मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
श्लोक १ ला

स्फुट प्रकरणें - श्लोक १ ला

मध्वमुनीश्वरांची कविता


जनस्थानीं नांदे द्विजवर सदा त्रिंबक कवी । तयानें हे केली सरस कविता पद्धत नवी ॥ कथेला ज्या येती द्विजवरद मूर्ती मुखरणी । तयाला वाढावी अभिनव रसाची सिखरणी ॥१॥
जगीं दैत्येंद्रानें तप करुनि देवांसि सळिलें । प्रतापें मृत्यूचें परम गति सामर्थ्य खिळिलें ॥ नृसिंहाच्या रूपें कनककशपूलागिं गिळिलें ॥ तया प्रल्हादाचें त्रिभुवनीं पहा भाग्य फळलें ॥२॥
कयाधूचें पोटीं सुत सुमति जाला गुणनिधी । तयाला देखोनी जनक सुख मानी निरवधी ॥ म्हणे याचीं चिन्हें सकल दिसतीं सुंदर बरीं । असो हा दीर्घायु असुरकुळिंचा दीपक घरीं ॥३॥
प्रकर्षें आल्हादें रमविल तुम्हांला निशिदिनीं । म्हणोनी पाचारा गुरु म्हणति प्रल्हाद वदनीं ॥ द्विजा द्या गोदानें गज तुरग यानें रथ धनें । अनंता वाद्यांचे गजर गुण गाती त्रिभुवनें ॥४॥
घरामध्यें रांगे मधुरवचनें बोलत असे । मुलांमध्यें खेळे अनुभवरसें डोलत असे ॥ भुकेल्या मागेना अशन जननीला निजमुखें । निवाला साधूचें वच परिसोनी निजसुखें ॥५॥
कुमाराचे केले उपनयनसंस्कार बरवे । जगीं शुक्राचार्या गुरुपरिस दैत्यांत मिरवे ॥ जिवीं प्रल्हादाचे नरहरिविना अन्य न सुचे । मुखीं गोविंदाचें स्मरण हरिचें कीर्तन रुचे ॥६॥
पित्यानें घोकाया गुरुसदनिं धाडूनि वहिलें । गुरूनें ॐ नामा लिहुन दिधला त्यास पहिलें ॥ गुरूला प्रल्हादें नमन विधिसंयुक्त विहिलें । स्वसंतोषें जेंएण निगमतरुचें बीज लिहिलें ॥७॥
नमः सिद्धा बुद्धा परमगुरुवृद्धांसि करितो । प्रसादें मी त्यांचे हृदयिं अनिरुद्धास धरितों ॥ असो त्यांचे पायीं अचल मति माझी अतुळसी । त्रिकाळीं गोपाळा नमुनि बहु वाहीन तुळसी ॥८॥
दया गोपाळा मजवरि दया पूर्ण करणें । अनाथाला येथें भवपुरिं वाहातांचि धरणें ॥ किती या संसारीं उपजुनि पुनर्जन्म मरणें । नको आतां ऐसें विषमविषयामाजि रमणें ॥९॥
दयाळा गोविंदा कमळनयना कंजवदना । कधीं येसी कान्हा कलुषशमना कंसदमना ॥ दयादृष्टी पाहे बहुत शिणलों शेषशयना । सख्या यावें न्यावें त्वरित मज वैकुंठभुवना ॥१०॥
गुरू बोले याचें चरित असुरां घातक असे । असें या संसारीं त्रिभुवनिं दुजें लेंकरु नसे ॥ दटाऊनी सांगे वदनिं न म्हणावें नरहरी अशा छंदें वेड्या करतिल तुला ताडन घरीं ॥११॥
गुरूच्या वाक्याला परिसुनि पुढें आपण वदे । म्हणे या मूर्खाची रघुपति मला संगत न दे ॥ कुळीं ज्याचें नाहीं स्मरण हरिचें कीर्तन सदा । तयाला कल्पान्तीं विमळ न मिळे मंगळ कदा ॥१२॥
घरा आला रागेंकरुनि अपमानूनि गुरुला । मनामध्यें चिंती सुमन सुफला कल्पतरुला ॥ पित्यानें त्या बाळा कवळूनि निजांकीं बसविलें । म्हणे बा प्रल्हादा तुज बहुत कोणें रुसविलें ॥१३॥
म्हणे शुक्राचार्या मज बहुत हा दापित असे । तयाचे ते दोघे कुमर दिसती केवळ धसे ॥ अशांच्याही बोधा बधतिल जगीं वोंगळ पिसे । गुरू ज्याचा ऐसा स्वहित आंधळ्यालागि न दिसे ॥१४॥
अनंता श्रीकांता हृदयिं भगवंता न भजती । वृथा चिंता कांताकुचकलश चिंतूनी निजती ॥ गुणातीता सीतापतिचरणपद्मीं न रमती । असे हे त्यागावे गुरुतर दुरात्मे खरमती ॥१५॥
म्हणे बा प्रल्हादा हृदयिं भजसी श्रीहरिपदा । नव्हे हे मर्याद आसुरकुळिंची निर्मळ कदा ॥ मुकुंदा गोविंदा वदनिं वदसी नामचि सदा । तुझ्या जिव्हाछेदा करिन बहुधा वीन अपदा ॥१६॥
पित्याची प्रल्हादें वचनरचना ऐकुनि बरी । म्हणे या दैत्याला हृदयिं न रुचे कां नरहरी ॥ त्रिदोषाच्या छंदें ज्वरित भलतैसे बडबडी । तसें याला जालें म्हणौनि सदनीं हा चरफडी ॥१७॥
अहा रे दैत्येंद्रा स्वहित समजेनास अधरा । वृथा केली कष्टी जननि परि येऊनि उदरा ॥ तुला नाहीं लज्जा विषयरस प्यालासि मदिरा । किती बोधूं मूर्खा श्रुतिवचनभावार्थबधिरा ॥१८॥
शरीराची आशा धरुनि फिरसी तूं दशदिशा । असारीं संसारीं विसरुनि कसा त्या जगदिशा ॥ अविद्येच्या योगें मन विषयरानांत फिरवीं अहा रे दैत्येंद्रा पळभरि न विश्रांति बरवी ॥१९॥
करा श्रीरंगाचें भजन तुम्हि सांडूनि कपटा । असंगाच्या शस्त्रें करुनि रिपुचें मूळ निवटा ॥ वृथा लोकांमध्यें भ्रमण करितां येइल उणें । कसें दारोदारीं मन फिरवितें ओंगळ सुनें ॥२०॥
भजावें श्रीकृष्णा उपजुनि तुम्हीं दानवकुळीं । त्यजावी हे तृष्णा विषयदमोहासि समुळीं ॥ सुता प्रल्हादाचें वचन परिसा दिव्य निरुतें । अनायासें जाती सकल तुमचीं दूर दुरितें ॥२१॥
अरे माझी कोणी अति सुरस हे युक्ति परिसा । भल्याच्या संसर्गें सकल तुम्हि संदेह निरसा ॥ विरक्तीचें कांहीं जरि घडल शास्त्रश्रवण रे । करावें मुक्तीचें तरि सुलभ पाणिग्रहण रे ॥२२॥
विरक्तीं सेवावें श्रवण मननाचें दधि मधू । प्रयागीं सत्क्षेत्रीं चतुर परिणावी नववधू ॥ विवेकें वारावें मधिलचि अविद्यावरण रे । प्रतिष्ठा वोंकारीं प्रगट वधुमुक्ताभरण रे ॥२३॥
प्रयागीं सत्क्षेत्रीं मिरवुनि विमानीं वधुवरें । तया दोघामध्यें अमित दिसतें हे सुखवरें ॥ पुढें सौभाग्याच्या अधिक अभिवद्धीस उमजा । कळेना तेव्हां हे शरण गुरुरायास तुम्हि जा ॥२४॥
सदा श्रीरामाचें हृदयकमळीं ध्यान धरें । प्रसादें देवाच्या भवजलधिचा बिंदु करणें ॥ द्विजेंद्रीं सेवावें अभिनय जगत्कल्पतरुला । मनोभावें जावें शरण सखया मध्वगुरुला ॥२५॥
कुमाराच्या बोलें असुर बहु संतप्त हृदयीं । भडाडे कोधाग्नीकरुनि मग तो तेच समयीं ॥ म्हणे याची कांहीं दिसत विपरीतार्थ करणी । रिपू आला पोटा खपविल कुला गारकमणी ॥२६॥
कयाधूसी बोले सुत खपवि देऊनि जहरा । बलावा गारोडी भुजग डसवा येकलहरा ॥ कुजंत्रीं जळावा प्रबळ अनलीं हा अवचिता । कुळीं माझ्या जाला बहुत करितो हे अनुचिता ॥२७॥
कुठाराचा दांडा अति सरळ हा नंदन म्हणा । पुढें माझ्या छेदा करिल सकळा चंदनवना ॥ उसाच्याही पोटीं जसिं निजपती हीन कणसें । तसें वंशामध्यें सुत उपजती पातकवशें ॥२८॥
अरे याचे बांधा भुज सुदृढशेंकरुनिया । समुद्रीं सेंदावा चपल करिं सेंडी धरुनियां ॥ निराळीं लोटावा अचल शिखराग्रावरुनिया । मला वाटे ऐसा कुमति सुत जावा मरुनिया ॥२९॥
वराहाच्या रूपें रणिं निवटिला उग्र चुलता । तयाला हा ध्यातो म्हणुनि गज लावूनी उलथा । अरे याचें कोणी शिरकमळ छेदा कचकचा । असें बोले तेव्हां सदय जन थुंके पचपचा ॥३०॥
यया प्रल्हादाला बहुत सळिले सेवक जनीं । समाधी मोठा हृदयिं सुखदुःखास न मनी । जयाचा कैवारी असुरगजवैरी नरहरी । तयाला संसारीं कवण रिपु मारी निजकरीं ॥३१॥
न जाळी त्या अग्नी जलधि सहसा तो न बुडवी । पडेना शैलाग्रावरुनि गज पायें न तुडवी ॥ तुटेना शस्त्रास्त्रीं भुजगविष त्यालागिं न चढे । विषाचा तो प्याला जिरवुनि सुखामाजि पहुडे ॥३२॥
घरां आले रायाजवळीं कथिलें सेवकजनीं । तया प्रल्हादाचे सकळ करिती कौतुक मनीं । बलीयेसी याचे हृदयिं वसते जीवनकळा । मिळाला विष्णूला वधिल तुमच्या दानवकुळा ॥३३॥
म्हणे बा प्रल्हादा प्रगट तरि दावी तव हरी । असे कोणे ठाईं वद मजपुढें तूं लवकरी ॥ न ये कां रे येथें लपत फिरतो कां गिरिवरी । बलावी युद्धाला प्रबळ तरि वैरी क्षणभरी ॥३४॥
म्हणे माझा स्वामी तव हृदयपद्मांत वसतो । अनंत ब्रह्मांडें रचुनि तृणकाष्ठांत दिसतो ॥ असें बोले तेव्हां कनककशपु त्रासुनि वदे । सभास्तंभीं कां रे त्वरित मजला दर्शन न दे ॥३५॥
पित्याच्या त्या बोलास्तवचि मग पुत्रें विनविलें । तया श्रीरंगाचें त्वरित हृदयीं ध्यान धरिलें ॥ वराहाच्या रूपें धरणि धरिली त्या निजमुखीं । सभास्तंभीं द्यावें त्वरित रिपुला दर्शन सुखीं ॥३६॥
स्वपुत्राच्या बोलावरुनि मग हांसे खदखदां । सभेच्या त्या स्तंभावरि सबळ हाणी असि तदा ॥ तये काळीं देवें त्यजुनि सहसा दूरि आळसा । सभास्तंभीं जाला प्रगट करि ब्रह्मांडवळसा ॥३७॥
सभास्तंभीं जाला ध्वनि अवचिता तो कडकडा । अनंत ब्रह्मांडें खचति समयीं ते गडगडा ॥ नृसिंहाच्या नेत्रीं निघति बहु ज्वाळा भडभडा । पळाले दैत्यांचे अधिप निजपायीं झडझडा ॥३८॥
नृसिंहाच्या तेजें गगनिं रविचंद्राग्नि जळती । सडा नक्षत्रांचा धरणिधर वाराह पळती ॥ प्रतापें दिक्पालासहित अमरां धाक सुटला । भुकेला कल्पातीं प्रळयसमयीं रुद्र खबळला ॥३९॥
नृसिंहानें जानूवरि असुर धाऊनि धरिला । नखाग्रानें त्याचें उदर उर संपूर्ण चिरिला ॥ सभाद्वारीं संध्यासमयिं रिपुचा गर्व हरिला । स्वभक्ताच्या रागें मग नरडिचा घोट भरिला ॥४०॥
तयाच्या त्या दाढा घनसर मुखामाजि विकटा । नखश्रेणी वज्रापरिस कठिणा फार तिखटा ॥ मुखीं नेत्रीं ज्वाळा निघति जळती तैं दशदिशा । नृसिंहाच्या दीर्घा पिवळट खटा पिंगट मिशा ॥४१॥
चतुर्बाहू पीतांबर विलसतो हा कटितटीं । मुखीं जिव्हा लोळे रुधिररस चाटी सरकटी ॥ करी अट्टाहासा असुर गजकुंभस्थळ चिरी । म्हणा रे तो आतां अभयवरदाता नरहरी ॥४२॥
तयेवेळीं देवाजवळिं मग कोणी परि न ये । लपाले ते ब्रह्मादिक करिति धांवा जयजयें ॥ रमेनें प्रल्हादासहित चरणांभोज नमिले । म्हणे लक्ष्मीकांता त्रिभुवनपते विघ्न शमलें ॥४३॥
नृसिंहाच्या माथां सुर वरुषती दिव्य सुमनें । दुरूनियां भूमीवरि करिति साष्टांगनमनें ॥ अनंता वाद्यांचे गजर उठती घोष बरवे । सभास्थानीं सिंहासनिं कमलजाकांत मिरवे ॥४४॥
रमा ज्याचे अंकीं अचल विलसे विश्वजननी । सुखी ज्यानें केले मुनिजन पदांभोजभजनीं ॥ शिरीं ज्याच्या शोभे मुकुट फणि छत्राकृति दिसे । जयासाठीं झाले हरिहर विरंच्यादिक पिसे ॥४५॥
म्हणे बा प्रल्हादा तुज बहुत बाळास सळिलें । तुझ्या रागें त्याला सुमति क्षणमात्रांत गिळिलें ॥ सुखी राहे आतां भजन करि माझें अनुदिनीं । तुझ्या भाग्याचा तो शुभ उदय झाला त्रिभुवनीं ॥४६॥
दयाळा म्यां तूझा अमल मनिं धांवा विनविला । धणी त्रैलोक्याचा अभयवरदानीं सिणविला ॥ तया प्रल्हादानें हृदयकमळीं देव नमिला । म्हणे स्वामी स्थापी चरणकमळी मध्वमुनिला ॥४७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP