अध्याय ७२ वा - श्लोक ४६ ते ४९

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


एकपादोरुवृषणकटिपृष्ठस्तनांसके । एकबाह्वक्षि भ्रूकर्णे शकले ददृशुः प्रजा ॥४६॥

एक चरण गुडघा मांडी । ऊध्व आसुडितां दोर्दंडीं । तडतडाटें चिरली गांडी । फूटली कांडी चक्राची ॥८७॥
एक वृषण अर्ध शिश्न । एक कटी एक जघन । पृष्ठ नाभि समसमान । एक स्तन एक खांदा ॥८८॥
एक बाहु अर्ध नासिक । कर्ण नयन भ्रू एकैक । ब्रह्मरंध्रांत शकलें देख । जालीं सम्यक सम तुल्य ॥८९॥
बळें उधडूनि शकलें केलीं । विपरीत द्विभागीं टाकिलीं । जनपदप्रजा देखती झाली । म्हणती भंगली नृपपदवी ॥२९०॥
उपचारप्रद किंकरजन । प्रजा पौर जनपद आन । तिहीं नृपशकलें देखोन । शंखस्फुरण आदरिलें ॥९१॥

हाहाकारो महानासीन्निहते मगधेश्वरे । पूजयामासतुर्भीमं परिरभ्य जयाच्युतौ ॥४७॥

मोठा माजला हाहाकार । म्हणती हा भंगला महावीर । जरासंध मगधेश्वर । खचला मंदरगिरि जैसा ॥९२॥
एकीं हाक नेली नगरीं । बोंब जाहली राजमंदिरीं । शोक करिती मागधनारी । आल्या बाहेरी प्रेतापे ॥९३॥
शकलें कवळूनि विलपती वनिता । म्हणती अहो मगधनाथा । नृपैश्वर्य कवणा माथां । घालूनि जातां परलोका ॥९४॥
गुह्यवृत्तान्त आम्हांप्रति । सांगूनि रंजवा परम प्रीति । आजी सांडूनि आमुची रति । सायुज्यमुक्ति आलिंगिली ॥२९५॥
शत्रु याचितां ब्राह्मणवेषीं । प्राणभिक्षा वोपूनि त्यासी । तुम्हीं वरिलें सायुज्यतेसीं । निजसत्त्वासी न टळूनी ॥९६॥
प्रजा म्हणती मागधराया । आमुच्या पाळणा उबगूनियां । तूं गेलासि कवण्या ठायां । उपेक्षूनियां राष्ट्रातें ॥९७॥
अमात्य सचिव मंत्रिवर्ग । सुहृद इष्टमित्र जिवलग । शेटे महाजन आप्त अनेग । ह्मणती प्रसंग संपादा ॥९८॥
मागधाचें कवळूनि प्रेत । ऐसे रडती जन समस्त । तंव येरीकडे पार्थाच्युत । आलिंगिती भीमातें ॥९९॥
धन्य धन्य भीमा म्हणती । तुझी अभंग प्रतापशक्ति । नागायुतबळ मागधनृपति । उघडूनि कीर्ति माजविली ॥३००॥
वारंवार हृदयीं भीमा । कवळूनि प्रेमें देती क्षेमा । म्हणती तुझिया बळाची सीमा । सहसा आम्हां न वर्णवे ॥१॥
जयजयकारें विजयलाभ । साहूनि पार्थपंकजनाभ । म्हणती आजि वीरश्रीकोंभ । समूळ स्वयंभ उन्मळिला ॥२॥
एकच्छत्री भूमंडळ । लाधला युधिष्ठिर भूपाळ । निष्कंतक वसुधातळ । झालें केवळ येथूनि ॥३॥
सिद्धी गेलाच राजसूय । येथूनि झाला दृढ निश्चय । युधिष्ठिराचे वंदिती पाय । नृपसमुदाय भूतळींचे ॥४॥
भीमार्जुनकृष्ण ऐसे । विजय वरूनि वीरश्रीतोषें । निर्भर वदती परमोल्लासें । मागधेशा संहरतां ॥३०५॥
तंव येरीकडे जनपदश्रेष्ठ । अमात्य राजवर्गी वरिष्ठ । येऊनि वंदिती वैकुंठपीटः । याचिती अभीष्ट राज्यातें ॥६॥
म्हणती नृपति नसतां भद्रीं । दस्यु तस्कर मातती राष्ट्रीं । यालागीं तुम्हां तिथांमाझारी । मागधराष्ट्रीं अभिषेका ॥७॥
तिघांमाजी एक राजा । करूनि त्यासि निरवा प्रजा । मागधपतीच्या धर्मभाजा । प्रेतकाजा प्रवर्तवा ॥८॥
ऐसी ऐकोनियां प्रार्थना । कृपा उपजली जनार्दना । मग तो म्हणे नृपनंदना । भेटी आणा मंत्री हो ॥९॥
अभय लाहूनि भगवत्प्रद । सवेग जाऊनि मंत्रिवृंद । सहदेवनामा नव मागध । आणिला प्रसिद्ध भेटीतें ॥३१०॥
सहदेवनामा मागधतनय । नमिता झाला श्रीकृष्णपाय । येरे देऊनि पूर्ण अभय । केला राय तें ऐका ॥११॥

सहदेवं तत्तनयं भगवान्भूतभावनः । अभ्यषिंचदमेयात्मा मागधानां पतिं प्रभुः ॥४८॥

मागधतनय तो सहदेव । प्रजा जनपद अमात्य सर्व । आज्ञापूनि केला राव । देऊनि गौरव मागधाचें ॥१२॥
पाचारूनि श्रेष्ठ बाह्मण । ब्रह्मनिष्ठ जे तपोधन । त्यांच्या मंत्रीं पट्टाभिषेचन । केलें विधानपूर्वक पैं ॥१३॥
सहदेव मगधेश्वराच्या भद्रीं । स्थापूनि छत्र धरिलें शिरीं । मुकुट कुंडलें युग्मचामरीं । श्रेष्ठ नृपवरीं मिरवला ॥१४॥
त्यानंतरें कव्यवाहना । नृपकलेवर होमिलें जाण । पट्टमहिषी सहप्रयाणा । करित्या झाल्या ते काळीं ॥३१५॥
सहदेव करूनि मगधपाळ । त्यातें आज्ञापी गोपाळ । तेंही निरूपण अळुमाळ । ऐका सकळ श्रोतेहो ॥१६॥

मोचयांमास राजन्यान्संरुद्धा मागधेन ये ॥४९॥

कृष्ण म्हणे गा मगधेश्वरा । ऐकें जरासंधाच्या कुमरा । आजि दुर्दैवकारागारा । पासून नृपवरां सोडावें ॥१७॥
माझी आज्ञा वंदूनि माथां । कारागारीं नृपां समस्तां । मुक्त करूनि निरसिजे व्यथा । मानूनि आप्तां गौरविजे ॥१८॥
दोनी अयुतें बळिष्ठ नृपती । मागधें रोधूनि रक्षिले निगुती । त्यांतें सोडवी रुक्मिणीपती । आज्ञासंकेतीं क्षणमात्रें ॥१९॥
परम प्रतापी जरासंध । वदान्य ब्राह्मनभक्त अगाध । परंतु दुर्वृत्ततेचा बाध । जे केला रोध नृपांचा ॥३२०॥
राजे जिंकिलिया समरंगीं । त्यांची फेडोनि अपमानधगी । मान देऊनि सोडिजे वेगीं । ऐसी मागी श्रेष्ठाची ॥२१॥
प्रतापें जिंकूनि भूतळ । मित्र करूनियां भूपाळ । होऊनि सर्वांसि स्नेहाळ । जनकातुल्य वर्तावें ॥२२॥
ऐसें सांडोनियां सद्वृत्त । मागध झाला पैं दुर्वृत्त । म्हणोनि त्याचा केला घात । नाहीं राज्यार्थ निर्दळिला ॥२३॥
प्रकट कळावें हें जनांसी । म्हणोनि राज्य सहदेवासी । देता झाला हृषीकेषी । रुद्धनृपांसी सोडवुनी ॥२४॥
दोनी अयुतें प्रतापी राजे । समरीं जिंकोनि वीरश्रीतेजें । गिरिद्रोणीमाजि सहजें । कोंडिले होते चिरकाळ ॥३२५॥
तयांचें करवूनियां मोक्षण । नृपोपचारीं गौरवून । बोळविले तें व्याख्यान । परिसा वक्ष्यमाण अध्यायीं ॥२६॥
द्विसप्ततितम संपला येथ । त्रिसप्ततितमाचा निरूपणार्थ । होतां राजसूय समाप्त । पावेल अंत शिशुपाळ ॥२७॥
बहात्तरावियामाझारी । इतुकी कथा शुक वैखरी । वदला तैसी भाषेवारी । श्लोकाक्षरीं प्रकाशिली ॥२८॥
अधिष्ठानींचा जो परमेष्ठी । प्रतिष्ठानीं गोदातटीं । श्रीएकनाथ विदुषां मुकुटीं । कोटीरकोटिरत्नमणि ॥२९॥
तयाचिया पादोदकें । जिह्वा तिंबतां केवळ मुकें । बृहस्पतीतें जिंकूं शके । वक्तृत्वकौतुकें प्रज्ञेच्या ॥३३०॥
तया श्रीप्रभूचे चरण । क्षाळूनि गौतमीचें अर्ण । पिपीलिकेसि येतां पूर्ण । केलें प्राशन दयार्णवें ॥३१॥
तो हा तद्रसवाग्व्यापार । श्रोते वक्ते प्राश्निक चतुर । सेवूनि होती अजरामर । कैवल्यभद्रपरमेष्ठी ॥३३२॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे अष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां जरासंधवधोनाम द्विसप्ततितमोऽध्यायः ॥७२॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४९॥ ओवी संख्या ॥३३२॥ एवं संख्या ॥३८१॥ ( बहात्तरावा अध्याय मिळून ओवी संख्या ३३३१९ )

बहात्तरावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP