अध्याय ५८ वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


नान्यं पतिं वृणे वीर तमृते श्रीनिकेतनम् । तुष्यतां मे स भागवान्मुकुंदोऽनाथसंश्रयः ॥२१॥

झणें हा म्हणेल मातेंचि वरीं । यालागिं पहिलेंचि निरुत्तर करी । जे मी वांछितें वर श्रीहरि । त्यावीण न वरीं त्रैलोक्यीं ॥३२॥
म्हणसी हरि हें बहुतांसि नाम । तरी ज्याचे हृदयीं श्रीवत्सलक्ष्म । ममाभीष्ट तो पुरुषोत्तम । हा दृढ नेम मम हृदयीं ॥३३॥
म्हणसी दुर्लभ त्याची प्राप्ति । केविं तूं वरिसी तयाप्रति । तरी अनाथसंश्रय तो श्रीपति । माझी आर्ति पुरवील ॥३४॥
तूं तेथ करिसी अनुष्ठान । तो वैकुंठीं विराजमान । त्यापें जाऊनि सांगेल कोण । ऐकें वचन यदर्थीं ॥१३५॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न हरि । वसे सर्वांच्या अभ्यंतरीं । ज्याची व्याप्ति सचराचरीं । तो मजवरी संतोषो ॥३६॥
स्वभक्ताचे निरसूनि कष्ट । कृपेनें पुरवी तदभीष्ट । यालागिं मुकुंद नाम हें स्पष्ट । पढती श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥३७॥
कोण तूं म्हणोनि तुवां पुशिलें । तरी तेंही कथितें परिसें वहिलें । चातुर्य देखोनि अर्जुनें केलें । आश्चर्य आपुले हृत्कमळीं ॥३८॥

कालिंदीति समाख्याता वसामि यमुनाजले । निर्मिते भवने पिता यावदच्युतदर्शनम् ॥२२॥

कालज्ञापक माझा पिता । कालिंदी मी त्याची दुहिता । कालिंदी या नामें ख्याता । जाण तत्त्वता मजलागीं ॥३९॥
पित्यानें यमुनेचिया सलिलीं । मंदिररचना मदर्थ केली । तेथ वसोनि सर्वकाळीं । नियमें चाळीं तपश्चर्या ॥१४०॥  
कोण काळवरी वससी येथें । ऐसें तूं जरी पुसरी मातें । तरी अच्युतदर्शन जालिया त्यातें । वरूनि सांगातें जाईन ॥४१॥
ऐसीं कालिंदीचीं वचनें । ऐकोनि अर्जुन निवाला मनें । मग तो स्वमुखें हरिकारणें । कथिता जाला तें ऐका ॥४२॥

तथाऽवद्द्गुडाकेशो वासुदेवाय सोऽपि ताम् । रथामारोप्य तद्विद्वान्धर्मराजमुपागमत् ॥२३॥

जैसी लिखित पत्रिका पढतां । पर्याय पालटूं न शके वक्ता । तैसेंचि अर्जुनें श्रीभगवंता । कथिलें तत्त्वता तदुदित जें ॥४३॥
तोही ऐकोनि अर्जुनवाणी । तद्वृत पूर्वींच चक्रपाणि । सर्व जाणता अंतःकरणीं । त्याची करणी अवधारा ॥४४॥
रथ लोटूनि घडघडाट । जाऊनि यमुनासलिलानिकट । कालिंदीचें यथाभीष्ट । केली उपविष्ट रहंवरीं ॥१४५॥
शंतम हस्तें करग्रहण । करूनि घेतली उचलून । रथावरौती आरोपून । निघे भगवान इंद्रप्रस्था ॥४६॥
भगवंताच्या करस्पर्शें । हृदयीं कालिंदी संतोषे । तया सुखासि तुलना असे । विधिही ऐसें वदों न शके ॥४७॥
पहातां श्रीकृष्णाचें वक्त्र । कालिंदीचे निवाले नेत्र । त्रैलोकविभवा जाली पात्र । फावली स्वतंत्र विश्रांती ॥४८॥
मग विलोकी चरणांकडे । रथीं मौनस्था न बोले तोंडें । हृत्कमळींच्या सुखसुखवाडें । प्रेम वोसंडे सर्वांगीं ॥४९॥
कालिंदीचा हर्षोत्कर्ष । वर्णूं न शके विरिंचि शेष । असो यानंतर आदिपुरुष । इंद्रप्रस्थास चालिला ॥१५०॥
भास्करभ्रमणें वय वोसरें । तैसाचि मार्ग क्रमूनि त्वरें । धर्मराजाप्रति स्नेहसुभरें । येता जाला श्रीभगवान् ॥५१॥
सेवक धांवोनि कथिती पुढें । कृष्णलावण्यगुणपरिपाडें । कन्या जोडली कनकीं ठिकडे । जेविं जिडे पाचूचे ॥५२॥
हें ऐकूनि धर्मराज । सभीम माद्रीचे आत्मज । परमाह्लादें नाचती भोज । जाणोनि भाज हरियोग्य ॥५३॥
हर्षें सामोरे धांवती । स्थळोस्थळीं बळी सांडिती । विविध द्रव्यें कुरवंडिती । तेणें वारिती दृग्दोष ॥५४॥
अनेक वाजंत्रांचिया ध्वनि । घाव घातला पैं निशाणीं । परमोत्साहें चक्रपाणि । राजसदनीं प्रवेशला ॥१५५॥
शिबिकारूढ येऊनि कुंती । नेली कालिंदी आतौती । पाहोनि लावण्य अवयवकांति । सदैव म्हणती हरिरमणी ॥५६॥
इचिया सुकृता नोहे सीमा । जिणें वरिलें पुरुषोत्तमा । उभयतांची लावण्यगरिमा । अयोग्य ब्रह्मा कथावया ॥५७॥
मा इतरांचा पाड किती । नर सुर किन्नर मंदमति । मुनिवर तेही अल्पसुकृती । केंवि अवगमिती भगवंता ॥५८॥
असो धर्माच्या अंतःपुरीं । द्रौपदीप्रमुख समस्त नारी । कालिंदीची सौभाग्यथोरी । सौंदर्यकुसरी प्रशंसिती ॥५९॥
यावरी श्रीकृष्ण सभास्थानीं । धर्मराजाच्या सन्निधानीं । बैसले असतां पाण्डवीं वचनीं । विनंति केली ते ऐका ॥१६०॥

यदैव कृष्णः संदिष्टः पार्थानां परमाद्भुतम् । कारयामास नगरं विचित्रं विश्वकर्मणा ॥२४॥

जेव्हां पाण्डवीं संप्रार्थिला । अघटितघटनापटीचा दाद्ला । तेव्हांचि आज्ञापिता जाला । विश्वकर्म्याला संकेतें ॥६१॥
पार्थ पाची पाण्डुकुमर । त्यांचें अद्भुत विचित्रतर । करविता जाला शाङ्गधर । जें अमरेंद्रपुर भूलोकीं ॥६२॥
विश्वकर्मा जो देवशिल्पिक । तेणें कृष्णाज्ञेस्तव सम्यक । विचित्र नगर रचिलें देख । निर्जरलोकतुळणेचें ॥६३॥
सर्व सौकर्यें जिये ठायीं । चिंता हृद्रोगव्यथा नाहीं । अमरेंद्रासम पाटव देहीं । प्रज्ञाविजयीं गीष्पतिवत् ॥६४॥
पाण्डवांसहित पापान्तक । तेथ वसोनि मन्मथजनक । करिता जाला जें कौतुक । तें तूं नावेक अवधारीं ॥१६५॥

भगवांस्तत्र निवसन्स्वानां प्रियचिकीर्षया । अग्नये खाण्डवं दातुमर्जुनस्याऽऽस सारथिः ॥२५॥

स्वजनांचिये प्रीतीकरून । वसवीत होत्साता तें सदन । कांहीं एक महत्कारण । लक्षूनि भगवान स्थिरावला ॥६६॥
श्वेतकिरायाचिये अध्वरीं । घृतावदानें पावका जठरीं । आमय जाला तत्परिहारीं । जाऊनि विचारी दुहिणातें ॥६७॥
तेणें ऐकोनि तत्प्रार्थना । पावक प्रेरिला खाण्डववना । तें जाणवतां संक्रंदना । वर्षोनि घना तो विझवी ॥६८॥
तेणें श्रमला हुताशन । पुढती प्रार्थिला चतुरानन । मग त्या देऊनि आश्वासन । गुह्य कारण प्रबोधिलें ॥६९॥
नरनारायण महारथी । त्यांतें भेटोनियां एकांतीं । विप्रवेषें भेषज प्रार्थी । ते तव आर्ती परिहरिती ॥१७०॥
तो येणार आपुले भेटी । भावी जाणोनि हे जगजेठी । खाण्डवप्रस्थीं अर्जुना निकटीं । सुखसंतुष्टी स्थिरावला ॥७१॥
विप्रवेषें हुताशन । अर्जुना प्रार्थील पैं येऊन । आपण सारथि तैं होऊन । खाण्डव अर्पण त्या करणें ॥७२॥
निरतिशय ऐश्वर्यवंत । म्हणाल अचिंत्यगुण भगवंत । स्वयें द्यावया तो असमर्थ । किमर्थ सारथ्य अवलंबी ॥७३॥
तरी पार्थ आपुली अपरमूर्ति । वाढवावया तद्यश कीर्ति । खाण्डवा अर्पितां अग्निप्रति । स्वयें सारथि हरि होय ॥७४॥
खाण्डव भक्षूनि हुताशन । नीरुज होऊनि सुप्रसन्न । गाण्डीव धनुष्य दिव्य स्यंदन । अक्षय इषुधि अर्पील ॥१७५॥
तेथ रक्षितां मयासुर । तो इच्छून प्रत्युपकार । निर्मूनि देईल सभागार । सुधर्मा अपर भूलोकीं ॥७६॥
एवं सखयाच्या लाभासाठीं । सारथ्य करी धरूनि काठी । तथापि ऐश्वर्या नोहे तुटी । त्रैलोक्यमुकुटीं मिरवतसे ॥७७॥
असो ऐसी संभावना । इंद्रप्रस्थीं कृष्णार्जुना । क्रीडत असतां हुताशना । येतां समय जाणोनी ॥७८॥
कृष्णें सज्ज केला रथ । आरूढोनियां पार्थासहित । मृगयाव्याजें निघाले त्वरित । खाण्डवप्रांत अधिष्ठिला ॥७९॥
तंव अकस्मात हुताशन । भेटला विप्रवेशें येऊन । याचितां तयासि खाण्डववन । केलें अर्पण गदहरणा ॥१८०॥
इंद्र निवारी वर्षोनि घना । पावक जाणवी कृष्णार्जुना । तिहीं देऊनि अभयदाना । शरसंधाना आदरिलें ॥८१॥
द्वादश योजनें गगना आंत । अभेद्य मंडप शरनिर्मित । निर्मूनि पर्जन्य वारिला त्वरित । पावकें स्वस्थ वन ग्रासिलें ॥८२॥
अस्त्रीं शस्त्रीं करूनि युद्ध । भंगूनि अमरेंद्र सुरासुर क्रुद्ध । अर्जुनरूपें धनुर्वेद । जातवेदा संतर्पी ॥८३॥
तेथ जळतां मयदानव । तेणें स्तविले कृष्णपाण्डव । तेव्हां अवलंबूनियां कींव । रक्षिला जीव तयाचा ॥८४॥
असो पावकरोगनिवृत्ति । जालिया येऊनि उभयांप्रति । प्रार्थूनि केली प्रत्युपकृति । ते तूं भूपति अवधारीं ॥१८५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP