मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे १०१ ते ११०

स्फुट पदें - पदे १०१ ते ११०

मध्वमुनीश्वरांची कविता


श्लोक १०१ वा
श्रीमध्वनाथ करितो सकळां विनंती । कीजे कृपा मजवरी गुरुराजसंतीं ॥ कोपों नये द्विजवरीं आणि भाग्यवंतीं । मी प्रार्थितों वदत जा हरि भोजनांतीं ॥१॥
ऋग्वेदि आणि यजुसामअथर्वणादि । मैत्रायणी चरक काणव अप्रमादी ॥ कात्यायनी द्विज अपस्तम ते अनादि । श्रीशैव सौरगण वैष्णव तत्त्ववादी ॥२॥
घालूनि आसन प्रशस्त बसा समस्तां । मी प्रार्थितों सलगिनें सुहृदां गृहस्था ॥ मागूनि घ्या तुम्हे अपोक्षित अन्न पात्रीं । सांडूं नका स्मरत जा हरि भूतमात्रीं ॥३॥
श्रीशर्करेसहित पायस वर्पितां जी । का लाजतां हरिस अन्न समर्पितां जी ॥ गोष्टी अनेक विफळा परि जल्पतां जी । भक्षूनि शाकफळ आणिक कल्पितां जी ॥४॥
मागूनि वोदन वरान्न सवेग घेतां । क्काथी पिऊनि मग ढेंकर फार देतां ॥ भक्षूं नका सगट पापड भोजनांतीं । गुंतोनि किंचित जडोनि बसेल दांतीं ॥५॥
द्रोणे भरूनि घृत पुष्कळ सेवितां जी । पुर्णावळ्या गुळवर्‍या बहु जेवितां जी ॥ आणीख मागुनि कडेसहि ठेवितां जी । स्वार्थेंकरूनि वय व्यर्थ गमावितां जी ॥६॥
स्वामी तुम्ही बहुत पोट भरूनि जेवा । कांहीं परंतु उदकासहि ठाव ठेवा ॥ जाऊनिया निजमठा मग चूर्ण सेवा । त्यानंतरें स्मरत जा गुरु वासुदेवा ॥७॥
विद्यार्थिहो तुम्हि बहूतचि साबडे जी । मिष्टान्न तें निजमनांतुनि आवडे जी ॥ त्यामाजि केवळ तुम्हांसचि वावडे जी । भोजनामधुनि टाकुनि द्या वडे जी ॥८॥
भक्षूनिया निज घरीं बहु तक्रपिष्टें । तें अर्भकें करिती जीं अशनें यथेष्टें ॥ एकावरी त्यजिति केवळ येक उष्टें । हीं मातलीं त्रिभुवनांत परान्नपुष्टें ॥९॥
श्रीमध्वनाथ सकळांसहि हात जोडी । घ्या येक वेळ रघुनंदननामगोडी ॥ संसारंधन समूळ दयाळ तोडी । अंतीं सखा रघुपतीविण कोण सोडी ॥१०॥

पद १०२ वें
कोण्ही मागति लोणची रुचिकरें ते भोकरें आइतीं । कोण्ही मागति बाळबेल सुरणा कोशिंबिरी राइतीं ॥ कोण्ही मागति आवळेच सगळे निंबें तथा नेपती । प्रार्थी मध्वमुनींद्र कां विसरले श्रीपार्वतीचा पति ॥१॥
कोण्ही मागति दोडके पडवळें कासीफळें कारलीं । कोण्ही मागति पोकळा चमकुरा सेऊप स्वीकारली ॥ राहीली जरि येक शाक तरि ते पात्रांत पाचारिली । प्रार्थी मध्वमुनींद्र मूर्ति वदनीं कोण्ही न उच्चारिली ॥२॥
कोण्ही मागति सांड्या कुरवड्या देखूनिया पापडा । कोण्ही मागति अर्भकें नवसिकें घारीपुरी चोपडा ॥ कोण्ही मागति वृद्ध वैदिक मुखें आणा मऊसा वडा । प्रार्थी मध्वमुनींद्र कां विसरलीं श्रीशंभु तो साबडा ॥३॥
पोळी भात कढी वरान्न करिता गप्पा वृथा मारिता । भक्षूनि घृत तृप्त होउन पुन्हां पात्रांत डोणा रिता ॥ कोण्ही येक खिरीस गूळ पुरता दुग्धाज्य पाचारिता । प्रार्थी मध्वमुनींद्र कां विसरले सर्वांस जो तारितां ॥४॥
स्वैपाकी श्रमले धुरांत भ्रमले जगरें कदा पेटना । स्वप्नामाजि परंतु येउनि कधीं मिष्टान्न तें भेटना ॥ नाकाला सुटली अखंड गळती पाणी तिचें आटना । रोटीभात वरान्न शाक हिरवी खातां बरें वाटना ॥५॥
व्याही हो तुम्हिं सावकाशचि बसा घ्या भोजनाच्या रसा  येथें भक्षुनि दूधतूप पहाटे पहा घरीं आरसा । मोठा घास भरूं नका निजमुखें बारीक तुमचा घसा । पक्वान्नें अवघीं त्यजा गटगटां आतां गिळा पायसा ॥६॥
कोण्ही येक लुलीं कितेक तिरळीं ते आंधळीं पांगळीं । द्रोणे फाडिति ताडिती झगडती सर्वागुणीं आगळीं ॥ ऐसी ब्राह्मण मंडळीतिल मुलें पंगतीमधें चांगलीं । उच्चा देखुनि घाबरीं जसिं भुतें झोंबूं तसीं लागलीं ॥७॥

पद १०३ वें
बगळा नोहे बगळा नोहे ॥ध्रु०॥
दोहीपक्षीं शुद्ध हंसाही वेगळा । एकापदीं राहे लीन ॥ अजी त्याची लीला बरवी बघा तुम्ही । परी तो भक्षिताहे मीन ॥१॥
कृष्णमुख ज्याचें कृष्णपद त्याचें । बगळा नव्हे तो कैसा ॥ ऐसा सत्वगुण नाहीं जयामध्यें । केवळ जाण तो ह्मैसा ॥२॥
बगळा श्रीशंकर बगळा । भवानी बगळा गोरख जोगी । बगळा मध्वनाथ मीनाच्या सेवनें । अखंड निरंजन भोगी ॥३॥

पद १०४ वें
देवचि मानव तो मानव तो । त्याला देवचि मानवतो ॥ध्रु०॥
न धरी आवड जो वैश्रवणीं । निष्ठा वेदांताच्या श्रवणीं ॥१॥
कामादिक रिपु सृष्टिंत मारी । दृष्टिंत उगवे बोधतमारी ॥२॥
शांति जयाच्या आंगीं बाणे । वागविना जो आणिख बानें ॥३॥
मारी जो यदु मल्ल मुराला । तत्पदीं मध्वनाथ मुराला ॥४॥
 
अभंग १०५ वा  
दीनानाथा नारायणा । परिसावी विज्ञापना ॥१॥
तुझी जाते बिरुदावळी । सत्य जाण वनमाळी ॥२॥
आम्हीं अपराध करावा । तुम्हीं राग न धरावा ॥३॥
ऐसें तुम्हांसि उचित । आम्ही केवळ पतित ॥४॥
बोलावितों चौघाजणां । माझा करी तूं उगाना ॥५॥
मध्वनाथाची करुणा । येऊं द्यावी नारायणा ॥६॥

अभंग १०६ वां
धरितां नाडीय सावज । उद्धरिला पशु गज ॥१॥
मुक्त केला अजामेळ । मी तों त्याहुनि चांडाळ ॥२॥
गणिका घालुनी विमानीं । नेली वैकुंठभुवनीं ॥३॥
हें तो अवघेंची लटिकें । कळूं आलें मज निकें ॥४॥
मध्वनाथाचिये वेळे । कैसे झाकितां जी डोळे ॥५॥

अभंग १०७ वा
देव अरूप अनाम । मी तो पातकी सकाम ॥१॥
अनाम का चांडाळाचें । नांव घेतां नये वाचे ॥२॥
तुझे माझी बराबरी । जाली सहजचि हरि ॥३॥
देव अगणित गुणवंत । माझे अवगुण अनंत ॥४॥
तूं तो व्यापक सर्व देशीं । मी काय नरकांत परदेशी ॥५॥
मज केलें जडमूढ । तुज केलें म्यां दगड ॥६॥
मध्वनाथास कोण्या गुणें । तुम्ही लेखितां जी उणें ॥७॥

अभंग १०८ वा
तुजहुनि मी अधिक । वर्म जाणती साधक ॥१॥
तुझें नांवचि तारक । मी तों म्हणवी प्रतारक ॥२॥
तुझें नांव तें विशाद । माझें अंतरीं विषाद ॥३॥
तुझीमाझी बराबरी । पाहतां मीच आहें भारी ॥४॥
तुझा अर्धा दोशाकर । मी तों सगळा दोषाकर ॥५॥
जीव शिव शब्द तोलूं । कोण पाहूं भरतें हळू ॥६॥
मी तों आहे बुद्धिमंद । तुज कैचा हा समंध ॥७॥
जीवपण डोईवर । घेऊन पाहे क्षणभर ॥८॥
मध्वनाथासि कोण्या गुणें । तुम्हीं लेखितां जी उणें ॥९॥

पद १०९ वें
जननीजठरीं अग्निच्या दाथरीं कां रे तां भाजियलें । वैरिहि न करी ऐसें तां श्रीहरि परोपरी गांजिलें ॥१॥दयाळा॥ध्रु०॥
ऐसा काय माझा अन्याय आहे तो विचारी रे मानसीं । वाळकाची चोरी बुक्क्याचा तो मार शासन हें देसी ॥२॥
राईचा पर्वत करिसी ऐसें समर्थ्य तुजपाशीं । समर्थासीं जेणें भांडावें तयासि गोविसी भवपाशीं ॥३॥
मध्वनाथ म्हणे संतसभेमधें पुसती जेव्हां कोण्ही । चरणींचीं बिरुदें सोडुनि त्यांपुढें जोडिसी हात दोन्ही ॥४॥

अभंग ११० वा
येकरूप नाहीं काळाचें बंधन । तुझें अनुसंधान काय राखो ॥१॥
वेद शास्त्र नीति मर्यादा उडाली । धर्माची बुडाली नाव येथें ॥२॥
तीर्थासि जाऊनि राहूं मी निवांत । तेथेंहि आकांत आरंभिला ॥३॥
देऊळ मोडूनि मूर्तींचा उच्छेद । करिती गोवध चांडाळ ते ॥४॥
माझिया डोळ्यांचें वोडवळें पाप । देव मायबाप बौध जाला ॥५॥
राजिक दैविक येकवट जालें । स्वधर्मासी आलें विघ्न मोठें ॥६॥
मध्वनाथ म्हणे सांग सीतापती । पुढील निश्चिती काय केली ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP