अध्याय ६८ वा - श्लोक १६ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


गत्वा गजाह्वयं रामो बाह्योपवनमास्थितः । उद्धवं प्रेषयामास धृतराष्ट्रं बुभुत्सया ॥१६॥

हस्तिनापुर पावला राम । पाहूनि उपवन उत्तम रम्य । पुष्पीं फळीं अमोघ द्रुम । देखोनि विश्राम पावला ॥१३५॥
तेथें राहोनियां आपण । पुढें उद्धवातें धाडून । धृतराष्ट्रातें निजाभिगमन । स्नेहवर्धन जाणविलें ॥३६॥
परम स्नेहाळ रोहिणीसुत । भेटीलागीं आर्तभूत । आला ऐसा निजवृत्तान्त । धृतराष्ट्रातें कळावया ॥३७॥
स्नेहवाद धृतराष्ट्रातें । जाणवितां त्याचेनि चित्तें । काय कल्पिजेल तेंही निरुतें । आपणातें जाणावया ॥३८॥
यालागीं उद्धव धाडिला पुढें । तेणें प्रेरूनि बार्तिकजोडें । महाद्वारापासूनि तोंडें । निरोप निवाडें पाठविला ॥३९॥
राम उपवनीं राहून । तुम्हां पें उद्धव पाठवून । सर्व कथावें वर्तमान । वार्तिकी जाऊन निवेदिलें ॥१४०॥
ऐकूनि वार्तिकांची वाणी । दुःशासनातें पाठवूनी । उद्धवालागीं सम्मानूनी । सभास्थानीं आणियला ॥४१॥
उद्धव येतां कौरवसभे । धार्तराष्ट्र ठाकले उभे । येरें स्नेहाच्या वालभें । नमिले लोभें तें ऐका ॥४२॥

सोऽभिवाद्यांबिकापुत्रं भीष्म द्रोणं सबाह्लिकम् । दुर्योधनं च विधिवद्राममागतमब्रवीत् ॥१७॥

धृतराष्ट्रातें नृपासन । यालागीं त्यातें अभिवादन । मग वंदिले भीष्मद्रोण । दुर्योधन सबाहलिक ॥४३॥
मान्य आणि वयोवरिष्ठ । त्यांचें वंदोनि पादपीठ । समवयस्कां संल्लग्नकंठ । क्षेमालिङ्गलें दीधलीं ॥४४॥
अल्पवयस्कां सामान्य मान्य । तिहीं उद्धवा करूनि नमन । नृपानिकटीं रम्यासन । देऊनि सम्मान बैसविला ॥१४५॥
सुहृद्भेटीच्या आदरें । राम आला हें कथिलें येरें । तीष मानिला अम्बिकाकुमरें । भीष्मादि अंतरें हरिखेले ॥४६॥
म्हणती आजिचा सुदिन धन्य । स्नेहवादें संकर्षण । आला भेटावयालागून । पूर्ण कल्याण कुरुवंशा ॥४७॥
रामागमन ऐकूनि सकळ । भेटीलागीं उतावीळ । जाती सामोरे तत्काळ । तेंही नवल अवधारा ॥४८॥

तेऽतिप्रीतास्तमाकर्ण्य प्राप्तं रामं सुहृत्तमम् । तमर्चयित्वाऽभिययुः सर्वे मंगलपाणयः ॥१८॥

सभास्थानीं उद्धवासी । कौरवीं पूजिलें उपचारेंसीं । सर्वीं घेऊनि उपायनासी । रामभेटीसी निघाले ॥४९॥
सुहृदांमाजी सुहृत्तम । आमुचा प्राणसखा बळराम । तत्पूजनीं धरूनि प्रेम । आले निस्सीम उत्साहें ॥१५०॥
रामासन्निधे रम्योपवनीं । प्रविष्ट झाल्या कौरवश्रेणी । पुढें नमनाची काहणी । ऐकें श्रवणीं कुरुवर्या ॥५१॥

तं संगम्य यथान्यायं गामर्घ्यं च न्यवेदयन् । तेषां ये तत्प्रभावज्ञाः प्रणेमुः शिरसा बलम् ॥१९॥

बळभद्रातें यथान्यायें । पूजिते झाले पूर्ण स्नेहें । जाणोनि अमोघपूर्णैश्वर्य । नमिती पाय अवघेची ॥५२॥
रामप्रभावा जाणते । वडील वृद्ध जे जे होते । तिहीं सप्रेमभावें तेथें । बळरामातें वंदियलें ॥५३॥
मग विष्टर समर्पून । केलें मधुपर्कपूजन । अर्घ्यपाद्यसह गोदान । वसनाभरणें समर्पिलीं ॥५४॥
सर्वीं घालूनि नमस्कार । स्तवनीं तोषविला हलधर । समीप बैसूनियां सादर । पुसती परिवार तें ऐका ॥१५५॥

बन्धून्कुशलिनः श्रुत्वा पृष्ट्वा शिवमनामयम् । परस्परमथो रामो बभाषेऽविवलवं वचः ॥२०॥

उद्धवें सकळ कौरवांप्रति । क्षेमकल्याण पुसिलें निगुती । अंबिकातनय कौरवपति । सह तत्पंक्ति भीष्मादि ॥५६॥
सुना कन्या पुत्र जामात । बन्धु भ्रातृजाया समस्त । पौत्र प्रपौत्र सुहृद आप्त । दासदासीप्रमुखही ॥५७॥
देश कोश यूथपति । दुर्गें सेना राष्ट्रें संपत्ति । क्षेम कल्याण सर्वांप्रति । यारे म्हणती कृपेनें ॥५८॥
तैसाचि कौरवा उद्धवासी । शभोजान्दासाहाधर्कु कुर । वृष्णिप्रमुख यदुकुळासी । कुशळ सर्वांसी पूसिलें ॥५९॥
पुसूनि सर्वांसी कल्याण । कथिलें तैसें करूनि श्रवण । परस्परें आनंदोन । म्हणती सुदिन आजीचा ॥१६०॥
यानंतरें बोले राम । स्नेहवर्धनकल्याणकाम । यदुकुळवंशामाजी प्रेम । राहे क्षेम ज्यापरी ॥६१॥
विक्लव म्हणिजे दुःखरूप । उभयवंशीं पडे विकल्प । कलहदुमाचें वाढे रोप । तो संकल्प तुटावया ॥६२॥
आपुल्या आगमनाची सिद्धि । पूर्वस्नेह पावे वृद्धि । यदर्थीं राम कृपानिधि । बोले सुबुद्धि तें ऐका ॥६३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP