अध्याय ६६ वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


राज्ञः काशिपतेर्ज्ञात्वा महिष्यः पुत्रबान्धवाः । पौराश्च हा हता राजन्नाथ नाथेति प्रारुदन् ॥२६॥

काशीपतिनृपाच्या जाया । बंधु पुत्र भ्रातृभार्या । इष्टमित्रां सोयरियां । विदित झाला वृत्तान्त ॥८७॥
राजद्वारीं नृपाचें मौळ । गगनींहूनि पडिलें अमळ । ऐकता धांवूनि आले सकळ । रुदती प्रबळ मोहभरें ॥८८॥
पुरजन म्हणती काशीराया । आम्हां प्रजांतें सांडूनियां । तूं गेलासी कवण्या ठायां । वीरश्रीजाया पर्णूनी ॥८९॥
कान्ता म्हणती भो भो नाथ । तुझेनि अंतःपुर सनाथ । आम्हां करूनियां अनाथ । वैकुंठपथ प्रार्थिला ॥१९०॥
परम कोमळ तुझें वदन । केवळ साम्राज्यसुखाचें सदन । समरीं शत्रूंसीं करूनि कदन । कां पां रुदनप्रद झालें ॥९१॥
श्मश्रु थरकले ओष्ठांवरी । दंत दिसती मुखाबाहेरी । सक्रोध भयंकर पाहोनि नेत्रीं । कां पां आम्हांवरी रुसलासी ॥९२॥
आजि न बोलसी कां वचन । कोठें रमोनि गेलें मन । तुजवीण आम्ही दिसतो दीन । विषाद कोण वद वदनीं ॥९३॥
आम्ही अंगना प्रीतिपात्रें । टाकोनि गेलासी कोण्या यात्रे । कोठें ठेविलीं आपुलीं गात्रें । आम्हांसी वक्त्रें गुज सांगें ॥९४॥
बाहु घालूनि ग्रीवेतळीं । आलंगिसी शयनकाळीं । ते भुज आजि न दिसती जवळी । कुच करतळीं न सिवसी कां ॥९५॥
मस्तकावरील काढूनि पदरा । तेणें पुसिति नृपाच्या शिरा । अधर चुम्बूनि कपोल नेत्रां । लावूनि वक्त्रा विलोकिती ॥९६॥
शंख चक्र गदा पद्म । मुकुट कुण्डलें कौस्तुभोत्तम । वासुदेव हें मिरवीं नांव । त्याचा संगम कां त्यजिला ॥९७॥
कोठें त्यजिले हय गज रथ । कैसा धरिला गगनपथ । अवयव सेना यूथप आप्त । सांडूनि येथ शिर आलें ॥९८॥
ऐशा विलपती सकळ जाया । मंत्री म्हणती भो भो राया । आम्हां दाखविली आपुली काया । तुझिया पायां अभिवंदूं ॥९९॥
आम्ही तुझिया प्रकृति सप्त । आम्हां मानिसी जिवलग आप्त । आमुसीं विचार करिसी गुप्त । आजी अक्लृप्त कां करिशी ॥२००॥
आमुचा उबग किमर्थ आला । कोण आमुचा अपराध झाला । उपेक्षूनियां स्वप्रजांला । धरिला अबोला कां सांगें ॥१॥
ऐसे विलपती सर्व प्रधन । तंव सुदक्षिणनामा नृपनंदन । म्हणे राया कां धरिलें मौन । सिद्धी अभिमान नेईन मी ॥२॥
मी जन्मलों तुझिये उदरीं । तरी हे प्रतिज्ञा माझी खरी । मारीन शत्रु निर्धारीं । सत्य वैखरी जाणावी ॥३॥
ऐसीं अनेकें शोकोत्तरें । प्रजा प्रधान दारा कुमरें । विलाप करिती त्यानंतरें । कृत्य पुढारें तें ऐका ॥४॥

सुदक्षिणस्तस्य सुतः कृत्वा संस्थाविधिं पितुः । निहत्य पितृहंतारं यास्याम्यपचितिं पितुः ॥२७॥

सुदक्षिणनामा नृपाचा सुत । सारूनि अंत्येष्टि समस्त । पितृहंता कृष्णनाथ । त्या वधूनि कृतार्थ हो पाहे ॥५॥
पितृर्हत्यातें मारीन जेव्हां । पुत्रधर्मा उत्तीर्ण तेव्हां । भरूनि ऐसिया दुर्धर हांवा । केला उठावा तो ऐका ॥६॥

इत्यात्मनाऽभिसंधाय सोपाध्यायो महेश्वरम् । सुदक्षिणोऽर्चयामास परमेण समाधिना ॥२८॥

सारूनि जनकाची उत्तरक्रिया । पुरोहित प्रधान पाचारूनियां । प्रबळ शत्रु जिणावया । कोणा उपाया प्रवर्तिजे ॥७॥
तंव ते वदतीं सुदक्षिणभूपा । ऐकें कृष्णाचिया प्रतापा । जेणें यमलार्जुनां पादपां । रांगत असतां उन्मळिलें ॥८॥
जातपात्र असतां तान्हा । तैं बळितनया पूतना । प्राशूनि विषाचा उल्बण पान्हा । सायुज्यसदना पाठविली ॥९॥
तृणावर्ताचा चेंपिला गळा । शकट स्पर्शूनि चरणकमळा । वदनीं विश्व दाखविलें डोळां । धर्षितां हेळा जननीतें ॥२१०॥
वत्सासुर कपित्थपृष्ठीं । बक चिरिला चांचुवटीं । अघासुराची फोडिली घांटीं । कालिय क्ष्वेडी पळविला ॥११॥
धेनुक टाकिला तृणराजाग्रीं । प्रलंब मारिला मुष्टिप्रहारीं । वदनें वणवा प्राशन करी । तो केंवि समरीं तुज आकळे ॥१२॥
अमरपतीचा रोधिला मख । तेणें प्रळयबलाहक । आज्ञापिता नंदघोष । महावर्षें पीडियला ॥१३॥
जेव्हां सप्त वर्षांचा हरि । गोवर्धनाद्रि उचलूनि करीं । गोकुळ रक्षिलें सप्त रात्री । शक्रें स्वनेत्रीं विलोकिलें ॥१४॥
अरिष्ट केशी महासुर । खेळतां मारिले न धरूनि शस्त्र । कुवलयापीड मत्त कुंजर । हस्तप्रहारें संहारिला ॥२१५॥
चाणूर मुष्टिक शल तोशल । रंगीं क्रीडतां मर्दिले मल्ल । कालनेमी जो कंस खळ । वधिला वाळ कर्षूनी ॥१६॥
तपाच्या कैपक्षा मागध । करावया कृष्णवध । अठरा वेळ केलें युद्ध । परी नाहीं साध्य जय झाला ॥१७॥
काळयवन जाळिला कपटें । विदर्भाचें मौळ मुखवटें । बीभत्स वपन लज्जापटें । आच्छादूनि विसर्जिला ॥१८॥
राजकन्या वरिल्या अष्ट । तये प्रसंगीं नृप यथेष्ट । झाले समरंगीं प्रविष्ट । अद्यापि कष्ट भोगिती ते ॥१९॥
जाम्बवत जो ऋक्षेश्वर । प्रत्यक्ष ब्रह्मयाचा अवतार । रामदळींचा महावीर । कांपे थरथर रावण ज्या ॥२२०॥
बिळीं रिघोनि त्या बाहुयुद्धीं । दमितां विसरविली शुद्धि । भौम मारिला निर्जरदंदी । त्याच्या समृद्धि अपहरिल्या ॥२१॥
बाण शिवाचा वरदपुत्र । ज्यातें रक्षी भालनेत्र । त्याचा छेदूनि बाहुभार । शोणितपुर विध्वंसिलें ॥२२॥
बाणासुराच्या धेनूलागीं । वरुण भंगिला समरंगीं । ऐसिया युद्धाचे प्रसंगीं । कोण त्रिजगीं जिणों शके ॥२३॥
यालागीं कृष्णेसीं युद्ध न घडे । त्वां जे प्रतिज्ञा केली तोंडें । तियेतें सत्यत्व केंवि घडे । अवघड कोडें हेंचि असे ॥२४॥
पुरोहितातें सुदक्षिण । म्हणे तुम्हीं प्रयोगप्रवीण । जिया प्रयोगें निवटे कृष्ण । तें अनुष्ठान मज सांगा ॥२२५॥
बुद्धि निश्चय विवरूनि ऐसा । पुरोहितमतें श्रीमहेशा । आभिचारमार्गें ऋत्विजां सरिसा । शरण होवोनि आराधी ॥२६॥
नियम चालूनि परम क्रूर । आकर्षुनि निज शरीर । प्रसन्न केला भूतेश्वर । कर्म अभिचार आचरोनी ॥२७॥
परमसमाधिनिष्ठावंत । देखोनि तोषला गिरिजाकांत । वरद होतां नृपाचा सुत । याची अभिप्रेत तै ऐका ॥२८॥

प्रीतोऽविमुक्ते भगवांस्तस्मै वरमदाद्भवः । पितृहंतृवधोपायं स वव्रे वरमीप्सितम् ॥२९॥

सुदक्षिणाचा देखोनि भाव । मागें वरदान म्हणे भव । पितृहंत्याचा निर्दळे ठाव । तो उपाव वर याची ॥२९॥
जेणें माझा मारिला पिता । त्याचा वधोपाय तत्वता । इतुका माझा वर आवडता । पार्वतीकान्ता दे वेगीं ॥२३०॥
इतुकी ऐकोनि वरप्रार्थना । काय बोलिला कैलासराणा । तें तूं ऐकें इरारमणा । कुरुभूषणा परीक्षिति ॥३१॥

दक्षिणाग्निं परिचर ब्राह्मणैः सममुत्विजम् । अभिचारविधानेन स चाग्निः प्रमथैर्वृतः ।
साधयिष्यति संकल्पमब्रह्मण्ये प्रयोजितः ॥३०॥

भूतेश म्हणे सुदक्षिणा । दक्षिणाग्निमाजी हवना । करीं अभिचारविंधिंविधाना । सहित ब्राह्मणा तन्मंत्रीं ॥३२॥
यजमानाचिये आज्ञेवरून । ऋत्विज सारी यज्ञविधान । तैसा आज्ञाधारक कृशान । करील हनन शत्रूचें ॥३३॥
साठी सहस्र वेष्टित प्रमथ । हवनांतूनि महाद्भुत । प्रकट होऊनि साधील कृत्य । तो वृत्तान्त अवधारीं ॥३४॥
मद्वरें या प्रयोगाग्नीसी । अब्रह्मण्यावरी प्रयोजिसी । तरी तो साधील संकल्पासी । या वर्मासी जाणावें ॥२३५॥
गूढ रहस्य भूतपति । यामाजी वदला इये रीती । तें तूं ऐकें परीक्षिति । म्हणे सुमति शुक योगी ॥३६॥
ब्रह्मण्यदेव श्रीकृष्णनाथ । त्यावरी प्रेरितां प्रयोगाद्भुत । तोचि क्षोभोनियां विवरीत । भस्मीभूत करील ॥३७॥
ऐसा गूढार्थ सूचिला शिवें । परि सुदक्षिणातें नोहे ठावें । कृष्ण मानूनि मनुष्यभावें । आचरें आघवें तें ऐका ॥३८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP