अनागतमतीतं च वर्तमानमतीन्द्रियम् । विप्रकृष्टं व्यवहितं सम्यक्पश्यंति योगिनः ॥२१॥

म्हणसी रुक्मी भीष्मीकतनय । त्याचे हृदयींचा अभिप्राय । केंवि आम्हांसी ठाऊक होय । बहुत समय अतिक्रमल्या ॥१३५॥
अनागत पुढें जें होणार । योगियां अतीन्द्र्यानें गोचर । होवोनि गेले दिवस फार । तेंही गोवर प्रस्तुतवत् ॥३६॥
चतुर्दिक्षु वर्तमान । देखती योगियांचे नयन । विप्रकृष्ट जे आच्छादन । कृतगोपन दूरस्त्थ ॥३७॥
त्रिविध व्यवधानें व्यवहित । देशकाळपदार्थजनित । तेही योगियां दुष्य होत । अतीन्द्रियज्ञादृष्टि ॥३८॥
ऐसें ऐकूनि नृपाचें वचन । आल्हादद्ययुक शुक सर्वज्ञ ।  करिता झाला निरूपण । तें सज्जन परिसोत ॥३९॥

श्रीशुक उवाच वृत :- साक्षादनंगोंऽगतुस्तया । राज्ञः समेतान्निर्जित्य जहारकरथो युधि ॥२२॥

राया कुरुवर्य चक्रवर्ती । विदर्भतनया रुक्मवती । उपवर जाणोनि विदर्भनृपति । आदरी निगुती स्वयंवर ॥१४०॥
अंग वंग कलिंग भूप । कारूष कैकेय कामरूप । चैद्य मागध नैषध नृप । मिनले अमूप भोजकटीं ॥४१॥
मद्र सैन्धव सुबळपति । गौड पांचाळ द्रविड नृपति । चौळ मल्यार केरळ क्षिति । पालक भूपति महाराष्ट्र ॥४२॥
असो छपन्न देशधर । शाण्णव कुळावतंस थोर । ऐश्वर्यप्रतापें अपर शक्र । मीनले अपार स्वयंवरीं ॥४३॥
वार्ता वार्तिकीं द्वारके कथिली । रामकृष्णीं ते उपेक्षिली । मातुळकन्या हातींची गेली । गोष्टी लागली प्रद्युम्ना ॥४४॥
मकरकेतुस्यंदन सिद्ध । शस्त्रास्त्रेंसी सन्नद्ध बद्ध । प्रद्युम्न प्रतापी अगाध । गेला संबंध स्मरूनी ॥१४५॥
मातुळकन्या रुक्मवती । प्रतापें जिणूनि करीन युवति । सर्व भूभुजां लावीन ख्याति । केंवि ते नेती मम भाग ॥४६॥
कंठीरवाचिया कवळा । हरणीं हांव जैशी श्रृगाला । तैं मज देखतां विदर्भबाळा । अन्य भूपाळां वरील ॥४७॥
ऐसा संकल्प करूनि मनीं । झणें तर्कील अपर कोणी । यालागीं एकाकी स्यंदनीं । आरूढ समय निघाला ॥४८॥
सारथि दारुकाचा तनय । अश्व जवन पवनप्राय । स्वयंवराचा साधूनि समय । खगेन्द्रन्यायें पावला ॥४९॥
बैसली भूभुजांची सभा । तेथ जाऊनि ठाकला उभा । रुक्मवतीच्या विरहक्षोभा । निजाङ्गप्रभा पावविला ॥१५०॥
ललनामोहक लावण्य तनु । ठाणठकार नवयौवन । साक्षात् अनंग साङ्ग देखोन । रुतले नयन नवरीचे ॥५१॥
वधूवरांची दृष्टादृष्टि । होतांचि प्रद्युम्नें गोरटी । हरूनि रहंवरीं उठाउठीं । वाहोनि जगजेठी निघाला ॥५२॥
हें देखोनि राजकुमर । म्हणती अपमान झाला थोर । आम्हां देखतां एकला वीर । नवरी हरूनि चालिला ॥५३॥
धिक्कार आमुचे आंगवणे । कायसें अश्लाघ्यपणाचें जिणें । तोंड घेऊनि स्वपुरा जाणें । लाजिरवाणें स्वजनांत ॥५४॥
ऐसें निकुरें निखंदिती । एकमेकांतें नोकिती । न्यूनोत्तरीं सर्व नृपति । क्षोभें धांवती पाठीलागे ॥१५५॥
कोणे कुळींचा कोण वीर । नोवरी हरूनि नेतसे चोर । धरा मारा अतिसत्वर । कार्मुकीं शर सज्जिती ते ॥५६॥
तंव तो कार्ष्णि द्वारकापथीं । जात असतां पवनगति । लागा पातले देखोनि नृपति । रहंवर निगुती स्थिराविला ॥५७॥
भंवती चमूची पडली घरटी । वीरीं कार्मुकें कवळीलीं मुष्टी । अवघे करिती बाणवृष्टि । म्हणती गोरटी त्यजीं वेगीं ॥५८॥
मरण आलिया निकटवर्ती । पिपीलिकेतें पक्षोत्पत्ति । तेंवि तुज हे रुक्मवती । रुचली चित्तीं जीवघेणी ॥५९॥
दीप देखोनियां पतंगीं । नयना रुचतां ते झगमगी । आंगें कवटाळितां आगी । उरती तद्भागीं भस्ममय ॥१६०॥
तेंवि तूं सुंदर देखोनि ललना । शौर्यें प्रवर्तलासि हरणा । आतां करितां समराङ्गणा । व्यर्थ प्राणां मुकसील ॥६१॥
अद्यापि दांतीं धरूनि तृण । शस्त्रें सोडून होई शरण । नोवरी टाकूनि वांचवीं प्राण । कीं आंगवण प्रकट करीं ॥६२॥
हें ऐकूनि रुक्मिणीतनय । हास्य करूनि वदता होय । कुंजर देखोनि श्वाननिचय । तेणें न्यायें भुंकतसां ॥६३॥
वीरश्री वागवीतसां आंगीं । तरी ते मिरवावी समरंगीं । ऐसें म्हणोनि लागवेगीं । ज्या कार्मुकीं वाहिली ॥६४॥
निषंग केला पिधानरहित । शर सज्जिला धगधगीत । जेंवि सुटला चक्रवात । तृणें उधळीत गगनपथीं ॥१६५॥
तेंवि रायांची बाणवृष्टि । छेदूनि धुरोळा दाविला दृष्टी । चपळ संधानें खिळिल्या मुष्टि । कार्मुकयष्टि खंडिलिया ॥६६॥
बाणीं भेदितां प्रबळदळ । धाकें तिहीं घेतला पळ । अंगप्रौढी राजे सबळ । करिती तुंबळ महारण ॥६७॥
तोमर मुद्गर कुंत पट्टिश । खङ्ग खेटक शूळ पाश । परिघ परश्वध शक्तिविशेष । शस्त्रें अशेष टाकिती ॥६८॥
चहूंकडूनि शस्त्रमार । होतां निर्भय रुक्मिणीकुमर । निषंगांतूनि काढिला शर । जैसा अपर प्रळयार्क ॥६९॥
झंझावात कुसुमा विधुळी । तैसीं नृपमौळें भूतळीं । बाणें पाडितां समरशाळी । भंगली फळी भूपांची ॥१७०॥
सैन्यें पळूनि गेलीं पुढें । मागें भूपति नागवे उघडे । शरीं खोंचतां झाले वेडे । पिशाचपाडें वावडती ॥७१॥
दाही दिशा भरले भूप । पूर्वस्मृतीचा झाला लोप । राख राख हा करिती जल्प । पुढें पादप देखूनी ॥७२॥
ऐसे समरीं जिंकूनि राजे । शिक्षा लाविली वीरश्रीओजें । रुक्मवतीतें हरूनि पैजे । द्वारकेबीजे आदरिलें ॥७३॥
हें देखोनि विदर्भनृपति । परमाश्चर्य मानी चित्तीं । म्हणे रुक्मिणीचिये गर्भशुक्ती । अपर श्रीपति अवतरला ॥७४॥
प्रतापें कृष्णाहूनि आगळा । वीरश्रीमंडन यादवकुळा । एक्या रथेंसी भूपां प्रबळां । न भरतां पळा पळविलें पैं ॥१७५॥
ऐसा वीर अद्वितीय । विशेष आपुला भागिनेय । रुक्मवतीतें परम प्रिय । जाणोनि स्नेह आदरिला ॥७६॥
श्यामसुंदर देखूनि कान्ति । प्रत्यक्ष साङ्ग अनंगव्यक्ति । लक्षूनि म्हणे रुक्मवती । यावीण नृपति न वरीं मी ॥७७॥
राया तुवां जो प्रश्न केला । त्यामाजी स्वयंवरोत्साह कथिला । यावरी रुक्मि प्रशस्त झाला । कन्यार्पणाला तें ऐका ॥७८॥

यद्यप्यनुस्मरन्वैरं रुक्मी कृष्णावमानितः । व्यतरद्भागिनेयाय सुतां कुर्वन्स्वसुः प्रियम् ॥२३॥

रुक्मिणीचिये स्वयंवरीं । रुक्मि अवमानिला हरी । जरी तें शल्य स्मरे अंतरीं । तथापि कुमारी दे मदना ॥७९॥
रूप लावण्य सुंदर । प्रतापी भर्ग कीं भार्गव वीर । ऐसा जामाता कैंचा अपर । विशेष आदर भगिनीचा ॥१८०॥
रुक्मिणीचिया स्नेहगौरवीं । प्रद्युम्नातें स्वकन्या द्यावी । ऐसा विचार करूनि जीवीं । जातां राहवी प्रार्थूनी ॥८१॥
सवें घेऊनि नागरजन । सहित पुरोहित प्रधान । रुक्मी निघाला आपण । प्रार्थून प्रद्युम्न आणावया ॥८२॥
अश्वसादी वेत्रपाणि । पुढें धाडिले तत्क्षणीं । एका पत्रिका देऊनी । द्वारकाभुवनीं पाठविलें ॥८३॥
मूळपत्रिका लिहोनि शुद्ध । देवकीवसुदेव यादववृंद । कृष्ण रुक्मिणी हलायुध । लग्ना विशद पाचारिले ॥८४॥
स्वपुत्र धाडूनि द्वारवती । आपण प्रद्युम्नातें प्रार्थीं । कन्या हरूनि सर्व भूपती । जिणोनि ख्याति दाखविली ॥१८५॥
आतां चला जी माझिया सदना । सारूनि वेदोक्त विधिविधाना । रुक्मवतीच्या पाणिग्रहणा । करूनि अंगना मग न्यावी ॥८६॥
द्वारके लिहूनियां कागळ । स्वपुत्र प्रधान धाडिले मूळ । ऐसें प्रार्थितां मातुळ । प्रद्युम्न तत्काळ परतला ॥८७॥
पुरा निकटीं पुष्पोद्यानीं । सीमान्तपूजा संपादूनी । नगरा जामात नेऊनी । वस्त्रसदनीं राहविला ॥८८॥
नगर श्रृंगारिलें साजिरें । उभविलीं तोरणें पताका मखरें । जानवशार्थ रम्य शिबिरें । अतिविस्तारें उभविलीं ॥८९॥
मूळ प्रविष्ट द्वारकापुरीं । पत्रिका पाहोनि राममुरारी । प्रद्युम्नप्रताप ऐकतां भारी । अभ्यंतरीं संतुष्ट ॥१९०॥
सवें देऊनियां गद । चारुदेष्णादि कुमरवृंद । अक्रूर सात्यकि सन्नद्धबद्ध । रुक्मिणीसमवेत पाठविले ॥९१॥
भोजकटपुरा जाऊनि सकळी । अग्रजा भेटली भीमकबाळी । अक्रूर सात्यकिक्षेमें कवळी । चारुदेष्णादि आळंगिले ॥९२॥
सुहृद आप्त सर्व मीनले । देखोनि रुक्मिणी अग्रजा बोले । म्हणे त्वां स्नेहवर्धन केलें । दुणाविलें सोयरिके ॥९३॥
येरू म्हणे हें ब्रह्मसूत्र । अघटित घडवी दैव विचित्र । तव पुत्रानें करूनि क्षात्र । केलें कलत्र मम कन्ये ॥९४॥
इत्यादि उपचारवचनादरें । क्षेमकुशल परस्परें । वेदविहितविधानगजरें । लग्नस्वसूत्रें लाविलें ॥१९५॥
बोहलां वधूवरें गोमटीं । संतुष्ट रुक्मिणी पाहोनि पोटीं । झणें कोणाची लागेल दृष्टि । लोण स्वमुष्टी उतरीतसे ॥९६॥
प्रद्युम्न वीर झंझार गाढा । न कळत प्रवर्तला कैवाडा । रूपलावण्यसरीपाडा । समान जोडा मेळविला ॥९७॥
झुंजार राजे भंगिले समरीं । जिंकिली पैजेसि नोवरी । रंभा उर्वशी न पवे सरी । परम सुन्दरी रुक्मवती ॥९८॥
सोळा दिवस सोहळा केला । सुहृद स्वजन गौरविला । याचकसमुदाय संतोषविला । स्वेच्छादानें वैदर्भें ॥९९॥
रुक्मिणीचे प्रीतीकारणें । पृथक्पृथक् दिव्याभरणें । वसनें वाहनें सह भाजनें । दिवस सोळाही समर्पिलीं ॥२००॥
रामकृष्णाचिया मानें । गद गौरविला वसनाभरणें । पोष्यांमाजी मज जाणणें । रुक्मि म्हणे सप्रेमें ॥१॥
चारुदेष्णादि उपजामात । सर्वाभरणीं सालंकृत । अक्रूर सात्यकि यादव समस्त । सेनेसहित गौरविले ॥२॥
शिबिकाहयगजरथादि यानें । सालंकृतें सपल्याणें । दासदासेसहोपकरनें । दिधल्या आंदण बहु वस्तु ॥३॥
रुक्मिणीनें बंधुवनिता । वस्त्राभरणीं आनंदभरिता । करूनि सोयरियां समस्तां । अर्पिलीं उचित उपायनें ॥४॥
दास दासी नागरिक । वस्त्राभरणीं एकें एक । संतुष्ट करूनियां सम्यक । प्रतापदीपक उजळिला ॥२०५॥
याचकमंडळी बोळविली । कीर्ति तन्मुखें दिगंता गेली । नृपां जिंकूनि ख्याति केली । मदनें वरिली रुक्मवती ॥६॥
त्यानंतरें सुमुहूर्तीं । वरात निघाली द्वारकेप्रति । कुञ्जरभेरी गर्जताती । विचित्र वाजती वाजंतरें ॥७॥
हय रथ कुंजर यादवभार । सन्नद्ध सात्यकि गद अक्रूर । सज्जूनि चातुरंग परिवार । नगराबाहेर निघाले ॥८॥
अंबिकापुरीं पंचरात्र । राहूनि उत्साह स्वतंत्र । केला सपर्यापुरस्सर । नमी वोहर जगदंबे ॥९॥
मग पातलीं द्वारकापुरा । ऐकूनि कुंजरभेरीगजरा । सवें घेऊनि कृष्णकुमरा । आला सामोरा बळभद्र ॥२१०॥
द्वारका श्रृंगारिली कोडें । कुंकुमसिक्ता चहूंकडे । मखरें तोरणें पताका जोडे । रंगीं बागडे नाचती ॥११॥
विचित्र शोभा दामोदरीं । नगरीं सालंकृत नर नारी । ठायीं ठायीं नृत्यकारी । नाचती गजरीं सुताळें ॥१२॥
महाद्वारीं सांडूनि बळी । वधूवरेंसहित भीमकबाळी । गद सात्यकि अक्रूर हली । नृपाजवळी पातले ॥१३॥
आहुकराजा उग्रसेन । तोषला वधूवरें देखोन । देवकी वसुदेव जनार्दन । नमी  प्रद्युम्न वनितेशीं ॥१४॥
सवेग उठूनियां उद्धवें । ओहर रुक्मिणी घेवोनि सवें । देवक वंदूनि कृत्य आघवें । श्रीपूजन संपविलें ॥२१५॥
जाम्बवती रेवती रति । भाणवसातें निरोपिती । निजाभरणें देऊनि प्रीति । आलिंगिती रुक्मवतीतें ॥१६॥
नगरनागरिकां सोहळा । वसनाभरणें टिळे माळा । अहेर अर्पिती घननीळा । आहुकनृपाळा वसुदेवा ॥१७॥
करूनि ब्राह्मणसंतर्पणें । कुलविधानें देवार्चनें । नगरनागरिकां भोजनें । सर्व सम्मानें पूजिले ॥१८॥
विदर्भपुत्र प्रधानें सहित । सवें आले ज बोळवित । तयांसी अहेर यथोचित । देऊनि समस्त सुखी केले ॥१९॥
रुक्मिणीचिये हरणकाळीं । रुक्मि विटंबिला वनमाळी । हृदयीं वाहे जे काजळी । ते ये वेळीं विसरला ॥२२०॥
द्वेषभाव परिमार्जिला । सुहृद्भाव दुणाविला । रुक्मिणीस्नेहें प्रद्युम्नाला । देता झाला निज तनया ॥२१॥
परस्परें वैर असतां । सुहृद्भावा हेतु कोणता । राया प्रश्न जो केला होता । तो हा तत्त्वतां निरूपिला ॥२२॥
यावरी रुक्मिणीचिये पोटीं । दहा पुत्रांहूनि धाकुटी । कन्या चारुमती गोमटी । तियें जगजेठी वर पाहे ॥२३॥
जिचिया रूपलावण्यगुणा । सरी न पवती अमराङ्गना । ऐसी नोवरी प्राप्त कोणा । त्याही कथना अवधारीं ॥२४॥

रुक्मिण्यास्तनयां राजन्कृतवर्मसुतो बली । उपयेमे विशालाक्षीं कन्यां चारुमती किल ॥२४॥

कृतवर्म्याचा तनय बळी । गुणलावण्यसमरशाली । कन्या चारुमती वेल्हाळी । दे वनमाळी तयातें ॥२२५॥
प्रथम रुक्मिणीची तनया । पुढती कन्या म्हणतां राया । द्विरुक्ति सहसा न नमूनियां । अभिप्राया जाणावें ॥२६॥
कन्या म्हणिजे अष्टवार्षी । मृगलोचना विशालाक्षी । जोडा लक्षूनि सर्वसाक्षी । देता झाला सर्वज्ञ ॥२७॥
यथाविधि वेदविधान । कृष्णें केलें कन्यादान । कृतवर्म्याचा ज्येष्ठ नंदन । वरी आपण करग्रहणें ॥२८॥
कृष्णें आंदण दिधलें बहुत । सोहळा केला परमाद्भुत । इष्टमित्र गौरविलें वोहर । सुहृदां अहेर समर्पिले ॥२३०॥
परस्परें लेणीं लुगडीं । आदरें बोळविले वर्‍हाडी । भीमकी रुक्मवतीच्या आवडी । रुक्मी घडिघडि सांभाळी ॥३१॥
पूर्वील द्वेष हारपला । सुहृद्भाव प्रवर्तला । तदनुसार सोयरिकेला । करिता झाला तें ऐका ॥३२॥
चारुमतीचें कन्यादान । करिता झाला जनार्दन । याचि प्रकारें राया जाण । कन्या संपूर्ण उजविल्या ॥३३॥
साष्ट शत सहस्र सोळा । दश दश पुत्र एकेकीला । एकेक कन्या घनसांवळा । देता झाला स्ववीर्यें ॥३४॥
तयां सर्वांचे विवाह । कथितां पृथक्त्वें उत्साह । होईल ग्रंथासी परिणाह । यास्तव समूह आवरिला ॥२३५॥
नृपाचें आयुष्य अल्प उरलें । भागवत पाहिजे संपविलें । म्हणोनि समासें कथन केलें । पुढें बोलले तें ऐका ॥३६॥

दौहित्रायानिरुद्धाय पौत्रीं रुक्म्यददद्धरेः । रोचनां बद्धवैरोऽपि स्वसुः प्रियचिकीर्षया ॥
जानन्नधर्म तद्यौनं स्नेहपाशानुबंधनः ॥२५॥

श्रीकृष्णाचा बद्धवैरी । वपनें विटंबिला जो समरीं । ऐसा असतांही अंतरीं । भग्नीस्वकुमरीस्तव द्रवला ॥३७॥
कैसा द्रवला म्हणसी राया । तरी भगवंताची अगाध माया । जिणें मोहिलें जगत्त्रया । ते तत्कार्या प्रवर्तवी ॥३८॥
भगिनीचिया स्नेहादरें । कन्यह दिधली सप्रेमभरें । वैर असतांही सोयरे । ऐशा प्रकारें ते झाले ॥३९॥
रुक्मवतीचिये जठरीं । प्रद्युम्नवीर्यें जन्मला क्षत्री । अनिरुद्ध नामा अपर शौरि । जो अजिंक समरीं सुरासुरां ॥२४०॥
लावण्यरसाचा पुतळा । गुणगणमंडित यौवनकळा । प्रतापें तुळितां ज्याचिया बळा । शक्रही आगळा हों न शके ॥४१॥
रुक्मी ऐशा दौहित्रातें । नोवरा योजि स्वपौत्रीतें । रोचनेच्या लावण्यातें । समता चित्तें जाणोनी ॥४२॥
आपुल्या दौहित्राकारणें । पौत्री रोचना कलत्र करणें । एवं स्नेहाच्य अवतरणें । द्वेषाचरणें सांडवला ॥४३॥
अन्न न भक्षिजे द्वेष्ट्याचें । आपुलें त्यासी न दीजे साचें । हेंचि कारण अधर्माचें । जें उभयां स्नेहाचें सुहृदत्व ॥४४॥
उभयांमाजी द्वेष असतां । विवाहसंबंध तो अधर्मता । जाणत जाणत करूं जातां । विघ्नावर्तावर पडती ॥२४५॥
ऊर्ध्वगतीचे नाशकर । अपकीर्तिदायक लोकोत्तर । धर्मानुकूळही असतां चतुर । न होती तत्पर ते कर्मी ॥४६॥
तस्मात् रुक्मि भगवद्द्वेष्टा । परंतु भगिनीस्नेहाभीष्टा । भजूनि करितां सुहृदनिष्ठा । पावला कष्टा तद्योगें ॥४७॥
तें निरूपण येईल पुढें । ऐक वैवाहित रोकडें । ब्रह्मरेखा कवणा मोडे । भवितव्य घडे दैवबळें ॥४८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP