TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

अध्याय ६८ वा - श्लोक ११ ते १५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्लोक ११ ते १५
तं तु ते विरथं चक्रश्चत्वारश्चतुरो हयान् । एकस्तु सारथिं जघ्ने चिच्छेदान्यः शरासनम् ॥११॥

साही वीर महारथी । एकें मारिला सारथि । चौघीं चौं वारुवांप्रति । एकें कार्मुक छेदिलें ॥८८॥
महावीरीं साही जणीं । साम्ब विरथ केला रणीं । रथ भंगतां आला धरणी । कौरवीं ते क्षणीं आकळिला ॥८९॥
उड्या घालूनि साही वीर । साम्ब आकळिती सत्वर । सोमींच्या बस्तापरी क्रूर । मुष्टिप्रहार येरू करी ॥९०॥
मुष्टिप्रहार सेवूनि साही । आंगीं संघटले लवलाहीं । मलाक्लेशें साम्ब तिंहीं । धरिला तेंही अवधारा ॥९१॥

तं बद्ध्वा विरथीकृत्य कृच्छ्रेण कुरवो युधि । कुमारं स्वस्य कन्यां च स्वपुरं जयिनोऽविशन् ॥१२॥

साम्ब वृष्णिकुळकुमार । धनुर्धरांमाजी प्रवर । त्यातें साही कौरववीर । भंगूनि रहंवर आकळिती ॥९२॥
महाक्लेशें करूनि युद्धीं । साम्ब कौरवीं धरिला बुद्धी । बांधूनि आणिला विजयसिद्धी । स्वपुरामधीं कन्येसीं ॥९३॥
साम्ब धरिला वृष्णिकुमर । विजयवाद्यांचा करिती गजर । लक्ष्मनेसहित कौरववीर । विजयी स्वपुर प्रवेशले ॥९४॥
साम्ब प्रतापी महारथी । भीष्मादि कौरवां लाविली ख्याति । महाक्लेशें धरिला म्हणती । आणिला निगुती नृपसदना ॥९५॥
साम्ब ठेविला निग्रहूनी । कौरव बैसले सभास्थानीं । म्हणती वार्ता हे ऐकोनि । यादव धांवणी करितील ॥९६॥
म्हणोनि बळिष्ठ द्वारकापथीं । गुल्मी स्थापिले महारथी । आज्ञा वार्तालेखकांप्रति । वार्तिकाहातीं पाठविली ॥९७॥
यादवसभेचा वृत्तान्त । क्षणक्षणांचा अतन्द्रित । लिहूनि पाठविजे त्वरित । ऐसा संकेत सूचविला ॥९८॥
हयरथशस्त्रास्त्रीं सन्नद्ध । आदि करूनियां कुरुवृद्ध । सदा सर्वदा समरा सिद्ध । कौरव सावध सभास्थानीं ॥९९॥
कौरवांकडील ऐसी मात । यादवीं साम्बाचा वृत्तान्त । कैसा ऐकिला तें समस्त । परिसे यथार्थ परीक्षिति ॥१००॥

तत्श्रुत्वा नारदोक्तेन राजन्संजातमन्यवः । कुरून्प्रत्युद्यमं चक्रुरुग्रसेनप्रचोदिताः ॥१३॥

तंव नारदें द्वारकाभुवनीं । साम्बावस्था यादवां कर्णीं । कथिली येऊनि सभास्थानीं । चक्रपाणिबळप्रमुखां ॥१॥
नारद म्हणे यादवांप्रति । साम्बचर्या ऐका पुरती । हस्तिनापुरीं सर्व भूपति । आले असतां स्वयंवरा ॥२॥
सुयोधनतनया लावण्यखाणी । नृपां निरीक्षी सभास्थानीं । साम्बें वाहूनि ते स्यंदनीं । निघाला न गणूनि नृपांसीं ॥३॥
यादवीं मागधप्रमुख राजे । भंगिले सुरवर पार्यातकाजें । यास्तव भूपति सांडूनि तेजें । वरूनि लाजे निघाले ॥४॥
तिये समयीं भीष्मप्रमुख । कर्णदुर्योधनादिक । कौरव क्षोभले अशेख । न धरूनि धाक कृष्णाचा ॥१०५॥
आमुची कन्या यादवां घरीं । हें कैं घदेल विपरीत परी । अर्भकें कैसी बलात्कारीं । हरिली नोवरी कुरुकुळींची ॥६॥
वरिष्ठ मानूनि आपुलें कुळ । हांवे चढूनि धांवले सकळ । वेष्टिला जाम्बवतीचा बाळ । केलें तुंबळ रण तेणें ॥७॥
मग साहीजणीं महारथीं । साम्ब धरिला निःशस्त्र विरथी । विजयोत्साहें स्वपुराप्रति । जाऊनि निगुतीं निग्रहिला ॥८॥
साम्बनिग्रहणाची मात । नारदें कथितां सभेआंत । क्रोधें यादव झाले तप्त । प्रळयीं कृतान्त ज्या परी ॥९॥
विशेष उग्रसेन नृपवर । म्हणे पालाणा सत्वर । पालथें घाला हस्तिनापुर । धरा गान्धार भीष्मेंसी ॥११०॥
लेंकरूं एकाकी निःशस्त्री । यानरहित धर्लें समरीं । भीष्मादिकीं महावीरीं । लज्जा अंतरीं न धरूनी ॥११॥
नोवरीसहित आणा साम्ब । झाडा भीष्माचा वीरश्रीमद । धृतराष्ट्राचें संतानथोंब । उपडा विलंब न करूनी ॥१२॥
उग्रसेन राजें ऐसी । आज्ञा देतां यादवांसी । सन्नद्ध बद्ध शस्त्रास्त्रेसीं । प्रबळ सेनेसीं निघाले ॥१३॥
हें देखोनि संकर्षण । इच्छूनि कुरुकुळा कल्याण । करविता झाला क्षमापन । तें संपूर्ण अवधारा ॥१४॥

सांत्वयित्वा तु तान्रामः सन्नद्धान्वृष्णिपुंगवान् । नैच्छत्कुरूणां वृष्णीनां कलिं कलिमलापहः ॥१४॥

उग्रसेनापुढें राम । भक्तकामकल्पद्रुम । उभा ठाकूनि अमृतोपम । प्रार्थी निस्सीम हितवाक्यें ॥११५॥
जयाच्या नामस्मरणें सकळ । नासती अशेषही कलिमळ । तो संकर्षण रोहिणीबाळ । सुहृद्वत्सल प्रार्थीतसे ॥१६॥
म्हणे जी यदुचक्रचूडामणि । प्रार्थनापूर्वक माझी वाणी । ऐकूनि कौरवांवरी येक्षणीं । सेना क्षोभूनि न धाडिजे ॥१७॥
काय म्हणोनि कीजे क्षमा । ऐका त्याही वदतों वर्मा । कलह नसावा कौरवां आम्हां । अमरोत्तमांमाजिवडा ॥१८॥
उतरावया धराभार । दोहीं वंशांमाजी अमर । अवतरले हा दृढ निर्धार । वदला साचार देवर्षि ॥१९॥
भीष्म द्रोण आणि कर्ण । पाण्डव धर्म भीमार्जुन । उभय माद्रीचे नंदन । केवळ सुरगण अवतरले ॥१२०॥
यालागीं यादवां आणि कौरवां । सहसा विरोध न घडावा । जाणोनि ऐसिया रहस्यभावा । क्रोध क्षमावा लागतसे ॥२१॥
आपुले दशन आपुले ओष्ठ । उभय संघटें पाविजे कष्ट । यादव कौरव ते हे स्पष्ट । विरोध अरिष्ट अनुचित यां ॥२२॥
यावरी क्षोभें कौरवांवरी । सहसा राया न कीजे स्वारी । स्वयें जावोनि साम्ब नोवरी । सामोपचारीं आणीन ॥२३॥
ऐकोनि रामाचें प्रार्थन । तथास्तु म्हणे उग्रसेन । आज्ञा होतां यादवसैन्य । रामें संपूर्ण राहविलें ॥२४॥
प्रद्युम्नप्रमुख हरिसुत सर्व । वसुदेव औरस वासुदेव । भोजान्ध कुकुर मधु यादव । वृष्णिपुङ्गव अवघेची ॥१२५॥
ससेनाशस्त्रास्त्रसन्नद्धातें । सान्तवूनि वृष्णिपुङ्गवातें । आणावया स्नुषासुतांतें । हस्तिनापुरातें चालिला ॥२६॥

जगाम हस्तिनपुरं रथेनाऽऽदित्यवर्चसा । ब्राह्मणैः कुलवृद्धैश्च वृतश्चंद्र इव ग्रहैः ॥१५॥

सूर्यप्रभाभासुर रथ । तालकेतुविराजित । हलादि शस्त्रास्त्रीं मंडित । रेवतीकान्त निघाला ॥२७॥
बुध गुरु भार्गव मंगळ मंद । इत्यादिग्रहगणवेष्टित चांद । गगनगर्भीं चाले विशद । तेंवि हलायुध द्विजवर्गीं ॥२८॥
ऋग्यजुःसामाथर्वण । निगमपारंगतब्राह्मण । वेदार्थप्रमुखशास्त्रसंपन्न । अनुष्ठानप्रवीण जे ॥२९॥
कुळ शीळ श्रेष्ठ वृद्ध । जीवावतार उद्धव प्रबुद्ध । प्रज्ञा प्रगल्भ द्विज कोविद । सहित पार्षदगण भंवता ॥१३०॥
ऐसा बळभद्र हस्तिनापुरा । भेटावया कुरुनरेन्द्रा । गेला लक्षूनि सहोदरा । स्नुषाकुमरा आणावया ॥३१॥
बळभद्र उद्धव विप्रमांदी । कौरवां भेटी स्नेहवादीं । येतो ऐसी नृपा शुद्धि । वार्तालेखकीं जाणविली ॥३२॥
तयावरूनि प्रतिगुल्मस्थां । कुरुनरेन्द्रें आज्ञापितां । तिंहें वंदूनि रेवतीकान्ता । कुरुपुरप्रान्ता प्रवेशविती ॥३३॥
द्विजवरवेष्टित सुनंदधर । ऐसा पावला हस्तिनापुर । कौरवभेटीचा प्रकार । तो सविस्तर अवधारा ॥३४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-05-11T06:01:33.9670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

असंतृप्त

  • वि. ( शाप . ) पुरें न भरलेलें ; कणांत कण न विरलेलें ; पूर्णपणें न मुरलेलें ; असंपृक्त ; ( इं . ) अनसॅच्युरेटेड . हे ( आल्डिहाईड ) असंतृप्त असल्यानें साक्षात दोन एकमूल्यतत्त्वांशीं किंवा मुलकांशीं संयोग पावूं शकतात . - सेंपू २ . १६ . [ सं . ] 
RANDOM WORD

Did you know?

If the rituals after the death are not performed what are the consequences?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.