अध्याय ७४ वा - श्लोक ५१ ते ५४

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


राजसूयावभृथेय स्नातो राजा युधिष्ठिरः । ब्रह्मश्रत्रसभामध्ये शुशुभे सुरराडिव ॥५१॥

राजसूयमख संपूर्ण । धर्में करूनि अवभृथस्थान । सभास्थानीं देदीप्यमान । इंद्रसमान विराजला ॥८४॥
दीक्षिता ब्राह्मणांमाजि श्रेष्ठ । प्रतापें क्षत्रियांमाजि वरिष्ठ । भद्रपीठासनीं उपविष्ट । शोभे त्रिविटपपति जैसा ॥४८५॥

राज्ञा सभाजिताः सर्वे सुरमानवखेचराः । कृष्णं ऋतुं च शंसंतः स्वधामानि ययुर्मुदा ॥५२॥

अवभृथानंतर सभास्थानीं । कुळशिळशौर्यगुणी । राजे पूजिले बहुसम्मानीं । वस्त्राभरणीं यथोचित ॥८६॥
यज्ञा पातले अमरवर । धर्में अर्चिले ते समग्र । सर्ववर्णात्मक मानव अपर । यथोपचारें गौरविले ॥८७॥
सुर भूसर खेचर नृपती । अपर मानव समस्त याती । धर्में पूजिले संतुष्टमनी । स्वधामा जाती पुसोनियां ॥८८॥
स्वधामा जातां पृथगाकर । म्हणती धन्य युधिष्ठिर । धन्य राजसूय अध्वर । धन्य श्रीधर अभिगोप्ता ॥८९॥
निर्विघ्न राजसूय संपला । ऐसा नाहींच कैं ऐकिला । अथवा भावी आणिकांला । न वचे केला भूचक्रीं ॥४९०॥
धर्मयज्ञाची साङ्गता । स्वमुखें वर्णूं न शके धाता । जेथ उच्छिष्टें रमाभर्ता । काधी तत्त्वता स्वानंदें ॥९१॥
एक म्हणती सर्वकृत्य । कृष्णें साधिलें अतंद्रित । पाण्डवस्नेहें सप्रेमभरित । करी नृत्य तत्सदनीं ॥९२॥
एरवीं एथ महाघोर । विघ्नें उदेलीं होतीं थोर । रक्षिता सधर कमलावर । म्हणोन अध्वरवर झाला ॥९३॥
विप्रवेशें अतिथिवेळे । मागध छळिला याञ्चाछळें । भीमहस्तें तो घननीळें । द्वंद्वयुद्धीं निर्दळिला ॥९४॥
मागधबंदीचे सुटले नृपति । अनुकूळ झाले धर्माप्रति । भूमंडळींच्या सर्व संपत्ति । आणिल्या श्रीपतीप्रतापें ॥४९५॥
अग्रपूजेचिया काळीं । निन्दिला शिशुपाळें वनमाळी । कृष्णें त्याचा छेदिला मौळी । दुष्ट हृत्कमळीं भंगले ॥९६॥
ऐसीं विघ्नें भंगिलीं कृष्णें । मखेन्द्र सिद्धी गेला तेणें । एक म्हणती पूर्वपुण्यें । धर्माचिया हें घडलें ॥९७॥
धर्म भक्तिप्रेमाथिला । म्हणोनि कृष्ण सेवक झाला । राजसूय सिद्धी नेला । आनंद केला त्रिजगातें ॥९८॥
धर्माचिया यज्ञेंकरून । लोकत्रयीं कृतकल्याण । एका दुर्योधनावांचून । आब्रह्मभुवन संतुष्ट ॥९९॥

दुर्योधनमृते पापं कलिं कुरुकुलामयम् । यो न सेहे श्रियं स्फीतां दृष्ट्वा पांडुसुतस्य ताम् ॥५३॥

पापराशि दुर्योधन । जो कलीचा अवतार पूर्ण । कुरुकुळासी क्षयकारण । रोग निर्वाण केवळ जो ॥५००॥
रोगें क्षीण होय शरीर । तेंवि कुरुकुळा जो क्षयकर । तया दुर्योधनाविण इतर । त्रिजग समग्र संतुष्ट ॥१॥
युधिष्ठिर जो पाण्डुसुत । झाला साम्राज्यपट्टाभिषिक्त । त्याची लक्ष्मी परमोर्जित । जळे पाहून जो पोटीं ॥२॥
तो एक दुर्योधन वेगळा । करूनि उत्साह त्रिजगीं सफळां । धर्माध्वरें कौरवकुळा । वरिती झाली यशोलक्ष्मी ॥३॥
यावरी म्हणे शुक सर्वज्ञ । हा इतिहास जे करिती श्रवण । ऐका तयांचें महिमान । निश्चळ मन करूनियां ॥४॥

य इदं कीर्तयेद्विष्णोः कर्म चैद्यवधादिकम् । राज्ञां मोक्षं वितानं च सर्वपापैः प्रमुच्यते ॥५४॥

जो हें विष्णूचें कर्म विशद । जैसा केला चैद्यवध । आदिशब्दें खळ मागध । वधिला द्वंद्वसमरंगीं ॥५०५॥
आणि नृपांचें विमोक्षण । राजसूयमखसाधन । भावें करील संकीर्तन । पापापासून तो सुटला ॥६॥
अनंतमहापापांच्या राशी । भस्म होती या इतिहासीं । कीर्तन करितां सद्भावेंशीं । पावे मुक्तीशीं चैद्यवत ॥७॥
विशेष आराधनप्रेमें । युधिष्ठिरासम मेघश्यामें । महासंकटें पूर्णकामें । स्नेहसंभ्रमें रक्षिजे ॥८॥
आराधक तो युधिष्ठिर । विभोक्तभक्त चैद्येश्वर । द्विविध भजनें परमेश्वर । भजतां मोक्षद तें कथिलें ॥९॥
ऐसें श्रीकृष्णचरित्र । पथन करील ज्याचें वक्त्र । अथवा ऐकती ज्यांचें श्रोत्र । कैवल्यपात्र ते होती ॥५१०॥
तें हें श्रीमद्भागवत । अठरा सहस्र श्रुतिनिर्मथित । श्रोता परीक्षिति नृपनाथ । वक्ता समर्थ शुक योगी ॥११॥
तयामाजी दशमस्कंधीं । धर्माध्वरीं नृपसंसदीं । मागध चैद्य वधिले दंदी । कथा सुमंदी ते कथिली ॥१२॥
इचिया श्रवणीं पठनीं मननीं । कैवल्य पाविजे श्रोतृजनीं । फलादेश हा बादरायणि । नृपालागुनी प्रशंसी ॥१३॥
ब्रह्मनिष्ठां अग्रगणी । तो श्रीएकनाथ प्रतिष्ठानीं । चिदानंदें स्वानंदभुवनीं । भद्रासनीं विराजला ॥१४॥
स्वानंदकृपासंभव चांग । गोविन्दपादप्रभवगाङ्ग । दयार्णवीं तें भरलें साङ्ग । कृपापांगें प्रभूचिया ॥५१५॥
तें हें कथामृत जे घेती । विष्णुभुवनीं ते विराजती । यालागीं अत्यादरें तें श्रोतीं । सेवूनि श्रीपति वश कीजे ॥१६॥
पुढले अध्यायीं इतिहास । सिंहावलोकनें गतकथेस । प्रश्न करितां कुरुनृपास । शुक अशेष निरोपील ॥१७॥
तें आख्यान वक्ष्यमाण । पंचसप्ततितमीं जाण । श्रोतीं सावध कीजे श्रवण । भवभंजन करावया ॥५१८॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे अष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संदितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्नवानुचरविरचितायां चैद्यवधादिराजसूयकथनं नाम चतुःसप्ततितमोऽध्यायः ॥७४॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥५६॥ ओवी संख्या ॥५७४॥ एवं संख्या ॥५७४॥ ( चौर्‍याहत्तरावा अध्याय मिळून ओवी संख्या ३४२०५ )

कालयुक्ताब्दिके कृष्णें माधवे द्वादशी दिने । पिपीलिकायां संख्यातं राजसूयमखादिकम् ॥१॥

चौर्‍याहत्तरावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP