अध्याय ७४ वा - श्लोक ४१ ते ४५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


ततः पांडुसुताः क्रुद्धा मत्स्यसृंजयकैकयाः । उदायुधाः समुत्तस्थुः शिशुपालजिघांसवः ॥४१॥

महाभारतीं सविस्तर । चैद्यनिन्देचा प्रकार । येथ श्रीशुक संक्षेपमात्र । वदला अवसर जाणोनी ॥९८॥
सदस्यांप्रति एसिया परी । वदली चैद्याची वैखरी । त्यापरी धर्म निन्द्योत्तरीं । निर्भर्त्सिला बहुसाळ ॥९९॥
धर्में क्षमा करूनि तितुके । चैद्या सान्तवितां निजमुखें । तैलें शिंपिलिया पावकें । क्षोभिजे तेंवि तो प्रज्वळिला ॥४००॥
तेथ भीष्में वारिलें धर्मा । कायसें सान्त्वन पामरा अधमा । पंचत्वाची भरली सीमा । सन्निपातभ्रमास्तव बरळे ॥१॥
हें ऐकोनि भीष्माप्रति । निन्दता झाला चैद्य दुर्मति । राजे क्षोभवूनि स्वपक्षपाती । दुष्ट निघातीं उठावला ॥२॥
सदस्यंचें निर्भर्त्सन । श्रीकृष्णाचें निन्दाकथन । युधिष्ठिराचें प्रहेलन । भीष्मगर्हण ऐकोनी ॥३॥
भीमें पडताळितां गदा । वधावया निन्दिका चैद्या । तैं त्या भीष्में वॄत्तान्त समुदा । चैद्यवधाचा प्रकटविला ॥४॥
साक्षात वसुदेवाची भगिनी । दमघोषाची मुख्य राणी । प्रसवली शिशुपाळालागुनी । तैं हा दुश्चिह्नीं जन्मला ॥४०५॥
चतुर्भुज ललाटेक्षण । भुङ्कें रासभस्वनें करून । सर्वीं मानूनियां दुश्चिह्न । म्हणती कल्याणकर नोहे ॥६॥
याचिया त्यागाप्रति उदित । जाले असतां अकस्मात । गगनवाणी वदली तेथ । गूढ वृत्तान्त प्रकटार्थें ॥७॥
त्यागूं नका या आत्मजा । हा होईल प्रतापी आजा । ज्याच्या दर्शनें भाळाक्ष भुजा । लोपती तो या मारील ॥८॥
ऐसी ऐकूनि गगनवाणी । तोषले मंत्री राव राणी । भूपाळ पहावया लागूनी । येतां ओपिती सुत त्यांपें ॥९॥
भूप भूतळींचे समस्त । स्पर्शिंतां नेत्र भुजा गुप्त । नव्हती त्यातें द्वारकानाथ । शिवतां लुप्त कर नयन ॥४१०॥
तये काळीं याची जनने । कृष्णा प्रार्थीं करुणावचनीं । मत्पुत्राचे अपराध सोसुनी । याचे हननीं न प्रवर्तें ॥११॥
ऐकोनि बोले श्रीभगवंत । कायसी अपराधाची मात । क्षमा करीन शतपर्यंत । चिन्तारहित तूं राहें ॥१२॥
ऐसें ऐकूनि अच्युतवचन । तिनें मानिलें समाधान । ते मर्यादा जाली पूर्ण । पावेल हनन हरिहस्तें ॥१३॥
ऐकूनि भीष्माची वैखरी । पुढती शिशुपाळ निन्दी हरी । म्हणे रुक्मिणी स्वयंवरीं । मज नेमिली तां हरिली ॥१४॥
जननीजनकें बंधुवर्गीं । मातें अर्पिली जे शुभाङ्गी । मनें कवळिली तत्प्रसंगीं ।  मग ते वेगीं तां नेली ॥४१५॥
ऐशीं शतशः निन्द्य वचनें । स्त्रीनिन्देचे न येती तुलने । निन्दा ऐकोनि पाण्डव मनें । क्षोभलेपणें उठावले ॥१६॥
सभापर्वींची संक्षेपसूचना । सूचिली ते श्रोतृजना । श्रवण करितां शंका मना । माजि कोण्हा न वसावी ॥१७॥
कृष्णानिन्दा ऐकूनि कानीं । पाण्डवां क्रोध न धरे मनीं । भीमार्जुन माद्रेय दोन्ही । आयुधें परजूनि उठावले ॥१८॥
पाण्डवांचा क्रूरावेश । देखोनि राजयां न धरवे रोष । कृष्णपक्षीं जे नृप अशेष । खङ्ग विकोश तिहीं केले ॥१९॥
मत्स्यराजे विराटप्रमुख । कैकय संतर्द्दनादिक । सृंजयादि नृप अनेक । चैद्य सन्मुख उठावले ॥४२०॥
कृष्णनिन्देचिया श्रवणीं । हेंचि प्रायाश्चित्त या क्षणीं । जे निन्दकाची प्राणहानी । समरांगणीं करावी ॥२१॥
म्हणोनि उठिले उदायुध । वधावया निन्दक चैद्य । तंव तो शिशुपाळ दुर्मद । झाला सनद्ध समरंगा ॥२२॥

ततश्चैद्यस्त्वसंभ्रांतो जगृहे खङ्गचर्मणी । भर्त्सयन्कृष्णपक्षीयान्राज्ञः सदसि भारत ॥४२॥

श्रीकृष्णाचे पक्षीय नृपति । त्यांची देखोनि आवेशवृत्ति । त्यांवरी चैद्य प्रतापमूर्ति । उठ्ला निगुती साटोपें ॥२३॥
सदस्यसभेमाजि तयां । मुखें निर्भर्त्सी कृष्णपक्षीयां । खङ्गखेटक घेऊनियां । आसन मांडूनि ठाकला ॥२४॥
चैद्या पाण्डवां समरांगणीं । निकरें व्हावी खणाखणी । तंव श्रीकृष्ण अंतःकरणीं । पाहे विवरूनि सर्वज्ञ ॥४२५॥
जय विजय हे द्वारपाळ । मद्वरें विरोधभजनशीळ । हिरण्याक्ष हिरण्यकशिपु प्रबळ । दैत्य केवळ पूर्वभवीं ॥२६॥
द्वितीयजन्मीं हे निर्घृण । राक्षस रावण कुंभकर्ण । तृतीय जन्मीं नृप होऊन । जन्मले शिशुपाळ वक्रदंत ॥२७॥
मद्वरें मत्तुल्य हे मम द्वास्थ । तो हा चैद्य निजमोक्षार्थ । क्षोभें उठला येथ । मारील समस्त नृपचक्रा ॥२८॥
ऐसें विवरूनि नारायण । चैद्यनृपवरां न घडे रण । तंव उठिला त्वरा करून । निवारूनियां नृपचक्रा ॥२९॥

तावदुत्थाय भगवान्स्वान्निवार्य स्वयं रुषा । शिरः क्षुरांतचक्रेण जहारापततो रिपोः ॥४३॥

स्वकीय वारूनि प्रतापतेजें । स्वस्थ केले स्वपक्षीय राजे । क्रोधेंकरूनि अधोक्षजें । चैद्य ओजें आमंत्रिला ॥४३०॥
अरे रे चैद्या दुष्टा दुर्मती । तोंडें अचागळी बोलसी किती । मम पूजेची तुजला खंती । तरी घेईं निगुतीं अग्रपूजा ॥३१॥
शिशुपाळ खङ्गखेटकधर । उठावला कृष्णा समोर । कृष्णें सुदर्शन क्षुरधार । प्रेरूनि क्षिर छेदियलें ॥३२॥
रिपु पडतां आपणावरी । त्याचा मस्तक चक्रप्रहारीं । हरिता झाला श्रीमुरारी । भूतीं समग्रीं विलोकितां ॥३३॥

शब्दः कोलाहलोऽप्यासीच्छीशुपाले हते महान् । तस्यानुयायिनो भूपा दुद्रुवुर्जीवितैषिणः ॥४४॥

शिर उडालें गगनोदरीं । कंबंध पडलें धरणीवरी । हाहाकार ते अवसरीं । सभेमाझारी प्रवर्तला ॥३४॥
महाराजा चैद्य पडतां । कोल्हाळशब्द सभेआतौता । दुष्ट नपगण झाला पळता । निजजीविता रक्षावया ॥४३५॥
शिशुपाळाचे पक्षपाती । जितुके राजे खळ दुर्मती । ते पळाले पवनगती । समरक्षिती सांडूनी ॥३६॥
जीवितें वांचवावयाचे चाडे । पळती खालती करूनि मुण्डें । न पाहती मागिलेकडे । मरण रोकडें चुकवावया ॥३७॥
न साम्भाळिती कोणा कोण्ही । चैद्यदेह पडला धरणी । झाली नृपांची भंगाणी । यावरी करणी हे ऐका ॥३८॥

चैद्यदेहोत्थितं ज्योतिर्वासुदेवमुपाविशत् । पश्यतां सर्वभूतानामुक्लेव भुवि खाच्च्युता ॥४५॥

चैद्यदेहींचें चैतन्यतेज । ज्योतिर्मय जें तेजःपुंज । गगनीं संचरूनियां सहज । अधोक्षजीं तें प्रवर्तलें ॥३९॥
सर्व भूतें पाहत असतां । उल्कापात होय अवचिता । तैसें प्रवेशलें अच्युता । माजि तरुता तत्तेज ॥४४०॥
गगनींहूनि तुटे तारा । त्या तेजातें प्राशी धरा । चैद्यज्योति तेंवि श्रीधरा - । माजि कुरुवरा प्रवेशली ॥४१॥
अंतीं मति तैसीच गति । धन्य म्हणती विरोधभक्ती । सभ्य स्वमुखें प्रशंसिती । तें तूं कुरुपति अवधारीं ॥४२॥

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP