अध्याय ७२ वा - श्लोक ६ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


न ब्रह्मणः स्वपदभेदमतिस्तव स्यात्सर्वात्मनः समदृशः स्वसुखानुभूतेः ।
संसेवतां सुरतरोरिव ते प्रसादः सेवाऽनुरूपमुदयो न विपर्ययोऽत्र ॥६॥

स्वपरभेदमति तुज । नाहींच हा निश्चय मज । कीं तूं ब्रह्म निरुपाधि सहज । स्वपरभेदवर्जित पैं ॥४१॥
स्वपर नाहीं मज कां म्हणसी । तरी ऐकावें इयेविषीं । तूं सर्वात्मा सर्व देशीं । परिच्छेदासी अस्पृष्ट ॥४२॥
सर्वात्मका चिदेकरसा । तुजमाजि भेद भाविजे कैसा । जरी तूं म्हणसी दृष्याभासा । विरहित सहसा मी कोठें ॥४३॥
तरी तूं सर्वात्मा समदृष्टि । तव संवेदनमात्रें सृष्टि । भूतभौतिकें तुष्टि पुष्टि । यथासंतुष्टि लाहती पैं ॥४४॥
म्हणती विषयसेवनें सुख । भूतां भौतिकांलागीं अशेष । तरी तूं विषयीं विषयात्मक । करणभ्रामक होत्साता ॥४५॥
तुझेनि पृथ्वी गंधवती । आंगीं वाहे धारण्यशक्ति । त्या गंधाची ग्रहणासक्ती । भौतिकीं भूतीं एकत्वें ॥४६॥
तुझेनि जीवन रसाळ जगीं । भौतिकें भूतें रसनामार्गीं । एकात्मसुखाचे प्रसंगीं । चित्सुकरंगीं रंगलीं ॥४७॥
तुझेनि तेजा द्योतनशक्ती । शोषणपचनकर्मा व्यक्ति । तुझेनि प्राणा पवना गती । भौतिकीं भूतीं अभेदें ॥४८॥
पोकळ गगनीं उमटे ध्वनी । तेथ तव संवेदनेंकरूनी । अर्थावबोधें अंतःकरणीं । पडतां श्रवणीं एकत्वें ॥४९॥
यालागीं अभेद स्वसुखानुभूती । तुझी सर्वत्र भौतिकीं भूतीं । ऐसी सर्वत्र प्रतीती । प्रवृत्तिनिवृत्तिमाजि असे ॥५०॥
म्हणोनि या कारणास्तव । रागादिवर्गाचा अभाव । तुझ्या ठायीं वर्ते सर्व । दृश्यादिभाववर्जित तूं ॥५१॥
तथापि स्वपर भासती जन । तेंही ऐकें विवेचन । निद्रित एकचि देखे स्वप्न । माजि नाना जनपद पैं ॥५२॥
तेंवि चैतन्यसागराअंगीं । अविद्याकामकर्मात्मकौघीं । प्रतिबिंबतां जीव तरंगीं । अनेकलिम्गीं भेद गमे ॥५३॥
तिये भेदभ्रमभावने । माजि स्वपरमतीचें होणें । तेथ स्वसंकल्पाचेनि गुणें । घडे भोगणें सुखदुःखा ॥५४॥
तूं अभीष्टकामकल्पतरु । जे जे होती तुजसमोर । ते ते स्वसंकल्पानुसार । फळसंभार लाहती ॥५५॥
कल्पतरूसी नाहीं विषम । परि कल्पितयाचे जैसे काम । तैसींच फळें विषम सम । लाहती निःसीम भेदभ्रमें ॥५६॥
एकें कल्पूनि शिबिकायान । सवेग पावला आत्मभुवन । एकें आपणा कल्पूनि श्वान । गेला धांवूनि निजसदना ॥५७॥
कल्पनेसारिखीं पावले फळें । सुरदुम विषमत्वा नातळे । तेंवि द्वेषिती अभक्त सळें । भक्त पदकमळें आश्रयिती ॥५८॥
उभयां प्राप्ति यथोचित । नोहे विपर्यय निश्चित । ऐसा माझा निश्चय सत्य । तूं हृदयस्थ जाणसी ॥५९॥
ऐसें ऐकूनि धर्मवचन । परमानंदें जनार्दन । म्हणे राया तव भाषण । परम धन्य श्रुतिसाम्य ॥६०॥
अनुमोदूनि धर्मवचना । म्हणे मद्भक्त कैवल्यसदना । लाहती तें अभक्त जना । प्राप्त नोहे कल्पान्तीं ॥६१॥
ऐसा अनुमोदनपूर्वक । बोलता झाला यदुनायक । तें तूं साकल्यें आइक । श्रवणपीयूष रसरसिका ॥६२॥

श्रीभगवानुवाच - सम्यग्व्यवसितं राजन्भवता शत्रुकर्शन । कल्याणी येन ते कीर्तिर्लोकाननुभविष्यति ॥७॥

शत्रुकर्शन या संबोधनें । भूचक्रजयाचें सामर्थ्य देणें । विजयश्रीचें आविर्भवणें । केलें वरदानें संबोधनीं ॥६३॥
सम्यक म्हणिजे बरव्या परी । व्यवसाय धरिला जो अंतरीं । तो तुज कल्याणकीर्तिकारी । निज निर्धारीं जाण पां ॥६४॥
जेणें तुझी उत्कर्षकीर्ती । सर्वत्र होईल कल्याणवती । भुवनत्रयामाजि व्याप्ती । विश्वलक्षिती यशोलक्ष्मी ॥६५॥

ऋषीणाम पितृदेवानां सुहृदामपि नः प्रभो । सर्वेषामपि भूतानामीप्सितः ऋतुराडयम् ॥८॥

सर्वां अभीष्ट हा ऋतुराव । यातें देव पितर ऋषि मानव । आम्हां सुहृदांसीं भूतें सर्व । सादर सदैव इच्छिती ॥६६॥
माझा यज्ञ हा संपादीं । म्हणोनि मातें सभासदीं । प्रभुत्व देऊनि वदसी शब्दीं । कवणे विधि मज सांगें ॥६७॥
म्यां श्रीकृष्णें अथवा कोण्हीं । काय संपादिजे येऊनी । तुझ्या आंगीं ऐश्वर्यश्रेणी । मखेंद्रसाधनीं स्वतःसिद्धा ॥६८॥
मखेंद्राचें साधन काय । तेंही कथितों परिसता होय । सिद्ध करूनि साधनत्रय । मग मखराय आरंभीं ॥६९॥
साधनत्रय म्हणसी कोण । यथानुक्रमें करीं श्रवण । आधीं तितुकीं संपादून । मग हा यज्ञ आरंभीं ॥७०॥

विजित्य नृपतीन्सर्वान्कृत्वा च जगतीं वशे । संभृत्य सर्वसंभारानाहरस्व महाक्रतुम् ॥९॥

राजसूययज्ञविधी । उचित ज्या संभारसमृद्धी । त्या न करितां यज्ञसिद्धी । केंवि हें बुद्धी माजि विवरीं ॥७१॥
जगतीमंडळ वश जों नाहीं । तंव संभारसमृद्धि कैंच्या काई । सर्व नृपति जिंकितां मही । होय सर्वही वशवर्तीं ॥७२॥
यालागिं राया युधिष्ठिरा । राजे जिंकूनि साधीं धरा । तदुत्थ संपादूनि संभारा । यजीं ऋतुवरा सुरेंद्रवत ॥७३॥
जरी तूं म्हणसी येवि विषयीं । मी तुजलागीं प्रार्थितों पाहीं । तरी हें तुजला अवघड नाहीं । ऐक तेंही निरोपितों ॥७४॥

एते ते भ्रातरो राजन्लोकपालांशसंभवाः । जितोऽ‍स्म्यात्मवता तेऽहं दुर्जयो योऽकृतात्मभिः ॥१०॥

राया तुझे हे अनुज चार्‍ही । लोकपालांश देहधारी । प्रतापें जिंकूनि दिशा चार्‍ही । दास्याधिकारी नृपां करिती ॥७५॥
चतुर्दिक्षु देऊनि घरटी । राजे जिंकूनि भूतळवटीं । करविती परिचर्याराहाटी । आज्ञा मुकुटीं धरवूनी ॥७६॥
ऐसे तुझे हे बंधु चार्‍ही । भूचक्रविजयाची सामग्री । म्हणसी अजिंक द्वारकापुरी । तरी अवधारीं ये विषयीं ॥७७॥
आत्मविजयें तां मज पाहीं । प्रतापें जिंकिलें बैसले ठायीं । या लागीं राया तुझिये गेहीं । करीं सर्वही परिचर्या ॥७८॥
अजितात्मका लोकत्रया । सर्वथा दुर्जय मी कुरुवर्या । आत्मविजयें मज ऐसिया । जिंकावया समर्थ तूं ॥७९॥
आत्मशब्दें बोलिजे देह । पंचविध करणांचा समूह । ज्ञातृचेष्टा ज्ञानप्रवाह । क्रियादि करणां तन्मात्रीं ॥८०॥
तें त्वां शरीर करणें प्राण । वृत्तिचतुष्टय अंतःकरण । वश्य करूनि जिंकिलों पूर्ण । जो दुर्जय गहन आकृतात्मकां ॥८१॥
मज जिंकिलें जिये काळीं । तैं तूं जयवान भूमंडळीं । मत्पर मामक महाबळी । त्या आकळी कोण दुजा ॥८२॥

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP