अध्याय ५९ वा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


ताः प्राहिणोद्द्वारवतीं सुमृष्टविरजोंऽबराः । नरयानैर्महाकोशान्नथाश्वान्द्रविणं महत् ॥३६॥

जाणोनि कृष्णाज्ञासंकेत । कुशला किंकरीं शतानुशत । कन्यका दास्यार्थीं भगदत्त । नियोजी समस्त पृथक्पृथक् ॥७१॥
जवादि केशर कस्तूरी उटणं । सुगंध तैलाभ्यक्त मूर्ध्नि । उष्णोदकीं मंगलस्नानीं । सुमृष्टगात्रा त्या केल्या ॥७२॥
वसनशाळेमाजील वसनें । अग्निधौतें विरजें नवीनें । कंचुकी उत्तरीयें परिधानें । सर्वांकारणें सुमृष्टें ॥७३॥
उघडोनियां नेपथ्यनिलयें । रत्नखचितें कर्बूरमयें । लेवविलीं यथान्वयें । पृथगवयवीं सुमृष्टें ॥७४॥
एवं सुमृष्टा विरजोऽम्बरा । सशत सहस्र षोडश दारा । शिबिकायानीं द्वारकापुरा । कमनीयतरा पाठविल्या ॥४७५॥
रत्नवैदूर्यमणींचे कोश । कनकमुद्रामय अशेष । भरूनि रथ गज क्रमेळ वृष । धाडी जगदीश त्यांसंगें ॥७६॥
अश्वरत्नें कुंजररत्नें । स्यंदनप्रमुखें विचित्रें यानें । मयनिर्मित दिव्याभरणें । द्वारके कृष्णें पाठविलीं ॥७७॥

ऐरावतकुलेभांश्च चतुर्दतांस्तरस्विनः । पाण्डुरांश्च चतुःषष्टिं प्रेषयामास केशवः ॥३७॥

क्षीरोदमथनोद्भव कुंजर । ज्यावरी आरूढे पुरंदर । तद्वीर्यसंभव संततिप्रवर । जवें समीर समतेचें ॥७८॥
पयःफेनपाण्डुरवर्ण । चतुर्दंतविराजमान । शुंडा लंबाळ त्रिवळीपूर्ण । छायाविहीन देदीप्य ॥७९॥
ते चौसष्टी स्वर्गभूषण । सालंकृत सपल्ल्याण । कृष्णें द्वारके दिव्य वारण । रत्नें भरून पाठविले ॥४८०॥
नाना शस्त्रास्त्रसमृद्धि । अनर्घ्य वस्तु अनर्घ्य विधि । मनुष्यलोकीं कोणीं कधीं । देखिलिया नायकिलिया ॥८१॥
भगदत्त विरक्त भगवत्प्राण । सर्व समृद्धि समर्पून । संतुष्ट केला भामारमण । अनन्य शरण होत्साता ॥८२॥
प्राग्ज्योतिषपुरींचा नृप । भद्रीं स्थापूनि भगदत्त भूप । कृष्णें ठाकिलें त्रिविष्टप । सुरपादपहरणार्थ ॥८३॥
निरसावया निर्जराधि । त्यांची प्रकटावया कृतघ्नबुद्धि । अमर जिंकावया युद्धीं । गेला त्रिशुद्धी तें ऐका ॥८४॥

गत्वा सुरेंद्रभवनं दत्वाऽदित्यै च कुण्डले । पूजितस्त्रिदशेन्द्रेण सहेंद्राण्या च सप्रियः ॥३८॥

जाऊनियां शक्रसदना । आह्लाद केला संक्रंदना । नमिलें अदितिमातृचरणा । सत्यभामे समवेत ॥४८५॥
दिव्य कुंडलें भौमापहृतें । आणोनि समर्पिलीं मातेतें । देखोनि आल्हादभरित चित्तें । आशीर्वचनें त्या दिधलीं ॥८६॥
सपादशतायुर्वैभव । भोगी त्रैलोक्यविजयविभव । भामासौभाग्यसलिलें प्रवाहो । सुरनिम्नगा चिरकाळ ॥८७॥
शक्रें नेवोनि भद्रासनीं । सत्यभामेसीं चक्रपाणि । सवें घेऊनि इंद्राणी । पादार्चनीं प्रवर्तला ॥८८॥
कनककुम्भ कुंभस्तनी । धरूनि जळ ओती इंद्राणी । महर्षि सजीव मंत्रपठनीं । सामगायनीं देवर्षि ॥८९॥
परिधान करवूनि कनकवसनें । रत्नखचितें दिव्याभरणें । दिव्यगंधें विलेपनें । स्वर्गसुमनें समर्पिलीं ॥४९०॥
उधळूनि सुगंधचूर्णरोळा । दिव्यावतंस सुमनमाळा । धूप दीप चरणकमआळ । उजळूनि केला जयगजर ॥९१॥
अमृत ओगरिलें नैवेद्या । सुरसा फळादि पदार्था मेध्यां । सुरवरसेव्यां खाद्या हॄद्यां । विधिहरवंद्या समर्पिती ॥९२॥
सर्वस्वदानें अनन्यदास । होवोनि नमिला श्रीनिवास । नीराजनादि मंगळघोष । मंत्रपुष्पें समर्पिलीं ॥९३॥
स्तुतिस्तवनें प्रदक्षिणा । करूनि निर्जर लागती चरणां । म्हणती रक्षिलें अमरभुवना । भौमा दुर्जना वधूनियां ॥९४॥
शचीनें सत्यभामा हातीं । धरूनि स्वसदनीं एकान्तीं । नेवोनि पूजिली यथानिगुती । सप्रेमभक्ती गौरविली ॥४९५॥
समर्पूनि स्वसंपत्ति । म्हणे धन्य तूं ये त्रिजगतीं । सुकृतें वरिला जगत्पति । अमर सेविती तच्चरणा ॥९६॥
घेऊनि निर्जरवरसम्मान । सत्यभामेसीं भगवान । खगेन्द्रपृष्ठीं आरोहण । करूनि गमना आदरिलें ॥९६॥
द्वारके निघतां श्रीगोपाळा । बोलिली सत्राजिताची बाळा । पार्यातग्रहणीं विसर पडला । तो घेतला पाहिजे ॥९८॥
हरि म्हणे घेतां कल्पद्रुम । विक्षेप मानील अमरोत्तम । घडेल अमरेंसीं संग्राम । त्यांसीं विक्रम केंवि घडे ॥९९॥
ऐकोनि हांसिली सत्यभामा । निर्जर कांपती ज्याचिया नामा । क्षणार्धें मारिलें तया भौमा । किमर्थ आम्हां भेडविसी ॥५००॥
अवश्य कीजे पार्यातहरण । अमरेंसीं मी करीन रण । ऐकोनि सत्यभामेचें वचन । श्रीभगवान हांसिला ॥१॥

नोदितो भार्ययोत्पाट्य पारिजातं गरुत्मति । आरोप्य सेंद्रान्विबुधान्निर्जित्योपानयत्पुरम् ॥३९॥

प्रेरिला भार्येनें होत्साता । नंदनवनीं प्रवेशतां । रक्षक वारिती भगवंता । म्हणती अनुचिता न करावें ॥२॥
इंद्राणीचें हें उपभोगवन । न करवे कोण्हा अवलोकन । बळात्कारें रिघतां पूर्ण । सद्यः शासन पावाल ॥३॥
ऐकोनि हांसिली सत्यभामा । इंद्राणीची कायसी गरिमा । मी पढियंती मेघश्यामा । माझिया नामा तीसि वदा ॥४॥
इंद्रमानिनी या अभिमानें । गौण मानिसी तिन्ही भुवनें । मी कृष्णाच्या वालभगुणें । नाणीं गणने तुजलागीं ॥५०५॥
ऐसें बोले जंव सत्यभामा । तंव आवेश आला पुरुषोत्तमा । उत्पाटूनियां कल्पद्रुमा । विहंगोत्तमा वोळंघला ॥६॥
रक्षकीं केला हाहाकार । म्हणती नेला सुरतरुवर । ऐकोनि क्षोभला पुरंदर । अमरभार उठावले ॥७॥
वसु पातले समरक्षिती । पावकनामा यूथपति । तेणें हाकिला श्रीपति । सैन्यसंपत्तिसमवेत ॥८॥
विष्णुनामा आदित्य दळीं । तेणें हांकिला वनमाळी । खट्वाङ्गपाणि रुद्रमंडळीं । शंकरनामा लोटला ॥९॥
सिद्ध साध्य चारण यक्ष । चित्ररथादि गंधर्वमुक्ष । किन्नर मरुद्गण किम्पुरुष । लोटली अशेष देवचमू ॥५१०॥
त्यानंतरें लोकपाळ । आपुलालें सज्जूनि दळ । ऐसी सुरसेना तुंबळ । मिळूनि गोपाळ वेष्टिला ॥११॥
गुह्यकपति द्रविणपति । कुबेर उत्तरेचा दिक्पति । गदा पडताळूनियां हातीं । तेणें श्रीपति पाचारिला ॥१२॥
विजयध्वजींचें व्याख्यान । सत्यभामेनें धनुष्यबाण । घेऊनि धनदेंसीं दारुण । केलें रण शस्त्रास्त्रीं ॥१३॥
सत्यभामेनें समराङ्गणीं । कुबेर भंगिला अर्धक्षणीं । गरुडें वरुण संत्रासूनी । रणमेदिनी सांडविली ॥१४॥
हें देखोनि परमाश्चर्य । हास्य करूनि वृष्णिधुर्य । भंगिता झाला निर्जरनिचय । कक्षप्राय पावकवत् ॥५१५॥
तिये समयीं पावक पवन । पिशाचसैन्येंसीं ईशान । दण्डपाणि कुणपासन । मिळोनि भगवान पडखळिला ॥१६॥
शार्ङ्ग सज्जूनि शार्ङ्गपाणि । त्यांचीं शस्त्रास्त्रें तोडूनी । सर्वही भंगिले समराङ्गणीं । पाठी देऊनि पळाले ॥१७॥
तिये समयीं पुरंदर । पालाणूनि सुरकुंजर । करें पडताळूनियां वज्र । समयीं श्रीधर पाचाली ॥१८॥
वज्र हाणितां खगेश्वरा । तेणें लाघवें चमत्कारा । करूनि त्रासिलें सुरकुंजरा । चंचुप्रहारा करूनियां ॥१९॥
कृष्णें परजूनि सुदर्शन । अमरेंद्राचे घ्या रे प्राण । तंव बहस्पतीनें करूनि स्तवन । निजयजमान वांचविला ॥५२०॥
मग बद्धाञ्जळि नम्र मौळें । लक्षूनि कृष्णाचीं पदकमळें । अष्टभावीं सहस्र डोळे । सप्रेम जळें गळताती ॥२१॥
म्हणे जय जय जगदीश्वरा । आम्हां कृतघ्नां पामरां । कृपेनें देऊनि अभयकरा । रक्षिसी अमरां निज दासां ॥२२॥
अमरेंद्रत्वाचा अभिमान । यास्तव गोकुळीं केलें विघ्न । तैं त्वां धरूनि गोवर्धन । गर्व भंगूनि लाजविलें ॥२३॥
त्रिदशमंडळीं पावलों तपा । तैं त्वां पुढती करूनि कृपा । रक्षिलें असतां सुरपादपा - । निमित्त आतां विरोधिलें ॥२४॥
सर्वापराध करूनि क्षमा । कृपावत्सला पुरुषोत्तमा । दासांमाजी कृतघ्नां अधमां । रक्षिजे आम्हां मातृवत् ॥५२५॥
मातृगर्भींचे क्लेश नाना । विशेष प्रसूतिसमयीं जाणा । बाल्यावयवसंरक्षणा । पुत्र कृतघ्नासम विसरे ॥२६॥
तथापि करुणावत्सल माता । सहसा न करी पुत्रघाता । तेंवि आम्हां स्वजठरस्थां । विभो समर्था रक्षावें ॥२७॥
ऐसें ऐकोनियां वचन । कृपेनें द्रवला जनार्दन । म्हणे त्यां त्यजिलिया मृत्युभुवन । दुम घेऊन येइजे ॥२८॥
इंद्र म्हणे माझा कुमर । त्रितीय पाण्डव तव किंकर । तो रक्षिजे हें वारंवार । जोडोनि कर प्रार्थितसें ॥२९॥
हें ऐकोनि म्हणे हरि । तद्विषयीं तूं चिंता न करीं । सख्य करूनि प्राणांपरी । रक्षीन समरीं मी त्यातें ॥५३०॥
इंद्रादि अमरां विसर्जून । भामा सद्रुम जनार्दन । खगेंद्रारूढ रत्नाभरण । द्वारकाभुवन पातला ॥३१॥
असो ऐशी पुराणान्तरीं । कथा बोलिली बहु विस्तारीं । येथ संकेतें शुकवैखरी । मुकुरापरी बीजवत् ॥३२॥
ऐकोनि भार्येचें उत्तर । उत्पाटूनि सुरतरुवर । गरुडीं वाहूनि सामर इंद्र । जिंकूनि सत्वर स्वपुरा ने ॥३३॥
म्हणाल नेऊनि लाविला कोठें । तेंही परिसा श्रवणपुटें । वदलें शुकाचें मुखवटें । तेंचि गोमटें वाखाणूं ॥३४॥

स्थापितः सत्यभामाया गृहोद्यानोपशोभनः । अन्वगुर्भ्रमराः स्वर्गात्तद्गंधासवलंपटाः ॥४०॥

प्रत्यय उपजे अंतःकरणीं । तंववरी फेडिली शिराणी । सत्यभामा वरिष्ठ राणी । चक्रपाणिप्रियललना ॥५३५॥
सत्यभामेच्या गृहोद्यानीं । कल्पतरु लाविला यत्नीं । ज्याच्या सौरभ्या वेधूनी । आले स्वर्गौनि सुरभ्रमर ॥३६॥
निष्कुट म्हणजे गृहोद्यान । पार्यातकुसुमीं सौरभ्यपूर्ण । तेणें अत्यंत शोभायमान । भामाभुवन दिविसाम्यें ॥३७॥
इंद्रें सहित निर्जरपंक्ति । जिणोनि पार्यात आणिला क्षिती । हें ऐकोनि परीक्षिति । उदित चित्तीं प्रश्नार्थ ॥३८॥
अहो इंद्रें भाकूनि करुणा । कृष्ण पार्थिला स्वार्थसाधना । तो कार्यार्थ साधूनि दिधल्या जाणा । कीं कीजे कदना तेणेंसीं ॥३९॥
ऐसी सुरांची कृतघ्नता । भासली परीक्षितीच्या चित्ता । तो अभिप्राय सर्वज्ञ वक्ता । बोले तत्त्वता शुक योगी ॥५४०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP