पृष्टाश्चानामयं स्वेषु प्रेमगद्गदया गिरा । कृष्णे कमलपत्राक्षे संन्यस्ताखिलराधसः ॥६॥

उग्रसेनादिकां सर्वां । अनामय पुसती ते यादवां । स्नेहगद्गदवाचा तेव्हां । प्रेमवैकल्य होत्सात्या ॥५४॥
कृष्णप्राप्ति अभीष्ट मानी । त्यावीण विषय न रुचे कोणी । वृत्ति वेधूनि गेलिया कृष्णीं । त्याग करूनि विषयांचा ॥५५॥
कमलपत्रायताक्ष हरि । सदैव आठवे अभ्यंतरीं । यालागीं विषयाचरणावरी । उद्योग न करी मन बुद्धि ॥५६॥
असो हा आमुचा कळवळा । परस्परें सप्रेमशीळां । जाणों येतसे गोपाळा । भक्तवत्सला भगवंता ॥५७॥
यावरी साफल्य वर्तमान । पुसते झाले बल्लवगण । तें तूं राया करीं श्रवण । म्हणे नंदन व्यासाचा ॥५८॥

कच्चिन्नो बांधवा राम सर्वे कुशलमासते । कच्चित्स्मरथ नो राम यूयं दारसुतान्विताः ॥७॥

बाळपणींच्या सखयांप्रति । आम्हां बान्धवांलागीं श्रीपति । स्त्रीपुत्रेंसीं तुम्ही समस्तीं । केव्हां चित्तीं स्मरिजेतें ॥५९॥
आमुचे सहे जे यादव । कुशल आहेत कीं ते सर्व । हरले कंसभयाचें नांव । ऊर्जितदैवप्रसंगें ॥६०॥

दिष्ट्या कंसो हतः पावो दिष्ट्या मुक्ताः सहृज्जनाः । निहत्य निर्जित्य स्मून्दिष्ट्या दुर्ग समाधितः ॥८॥

ऊर्जित दैवप्रसंग झाला । यास्तव पापी कंस मेला । बंधापासूनि दैवें सुटला । सुहृदमेळा यदुवृष्णि ॥६१॥
पूतनादि कंसपर्यंत । दैवें मारूनि दुष्ट दैत्य । जरासन्धादि नृप समस्त । जिंकिले दृप्त समरंगीं ॥६२॥
दुर्गमदुर्ग द्वारकापुर । आक्रमूं न शकती असुरामर । तेथ केउते नर पामर । भूचर खेचर उरगादि ॥६३॥
रत्नाकराचा भंवता परिधि । ब्रह्माण्डगर्भींच्या सर्व समृद्धि । छप्पन्नकोटि यदुगण युद्धीं । जिणिती त्रिशुद्धी कृतान्ता ॥६४॥
ऊर्जित दैवाचें हें फळ । तेणें द्वारका दुर्ग प्रबळ । जोडलें तदाश्रयें यदुकुळ । निर्भय केवळ कळिकाळा ॥६५॥
इत्यादि बहुधा बल्लवगण । पुसती यदुकुळा कल्याण । तंव गोपींहीं संकर्षण । सुखासीन विलोकिला ॥६६॥
रामदर्शनें गोपनारी । संतुष्ट झाल्या अभ्यंतरीं । बोलती ते वाड्माधुरी । परिसें निर्धारीं कुरुवर्या ॥६७॥

गोप्यो हसंत्यः पप्रच्छू रामसंदर्शनादृताः । कच्चिदास्ते सुखं कृष्णः पुरस्त्रीजनवल्लभः ॥९॥

रामदर्शनें परमाह्लाद । पावला होत्साता बल्लवीवृंद । हास्य करूनि वदती शब्द । पुसती मुकुन्दआचरणा ॥६८॥
म्हणती भो भो रोहिणीतनया । कृष्णा पुरजनललनाप्रिया । कल्याण असे कीं दाशार्हनिचया । वेष्टितद्वारकापुरगर्भीं ॥६९॥
कृष्ण पुरस्त्रीजनवल्लभ । सुखी आहे तो पंकजनाभ । इतुकें पुसोनि वधूकदंब । विरहक्षोभें प्रश्न करी ॥७०॥

कच्चित्स्मरति वा बन्धून्पितरं मातरं च सः । अप्यसौ मातरं द्रष्टुं सकृदप्यागमिष्यति ।
अपि वा स्मरतेऽस्माकमनुसेवां महाभुजः ॥१०॥

आपुल्या बंधुवर्गाप्रति । कोणे समयीं तरी श्रीपति । स्मरतो नंदयशोदा चित्तीं । करितो खंती कीं त्यांची ॥७१॥
नंदयशोदा पहावीं नेत्रीं । ऐसी करितो कीं अवसरीं । मातृभेटीस एकदां तरी । येईल हरि कीं ना तो ॥७२॥
महाबाहु जनार्दन । केव्हां तरी आमुचें स्मरण । करितो पूर्वसेवा स्मरून । विलासभुवनीं आपुलिया ॥७३॥
आतां आमुचें स्मरण त्यासी । किमर्थ होईल सुखविलासीं । पुरजनललनांच्या सहवासीं । मन्मथरसीं रंगलिया ॥७४॥
आम्ही त्यालागीं दिनशर्वरी । झुरत असों अभ्यंतरीं । तदर्थ संसारा बोहरी । केली अवधारीं तें राया ॥७५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP