अध्याय ७४ वा - श्लोक १० ते १५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


उपहूतास्तथा चान्ये द्रोणभीष्मकृपादयः । धृतराष्ट्रः सहसुतो विदुरश्च महामतिः ॥१०॥
ब्राह्मणाः क्षत्रिया वैश्याः शूद्रा यज्ञदिदृक्षवः । तत्रेयुः सर्वराजानो राज्ञां प्रकृतयो नृप ॥११॥

धर्मराजें स्वमुखें वचनीं । नकुळाप्रति आज्ञापूनी । गजसाह्वया पाठवूनी । कौरवांलागोनी आणविलें ॥८७॥
भीष्म द्रोण कृपाचार्य । प्रज्ञाचक्षु सशततनय । त्रिकाळज्ञ विदुर आर्य । आर्यांवर्य वक्तृत्वें ॥८८॥
यालागीं महामति ऐसें । श्लोकीं विशेषण दिधलें असे । आदिपदाच्या सौरसें । अशेष कौरव सूचिले ॥८९॥
कर्ण शकुनि जयद्रथ । बाहूलीक भूरिश्रवा सोमदत्त । अश्वत्थामा शल्य सुरथ । नकुळें समस्त आणिले ॥९०॥
सहदेवातें युधिष्ठ्रें । आज्ञापितां दूर येरें । प्रेरूनि राजे अत्यादरें । यज्ञमंडपा प्रार्थिले ॥९१॥
पूर्वीं दिग्व्जयाचे काळीं । भूभुजांतें आज्ञा केली । दूतसंकेतें वंदूनि मौळी । आली मंडळी नृपांची ॥९२॥
बार्हद्रथें जिंकूनि रणीं । रोधिल्या होत्या नृपांच्या श्रेणी । त्या सोडितां मागधमरणीं । आज्ञा केली श्रीकृष्णें ॥९३॥
ते आज्ञेतें स्मरोनि हृदयीं । राजे मिनले मखालयीं । चातुर्वण्य सहसमुदायीं । आले तेंही अवधारा ॥९४॥
श्रेष्ठ ब्राह्मण चतुर्वेदी । सहित शिष्योपशिष्यमांदी । शास्त्राध्यायी दर्शनवादी । मीमांसकादि पातले ॥९५॥
तैसींच समस्त क्षत्रियकुळें । परमस्वधर्मशीळें अमळें । धर्मराजाचे यज्ञाशाळे । पाहों आलीं सप्रेमें ॥९६॥
वैश्य सदाचारसंपन्न । धनाढ्य अपर जे वैश्रवण । धर्मराजाचा पहावया यज्ञ । आले संपूर्ण सद्भावें ॥९७॥
तैसेचि शूद्र आस्थावंत । द्विजपरिचर्याविषयीं निरत । धर्मराजाचा मख समस्त । पहावयार्थ पातले ॥९८॥
अष्टधा नृपांचिया प्रकृती । यज्ञ पहावयाचे आर्ती । पातल्या नृपांचिये संगती । न लगे पुनरुक्ति करावी ॥९९॥
ऐसे मंडपीं चार्‍ही वर्ण । अपार मिनले भूभुजगण । द्विजीं शोधिलें देवयजन । तें व्याख्यान अवधारा ॥१००॥

ततस्ते देवयजनं ब्राह्मणाः स्वर्णलाङ्गलैः । कृष्ट्वा तत्र यथाम्नायं दीक्षया्ञ्चक्रिरे नृपम् ॥१२॥

ब्राह्मणीं यथोक्त यज्ञकर्मा । भू याचिजे नृपोत्तमा । धर्मराजें यज्ञकामा । कैसी क्षमा स्वीकारिली ॥१॥
परशुरामें ब्राह्मणांप्रति । दान केली अवघी क्षिति । धर्में ब्राह्मणांपासूनि पुढती । कवणे रीती प्रार्थियली ॥२॥
आधुनिक राजे झाले क्षत्री । प्राचीन ब्राह्मणांची धरित्री । त्यांपासूनि परिमितसूत्रीं । यज्ञायतना पुरे ऐसी ॥३॥
सूत्रमानें भू मोजिली । स्वर्णनिष्कीं आच्छादिली । तन्निष्कदानें ते स्वीकेली । मग शोधिली यथाविधिं ॥४॥
देवयजन तें यज्ञभूमी । लांब रुंद यथानियमीं । ब्राह्मणीं आकृष्ट लाङ्गलीं हैमीं । यज्ञवित्तमीं विलोकुनी ॥१०५॥
काच खर्परें अस्थिशकलें । प्रतिमा अवयवादि भंगले । इटा लोष्ठ दुर्दुममूळें । काढूनि केली भूशुद्धि ॥६॥
भूमि शोधूनि यज्ञायतनें । वेदि निर्मिली सूत्रज्ञानें । धर्मराजातें वेदविधानें । दीक्षा करिते जाहले ॥७॥
दीक्षाङ्गसंस्कार समस्त । तिहीं करूनि संसारयुक्त । करिते जाहले द्विज समर्थ । युधिष्ठिरातें ते काळीं ॥८॥

हैमाः किलोपकरणा वरुणस्य यथा पुरा ।

समस्त यज्ञांचीं उपकरणें । निर्मिलीं जाम्बूनदसुवर्णें । जैसीं पूर्वीं केली वरुणें । स्वमखाकारणें स्वभुवनीं ॥९॥
म्हणाल वरुण तो दिक्पाल । धर्म मानवी भूपाळ । ऐसें नव्हे हे पाण्डव सकळ । अमर केवळ अवतरले ॥११०॥
म्हणोनि हरिहरांच्या मूर्ति । आल्या युधिष्ठिरमखाप्रति । ते हे ऐका शुकभारती । शंका चित्तीं न धरूनियां ॥११॥

इन्द्रादयो लोकपाला विरञ्चिभवसंयुताः । सगणाः सिद्धगंधर्वा विद्याधरमहोरगाः ॥१३॥
मुनयो यक्षरक्षांसि खगकिन्नरचारणाः । राजानश्च समाहूता राजपत्न्यश्च सर्वशः ॥१४॥
राजसूयं समीयुः स्म राज्ञः पांडुसुतस्य वै । मेनिरे कृतभक्तस्य सूपपन्नमविस्मिताः ॥१५॥

इंद्राग्नि यम निरृति । वरुण वायु कुबेर पशुपति । ब्रह्मादि निर्जर सहसंपत्ति । आले निगुती धर्ममखा ॥१२॥
गण गंधर्व सिद्ध चारण । उरग यक्ष रक्षोगण । खग मुनि किन्नर विद्याभरण । आले पूर्ण मख लक्षूं ॥१३॥
आज्ञापत्रें भूभुज सर्व । पाहूं आले मख अपूर्व । पत्न्या पुत्र सेनाविभव । घेऊन मखार्ह संभार ॥१४॥
पाण्डुसुत जो धर्मराज । तयाचा यज्ञ सुकृतपुंञ्ज । पाहों आले सर्व भूभुज । मानिती चोज विलोकनीं ॥११५॥
म्हणती कृष्णभक्ताचा अध्वर । म्हणोनि सिद्धी पावला सधर । येरव्हीं विघ्नें धुरंधर । जिणोनि पार कोण पावे ॥१६॥
ऐसे विस्मित भूपाळ । अमरेंसहित अमरपाळ । विरंचिसहित जाश्वनीळ । मानिती केवळ कृष्णकृपा ॥१७॥
ऐसी संभारसमृद्धि । देखोनि ऋत्विज यथाविधि । आसादनी करूनि आधीं । योजिते झाले तें ऐका ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP