अध्याय ७२ वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


न त्वया भीरुणा योत्स्ये युधिविक्लवचेतसा । मथुरां स्वपुरीं त्यक्त्वा समुद्रं शरणं गतः ॥३१॥

युद्ध करावें कोणासीं । जेणें श्लाघ्यता ये आपणासी । तुम्हां ऐसिया पामरांसीं । युद्ध आम्हांसि अयोग्य ॥२००॥
कृष्णा कालीचें तूं लेंकरूं । तुझा वाळला नाहीं जारू । दिग्विजयी मी मागधवीरू । नव्हें श्लाघ्यतर तव युद्धीं ॥१॥
गरुड शेषेंसी समराङ्गणीं । अश्लाघ्य मारणें त्यां उंडणीं । सिंह शशका मारितां रणीं । धन्य कोणी न म्हणे कीं ॥२॥
युद्धीं व्याकुळ चित्तेंकरून । समरीं करिसी पलायन । मथुरा राजधानी टाकून । समुद्रा शरण गेलासी ॥३॥
ऐसिया तुजसीं भांडतां मज । वीरमंडळीं पावेन लाज । मातुलहंता तूं निर्लज्ज । मुखाम्भोज दाखविसी ॥४॥
एवं तुजसीं युद्ध न घडे । म्हणसी धनंजयासीं भिडें । तोही अतुल्य तुझेनि पाडे । तेंही निवाडें अवधारीं ॥२०५॥

अयं तु वयसाऽतुल्योनातिसत्त्वो न मे समः । अर्जुनो न भवेद्योद्धा भीमस्तुल्यबलो मम ॥३२॥

अर्जुन कनीयवयसायोगें । परम सूक्ष्म निर्बळ आंगें । समरीं न शोभे वीरविभागें । युद्ध वाउगें येणेंसी ॥६॥
अर्जुन योद्धा नव्हे धीर । त्यासीं भिडतां हांसती वीर । भीमही केवळ कोमळ पोर । मजसीं समर या न घडे ॥७॥
परंतु तुम्ही ब्राह्मणवेशें । दरिद्री आलेति भिक्षामिपें । याचिलें द्वंद्वयुद्ध आपैसें । तें म्यां कैसें न देइजे ॥८॥
समस्त मनोरथ जो तुमचा । तदनुसार केली याञ्चा । तदर्पणीं म्यां गोविली वाचा । देईन साचा युद्ध तुम्हां ॥९॥
यालागीं तुम्हां तिघां जणां । भीम कांहींसा आंगवणा । मजसीं तुल्य ऐसें म्हणा । समराङ्गणा माजिवडा ॥२१०॥
ऐसे सम्मानूनि ब्राह्मण । कृष्णार्जुनभीमसेन । त्यांमाजि द्वंद्वयुद्धाचा क्षण । भीमालागून दिधला पैं ॥११॥

इत्युक्त्वा भीमसेनाय प्रादाय महतीं गदाम् । द्वितीयां स्वयमादाय निर्जगाम पुराद्वहिः ॥३३॥

इतुकें बोलूनि मागधें तेणें । विशाळ गदा भीमाकारणें । आणूनि दिधली संतुष्टमनें । दुसरी आपण घेतली ॥१२॥
मग वंदूनि कुलदेवता । त्रेताग्निऋत्विजां द्विजां समस्तां । गौरवूनि सुहृदां आप्तां । झाला निघता समरातें ॥१३॥
लागली वाजंतरांची घाई । चामरें ढळती दोहीं वाहीं । भीमार्जुनशेषशायी । ब्राह्मणवेशें विराजती ॥१४॥
पुराबाहिर निघाला गजरें । रणमही ठाकिली आनंदभरें । द्वंद्वयुद्धाच्या दानाधिकारें । साधनें अपरें निषेधिलीं ॥२१५॥
सेनासंभार पार्षद । प्रधान मंत्री अमात्यवृंद । यातें वारुनि जाहला सिद्ध । द्वंद्वयुद्धदानार्थ ॥१६॥

ततः समे खले वीरौ संयुक्तावितरेतरौ । जघ्नतुर्वज्रकल्पाभ्यां गदाभ्यां रणदुर्मदौ ॥३४॥

शस्त्रास्त्रविद्येचा आखाडा । शिष्यां राजगुरुसंग्रामचाडा । युद्धकौशल्यें शिक्षिती होडा । तो तो पवाडा ठाकियला ॥१७॥
लांब रुंद विस्तीर्ण भूमे । मीढुषदेवता वेताळनामी । स्थापूनि संग्रामभिक्षाकामी । अभ्यासनियमीं जे ठायीं ॥१८॥
चतुष्कोण चारी भुजा । अरत्निमात्र उच्छ्रित वोजा । पाषाणबद्ध वेदी सहजा । मेखळामंडित रंगमही ॥१९॥
मॄदुळवाळुकामय विस्तीर्ण । यथेष्ट विखुरिलें गैरिकाचूर्ण । लहुडी भुशुण्डी गुरु पाषाण । बाहुबळगणनार्थ ॥२२०॥
ऐसिये समेखळे भूमी । तिये समयीं संग्रामकामी । वीर पातले पराक्रमी । उद्भटकर्म मदोद्धत ॥२१॥
गगनचुंबित रोविले ध्वज । पताका फडकती तेजःपुञ्ज । समरश्रियेची लावण्यवोज । दाविती मत्तगजपडिपाडें ॥२२॥
वीरश्रीचूर्णरंगीं डवरले । ठाणठकारें सज्ज झाले । द्वंद्वयुद्धाप्रति वेठले । जेंवि मातले बळसिंधु ॥२३॥
कास कसूनि मालगांठीं । वळिल्या केशांच्या वीरगुंठी । गदा पडताळूनियां मुष्टी । युद्धीं जगजेठी मिसळले ॥२४॥
दंडीं मणगटीं सुबद्ध बिरुदें । गगन गाजविती सिंहनादेण । वीरश्रीद्योतक वाजती वाद्यें । स्मरती पदें स्वगुरूचीं ॥२२५॥
गदा धरूनि स्वकक्षपुटीं । पृथ्वी स्पर्शोनि वंदिती मुकुटीं । मृत्तिका चर्चून्यां ललाटीं । गदा मुष्टी आकळूनी ॥२६॥
परस्परें करिती प्रहार । वज्रप्रहारतुल्य कठोर । जेंवि मदोन्मत्त कुंजर । दुर्मदें धीर रणरंगणीं ॥२७॥
मंदर भेदिती कठोरप्रहारें । तेंवि त्या गदा जैसीं वज्रें । कीं तीं सुनाभसुदर्शनचक्रें । युद्धीं हरिहरें परजिलीं ॥२८॥
गदायुद्धीं अभ्यासशीळ । परीक्षा देती शिक्षाकुशळ । तैसे दुर्मद वीर प्रबळ । करिती तुंबळ द्वंद्वयुद्ध ॥२९॥

मंडलानि विचित्राणि सव्यं दक्षिणमेव च । चरतोः शुशुभे युद्धं नरयोरिव रंगिणोः ॥३५॥

गदायुद्धाची शिक्षाझडती । तैसी परस्परें परीक्षा देती । रंगीं शिक्षित नट ज्या रीती । तेंवि शोभती समरंगीं ॥२३०॥
दक्षिण सव्य पदसंचारी । विवित्र मंडळांचिया परी । गदाप्रहार अभ्यासकुसरी । देती भंवरी परस्परें ॥३१॥
जैसे रंगीं नरश्रेष्ठ । तैसेच मागध भीम सुभट । या दोघांचें युद्ध उद्भट । शोभा यथेष्ट पावले ॥३२॥
हां हां म्हणोनि हाकिताती । घे घे म्हणोनि संघटती । ओष्ठ रगडूनि घाय हाणिती । साहें म्हणती परस्परें ॥३३॥
मस्तकीं हाणिती कठोर घाय । लत्ताप्रहारें मोडिती पाय । जानुप्रहारें चूर्ण हृदय । करूं धांवती क्षोभोनी ॥३४॥
श्रावणमासीं जेंवि अबळा । टिपरी घेऊनि खेळती खेळा । तैशा वाजती गदा चपळा । कुरुभूपाळा ते काळीं ॥२३५॥

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP