अध्याय ६३ वा - श्लोक १० ते १५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


शङ्करानुचराञ्शौरिर्भूतप्रमथगुह्यकान् । डाकिनीर्यातुधानांश्च वेतालान्सविनायकान् ॥१०॥
प्रेतमातृपिशाचांश्च कूष्मांडान्ब्रह्मराक्षसान् । द्रावयामास तीक्ष्णाग्रैः शरैः शार्ङ्गधनुश्च्युतैः ॥११॥

शङ्कराचे जे अनुचर । निकटवर्ती प्रतापी शूर । तिहीं त्रासिले यादवभार । भिडती क्रूर प्रतापें ॥९२॥
भूतें परसोनि मोकळीं भिसें । वीरां झोंबती अट्टहासें । संचार करूनि लाविती पिसें । मग त्यां नुमजे आपपर ॥९३॥
प्रमथ क्रूर कुठारपाणि । एक त्रिशूळें खोंचिती रणीं । एक खट्वाङ्गें फोडिती मूर्ध्नी । एक ते दशनीं विदारिती ॥९४॥
एक नखें फाडिती पोटें । एक नयनीं रोविती बोटें । मारूं जातां न दिसती कोठें । पिशाच कपटें भांडती ॥९५॥
शाकिनी डाकिनी यातुधानी । नग्न धांवती समराङ्गणीं । उन्मत्त नाचती रुधिरपानी । पिशिताशनी भयंकरा ॥९६॥
महामारिका कोटरा ज्येष्ठा । करिती भयंकर कुत्सित चेष्टा । संचार करूनि देती कष्टा । बळें अनिष्टा भेटविती ॥९७॥
वेताळ कंकाळ पिंगाक्ष पिंग । उन्मत महिषासुर । मातंग । समरांगणीं करिती धिंग । कुष्मा्ण्डवर्ग भ्रान्तिकर ॥९८॥
प्रचंड विघ्न विनायक । परम अघोर प्रेतनायक । ब्रह्मराक्षस क्रव्यादप्रमुख । वीरां सम्मुख घोळसिती ॥९९॥
नरगजाश्वीं संचार करिती । त्यांची हारपे समरस्मृति । अस्ताव्यस्त धांवताती । बळें मारिती निज सैन्या ॥१००॥
आपुले आपणांमाजी वीर । एकमेकां मारिती प्रहार । आंगीं भूतांचा संचार । तेणें आपपर विसरले ॥१॥
हाहाकार समरांगणीं । यादव त्रासिले पिशाचगणीं । हें देखोनि शार्ङ्गपाणि । अमोघ बाणीं वृष्टि करी ॥२॥
शार्ङनिर्मुक्त सुटतां शर । रणीं खोंचले पिशाचभार । भूतप्रेतप्रमथनिकर । पळती समर साडूनी ॥३॥
शाकिनीडाकिनीगुह्यकांतें । शार्ङ्गनिर्मुक्त बाणघातें । त्रासितां पळती गगनपथें । फिरूनि मागुते न पाहती ॥४॥
यातुधानी रुधिराशना । वेताळ कंकाळ पिंगाक्षगणा । लागतां शार्ङ्गनिर्मुक्त बाणा । पळती प्राणा घेऊनी ॥१०५॥
विनायक जे विघ्नपति । ब्रह्मराक्षस कुष्माण्डजाति । मातरा कोटरा ज्येष्ठा रेवती । पळती दिगंतीं प्राणभयें ॥६॥
प्रळयमेघांची वांकडी । बाणवृष्टि तत्पडिपाडीं । पिशाचसेना झोडिली प्रौढी । रणीं धांदडीं नाचविलीं ॥७॥
शार्ङ्गशिजिनीटणत्कार । करितां उठती नामोच्चार । शार्ङ्गनिर्मुक्त शरांचा मार । मंत्रोच्चारपूर्वक पैं ॥८॥
पिशाच पळती मंत्रश्रवणें । प्रथम खोंचले प्रचंड बाणें । समरीं न धरिती आंगवणे । जेंवि कां तृणें महावातें ॥९॥
पिशाच पळाले सांडूनि रण । कित्येकांचे घेतले प्राण । प्रमथ समरीं न धरिती त्राण । पातले शरण शर्वातें ॥११०॥
भो भो स्वामी भूतान्तका । त्रिपुरभंजका श्रीत्र्यंबका । साहों न शकों जी सायकां । अभयदायका संरक्षीं ॥११॥
पळोनि गेली पिशाचसेना । प्रमथ भाकिती ऐसी करुणा । ऐकूनि क्षोभला कैलासराणा । अस्त्रसंधाना आदरिलें ॥१२॥
आंगीं भरला प्रचंड कोप । सवेग सज्जूनि पिनाकचाप । अस्त्रविद्येचा खटाटोप । दावी प्रताप समरंगीं ॥१३॥

पृथग्विश्वानि प्रायुंक्त पिनाक्यस्त्राणि शार्ङ्गिणे । प्रत्यस्त्रैः शमयामास शार्ङ्गपाणिरविस्मितः ॥१२॥

पिनाक सज्जूनियां पिनाकी । पृथक्पृथक् अस्त्रें निकीं । शार्ङ्गपाणीतें लक्षूनि टाकी । समरीं हाकी भीमरवें ॥१४॥
कठोर डामर उड्डामर । साबर अभिचार अघोर । प्रयोगमंत्र जपूनि क्रूर । प्रेरी सत्वर अस्त्रांतें ॥११५॥
तया अस्त्रांचे प्रतिकार । सांदीपनिदत्तमंत्र । गुरुपद स्मरूनि शार्ङ्गधर । अस्त्रीं प्रत्यस्त्र प्रयोगी ॥१६॥
शंकर करकरां खाऊनि दांत । निकरें अस्त्रांतें प्रेरित । हास्यवदनें रमाकान्त । करी त्यां उपहत प्रत्यस्त्रें ॥१७॥
कुरुवर भूसुरामरदुमा । याचकस्वेच्छापूर्णकामा । अस्त्रां प्रत्यस्त्रांचिया नामा । भूपललामा अवधारीं ॥१८॥

ब्रह्मास्त्रस्य च ब्रह्मास्त्रं वायव्यस्य च पार्वतम् । आग्नेयस्य च पार्जन्यं नैजं पाशुपतस्य च ॥१३॥

ब्रह्मास्त्रविद्या जपूनि मंत्रीं । शंकर योजी पीताम्बरीं । बगळामुखीं मंत्रोच्चारीं । शक्ति अंबरीं प्रज्वळली ॥१९॥
अनिवार ब्रह्मास्त्राचा भार । भरलें प्रळयातळें अंबर । त्रिजगीं झाला हाहाकार । देखूनि श्रीधर काय करी ॥१२०॥
ब्रह्मास्त्राचिया निवारणा । करूं न शकती अस्त्रें नाना । हें जाणोनि वैकुंठराणा । अपर ब्रह्मास्त्रा प्रयोजी ॥२१॥
गायत्रीचें जें कां शिर । अमोघ अव्याहत ब्रह्मास्त्र । उपसंहरी व्याहृतिनिकर । जपोनी श्रीधर शर सोडी ॥२२॥
ब्रह्मास्त्राचें निवारण । करितां ब्रह्मास्त्रें जनार्दन । हें देखोनि गौरीरमण । म्हणे दारुण प्रतियोद्धा ॥२३॥
प्रभंजनास्त्र जपोनि पुढती । कृष्ण विंधी जवें पशुपति । तंव मारुतीं केली ख्याति । सैन्य आवर्तीं पाडिलें ॥२४॥
तृणावर्ताची जैसी घरटी । तैसीं सैन्यें गरगराटीं । फिरती आणि गगनपोटीं । वीर जगजेठी उडताती ॥१२५॥
अश्व कुंजर रथ पताका । प्रचंड पवनें उधळती देखा । पायदळाचा कवण लेखा । नोहे आवांका अतिरथियां ॥२६॥
पवनास्त्रमारें त्रासिलें सैन्य । ऐसें देखोनि जनार्दन । पर्वतास्त्र जपूनि पूर्ण । करी खंडन अनिळाचें ॥२७॥
पर्वतास्त्राचेनि सामर्थ्यें । पवन लोपला जेथींचा तेथें । यूथपीं सैन्यें इत्थंभूतें । केलीं स्वस्थें सांवरूनी ॥२८॥
हें देखोनि शूळपाणि । प्रळयानळास्त्र लाविलें गुणीं । ज्वाळा दाटल्या गगनीं धरणीं । जळती प्राणी उभेउभे ॥२९॥
स्वस्थ शिबिरें पताका जळती । कुंजर पोळले सैरा पळती । अश्व आहळुनि वावळती । वीर कोसळती करपूनी ॥१३०॥
हाहाकार यादवदळीं । देखूनि प्रतापी श्रीवनमाळी । जीमूतस्त्रातें अस्त्रशाळी । योजूनि विधुळी अनळास्त्रा ॥३१॥
मुसळधारीं वर्षती मेघ । भ्म्गला पावकास्त्रनिदाघ । खळबळां वाहती प्रचंड ओघ । तेणें भर्ग चाकाटला ॥३२॥
म्हणे हा नोहे मनुजकोटि । अमोघ योद्धा त्रिजगजेठी । यावरी न चले कोणी काठी । म्हणोनि हठी प्रज्वळिला ॥३३॥
पाशुपतास्त्रें प्रळयकाळीं । क्षोभें ब्रह्माण्ड अवघें जाळी । तें प्रेरूनि करीन होळी । म्हणोनि शूळी अस्त्र जपे ॥३४॥
नयनीं धडकती प्रचंड ज्वाळा । जिह्वा पंचवक्त्रीं विशाळा । पाशुपतास्त्रविद्या प्रबळा । प्रेरिता झाला सक्रोधें ॥१३५॥
पाशुपतास्त्रनिवारण । करितें अपर अस्त्र कोण । ऐसें विवरूनियां श्रीकृष्ण । निजास्त्र पूर्ण प्रयोजी ॥३६॥
निजास्त्र म्हणिजे वैष्णवास्त्र । नारायण हा नामोच्चार । प्रयोगपुरस्सर सोडितां शर । पाशुपतास्त्र भंगलें ॥३७॥
अपर अस्त्र जंव विवरी हर । तंव तो प्रतापी शार्ङ्गधर । काय केला चमत्कार । तोही सादर अवधारा ॥३८॥

मोहयित्वा तु गिरिशं जृंभणास्त्रेण जृंभितम् । बाणस्य पृतनां शौरिर्जघानासिगदेषुभिः ॥१४॥

कृष्ण विवरी अभ्यंतरीं । तमःप्रचुर हा त्रिपुरारि । जृंभणास्त्रें यातें समरीं । निजनिर्धारीं जिंकावें ॥३९॥
मग स्मरूनि सांदिपनी । तामसी विद्या जपूनि वदनीं । जृंभणास्त्र लावूनि गुणीं । शूळपाणि भेदियला ॥१४०॥
तामसी विद्येचें सामर्थ्य निवाड । मोहित करूनि चंद्रचड । केला जृंभणास्त्रा वरपड । येती कडकड आंगमोदे ॥४१॥
पांचही मुखें पसरूनि नेटें । जांभया येती कडकडाटें । दाही हस्तांचीं जुंबाडें । मागें पुढें आळीपिळी ॥४२॥
डोळे झांकती गपगपां । डुकल्या देतसे टपटपां । समरस्मृति पावली लोपा । मोहप्रतापा वश झाला ॥४३॥
गळालीं नेणें हातींचीं शस्त्रें । नुमजे आपणा भेदिलें अस्त्रें । तें देखूनि यादवेश्वरें । त्यजिलें निदसुरे शंभूतें ॥४४॥
शंकरें आंवरिला श्रीहरि । जाणोनि बाणसेनेच्या वीरीं । यादवांवरी केली मारी । प्रमथीं अपरीं येरीकडे ॥१४५॥
जृंभणास्त्रें शङ्करातें । मोहित करूनि रुक्मिणीकान्तें । शार्ङ्गनिर्मुक्त बाणघातें । बाणसेनेतें त्रासिलें ॥४६॥
प्रळयकाळींचे जैसे घन । तैसे सणसणा येती बाण । कोणा नोहेचि आंगवण । शरनिवारण करावया ॥४७॥
गरुड लोटूनि सेनेवरी । कित्येक मारिले गदाप्रहारीं । कित्येकांचीं खङ्गधारीं । शिरें अंबरीं उडविलीं ॥४८॥
कुंभस्थळीं आपुंखशर । भेदितां भंगले कुञ्जरभार । लागतां दृढतर प्रहार । झाले रहंवर शत चूर्ण ॥४९॥
खगेंद्राचिये झडपेसवें । पायदळें पडलीं होवोनि निर्जीवें । एवं बाणसैन्य आघवें । भंगिलें केशवें क्षणमात्र ॥१५०॥

स्कंदः प्रद्युम्नबाणौघैरर्द्यमानः समंततः । असृग्निमुंचन्गात्रेभ्यः शिखिनापात्रमद्रणात् ॥१५॥

तंव येरीकडे तारकारि । समरीं प्रद्युम्ना पाचारी । साहें म्हणोनि शक्तिप्रहारीं । हृदयावरी ताडिला ॥५१॥
हें देखोनि प्रद्युम्नवीर । रसाळकार्मुकीं लावोनि शर । येतां भंगिला शक्तिप्रहार । षण्मुखें तोमर उचलिला ॥५२॥
धनुर्विद्येचा सागर । रुक्मिणीतनय परम शूर । तेणें विंधूनीं पंच शर । केला जर्जर शिवतनय ॥५३॥
बानें तोमर उडविला गगनीं । सायकें भेदिला मयूर मूर्घ्नि । क्रौंचदारण अमोघ बाणीं । समराङणीं त्रासियला ॥५४॥
अंगुष्ठापासोनि मस्तकवरी । बाण भेदले स्कंदशरीरीं । बाणक्षतांच्या रुधिरधारीं । समरधरित्री रंगविली ॥१५५॥
सव्यदक्षिण येती बाण । बाणीं पूर्ण भरलें गगन । पुढें मागें तळीं वरून । भेदितां स्मरण हारपलें ॥५६॥
झालें सर्वांगीं बाणक्षतें । त्यांपासोनि रुधिर भोंवतें । समराङ्गणीं झालें स्रवतें । प्राशिती भूतें संतुष्टें ॥५७॥
मूर्ध्नि पोळला बाणप्रहारें । तेणें मयूरा घायवारें । षण्मुखा घेवोनि पाठिमोरें । रणापासोनि पळाला ॥५८॥
षण्मुखातें देखोनि पळतां । भंगल्या प्रमथगणाच्या चळथा । कायसी भूतप्रेतांची कथा । पावले व्यथा यूथपति ॥५९॥
रणीं भंगला शक्तिधर । जृंभणास्त्रें विकळ शङ्कर । बाणसेनेसी केला मार । जयजयकार यदुभारी ॥१६०॥
तंव ते कुम्भाण्डकूपकर्ण । पाचारूनि संकर्षण । दाविते झाले आंगवण । अपार बाण वर्षूनी ॥६१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP