अध्याय ७२ वा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


ततश्चटचटाशब्दो वज्रनिष्पेषसन्निभः । गदयोः क्षिप्तयो राजन्दंतयोरिवं दंतिनोः ॥३६॥

त्यानंतरें परम क्रूर । उभयतांचे गदाप्रहार । व्रजासारिखे कठोर । अतिनिष्ठुर पडताती ॥३६॥
गदेवरी वोढिती गदाघाया । हस्तलाघवें चपळ राया । चटचटाशब्द उमटती तया । उपमावया गजयुद्धा ॥३७॥
जैसे कुञ्जर मदोन्मत्त । निकरें भिडती अरण्यांत । चटचटाशब्दें वाजती दंत । हेही तद्वत गदाप्रहार ॥३८॥
दोघेही न धरिती मरणभया । नागायुतबळिष्ठ काया । समान सदट दोघांचिया । इच्छिती विजया परस्परें ॥३९॥
वीरश्री बाणली दोघां आंगीं । निर्भय निःशंक भिडती रंगीं । गदा प्रेरिती बाहुवेगीं । मर्मविभागीं तें ऐका ॥२४०॥

ते वै गदे भुजजवेन निपात्यमाने अन्योऽन्यतोंऽसकटिपादकरोरुजत्रून् ।
चूर्णीबभूवतुरुपेत्य यथार्कशाखे संयुद्ध्यतोर्द्विरदयोरिव दीप्तमन्यवोः ॥३७॥

तया दोघांच्या उभय गदा । बाहुवेगें ताडिती विशदा । एकमेकांच्या अवयवभेदा । करितां खेदा न पवती ते ॥४१॥
एकमेकांच्या खांदियांवरी । निकरें ताडिती गदाप्रहारीं । घाय वोढिती वरिच्यावरी । कटितट प्रहारीं शितरिती ॥४२॥
मस्तकीं दावूनियां घाय । वंचनमार्गें ताडिती पाय । तेणें जघन चूर्णित होय । परि न धरिती भय मरणाचें ॥४३॥
बाहु कोंपर मणगटें मुष्टी । लक्षूनि ताडिती जगजेठी । एकमेकांच्या अंगयष्टी । झोडिती हठी गदाप्रहारें ॥४४॥
मन्यु म्हणिजे क्रोधानळ । तेणें प्रदीप्त जाले प्रबळ । हिमाचळावरी वज्रकल्लोळ । तेंवि विशाळ गदाप्रहार ॥२४५॥
मांडिया मोडिती गदाघातीं । जत्रु म्हणिजे कंठप्रान्तीं । अग्रभागींच्या उभय अस्थी । चूर्ण करिती परस्परें ॥४६॥
असो ऐसिया अवयसंधी । लक्षूनि ताडिती महाक्रोधी । जेंवि अर्कतरूचे सन्निधी । भिडिजे द्विरदीं महाक्रोधें ॥४७॥
द्विरदय्युद्धाचे संघटनीं । अर्कशाखांची भंगाणी । तेंवि अवयव दोघीं जणीं । गदाप्रहरणीं भंगिजती ॥४८॥
मदोन्मत्त कुञ्जर वनीं । तेंवि संघटिजे दोघीं जनीं । दोघांमाजि विषादाग्नि । प्रज्वळलेनि आवेशें ॥४९॥

इत्थं तयोः प्रहतयोर्गदयोर्नृवीरौ क्रुद्धौ स्वमुष्टिभिरयःस्पर्शैरपिष्टाम् ।
शब्दस्तयोः प्रहरतोरिभयोरिवाऽसीन्निर्घातवज्रपरुषस्तलताडनोत्थ ॥३८॥

ऐसे सक्रोध मानववीर । हाणित असतां गदाप्रहार । स्वमुष्टीचे स्पर्श कठोर । तिहीं चकचूर उभयाङ्गें ॥२५०॥
उभय गजांचे दंतखडके । तेंवि उभय गदांचे धदके । विद्युत्पातासारिखे कडके । उठती चपेट घाताचे ॥५१॥
तळताडनें उठती ध्वनी । जेंवि तडिद्वान मेघ गगनीं । तेंवि चपेटें मुष्टीच्या प्रहरणीं । भूमि दणाणी सशैल ॥५२॥
एवं दोघे समान बळी । समान गदाशिक्षाशाळी । दोघे अभंग रणमंडळीं । हें परीक्षितीजवळी शुक सांगे ॥५३॥

तयोरेवं प्रहरतोः समशिक्षाबलौजसोः । निर्विशेशमभूद्यूद्धमक्षीणजवयोर्नृप ॥३९॥

ऐसिया भिडतया दोघांचे । बळप्रभाव समान साचे । शिक्षाअभ्यासशीळतेचे । समान वीर दोघेही ॥५४॥
( येथे २५५ नं. नाही. )
कोण्ही कोण्हा न मेजती । कोण्हा कोण्ही न भंगती । समान वीरश्रीइंगितीं । आवेशवृत्ती समसाम्य ॥५६॥
म्हणोनि निर्विशेष युद्ध । अक्षीण शक्ती अत्यंत क्रुद्ध । आवेश वेग अतिसुबद्ध । समान सन्नद्ध समरंगीं ॥५७॥
कोण्ही कोण्हा न येती हारी । यालागिं युद्ध चिरकाळवरी । चपेटमुष्टिगदाप्रहारीं । करिती समरीं सावेश ॥५८॥
राया म्हणसी किती दिवस । द्वंद्वयुद्धी केले त्यांस । ऐक कथितों तो विशेष । जें वदला व्यास मम जनक ॥५९॥

एवं तयोर्महाराज युद्ध्यतोः सप्तविंशतिः । दिनानि निरगंस्तत्र सुहृद्वन्निशि तिष्ठतोः ॥४०॥

सत्तावीस दिवसवरी । द्वंद्वंयुद्धाचिया कसुरी । ऐसे भिडतां महावीरीं । न येती हारीं परस्परें ॥२६०॥
जिवलग सोयरे परम आप्त । तैसे निर्वैर रात्रीं सुप्त । कापट्यमळें न होती लिप्त । सदा सतृप्त स्वानंदें ॥६१॥
निर्दोषयशाची करणें जोडी । धरूनि मानसीं हेचि आवडी । दिवसां भिडती प्रतापप्रौढी । निर्वाणगुढी उभयावया ॥६२॥
भिडतां या रीती अजस्र । लक्षूनि एकान्तीं श्रीधर । तयाप्रति वृकोदर । बोले उत्तर तें ऐका ॥६३॥  

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP