अध्याय ६६ वा - श्लोक ४१ ते ४३

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


चक्रं च विष्णोस्तदनुप्रविष्टं वाराणसीं साट्टसभालयापणाम् ।
सगोपुराट्टालकगोष्ठसंकुलां सकोशहस्त्यश्वरथान्नशालाम् ॥४१॥

विष्णुचक्र सहस्रार । भग्न करूनि कृत्याङ्गार । त्याच्या पाठीं लागे क्रूर । काशीपुर प्रवेशलें ॥२९०॥
प्रलयज्वाळांची महामारी । भरली वारानसीमाझारी । मारुतिपुच्छें जयापरी । केली बोहरी लंकेची ॥९१॥
हाट बाजार धडधडां जाळती । प्राणभयें लोक पळती । पुरी प्रज्वळली सभोंवती । आक्रन्दती पुरवासी ॥९२॥
प्रतिपण्यस्थें सभास्थानें  । राजमुद्रांचीं शासनें । धडधडां जळती चक्राग्नीनें । शङ्खस्फुरणें जन करिती ॥९३॥
नाना पदार्थ प्रतिदुकानीं । घृतें तैलें चर्मभाजनीं । मधु ऐक्षवरसश्रेणी । जळती धडकोनि पण्यस्थ ॥९४॥
अग्नियंत्राचे द्रव्यसांठे । स्पर्शमात्रें कडकडाटें । गगना उसळूनि जाती नेटें । प्रळय वाटे प्रान्तस्था ॥९५॥
गोधूम साळी जव जोंधळे । माष मुद्ग मसुरा राळे । खल्व चणक सर्षप काळे । तिळ तण्डुल श्यामक ॥९६॥
नानाविधा द्विदलराशि । नृपोपभोग्या वरान्नासी । कुलित्थ कोद्रव अढक अतसी । करडी अंबाडी पौष्करिका ॥९७॥
इत्यादि धान्याचे पर्वत । धडधडां जळोनि भस्मीभूत । मुखीं मृत्तिका निक्षेपित । वार्धुषगण भोंवताला ॥९८॥
राजभ्योग्यादि महार्हवसनें । जनपदभोग्यें गौण सामान्यें । कृमिजें कोशेये रोमजें तार्णें । राजतें सौवर्णें हत होती ॥९९॥
शिंपी सोनार चर्मकार । नाना धातूंचे भाण्डकार । हयगजवृषादिपल्याणकार । शरचापकार जळताती ॥३००॥
माल्यकार रंगकार । परिमळद्रव्यक्रयी अपार । भिषक नापित नृत्यकार । अवघे बाजार जळताती ॥१॥
हेमरजतताम्रनाणीं । विकिती वेव्हारे सोवाणी । तेथ प्रज्वळतां चक्राग्नि । धातु द्रवोनि रस वाहती ॥२॥
एक पळोनि बाहेर जाती । एक जेथील तेथें जळती । पळतां पथ ते न लाहती । आहुति होती चक्रानळा ॥३॥
एक एकासाठीं रडती । तेही अग्निमुखीं पडती । पडतां क्षण एक तडफडती । मग सोडिती प्राणांतें ॥४॥
स्त्री माहेरा काली गेली । आमुची शान्ति पावकें केली । मही धन संपत्ति जे पुरिली । तुम्हीं ते कथिली पाहिजे ॥३०५॥
ऐसें भोंवतालियां लोकां । जळतां एक मारिती हाका । एक म्हणती मुलां बायकां । करितां शोका शान्तविजे ॥६॥
एक म्हणती प्रळयांतून । शान्तवावया वांचेल कोण । अंतीं करा हरिहरस्मरण । कांहीं सोडवण जीवाची ॥७॥
ज्वाळा धडकत लागल्या गगनीं । तप्तताम्रमय तापली धरणी । सळसळां कढों लागलें पाणी । जळचर श्रेणीसमवेत ॥८॥
तों पुरगर्भीं भरले ज्वाळ । तेणें फुटोनि उडती उफळ । जैसे यंत्रगर्भींचे गोळ । वज्रकल्लोळसम पडती ॥९॥
अट्टाळिया दामोदरें । श्रीमंतसदनें राजमंदिरें । भस्म केलीं मुकुंदास्त्रें । चमत्कारें निमिषार्धें ॥३१०॥
पशुगोठणें अश्वशाळा । कुंजरशाळा रहंवरशाळा । खेचरक्रमेळरासभशाळा । जाळिल्या सकळा सुदर्शनें ॥११॥
अजाअविकांचिया कोंडणी । पाकशाळा पाचकश्रेणी । कोश मांदुसा भरल्या रत्नीं । सुवर्णनाणीं अपरिमितें ॥१२॥
चक्राग्नीच्या कडकडाटें । रत्नें फुटती तडतडाटें । हेम द्रवोनि वाहे पाटें । झालें उफराटें जन म्हणतीं ॥१३॥
भणगें भिकारी याचक । गनक जोशी ग्रामयाजक । वैयाकरणी नैयायिक । वेदपाठक हुत झाले ॥१४॥
सुदक्षिण नृप नव्हे गाढव । प्रयोगें क्षोभविला वाडव । आपणांसहित आमुचे जीव । होमिले सर्व पूर्णाहुतीं ॥३१५॥
सांख्य मीमांसक वेदान्ती । धर्मशास्त्रज्ञ दशग्रंथी । वाजपेयी श्रौतस्मार्ती । पडिले आहुती चक्राचे ॥१६॥
यति वनस्थ ब्रह्मचारी । आगमी कौळिक वामाचारी । कादिहादिदीक्षाधारीं । महाअभिचारीं प्रवीण जे ॥१७॥
साबरी आसुरी पंचाक्षरी । जारणमारणप्रयोगकारी । नानापाखंडी वेषधारीं । कर्कश अघोरीं हुत झाले ॥१८॥
राजनियोगी ग्रामलेखक । जळतां वदनें करिती शंख । वेतन बुडालियाचें दुःख । स्मरतां पावक त्यां कवळी ॥१९॥                                                  
मूषक बिडालें श्वान जंबुक । गो सरड सर्प वृश्चिक । सामान्य जंतुयोनि अनेक । चक्रपावका हुत झाले ॥३२०॥
पूर्वी जैसा खाण्डववनीं । कृष्णार्जुनांच्या अभयेंकरूनी । पावकें भक्षिले समस्त प्राणी । तद्वत करणी हे झाली ॥२१॥
मुंगी मत्कुण मूषक माशी । न सुटत पडलीं पावकग्रासीं । गगनगर्भीं उडतां पक्षी । पडती हुताशीं आहळुनी ॥२२॥
श्रोते आशंका करिती येथ । यति वेदान्ती व्रती वनस्थ । चक्रें जाळिले हे किमर्थ । तरी तो वृत्तान्त अवधरा ॥२३॥
धान्यासरिसे रगडिती किडे । ऐसें बोलती लोक वेडे । गुंततां धान्यभक्षणचाडे । मरणा वरपडे ते होती ॥२४॥
महापातकियाचा संग । धरितां तत्तुल्य तो अव्यंग । संसर्गजनितपापप्रसंग । दे फळभोगसमसाम्य ॥३२५॥
राजा प्रवर्तला अभिचारा । ऐसिया ऐकतांचि विचारा । त्यागूनि गेले काशीपुरा । चक्राङ्गारा न जळती ते ॥२६॥
कुकर्म कळतां पळती त्वरित । ते तद्दोषें न होती लिप्त । धनसदनादिममताव्याप्त । ते संतप्त तत्पापें ॥२७॥
असंप्रज्ञात समाधिस्थ । निर्विकल्पदशा प्राप्त । ते सर्वदा स्वरूपस्थ । शारीर स्वार्थ नेणती ते ॥२८॥
जितां मरतां आत्मस्थिति । ज्यांची न मोदे कल्पान्तीं । चक्राग्नि जाळितां तयांप्रति । न वटे खंती अणुमात्र ॥२९॥
हरिरूप केवळ योगीश्वर । हरितेजोमय हरीचें चक्र । समरसें होती ते तन्मात्र । जळतां शरीरभय कोणा ॥३३०॥
पूर्वींच नाहीं देहभान । असंप्रज्ञातसमाधिवान । त्यांसी जाळितां सुदर्शन । कवळी पूर्ण आत्मत्वें ॥३१॥
असो ऐसी वाराणसी । पदली सुदर्शनाच्या ग्रासीं । पुढें कथा वर्तली कैसी । तें नृपासी शुक सांगे ॥३२॥

दग्ध्वा वाराणसीं सर्वां विष्णोश्चक्रं सुदर्शनम् । भूयः पार्श्वमुपातिष्ठत्कृष्णस्याक्लिष्टकर्मणः ॥४२॥

पुराणपुरुष जो कां कृष्ण । अक्लिष्टकर्मा तो श्रीकृष्णु । त्याचें चक्र सुदर्शन । काशी जाळून परतलें ॥३३॥
सर्व जाळीली वाराणसीं । तेव्हां वनस्थ यति तापसी । वांचलें ऐसें म्हणावयासी । सामर्थ्य कोणासी असेना ॥३४॥
एवं कथिला दल्प विस्तार । संपूर्ण जाळिलें काशीपुर । सर्वज्ञ जाणती श्रोते चतुर । नलगे परिहार यदर्थीं ॥३३५॥
पूर्ण जाळूनि वाराणसी । चक्र पातलें द्वारकेसी । श्रीकृष्णाचे पार्श्वदेशीं । दक्षिणेसी स्थिर झालें ॥३६॥
श्रीकृष्णाचें जें जें कर्म । दुष्ट भंगूनि स्थापी धर्म । अक्लिष्टकर्मा ऐसें नाम । जाणोनि वर्म मुनि म्हणती ॥३७॥
प्राकृत म्हणती हिंसापर । म्हणोनि श्रीशुक योगीश्वर । या कर्माचा महिमा सधर । वर्णी सादर तो परिसा ॥३८॥

य एनं श्रावयेन्मर्त्य उत्तमश्लोकविक्रमम् । समाहितो वा शृणुयात्सर्वपापैः प्रमुच्यते ॥४३॥

शुक म्हणे गा परीक्षिति । उत्तम श्लोकाची विक्रमख्याति । श्रवण करवील जो वक्ता सुमति । प्राण्याप्रति एकादिया ॥३९॥
अथवा सप्रेमभावें करून । एकाग्र इंद्रियां नियमून । समाहित करूनि अंतःकरण । करील श्रवण श्रद्धाळु ॥३४०॥
एवं कथिलें जैसें तूतें । इतिहासाचे श्रोते वक्ते । ते या श्रवणें सर्व पापांतें । भस्म करिती क्षणमात्रें ॥४१॥
महापातकें उपपातकें । ज्ञाताज्ञातें सांसर्गिकें । नैमित्तिकें उपहासकें । आर्द्रें शुष्कें जळताती ॥४२॥
अखिल पातकां भस्म करिती । विशेष लाहती श्रीकृष्णभक्ति । इतिहास श्रवणाचिये ख्याति । प्रियतम श्रीपति त्यां मानी ॥४३॥
इहामुत्रार्थ जो फलभोगी । जो मर्त्यधर्मी मनुष्यवर्गी । तो हा इतिहास श्रवणप्रसंगीं । मिळे श्रीरंगीं नियमात्मा ॥४४॥
हें कृष्णाचें उज्बल यश । श्रवण करिती शुद्धमानस । ते ते होती नित्य निर्दोष । अमृतत्वासी पावती ॥३४५॥
इतुकी श्रीमद्भागवतीं । दशमस्कंधीं श्रीशुकोक्ति । ऐकूनि निवाला परीक्षिति । निर्दोष चित्तीं होत्साता ॥४६॥
एथवरी एकादशनीषट्क । कथिलें श्रोतयां निष्टंक । यावरी परीक्षिती सुटंक । रामप्रताप पुसेल ॥४७॥
ये कथेचिया श्रवणा । श्रोतीं देऊनियां अवधाना । श्रवणमात्रें कैवल्यसदना । माजी चिद्घना अनुभविजे ॥४८॥
इतुकी कथा प्रतिष्ठानीं । एकनाथाचे साम्राज्यसदनीं । चिदानंदें स्वानंदश्रवणीं । कृपा वरदानीं सांठविली ॥४९॥
स्वानंदकृपारसाचा ओघ । गोविन्दह्रदीं भरला साङ्ग । तत्पादोदकप्रवाहगाङ्ग । रिघालें अव्यंग दयार्णवीं ॥३५०॥
ऐसा दयार्णव आपूर्यमाण । विग्रहधारी अग्रवर्ण । एकनाथाचे लक्षूनि चरण । वसतिस्थान पिपीलिका ॥५१॥
तेथें अध्याय हा षट्षष्ठि । श्रीधरस्वामीची पदवीदृष्टी । पाहोनि केली जे चावटी । ते टीका मराठी हरिवरदा ॥५२॥
इच्या श्रवणें पठनें स्मरणें । दुर्गम भवाब्धि निस्तरणें । ऐसें वरदोन नारायणें । श्रोत्यांकारणें दिधलेंसे ॥५३॥
एथ धरिती जे विश्वास । ते पावती कैवल्यास । अविश्वास माथां दोष । वाराणसीदहणाचा ॥३५४॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां पौण्ड्रककाशीराजवधाभिचार कृत्याभंगसर्त्विक्सुदक्षिणकाशीपुरीदहनं नाम षट्षष्टितमो‍ऽध्यायः ॥६६॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४३॥ टीका ओव्या ॥३५४॥ एवं संख्या ॥३९७॥ ( सहासष्टावा अध्याय मिळून ओवीसंख्या ३१,११८ )

सहासष्टावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP