अध्याय ६६ वा - श्लोक ६ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


यानि त्वमस्मच्चिह्नानि मौढ्याद्बभिर्षी सात्वत । त्वक्त्वैहि मां त्वं शरणं नो चेद्देहि ममाहवम् ॥६॥

मूढत्वास्तव माझीं चिह्नें । शङ्खचक्राब्ज कौस्तुभाभरणें । जितुकीं न कळूनि तुवां धरणें । जीवां वांचवणें त्यजूनी ॥४२॥
चिह्नें टाकूनियां मातें शरण । येऊनि चुकवीं आपुलें मरण । गर्व धरिसी तरी तूं रण । देईं निर्घृण मम समरीं ॥४३॥
स्त्रिया मेळविलिया बहुसाळा । त्यांचें सौभाग्य रक्षीं कुशळा । शरण होऊनि मज चिरकाळ । विचरें प्राञ्जळ भूलोकीं ॥४४॥
अथवा मरणाचे डोहळे । झाले असती प्रेरिल्या काळें । तरी तूं मजसीं गर्वबळें । येऊनि मिसळें समरंगी ॥४५॥
ऐसी द्विविध आज्ञा माझी । वंदूनि भजे आवडत्या काजीं । ऐसी दूतें यदुसमाजीं । कारुषवाणी निवेदिली ॥४६॥
दूतमुखें हेम कारुषवाणी । यादवी ऐकूनि सभास्थानीं । पुढें केली जैसी करणी । तेहि श्रवणीं अवधारा ॥४७॥

श्रीशुक उवाच - कत्थनं तदुपाकर्ण्य पौंड्रकस्याल्पमेघसः । उग्रसेनादयः सभ्या उच्चकैर्जहसुस्तदा ॥७॥

शुक म्हणे गा कुरुपुङ्गवा । उग्रसेनादिकां यादवां । ऐकतां पौण्ड्रकोक्ति सर्वा । कथिल्या अपूर्वा ज्या दूतें ॥४८॥
मंदमति जो अल्पमेधस । तया पौण्ड्रकाचे संदेश । ऐकोनि दूतमुखें अशेष । यादवां विशेष स्मय गमला ॥४९॥
सभ्यांसहित उग्रसेन । पौण्ड्रकाचें विकत्थन । हांसते झाले होतां श्रवण । उच्च दशन प्रकाशुनी ॥५०॥
म्हणती अभिनव ऐकिली मात । मृगेन्द्र समरा आमंत्री बस्त । मत्कुण मानूनि रावण अल्प । युद्धा काकुत्स्थ पाचारी ॥५१॥
मशक मेरूतें आंगवणे । थडकूनि गगनीं उडवीन म्हणे । कीं कालकूटाचे आरोगणे । भणगें बैसणें पारणिया ॥५२॥
किंवा मुंगीस निघाले पांख । कीं पक्क झालें कदलीपीक । कीं संतानवृद्धीचा मानूनि हरिख । वृश्चिकी तोक धरी जठरीं ॥५३॥
तेंवि पौण्ड्रकाची आयुष्यगणना । पुरली म्हणोनि हे विकत्थना । दूतद्वारा प्रेरूनि कृष्णा । समरांगणा आमंत्रिलें ॥५४॥
ऐसे समस्त सभास्थानीं । यादव श्मश्रु स्पर्शूनि पाणि । वदते झाले तें ऐकुनी । दूतांलागोनि हरि बोले ॥५५॥

उवाच दूतं भगवान्परिहासकथामनुय । उत्स्रक्ष्ये मूढ चिह्नानि यैस्त्वमेवं विकत्थसे ॥८॥

ऐकोनि दूतोक्तिप्रसंग । देखोनि यदुचक्राचा रंग । बोलता झाला कमलारंग । दूता अमोघ प्रतिवचनें ॥५६॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । तो दूतातें बोले वचन । पौण्ड्रकोक्ति उपहासून । श्रीभगवान जगज्जेता ॥५७॥
दूताप्रति म्हणे हरि । माझें प्रत्युत्तर अवधारीं । तैसेंचि पौण्ड्रका निवेदन करीं । तो मग तुजवरी न क्षोभे ॥५८॥
अरे पौण्ड्रका मूढमति । ज्या चिह्नांची तुजला खंती । तुझ्या ठायीं तियें निगुती । मी निश्चिती प्रेरीन ॥५९॥
जया चिह्नांसीं विकत्थना । करूं पाहसी आंगवणा । त्यांच्या ठायीं समरांगणा । माजी ग्रहणा प्रवर्ते ॥६०॥
अथवा अब्जदरारिकौमोदकी । कृत्रिम चिह्नीं कौस्तुभादिकीं । वासुदेव म्हणविसी लोकीं । तीं मी निकीं सांडवीन ॥६१॥
शरण येऊनि वांचवीं प्राण । ऐसें सांगूनि धाडिलें वचन । त्याचें प्रत्युत्तर हें जाण । करीं श्रवण दूतमुखें ॥६२॥

मुखं तदपिधायाज्ञ कंकगृध्रवटैर्वृतः । शयिष्यसे हतस्तत्र भविता शरणं शुनाम् ॥९॥

शरण होऊनि वांचवीं प्राणा । केली ज्या मुखें हे वल्गना । आच्छादूनियां तया वदना । करिसी शयना जे समयीं ॥६३॥
पक्षी वटादि गृध्र कंक । श्येन वायस मांसभक्षक । तुण्डें तोडिती श्रवण नाक । अवयव सम्यक विदारिती ॥६४॥
तये समयीं शृगाल श्वान । त्यातें होऊनि ठासी शरण । तुझिये पिशाताश्रयें जाण । प्राणतर्पण ते करिती ॥६५॥
कृष्णें ऐसिया प्रत्युत्तरें । दूत फिरूनि धाडिला त्वरें । पुढें वर्तलें तें कुरुवरें । अत्यादरें परिसावें ॥६६॥

इति दूतस्तदाक्षेपं स्वामिने सर्वमाहरत । कृष्णोऽपि रथमास्थाय काशीमुपजगाम ह ॥१०॥

कृष्णापासूनि परतला दूत । कारुषा येऊनि भेटला त्वरित । प्रत्युत्तर जें भगवद्दत्त । तें समस्त निवेदिलें ॥६७॥
दूत म्हणे करुषपति । कृष्णसभेसि तुमच्या उक्ति । निवेदिल्या त्या ऐकुन चित्तीं । बालिशमतीसम गमिल्या ॥६८॥
मम मुखें तुमचीं आज्ञावचनें । यादवीं ऐकिलीं जेव्हां श्रवणें । उपेक्षिलीं तीं हास्यवदनें । सागर तृणें जेंवि त्यजी ॥६९॥
कृष्णें दिधलें प्रत्युत्तर । ममायुधांचा मानिसी भार । तरी तियें टाकीन तुजसमोर । घेईं सादर होत्साता ॥७०॥
शरण येईं मातें म्हणसी । तो तूं श्वानश्रृगाला शरण होसी । कंक गृध्र वट बैसोनि शिशीं । मांसकवळासी जै घेती ॥७१॥
इत्यादि निष्ठुरीं प्रत्युत्तरीं । मातें विसर्जूनियां हरि । रथ सज्जूनि अंतकापरी । येतो समरीं जिणावया ॥७२॥
दूतें ऐसी पौण्ड्रकाप्रति । कथिली कृष्णाची प्रत्युक्ति । तंव येरीकडे कमलापति । करी प्रवृत्ति समराची ॥७३॥
दारुका पाचारूनियां हरि । म्हणे रहंवर सज्ज करीं । जाणें आहे पौण्ड्रकावरी । आयुधें समरीं टाकावया ॥७४॥
आज्ञा देतां कृष्णनाथ । दारुकें सज्ज केला रथ । वरी बैसोनि कमलाकान्त । काशीप्रान्त आक्रमिला ॥७५॥
कारुषसमरा केली स्वारी । तरी कां ठाकिली काशीपुरी । ऐसी शङ्का कीजेल चतुरीं । तेंही निर्धारीं परिसावें ॥७६॥
कारुष काशीपतीचा मित्र । दोघीं मिळोनि रचिला मंत्र । यालागीं पौण्ड्रकें काशीपुर । होतें निरंतर अधिष्ठिलें ॥७७॥
हें जाणोनि पंकजपाणि । आला काशीपुरा ठाकूनी । पौण्ड्रकें वार्ता ऐकूनि कानीं । केली करणी तें ऐका ॥७८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP