे ॥६०॥
जया तरुवरांचिये छाये । बैसतां अजरामरत्व काये । लाहोनि म्हणती कैवल्य काय । विशेष होय शर्मद पैं ॥६१॥
ऐसीं वनें सुरवरसेव्यें । परमरमणीये केवळ दिव्यें । ज्यांचा महिमा सजीवकाव्यें । जाणोनि वास्तव्यें वसविती तें ॥६२॥
तियें वनें खंडिलीं दुष्टीं । नगरीमाजी जनपद कष्टी । निर्घृण करिती शस्त्रवृष्टि । तेणें सृष्टिप्रळय गमे ॥६३॥

सगोपुराणि द्वाराणि प्रासादाट्टालतोलिकाः । विहारान्स विमानाग्र्यान्निपेतुः शस्त्रवृष्टयः ॥१०॥

तो जो शाल्व दुर्मति क्रूर । स्मरोनि पूर्वील पराजयवैर । दांत खाऊनियां करकर । करी प्रहार पुरवप्रीं ॥६४॥
गोपुरें म्हणिजे पुरद्वारें । त्रयोदश खणांची उच्चतरें । दुष्ट भंगिती शस्त्रास्त्रप्रहारें । अग्नियंत्रें प्रेरूनि ॥६५॥
माडिया भंगिती उच्चतरा । प्रासाद पवळिया दुर्गाकारा । अट्टालिया दामोदरा । यंत्रप्रहारा करिताती ॥६६॥
माडियांच्या सुरत्न भिन्ती । उंच बैठका सांगों किती । क्रीडास्थानें भंगताती । परमनिघातीं यंत्रांच्या ॥६७॥
सौभनामक लोहपुर । गगनगर्भी चंचलतर । तेथून करिती वज्रप्रहार । भंगिती नगर कृष्णाचें ॥६८॥
मेघा आडूनि रावणसुत । वानरसैन्या करी घात । तैसाचि शाल्व द्वारके आंत । शस्त्रजीमूत वर्षतसे ॥६९॥
गगनौनि पडती पर्जन्यधारा । सौभापासूनि शस्त्रमारा । द्वारकेमाजी नारीनरां । दिव्यमंदिरां भंग करी ॥७०॥
आसुरी प्रयोगजनित विद्या । घोराभिचारकपटसाध्या । त्या मायामयवृष्टि विविधा । परिसा निन्द्या शाल्वाचिया ॥७१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP